जखमा आणीबाणीच्या

एखादी संस्था किंवा व्यक्तीच्या आयुष्यातील आलेल्या संकटांच्या  काही जखमा आयुष्यभर त्रास देत राहतात. संस्थेच्या आयुष्यातील  जखमा कार्यकर्ते मिळून भरून काढतात पण वैयक्तिक आयुष्यात  ज्याचे  त्यालाच सोसावें लागते. आणीबाणीत झालेल्या अत्याचारांना तोंड देत कांही संघ कार्यकर्ते सावरले. पण काहींच्या नोकऱ्या गेल्या, कायमची आजारपण आली, काहींनी आपले आधारच गमावले होते, कित्येक व्यावसायिक  आयुष्यभरात उभे राहू शकले नाही. त्यांच्या या करूण  कथा. 

मी त्या काळात  जळगाव जिल्ह्यात असल्याने जास्त माहिती तेथील आणि नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध असल्याने  महाराष्ट्रातील काही माहिती देऊ शकलो आहे .पण अशा घटना देशभरातील आहेत.  माझ्यापेक्षा अनेकांजवळ अधिक माहिती असण्याची शक्यता आहे.   

आमचे जळगावचे बाळासाहेब झारे. संघाच्या छोटया  मोठ्या जबाबदार्या  सांभाळत. पण  स्वतःचा टायपिंग क्लास असल्याने संघाचा एखादा र्पोलिसांना  द्यावयाचा अर्ज तेच टाईप करून  पोलीस स्टेशनला देऊन ही येत. त्यामुळे संघचालकांच्या नंतर पोलिसांना संघ माहित होता तो बाळासाहेब झारे या नावाने. 

तर या झारेंचा विवाह संपन्न होऊन ते घरी आले. सत्यनारायण विधीची तयारी सुरु होती. देवदर्शनासाठी जाण्याचे बेत आखले जात असतील.  तेवढ्यात चार पाच पोलीस घरात आले व सांगू लागले बाळासाहेबांना झारेंना पोलीस स्टेशनवर बोलावले आहे. कशासाठी वगैरे माहिती ते सांगायला तयार नव्हते. तिथे गेल्यावर त्यांना सांगण्यात आले की देशांत आणीबाणी लागू झाली आहे आणि तुम्हाला मिसाखाली अटक करण्यात आली आहे.

आपण कल्पना करू शकतो की  जिला लग्न करून घरी आणले आहे. जिचा नीट परिचयही झाला नाही निरोप देखील घेता आला नाही तिला आणि वयस्कर मातापित्यांना सोडून  जावे लागले ते थेट २१ महिने... हा जो मानसिक त्रास त्यांना झाला त्यामुळे झारे वहिनी फार लवकर  मेंदूच्या विकाराने तीन लहान मुलांना मागे ठेऊन वर गेल्या बाळासाहेबांनी  विस्कटलेला टायपिंग क्लास व या मुलांना आयुष्यभर सांभाळले.

भुसावळच्या आमच्या मांडे वाहिनी स्वतःचे मोठे घर असूनही लहान बाळाला घेऊन स्टेशन जवळ एका हॉटेलच्या मागच्या बाजूला भुसावळ सारख्या भट्टी असलेल्या  वातावरणात उन्हाळ्यात एका पत्र्याचे शेड असलेली खोलीत दिवस काढावे लागले. 

धरणगावचे वीर विक्रम जोशी,  आपल्या जिल्ह्या कार्यकर्ते सुधाकर जोशींचा मुलगा, जळगावहून धरणगावला  रात्रीच्या  वेळी मोटार सायकलने पत्रके घेऊन जात असतांना  एका ट्रकने  त्याला  चिरडले. वडील आधीच आत होते. त्यात तरुण मुलाचे असे झाले. त्या धक्क्याने त्या माऊलीचे हास्य कायमचे गमावले. 

आणिबाणीपूर्वी जळगावला तिघे सिंधी समाजाचे कार्यकर्ते संघाचे काम खूप जोशात करीत. त्यांना १६ महिने मिसात ठेवले. तिघांचेही व्यवसाय उध्वस्थ झाले. एका कार्यकर्त्याचा मोठा व्यवसाय पूर्ण बसला. तो वेडा  झाला व त्याच अवस्थेत गेला. बाकी दोघे व्यवसाय, स्थान बदलत  अजून झगडताहेत.

एकेक घरातील दोघे, तिघे बंधू आत टाकून त्यांच्या नोकऱ्या व्यवसाय विस्कटण्याचे पाप त्या जुलमी सरकारने केले. जळगावचे कलभंडे तिघे बंधू आत गेले त्यांची वडिलांपासून चालत आलेली आयकर सल्लागाराची प्रॅक्टिस पूर्णपणे विस्कटली. कोपरगावचे बडदे, तिघे  बंधू आत होते  व्यवसाया शेतीचा. गावात असतांनाही जरा शेतीकडे दुर्लक्ष झाले तर शेतीचा बोजवारा वाजतो त्यातून डीड वर्ष हे बंधू आत असतांना शेतीचे काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी.

एकेका  घरातील एका भावाने सत्याग्रह केला मग दुसऱ्यालाही मिसा लागला. अशीदेखील कितीतरी उदाहरणे आहेत. ज्यांना काही आधार नव्हता त्यांना कांही स्वयंसेवकांनी खूप अडचणीत व धोका पत्करीत मदत केली. सर्वात कौतुक अशा महिलांचे करावे लागेल की ज्यांनी आपल्या घरच्या अडचणी बाजूला ठेऊन कारागृहात असलेल्या स्वयंसेवकांच्या घरी जाऊन  त्याच्या पाठीशी उभ्या राहिली.  

यापेक्षाहि अनेक घटना आहेत / असतील पण काही प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांनी जे सहन केले ते आजच्या पिढीला माहीत व्हावे यासाठी हा  छोटासा प्रयत्न.

- प्रदीप केतकर, नाशिक

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या