युद्धाचा विषय येताच नमती भाषा का सुरू होते?
याचे सांगोपांग स्पष्टीकरण करणारी लेखमाला.
भाग १ - शांतता दूत की चिनी हस्तक?
सध्या भारत चीन संबंधाने देशात वातावरण तापले आहे. भारत-पाकिस्तान विवाद विषय तर नित्याचे आहे. परंतु जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा युद्ध म्हणून चर्चा सुरू होते तेव्हा विशिष्ट लोक भारताला सबुरीचा सल्ला देऊन कमी का लेखतात, असा प्रश्न अनेकांच्या मनाला स्पर्शून जात असेल यात शंका नाही.
भारताचे शस्त्र, सैनिक संख्या, आर्थिक संकट, देशांतर्गत परिस्थिती यासोबतच शत्रू राष्ट्र आपल्यापेक्षा कसे बलशाली आहे हे दाखविण्याचा तथाकथित बुद्धिवादी प्रयत्न वारंवार करत असतात. आपण या कडे फार समजूतदार भूमिका म्हणून बघत असतो, परंतु दुसऱ्या बाजूने विचार करू गेल्यास भारताला सतत नमतं घेण्यासाठी एक विचारवंतांची फौज कायम सक्रिय असलेली आपल्याला पाहायला मिळते.
सध्या भारत चीन दरम्यान गलवान खोऱ्यातील घटनेमुळे वातावरण तापले आहे. या परिस्थितीत भारत चीन युद्ध या विषयावर चर्चा सुरू झाली आणि चीन भारतापेक्षा कसा शक्तिशाली आहे हे दाखवले जात आहे. यामध्ये काही विशिष्ट व्यक्तींप्रमाणे मीडियाचा सहभाग आहेच. देशातील छुपे साम्यवादी, कथित पुरोगामी व शहरी नक्षलवादी यांच्या फौजेचा सामना आपल्याला वारंवार करावा लागतोय. शत्रूशी प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी आपल्याला देशातील विशिष्ट मंडळींशी तात्विक, वैचारिक युद्ध खेळावं लागत आहे. याच्या पुनरावृत्तीला सीमा नाही. मत मतांतरे असू शकतात, त्यात दुमत नाही. परंतु विशिष्ट (काही अदृश्य) चेहऱ्यांची एककल्ली भूमिका साशंकता निर्माण करत राहते.
युद्धाची चर्चा सुरू झाल्याबरोबर आपल्याला शत्रू राष्ट्रांकडे असलेले अणूबॉम्ब, त्याची वायू दल संपदा, युद्ध विमाने, तोफा यापासून चीनच्या सैनिकांची संख्या सांगायला सुरुवात होते. आज अगदी लहान मूल सुद्धा चीन आणि पाकिस्तानकडे असलेल्या आण्विक शक्तीविषयी सहज बोलून जातं. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि तो भारतावर टाकला म्हणजे देश संपलाच समजा असा अनेक सुशिक्षित लोक सुद्धा विचार करतात. गल्ली, कट्ट्यावरील चर्चेत युद्ध नको म्हणून नकळत ते आपली बाजू मांडत असतात. शत्रू विषयी समजूतदारपणाच्या वेष्टनात भीती कशाप्रकारे लोकमनात रुजवली जाते हे त्याचं उदाहरण.
जगातील सर्वात मोठे सैन्य दल चीनकडे आहे म्हणून काय झालं? युद्ध सुरू होते तेव्हा सर्व सैन्य युद्धात उतरत नसतेच मुळी. ठराविक तुकड्यामंध्ये युद्ध होत असते. एखाद्या राष्ट्राकडे मोठं सैन्य दल आहे म्हणून तुलनेत लहान सैन्य दल असलेल्या राष्ट्रांनी आपली हार अगोदरच मानून घ्यायची असते का? असे असते तर तैवान आणि व्हिएतनाम सारख्या लहान राष्ट्रांनी चीनला लोळवले असते? 1967 मध्ये नथुला खिंड युद्धात भारताने चीनला मात दिली आहे हे आपले शौर्य का दडवले जाते? त्यामागे सुनियोजित अजेंडे आहेत. अन्यथा मूठभर मावळ्यांनी मुघलांचा कसा धुव्वा उडवला हा गौरव इतिहास तर आपण नित्याने वाचत असतो, सांगत असतो. मग वर्तमान परिस्थितीत शत्रूची संख्या पाहून आपण का बिचकतो?
1949 आणि 1951 मध्ये दोनवेळा तैवान ने चीनला सपाटून मार दिला आहे. 1979 मध्ये व्हिएतनामकडून चीन पराभूत झाला आहे. चीन लहान राष्ट्रांना केवळ सैन्य दलाच्या संख्येची भीती घालून मनाने कमजोर करू पाहतो. केवळ पैश्याच्या आणि विश्वासघाताच्या जोरावर चीन शत्रू राष्ट्राला शह देत असतो. भारतापुढे चिनी सैन्य फारच कमजोर आहे. नुकत्याच गलवान येथील घटनेत भारताच्या एकेका जवानाने चार ते पाच चिनी सैनिकांचा सामना केला आणि 43 हुन अधिक चिनी सैनिक यमसदनी धाडून जो पराक्रम केला ते याचं जिवंत उदाहरण आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये.
बलाढ्य हत्तीला वारंवार साखळदंडाला बांधून ठेवले की त्याला त्याच्या शक्तीचाच विसर पडू लागतो. आणि एक दिवस असा येतो की हत्तीच्या पायात साखळदंड नसतानाही तो प्राणी जागचा हलत नाही. हाच विचार आज देशात पसरविला जातोय. त्यामागे जगासाठी घातक असलेल्या कम्युनिस्ट शक्तीचा हात आहे. अश्या शांतता दूतांना खरेच भारताची काळजी आहे की चिनी अजेंडे पोसण्याची तयारी असा प्रश्न पडतो. त्यामुळे घडणाऱ्या घटना, प्रसंग विशिष्ट विचारांची येणारी लाट याकडे नागरिक म्हणून डोळसपणे पाहावे लागणार आहे.
(चीनने आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी देशभरात त्याचे हस्तक पेरले आहेत. ते असतात आपल्याच अवतीभोवती पण दिसत नाही. याचीच माहिती "चिनी हस्तक व कम्युनिस्ट अजेंडे" या पुढील भागात अवश्य वाचा.)
- कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
8 टिप्पण्या
आपल्या देशात लगेच काही सो कॉल्ड सुशिक्षित (जे सुज्ञ नसतात) त्यांना शांततेची आठवण येते.