राममंदिर ते राष्ट्रमंदिर: पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची विशेष मुलाखत..


 
शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर रामजन्मभूमी मुक्त झाली, कोट्यावधी हिंदूंची स्वप्नपूर्ती झाली, आता काशी आणि मथुरेच्या मुक्तीसाठी आंदोलन होणार का?, अयोध्येतील भव्य राममंदिर केवळ पूजाकर्तेपुरते मर्यादित असेल की यामध्ये अधिक व्यापक, राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने विचार करण्यात आला आहे, 'आत्मनिर्भर भारता'साठी देशाचे मार्गक्रमण कशाप्रकारे व्हावे? राष्ट्रउभारणीत मुस्लिम, ख्रिश्चन व अन्य उपासना पंथांच्या धर्मप्रमुखांची भूमिका काय असावी? या संवादासाठी संघ परिवार काय प्रयत्न करत आहे? राष्ट्रजागरणासाठी धार्मिक शिक्षण आवश्यक आहे का, संघाचे याबाबत मत काय?  या व अशा असंख्य प्रश्नांवर पू. डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केलेले समर्पक व दिशादर्शक विचार सा. विवेकच्या आगामी 'राममंदिर ते राष्ट्र मंदिर' या ग्रंथानिमित्त  घेतलेल्या मुलाखतीत...  
  
प्रश्नः संपूर्ण हिंदू समाजासाठी 5 ऑगस्ट 2020 हा एक अभिमानाचा दिवस होता. अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या उभारणीचा संकल्प घेऊन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यामुळे आता रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन संपले आहे, अशी चर्चा ऐकू येत आहे. तेव्हा हा प्रभू रामचंद्रांचा विषय संपला आहे का?

- राममंदिराचा शिलान्यास 1989 सालीच झाला होता. या 5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिरनिर्मितीच्या कामाचा शुभारंभ झाला. मंदिर उभारण्यासाठी तेथील भूमी ताब्यात मिळावी यासाठी आंदोलन चालले होते. सर्वोच्च न्यायालयाने यावर आपला निकाल दिला आणि त्यांच्या आदेशानुसार एक न्यास स्थापन करण्यात आला. या न्यासाकडे मंदिरनिर्मितीसाठी तेथील जमिनीचा ताबा देण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन संपले. पण प्रभु रामाचा विषय तर त्यांच्या काळापासून सुरू आहे आणि तो यापुढेही तसाच सुरू राहणार आहे. भारतातील फार मोठी लोकसंख्या त्यांना आपले दैवत मानते. जे लोक त्यांना आपले दैवत मानत नाहीत त्यांच्या दृष्टीनेही आदर्श आचरणाचा मानदंड स्थापन करणारे ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू रामचंद्र म्हणजे भारताच्या भूतकाळाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचबरोबर भारताच्या वर्तमानकाळावर आणि भविष्यकाळावर त्यांचा दीर्घकाळ प्रभाव राहणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे प्रभू रामचंद्र होते, आहेत आणि यापुढेही राहतीलच! मात्र मी श्री रामजन्म भूमी मुक्ती आंदोलनाचा विषय ज्या दिवशी न्यास निर्माण झाला त्याच दिवशी संपला.


प्रश्नः काशीविश्वनाथ मंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीमुक्ती ही आंदोलने भविष्यकाळात हाती घेण्यात येणार आहेत का?

- ते आम्हाला माहीत नाही. कारण आम्ही अशी आंदोलने चालवित नाही. श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचीही सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेली नाही; ते आंदोलन तर समाजाकडूनच फार पूर्वीपासून सुरूच होते. अशोकजी सिंघल हे विश्व हिंदू परिषदेत कार्यरत होण्याच्या पूर्वीपासून हे आंदोलन सुरू होते. विश्व हिंदू परिषदेने या आंदोलनात नंतर सहभाग घेतला. एका विशिष्ट परिस्थितीत आम्हीसुद्धा या आंदोलनाचा एक भाग बनलो. एखादे आंदोलन सुरू करणे हा काही आमचा अजेंडा नव्हे! संघ हा शांततामय मार्गाने समाजमनावर संस्कार घडविण्याचे काम करतो आणि प्रत्येकाच्या हृदयात परिवर्तन घडवून आणतो. हाच आमचा मुख्य विषय आहे. हिंदू समाजाच्या मनात काय आहे आणि तो काय करील हे सांगता येणार नाही. ही भविष्यकाळातील गोष्ट आहे. याबाबत आता मी काही सांगू शकत नाही. पण आम्ही कोणतेही आंदोलन सुरू करीत नाही एवढेच मला सांगायचे आहे.

 
प्रश्नः आता अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहणार आहे. ते केवळ पूजाअर्चा करण्यासाठी एक स्थान असणार की आदर्श समाजासाठी एक प्रेरणास्थान म्हणून विकसित होणार आहे?

- भारतात पूजाअर्चा करण्यासाठी मंदिरांची मुळीच कमतरता नाही. त्यासाठी इतका दीर्घकाळ प्रयत्न करण्याची हिंदू समाजाला मुळीच आवश्यकता नव्हती. मात्र आपल्या भारतवासीयांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ही प्रमुख मंदिरे तोडण्यात आली होती. त्यामुळे आपल्या श्रद्धास्थानांची पुनश्च उभारणी केली जावी अशी हिंदू समाजाची फार आधीपासूनच इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या दिशेने काम सुरू झाले. मात्र अशी प्रतीके उभी करून आपले काम संपत नसते. ज्या मूल्यांचे आणि आचरणाचे ते प्रतीक आहेत तसे आपल्याला व्हावे लागते. भूमीपूजनाच्या दिवशी केलेल्या भाषणात मी म्हणालो होतो की, भारताला परमवैभवसंपन्न करून विश्वगुरूपदावर नेण्यासाठी प्रत्येक भारतीयाला तशी योग्यता प्राप्त करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या मनात अयोध्या साकार करावी लागणार आहे. रामजन्मभूमीवर मंदिर उभे राहीपर्यंत प्रत्येकाच्या मनात ती अयोध्या साकार झाली पाहिजे. मनात अयोध्या साकार करणे म्हणजे काय? याचे उत्तर देताना मी तेव्हा संत तुलसीदासांच्या दोन दोह्यांचा उल्लेख केला होता.

काम कोह मद मान न मोहा।

लोभ न छोभ न राग न द्रोहा ॥

जिन्हके कपट दंभ नहीं माया ।

तिन्ह कें हृदय बसहुँ रघुराया ॥

म्हणजे प्रभू रामचंद्राची अयोध्या अशीच असते. ती प्रत्येक भारतीयाच्या मनात साकार झाली पाहिजे.

दुसरा दोहा असा आहे -

जाति पांति धनु धरमु बडाई, प्रिय परिवार सदन सुखदाई।

सब तजि तुम्हा हि रहई उर लाई, तेहि के हृदयँ रहहु रघुराई॥

‘सब तजि’चा अर्थ असा नव्हे की, सर्वांनी संन्यास घेऊन हिमालयात जावे, केवळ आपल्या हृदयात त्या रघुरायाची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. असे आदर्श आणि नैतिक मूल्यांनी युक्त जीवन बनावे, यासाठी प्रत्येकाने ‘तेहि के हृदय रहहु रघुराई’ असा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनाला नैतिक दृष्ट्या उन्नत बनविण्यासाठी रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीचा आग्रह धरण्यात आला होता. या संदर्भात देशभरात जागरुकता आली पाहिजे. या भावनेचा सन्मान केला गेला पाहिजे. आमचे आदर्श प्रभू रामचंद्र यांचे मंदिर तोडून आम्हाला अपमानित करून आमचे जीवन भ्रष्ट करण्यात आले. आम्हाला पुन्हा उभे राहायचे आहे, महान व्हायचे आहे, याच हेतूने भव्यदिव्य राममंदिर उभे केले जात आहे. केवळ पूजाअर्चा करणे एवढीच आपली मर्यादित भूमिका कधीच नव्हती, त्यासाठी भरपूर मंदिरे आहेत.

प्रश्नः प्रभू रामचंद्र हे आपले आदर्श आहेत. पण आपल्या समाजात आजही बर्‍याचशा कुप्रथा दिसून येतात. त्या दूर करण्याच्या दृष्टीने धर्माचार्यांनी कोणत्या प्रकारे योगदान दिले पाहिजे, असे आपणास वाटते?

- धर्माचार्यांनी कसे काम करावे, कशाप्रकारे योगदान द्यावे, याबाबत आम्हाला धर्माचार्यांना कोणत्याही प्रकारचा उपदेश करायचा नाही. पण समाजाचे आचरण निर्दोष व्हावे, असा प्रयत्न नक्कीच करायला हवा. यासाठी धर्मातही एक व्यवस्था असते. धर्माची व्यवस्था आपल्याला आचारधर्म सांगत असते. आपल्या धर्मात काही शाश्वत मूल्ये सांगितलेली आहेत. उदा. सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, स्वाध्याय, संतोष, तप इ. हाच शाश्वत धर्माचा भाग आहे. पण देशकालपरिस्थितीला अनुसरून या धर्माचे आचरण करावे लागते. व्यक्तिपरत्वेसुद्धा या आचरणात फरक पडू शकतो.

आपल्या पुराणांत शिबी राजाची कथा सांगितलेली आहे. एके दिवशी शिबी राजाच्या दरबारात एक कबूतर येते आणि त्याच्याकडे आश्रय मागते. शिबी राजा कबुतराला आश्रय देतो. कारण शरणागताचे रक्षण करणे हा राजधर्म आहे. तेवढ्यात त्या कबुतराच्या पाठोपाठ एक ससाणा तेथे येतो. तो राजाला सांगतो, ‘ते कबूतर माझे भक्ष्य आहे आणि मला ते खायचे आहे.’

राजा म्हणतो, ‘प्रजेचे रक्षण करणे हा राजाचा धर्म आहे आणि ते कबूतर मला शरण आलेले आहे. त्यामुळे तू कबुतराला खाऊ शकत नाहीस.’

ससाणा म्हणतो, ‘राजा, तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण कबूतर खाऊन मी माझे पोट भरावे हासुद्धा माझा धर्म आहे. तसा निसर्गनियमच आहे. मीसुद्धा आपलीच प्रजा आहे आणि जर मला तुम्ही उपाशी ठेवलेत तर तोसुद्धा अधर्मच होईल.’

आता समोर धर्मसंकट उभे राहिले. राजाचा एक धर्म आहे. त्या कबुतराचा एक धर्म आहे आणि ससाण्याचाही एक धर्म आहे. या तिन्हींचे संतुलन साधले पाहिजे. शरण आलेल्या कबुतराचे रक्षणसुद्धा झाले पाहिजे आणि ससाणासुद्धा उपाशी राहायला नको. मग या समस्येवर शिबी राजाने उपाय शोधला आणि तो ससाण्याला म्हणाला की, ‘कबुतराच्या ऐवजी मी तुला माझ्या मांडीचे मांस देतो. तू ते खाऊन आपले पोट भर आणि कबुतराला सोडून दे.’ अशी ती कथा आहे. त्यामुळे देशकालपरिस्थितीचा विचार करून आणि व्यक्तीचा स्वभाव लक्षात घेता त्याच्या कर्तव्याच्या रूपाने जसे निश्चित केले जाते त्यालाच आचारधर्म असे म्हणतात. आपल्या देशात प्राचीन स्मृती आहेत; एकच स्मृती नाही. त्यांतही बदल होत गेले आहेत. अनेक स्मृती रचल्या गेल्या आहेत. ‘देवलस्मृती’ ही शेवटची स्मृती आहे, असे म्हटले जाते. या स्मृतीत महिलांना शिक्षण द्यावे, जबरदस्तीने परधर्मात ओढले गेलेल्यांना स्वधर्मात परत घ्यावे, अशा तरतुदी आहेत. आपल्यालाही आज या गोष्टी आवश्यक वाटतात. त्या काळात त्यांना ज्या गोष्टी आवश्यक वाटल्या असाव्यात तशा प्रकारच्या तरतुदी त्या स्मृतींमध्ये करण्यात आल्या असाव्यात. देवलस्मृती दहाव्या शतकात संपुष्टात आली आणि त्यानंतर एक हजार वर्षांपर्यंत स्मृती तयार करण्याच्या प्रक्रियेत खंडच पडला. त्यामुळे जुनाट स्मृतींच्या आधारावरच समाजाची वाटचाल पुढे सुरू राहिले. पण काळ हा बदलत गेला आहे आणि नव्या पिढीच्या समोर नवीन प्रकारची आव्हाने आणि समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सर्व समाजातील परिस्थितीचे अवलोकन करून भारतातील सर्व धर्माचार्यांनी आजच्या भारतीय समाजासाठी अनुकूल ठरेल, आचरण करण्यास सोपी असेल, आज काळानुसार आपले परंपरागत आदर्श पाळून जीवन जगण्यासाठी मनुष्याला सबळ बनविल, अशा प्रकारची नवीन आचारव्यवस्था धर्माचार्यांनीच निर्माण करायला हवी. ही काळाची गरजच आहे.


प्रश्नः काही धर्मग्रंथ आणि स्मृती यांच्यात काळानुसार परिवर्तन झाले पाहिजे, असे आपण म्हणत आहात. त्यामागची आपली भूमिका काय आहे?

- आपला भारतीय समाज कोणत्या तरी एका ग्रंथालाच प्रमाण मानून आपली वाटचाल करत नाही. असे जर असते तर संत एकनाथ महाराजांनी गंगेचे पाणी तहानलेल्या गाढवाला मुळीच पाजले नसते. कारण त्यांना ती कावड रामेश्वरम् येथे न्यायची होती. धर्मग्रंथातील बर्‍याचशा गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत. भारतीय समाजाची आपल्या धर्मावर पूर्णपणे श्रद्धा आहे. मात्र तो काळाला सुसंगत असे धर्माचरण करीत असताना दिसतो. त्यांना कोणीही दोष देत नाहीत, अथवा बहिष्कृत करीत नाहीत. कोणीही जुन्या शब्दाला घट्ट चिकटून राहत नाही. देशकालपरिस्थितीनुसार लोक बदल स्वीकारत असतात. ग्रंथातील शब्दांचा नवा अर्थ सांगावा लागतो अथवा शब्दांमध्ये बदलसुद्धा करावे लागतात.

आपल्या धर्मग्रंथांपैकी महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्रीमद् भगवद्गीता होय. त्यात काहीच प्रक्षिप्त भाग नाही, असे मानले जाते. वेद आणि उपनिषदे यांतही प्रक्षिप्त भाग नाही. कारण ती मौखिक पद्धतीने सुरक्षित राखली आहेत. आपण महाभारताचे उदाहरण घेतले तर त्याच्या प्रास्ताविकातच असे सांगितले आहे की, आधी या महाभारत ग्रंथाची श्लोकसंख्या 8800 एवढीच होती आणि आता आपल्याला जी संपूर्ण संहिता उपलब्ध झाली आहे त्या संहितेमध्ये एक लाख श्लोक आहेत. याचा अर्थ असा होतो की, हे श्लोक नंतर त्या मूळ संहितेत घालण्यात आलेले आहेत. आपल्या धर्मग्रंथांत असा जो काही प्रक्षिप्त आणि कालबाह्य भाग आहे तो काढून टाकायला हवा. जो आपल्या परंपरागत मूल्यांशी सुसंगत आहे, असा भाग ठेवायला हवा. जर कोणी अशा प्रकारचा विचार करीत असेल तर ते चूक म्हणता येणार नाही. मात्र असा अधिकार केवळ आपल्या धर्माचार्यांनाच आहे. याबाबतचा निर्णय केवळ तेच घेऊ शकतात. अन्य लोकांनी त्यात हात घालण्याचे कारण नाही. पण अन्य लोक या धर्माचार्यांना हात जोडून अशी आग्रहाची विनंती अवश्य करू शकतात. अशी बर्‍याच जणांची इच्छासुद्धा आहे.

ज्यांच्या मनात स्वार्थ नाही अथवा कोणतीही राजकीय आकांक्षा नाही अशा बर्‍याच थोर लोकांशी माझ्या भेटी झाल्या आहेत. त्यांचेही असेच मत आहे.


प्रश्नः आपल्या समाजात आणि आपल्या धर्मात अनेक उपासना पंथ आहेत. हे सर्व पंथोपपंथ एकत्रित आले तर आपला समाज बलशाली होऊ शकतो. अशी प्रेरणा देण्यासाठी हे राममंदिर एक आदर्श म्हणून साकार होऊ शकेल का?

- अवश्य. संपूर्ण रामायणात आणि रामचरितमानसात कुणाची पूजा करावी ते सांगितलेले नाही. रामायणात असे सांगितले आहे की आपण सत्याचा मार्ग अनुसरला पाहिजे. अन्याय-अत्याचार आणि अहंकार या दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे. पूजापद्धतीत विविधता असू शकते. आपापली पूजापद्धती अनुसरण्यास प्रत्येक व्यक्तीला मोकळीक असली पाहिजे. त्याचबरोबर दुसर्‍याच्या पूजापद्धतीलाही आपल्या पूजापद्धती इतकेच सत्य मानून तिचा आदर आणि स्वीकार केला पाहिजे. परस्पर समन्वयाने वाटचाल करायला हवी, तरच आपला समाज, धर्म आणि देशाचे कल्याण होईल. आपल्या संविधानाच्या उद्देशिकेत याच सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या संविधानातील चार प्रकरणे अत्यंत महत्त्वाची आहेतः उद्देशिका, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि राज्याची मार्गदर्शक तत्त्वे. या सर्व गोष्टी आम्हाला हेच सांगतात.

आपल्या देशात पूर्वीपासूनच विविधता आहे. आपण रामाच्या काळाचा विचार केला तर त्यावेळी कोणते संप्रदाय असावेत? यामध्ये आपल्याला शैव आणि वैष्णव असे दोन मुख्य संप्रदाय आढळतात. आपल्या परंपरेत असे मानले आहे की, भगवान शिव हे रामनामाच्या ध्यानधारणेत तल्लीन असतात तर प्रभू रामचंद्राने नेहमीच शंकराचीच पूजा केली आहे. अशी एकात्मता आपल्याला आढळून येते. मिळून-मिसळून वाटचाल करण्याचा निश्चय आपल्याला आढळून येतो. आपल्या रामायणाचा आणि परंपरेचाही हाच संदेश आहे. प्रत्येकाच्या भावनेनुसार पूजापद्धतीत विविधता असू शकते पण अंतिम सत्य हे एकच आहे. त्यामुळे आपल्या देशातील सर्व पंथोपपंथ याच आदर्शाला मानून वाटचाल करतील तर सर्वांचाच विकास होईल, आपल्या देशाचा विकास होईल आणि समाजात शांतता, सद्भाव आणि बंधुभाव टिकून राहील.


प्रश्नः आपल्या धर्मातील विविध उपासना पंथ अशा विचाराने एकत्र येऊ शकतील, पण आपल्या देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे अनुयायीसुद्धा आहेत. त्यांना सोबत घेण्यासाठी कोणते प्रयत्न आवश्यक आहेत आणि कोणते प्रयत्न चालले आहेत?

- अन्य धर्मानुयायांना आपल्यासोबत आणण्यापेक्षा ते आपली सोबत सोडून जाणार नाही याची काळजी करायला हवी. आपल्याला रसखान माहीत आहे. ते मुस्लिम होते. त्यांनी इस्लामचा त्याग केला नव्हता. मात्र कृष्णभक्तीबद्दल त्यांचे काव्य अतिशय उत्तम मानले जाते. विट्ठलभक्त शेख महंमद आहेत. ही फार प्राचीन काळातील गोष्ट नव्हे! रामकृष्ण परमहंस यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रत्यक्ष उपासनेद्वारे अनुभव घेऊन त्यांच्या अभ्यासाच्या अंती असे सांगितले की, सर्वांचे गंतव्यस्थान एकच आहे. रमणमहर्षी यांना जेव्हा पॉल ब्रँटन (Paul Brunton) यांनी ‘मी हिंदू होऊ का?’ असे विचारले असता ते म्हणाले होते, ‘‘तुमचा जन्म ख्रिश्चन म्हणून झाला आहे. तेव्हा तुम्ही एक चांगला ख्रिश्चन बनण्याचा प्रयत्न करा. तसे केले असता एका चांगल्या हिंदूला जे फळ मिळते ते तुम्हालाही अवश्य मिळेल.’’ हीच वृती आपल्याकडे नेहमी आढळते.

आपण पाहतो की वेळोवेळी कट्टरपंथी लोक या समाजघटकांना वेगळे पाडण्याचा आणि वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयास करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही असे प्रयत्न झाले होते आणि या प्रयत्नांना आळा घालण्याचे काम महाराजांनी केले. महाराजांच्या नौदलात मुसलमान आणि सिद्दीदेखील होते. महाराणा प्रताप यांच्या सैन्यातही मुसलमान होते आणि ते अकबराच्या विरोधात हळदीघाटीत लढले होते. जेव्हा आपण सर्व लोक एकत्र होऊन उभे ठाकतो तेव्हा भारतभक्ती जागृत होते. तेव्हा भारताच्या संस्कृतीबाबत भक्ती जागृत होते. भारताच्या प्राचीन परंपरेबाबत मनात स्वाभिमान जागतो. तेव्हा सर्व भेदभाव मावळतात.

ज्या लोकांच्या हितसंबंधांना या एकतेमुळे धक्का पोहोचतो असे लोक वारंवार फुटिरतावाद आणि कट्टरता यांना खतपाणी घालण्याचे उद्योग करत असतात. खरे पाहता आमचाच एकमेव देश असा आहे की जेथे सर्व धर्म, पंथ आणि संप्रदायांचे लोक दीर्घकाळ एकत्र नांदत आहेत. कोणत्या देशातील मुसलमान सर्वांत अधिक सुखी आहेत? तर भारतातील मुसलमानच सर्वांत सुखी आहेत. बहुसंख्याकांच्या तुलनेत अल्पसंख्य समाजाला अशी चांगली वागणूक देणारा देश जगाच्या पाठीवर अन्यत्र आढळणार नाही. मुस्लिम आक्रमकांच्या आधीही काही मुसलमान भारतात आले होते आणि या आक्रमणांच्या नंतर ते मोठ्या प्रमाणात आले. देशात रक्ताचे पाट वाहले होते. लढाई आणि वैर याचा इतिहास आहे. तरीसुद्धा आपल्या देशात आजही मुसलमान आणि ख्रिश्चन टिकून आहेत. त्यांना कोणीही वाईट वागणूक दिलेली नाही. त्यांना तर येथे सर्व अधिकार प्राप्त आहेत. मात्र पाकिस्तानात अन्य धर्माच्या अनुयायांना समान अधिकार मिळालेले नाहीत. पण आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. हिंदू-मुसलमान धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण करण्यात आला. पण भारतीयांनी या देशातील मुसलमानांना असे कधीच सांगितले नाही की तुम्ही आता तुमच्यासाठी बनलेल्या देशात निघून जावे आणि याउपरही तुम्हाला याच देशात राहायचे असेल हिंदूंच्या नंतर दुय्यम नागरिक म्हणूनच तुम्हाला राहावे लागणार आहे. असे झाले नाही. आपल्या संविधानाने सर्वांना सारखेच अधिकार दिलेले आहेत. लोकसंख्येची अदलाबदल व्हावी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटत होते. पण जर येथे मुसलमान राहिले तर त्यांना पाकिस्तानात पाठविले जावे, अशी तरतूद सांगणारे संविधान डॉ. बाबासाहेबांनी बनविलेले नाही. हाच आमच्या देशाचा खरा स्वभाव आहे आणि या स्वभावालाच ‘हिंदू’ असे नाव आहे. आम्ही कोणत्या दैवताची पूजाअर्चा करतो यावर ‘हिंदू’चे काही घेणेदेणे नाही. धर्म हा माणसांना जोडतो, त्यांना उन्नत बनवितो. धर्म समाजाला एका सूत्रात गुंफतो. तो समाजाची धारणा करतो. भौतिक आणि आध्यात्मिक अशी दोन्ही प्रकारची सुखे धर्माचरणामुळे माणसाला प्राप्त होतात. अर्थ आणि काम या दोन्ही पुरुषार्थांचे उचित नियमन करून समाजाला चालविण्याचे काम धर्म करीत असतो. तुमची पूजापद्धती कोणतीही असू शकते. राष्ट्रीयत्व हे पूजापद्धतीशी जोडलेले नाही.

जेव्हा पाकिस्तानची संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली होती. तेव्हा जमाते इस्लामीचे नेते मदनी यांनी एक पुस्तक लिहिले होते की, ‘कौम आणि रिलिजन यांचा काहीही संबंध नाही. जे मुसलमान आहेत ते हिंदुस्थानचे नाहीत. असे सांगणारे लोक चूक आहेत.’ त्यामुळे अधूनमधून जेव्हा कट्टरतावाद डोके वर काढत असतो तेव्हा त्याला वेळीच आवर घालण्याची केवळ गरज आहे. म्हणून आपण पुरातन काळापासून एक राष्ट्र आहोत, हे हिंदू राष्ट्रच आहे. काही बदलण्याची गरज नाही. फक्त काही वाईट गोष्टींचा त्याग करायला हवा. संकुचितपणा सोडला पाहिजे. हे सहजशक्य आहे. ही गोष्ट मान्य असलेले अनेक सुशिक्षित आणि उच्चपदस्थ मुसलमान आणि ख्रिश्चन मला भेटले आहेत.


प्रश्नः भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. त्यामुळे आपण सांगितलेली गोष्ट सर्व मुसलमान आणि ख्रिश्चनांना मान्य होईल का? आणि ती कशी मान्य होईल?

- जे सत्य आहे तेच मी सांगत आहे. ते मान्य करावे अथवा न करावे हा ज्याच्या-त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. हे सत्य मान्य करणार्‍याचे सर्व काही व्यवस्थित चालत असते. सत्याला किती काळ नाकारले जाणार! या विचाराची स्वतःची मोठी ताकद आहे. आम्ही काहीही अन्य उपाय केले नाहीत तरीही लोकांना आपल्या जीवनात अवश्य असे अनुभव येतील की, हो, आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही सर्व भारतीय आहोत. आम्ही अरब किंवा तुर्क नाही, तर भारतीय आहोत. आम्ही सर्व एक आहोत. आम्ही सर्व भारत राष्ट्र आहोत. जेव्हा सर्वजण आपण भारत आहोत असे म्हणतात तेव्हा लक्षात येते की, भारत म्हणजेच हिंदू होय. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण याकरिता त्यांच्यामधूनच प्रबोधन घडून येणे आवश्यक आहे. कारण त्यांनाच ही गोष्ट मान्य करायची आहे. त्यासाठी बाहेरून प्रबोधन करता येणार नाही. हातात लाठी घेऊन त्यांच्याकडून हे वदवून घेण्याची गरज नाही. हृदयपरिवर्तन घडवून आणले पाहिजे. त्याचा एक मार्ग असा आहे की त्यांनीही विचार केला पाहिजे की, आपण मूळचे कोण आहोत? आपले पूर्वज कोण होते? आम्ही कोणत्या भूमीशी जोडलेलो आहोत? आम्ही मुसलमान आहोत, मग आम्ही कव्वाली का बरे गातो? कारण अखंड भारताच्या सीमेच्या बाहेर अन्यत्र कव्वाली हा प्रकार आढळत नाही. कबर आणि मजार यांची पूजासुद्धा अन्यत्र आढळत नाही. प्रेषित महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद-उन-नबी हा उत्सवाच्या रूपात अखंड भारताच्या सीमेच्या आतच साजरा केला जातो, बाहेर तो साजरा होत नाही. कारण अल्लाहपेक्षा कोणीच मोठे नाही, असे त्यांचे मत आहे. पण आमच्या देशातील लोकांचा स्वभाव वेगळा आहे आणि हे सर्व काही परंपरेतून आलेले आहे. त्या प्रभावाखालीच आपली वाटचाल सुरू आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज हिंदूच होते ही सत्य गोष्ट आहे. भारताच्या बाहेर भारतीय म्हणूनच आपली ओळख आहे. भारताच्या प्रतिष्ठेसोबत आपली प्रतिष्ठा जोडलेली आहे.

बंगलोरला प्रवास करताना मला एक टिसी भेटले होते. त्यांनी मला असे सांगितले होते की, येथील मुसलमान असे मानतात की, आपल्या मृतदेहाचे दफन करताना त्या ‘कफन’मध्ये आपल्या देशाची माती टाकावी लागते. त्याशिवाय आपल्याला ‘जन्नत’ नसीब होणार नाही. ओसामा बिन लादेन याचे खोल सागरात दफन करण्यात आले तेव्हा ‘कफन’मध्ये देशाची माती टाकलेली नसल्यामुळे त्यावरून गदारोळ यामुळेच झाला होता. त्यामुळे आपल्या देशाच्या मातीला सर्वांच्या मनात फार मोठे महत्त्व आहे. मात्र हिंदूंनी ही गोष्ट पुढे येऊन सांगितली तर असे म्हटले जाईल की, यात तुमचा कोणता फायदा दडलेला आहे? त्यामुळे हिंदूंना अशीच भूमिका घ्यावी लागेल की तुम्हाला हे सर्व मान्य आहे अथवा नाही याच्याशी आमचे काही घेणेदेणे नाही. आम्हाला हे ओरडून सांगण्याची आवश्यकता नाही आणि हे सांगायला आम्हाला कोणी भाग पाडलेले नाही. हेच सत्य आहे आणि यामुळे तुम्हीसुद्धा आमचेच भाऊबंद आहात. हिंदूंना अशा स्थितीत यावे लागेल की तो आपली सुरक्षा करण्यासाठी स्वतः समर्थ आहे आणि त्यासाठी त्याला कुणाच्याही मदतीची गरज नाही. तो कुणावरही अवलंबून नाही आणि तरीसुद्धा तो या सर्वांना आपले भाऊबंद मानत आहे. हिंदू अशा परिस्थितीत आल्याशिवाय त्याला अशी भूमिका मांडता येणार नाही. असे केल्यास तो त्याचा दुर्बळपणाच मानला जाईल. त्यामुळे हिंदू समाजाला सामर्थ्यसंपन्न व्हावेच लागेल. मात्र दुसर्‍याला धडा शिकविण्यासाठी आपण सामर्थ्य वाढवित नाही आहोत तर आपण जे सांगतो आहोत त्याच्यावर सर्वांनी विश्वास ठेवावा यासाठीच हिंदूंना आपली शक्ती वाढविणे भाग आहे.


प्रश्नः कोरोना महामारीच्या संकटकाळात ‘आत्मनिर्भर भारत’ असा मंत्र जागविण्यात आलेला आहे. जर आपणास खरोखरच आत्मनिर्भर भारत साकार करायचा असेल तर कोणत्या गोष्टी आपल्याला आत्मसात करण्याची गरज आहे?

- जर आपल्याला आत्मनिर्भर भारत साकार करायचा असेल तर आपला मूळ ‘आत्मा’ काय आहे? याची आपण नीट ओळख करून घेतली पाहिजे. आपल्याला अंतर्मुख व्हावे लागणार आहे.

चाणक्यनीतीत असा एक श्लोक आहे -

कः कालः कानि मित्राणि को देशः कौ व्ययागमौ ।

कस्याहं का च मे शक्तिः इति चिन्त्यं मुहुर्महुः ॥

ज्या व्यक्तीला प्रगती करायची आहे त्याला या सहा गोष्टींचा दररोज विचार करणे भाग आहे. हा समाजाचा नियम आहे. सध्याचा काळ कसा आहे? माझे मित्र कोण आहेत? माझा जमाखर्च काय आहे म्हणजे आर्थिक परिस्थिती कशी आहे? देशातील स्थिती कशी आहे? पण या सर्व गोष्टींचे मूळ असलेल्या मुख्य दोन गोष्टी आहेत. मी कोण आहे आणि मी काय आहे? माझी शक्ती नेमकी कशात आहे? हे आपल्याला ओळखले पाहिजे. हे जाणण्यासाठी आपला वर्तमानकाळ आपल्याला माहीत असायला हवा आणि भूतकाळसुद्धा माहीत असायला हवा. आम्ही जे आहोत ते आता आहोत की नाहीत? अथवा आम्ही एखादे सोंग आणले आहे! आणि आमची शक्तिस्थाने कोणती आहेत? ती शक्तिस्थाने आम्ही जतन करीत आहोत का? हे जाणून घेतले पाहिजे. या सर्व गोष्टींची शिकवण सध्या दुर्लभ झालेली आहे.

आपल्या आजच्या पिढीला आपला इतिहास नीट माहीत नाही. इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या एका बारावीच्या विद्यार्थ्याने मला असे बोलून दाखविले की, आजकाल आम्हाला आमचा खरा इतिहास शिकविला जात नाही. आम्हाला भारताचा इतिहास माहीत नाही. त्याबाबत इतिहासाच्या पुस्तकातही काही सापडत नाही. ‘1857च्या स्वातंत्र्यसमरा’वर त्याला निबंध लिहायचा होता; पण त्याला ‘1857’ बाबत काहीच माहिती नव्हती. ती माहिती देणारी पुस्तकेही त्याला सापडत नव्हती. तेव्हा मी त्याला एक-दोन पुस्तकांची माहिती दिली. ही परिस्थिती बदलायला हवी.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोण आहोत हे जाणून घेतल्यावर आपण जे आहोत त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आत्मभान आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मगौरव. प्रत्येकात काही कमतरता असू शकतात, पण त्या दूर करणे हे आपलेच कर्तव्य आहे. आपली शक्तिस्थाने म्हणजे आजच्या भाषेत प्लस पाँइंटस् जाणून त्याबद्दल गौरवाची भावना बाळगली पाहिजे. ज्याला स्वाभिमान नाही त्याची प्रगती होऊच शकत नाही. त्याची स्वप्ने खुजी असतात. अशांना राजाकडे नोकरी मिळविण्यात धन्यता वाटते (आजच्या भाषेत सरकारी नोकरी!). आपण स्वतःच राजा झालो पाहिजे असा ते कधीच विचार करू शकत नाहीत. त्याच्यात आत्मगौरवाच्या भावनेचा अभाव असतो. प्रगती करण्यासाठी आत्मगौरवाच्या जोडीला आत्मविश्वास आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टी जागविणारा संस्कार आणि तशी शिक्षणपद्धती, त्याचबरोबर सामाजिक आणि कौटुंबिक प्रबोधन यांची आवश्यकता आहे. काही गोष्टी या व्यवस्थागत असतात, तर काही गोष्टी आपल्याला विचारपूर्वक अनौपचारिक पद्धतीने कराव्या लागतात. जर समाजाने या दोन्ही गोष्टींवर भर दिला तर समाजातील नवी पिढी नक्कीच विजय प्राप्त करू शकते.

इंग्लंडच्या बाबतीत असे म्हटले गेले आहे की, ‘Battle of Waterloo was won on the playgrounds of Harrod and Eton.’ कारण इंग्लंडमधील शिक्षणपद्धतीत, सामाजिक वातावरणात आणि घराघरात तशा प्रकारचे संस्कार करण्यात आले होते. व्यवस्थात्मक गोष्टी या व्यवस्थेच्या माध्यमातून आणि अन्य गोष्टी या अनौपचारिक पद्धतीने कराव्या लागतात. त्यामुळे इंग्लंडने नेपोलियनचा पराभव केला आणि हिटलरचाही पराभव केला. आपल्यालाही तसेच केले पाहिजे.

प्रश्नः आपण नेहमीच तिसर्‍या पर्यायाविषयी सांगत असता. हा तिसरा पर्याय नेमका काय आहे, याबाबत जगाची काय भूमिका आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल?

- भारताच्या आत्म्याच्या आधारावर जे होणार आहे त्यालाच खरी आत्मनिर्भरता म्हटले पाहिजे. केवळ स्वावलंबी होणे, एवढीच यामागची भूमिका नाही. स्वावलंबीमधील ‘स्व’ फार महत्त्वाचा आहे. आपल्याकडे कितीतरी साखर कारखाने आहेत. त्यामुळे आपण दारूचे भरमसाठ उत्पादन करून त्याची निर्यात करू शकतो आणि पैसा कमवू शकतो. मद्य उत्पादनाला आत्मनिर्भरता म्हणता येणार नाही. भारतीय प्रकृतीत याला स्थान नाही. भारताची मूळ प्रकृती काय आहे? ती एकात्म आणि समग्र आहे. संपूर्ण विश्वाच्या एकात्मिक अस्तित्वाचा विचार आपण सांगतो. संपूर्ण विश्व एकत्र जोडलेले आहे. माझे काही भले झाले तर त्यामुळे संपूर्ण विश्वाचेही भले झाले पाहिजे. जर संपूर्ण विश्वाचे भले झाले तरच माझेसुद्धा भले होईल. केवळ माझे एकट्याचेच भले व्हावे असा विचार आपण करीत नाही. आपण एकमेकांना पूरक आहोत. आपण सर्व वेगवेगळे दिसत असलो तरी एकाच ब्रह्माचा आपण सर्व आविष्कार आहोत. यामुळे आपण तुकड्या-तुकड्याने विचार करीत नाही; समग्र विचार करतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मागच्यापुढच्या गोष्टी लक्षात घेऊन विचार करतो, त्याचप्रमाणे संभाव्य परिणाम लक्षात घेऊनच नेहमी विचार करतो. आपण कधीही आत्यंतिक टोकाचा (extremist) विचार करीत नाही. आपला विचार समतोल (balanced) असतो. त्यामुळे आपण मध्यममार्ग शोधून काढत असतो. आपला धर्मही हेच सांगतो. आपल्या सर्वांचे अस्तित्व एक आहे ही गोष्ट सत्यावर आधारीत आहे.

आताची प्रचलित व्यवस्था ही पाश्चिमात्य विचारावर आधारलेली आहे. त्यांचे चिंतन असे सांगते की, प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याचे शरीर, मन व बुद्धी वेगळी आहे. समाजाचे भले वेगळे आणि व्यक्तीचे हित वेगळे आहे. व्यक्ती, समाज, सृष्टी या सर्वांचे अस्तित्व वेगळे आहे. सर्वांनाच सुख आणि सुखाची साधने हवी आहेत. भारतीयांनाही सुख हवेच आहे. पण केवळ शारीरिक सुख हवे की मानसिक सुख हवे? मनुष्य नेहमीच शारीरिक सुखाला प्राधान्य देतो. पण भारतीय विचार सांगतो की सर्वांना सुख लाभले पाहिजे. जर सर्वांना सुख लाभायला हवे असेल तर सर्वांनाच काहीतरी संयम पाळावा लागणार आहे. पाश्चिमात्य लोकांना याची आवश्यकता वाटत नाही. व्यक्तिगत सुखासाठी ते टोकाला जाण्याबाबतही तमा बाळगत नाहीत. व्यक्तिगत सुख हवे तर अस्तित्वासाठी संघर्ष (Struggle for existence) होतो. त्यामुळे झगडे आणि दु:ख उत्पन्न होते. व्यक्तीला समाजात केवळ एक यंत्राचा घटक समजल्याने स्वातंत्र्य मिळत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत भाषण करताना सांगितले होते की, ‘आम्हाला स्वातंत्र्यासोबत समता आणि बंधुभाव सुद्धा हवा आहे.’ आपण सर्व एक आहोत असे मानणे म्हणजेच बंधुभाव होय. हाच पायाभूत सिद्धान्त असल्यामुळे आमच्याकडे विकास झाला. संशोधक व अभ्यासक असे सांगतात की, एक हजार वर्षे सर्व जगभर भारताचा प्रभाव होता आणि भारताचे साम्राज्य दूरवर पसरले होते. भारतीय अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर होती. भारताचा राजकीय प्रभावसुद्धा मोठा होता, पण आपण जगातील अन्य साम्राज्य नष्ट करण्यासाठी त्याचा उपयोग केला असे उदाहरण सापडणार नाही. आपल्या देशातील ढाक्याची मलमल प्रसिद्ध होती; तशी मलमल संगणक युगातही तयार करणे अवघड आहे. असे तंत्रज्ञान भारताकडे होते. पण आपण पर्यावरणाचे नुकसान केले नाही. सर्वांच्या हिताची काळजी घेतली गेल्यामुळे वैयक्तिक स्वार्थाला एक मर्यादा होती. सर्वजण स्वतंत्र होते. पण आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग अन्य लोकांना गुलाम नव्हे तर स्वतंत्र करण्यासाठी झाला पाहिजे, ही आपली भूमिका आहे.

भारतीय शेतकरी आपले बियाणे आणि खते स्वतःच तयार करीत होता. उदा. टूथपेस्ट सर्व जंतूना मारून टाकते असे जाहिरातीतून सांगितले जाते. त्यात तशा प्रकारची रसायने असतात. आपल्याकडील ‘दातवण’ मात्र नियंत्रणाचे काम करते. आपले देशी कीटनाशक कीटकांचा नाश करीत नाही, त्यांच्यावर नियंत्रण मिळविते. कारण त्यांचा सुद्धा जीव महत्त्वाचा आहे हाच भारतीय दृष्टिकोन आहे.

विश्वातील सर्व प्रकारचे संघर्ष संपुष्टात यावेत, सर्व जगाची एकत्र उन्नती व्हावी असे आपण मानतो. मात्र असे होऊ शकत नाही, असे जगाला वाटते. आतापर्यंत सर्वांनी दोन प्रकारचे प्रयोग केले आहेत; पण त्यांना यश मिळाले नाही. केवळ व्यक्तीला महत्त्व दिले तरी यश मिळाले नाही, केवळ समाजाला महत्त्व दिले तरीसुद्धा यश मिळाले नाही. आस्तिक होऊन पाहिले तरीही यश मिळाले नाही आणि नास्तिक होऊन पाहिले तरीही यश मिळाले नाही. लोकमताच्या आधाराने गेलो तरीही यश मिळाले नाही आणि शास्त्रज्ञांच्या आधाराने गेलो तरीही यश मिळाले नाही. मग या दोन टोकांच्या भूमिका सोडून तिसरा पर्याय शोधला पाहिजे. तो पर्याय आपल्याकडे आहे.

आपल्याकडे मात्र अर्थ आणि काम यांना शिस्त लावण्याचा विचार केला गेला आहे. शरीर, मन आणि बुद्धी यांना अनुशासन देणारा धर्म आमच्याकडे आहे. व्यक्ती, समाज आणि सृष्टी या तिन्हींची उन्नती साधायला हवी आणि यासाठी परमात्मा हा आपला आधार आहे अशी दृष्टी आपल्याकडे विकसित झाली. ही सनातन आणि शाश्वत दृष्टी आहे. याच आधारावर आपल्याला नवी संरचना उभी करावी लागणार आहे. यासाठी विचार करावा लागेल, संशोधन करावे लागेल. वर्तमानकाळातील संरचनेचा विचार करताना तो आपल्याला वर्तमान संदर्भातच करावा लागणार आहे. असे प्रयोग आपल्याकडे सुरू आहेत आणि सरकारी पातळीवरसुद्धा ते सुरू आहेत.


प्रश्नः परिवर्तनासाठी नवे प्रयोग सुरू आहेत असे आपण सांगितले. यात शिक्षण हे महत्त्वाचे अंग आहे. शिक्षणात धर्माचे कोणते स्थान असायला हवे. आपली भूमिका काय आहे?

- सर्वत्र धर्मालाच स्थान आहे. कोठेही अधर्म होता कामा नये. शिक्षणात धर्माला स्थान असावे असे म्हटले तर लोक मोठा गहजब करतील. पण शिक्षणात अधर्म नको असे म्हटले तर कोणीच गहजब करणार नाही. धर्म म्हणजे संप्रदाय आणि पूजापद्धती नव्हे! नागरी अनुशासन (सिव्हिक डिसिप्लिन) आणि नागरी दायित्व (सिव्हिक रिस्पान्सिबिलिटी) यालाच धर्म असे म्हणतात. मागे आपल्या संविधानाबाबतचे संविधानाची उद्देशिका, नागरिकांचे मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि राज्याची मार्गदर्शक तत्त्वे हे जे चार मुद्दे मी मांडले ते भारतातील नव्या पिढीला मुळातून समजावून सांगण्याची गरज आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होत असताना या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्याच पाहिजे. यालाच धर्म असे म्हटले पाहिजे. विविध लोकांनी एकत्र येऊन सोबत वाटचाल करावी आणि भारताची प्रगती व्हावी, मात्र असे होत असताना जगाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये ही गोष्ट ध्यानात ठेवूनच आपल्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे आणि संविधान बनविणारे सर्व आपलेच लोक होते. त्यांच्या समोर कोणते आदर्श होते? आपल्या संविधानाच्या मूळ प्रतीत समाविष्ट केलेली चित्रेसुद्धा पाहिली तर ही गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते. एकेका शब्दावर संविधान सभेत जी चर्चा झालेली आहे ती आपण वाचली तर हे आपल्या लक्षात येऊ शकते. आपला सनातन धर्मच वर्तमान संरचनेत अभिव्यक्त झालेला आहे. त्याचे शिक्षण द्यायला हवे. पैसे कमविण्यासाठी शिक्षण घ्यावे अशी भूमिका नसली तरी आपल्याला उपाशी ठेवणारे शिक्षणही कामाचे नाही. आपल्याला स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा आत्मविश्वास देणारे शिक्षण हवे. केवळ आपलेच पोट भरण्याचा विचार नको तर सर्वांच्या भल्याचा विचार करायला प्रेरित करणारे शिक्षण हवे. ही दृष्टी लाभली पाहिजे आणि घराघरांतून असेच संस्कार करायला हवेत. शाळेतील अभ्यासक्रम, शिक्षकांची अनुकरणीय उदाहरणे आणि समाजातील वातावरण या सर्व गोष्टी पूरक असायला हव्यात. तुम्ही केवळ शैक्षणिक धोरणाशी संबंधित प्रश्न विचारला आहात. आपले शिक्षण अशा प्रकारचे असावे की, आपण जीवनसंघर्षात उभे राहून आपल्या परिवारासोबत जगाचेही भले करू शकतो असा विश्वास आणि त्यासाठी आवश्यक कलाकौशल्य प्रत्येक व्यक्तीला त्यातून लाभले पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे मला जे या जगाकडून लाभले आहे ते दामदुपटीने मला सर्व जगाला परत द्यायचे आहे आणि त्यासाठीच मला जगायचे आहे. असा भाव प्रत्येकाच्या मनात जागला पाहिजे.

तिसरी गोष्ट म्हणजे हे सर्व अनुभव घेत वाटचाल करीत असताना आपल्या जीवनात जे चढउतार येतील त्यांना सामोरे जात त्यातील आनंद मी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून प्राप्त करीन असा आपला स्वभाव बनला पाहिजे.

आपल्या शिक्षणाचे स्वरूप अशा प्रकारचे असले पाहिजे. विद्यमान शैक्षणिक धोरणाने या दिशेने काही पावले उचलली आहेत, ही चांगली गोष्ट आहे.

जरी सरकारने समग्र धोरण बनविले तरीही त्याची अंमलबजावणी व्यवस्थेच्या माध्यमातून होऊ शकणार नाही. धर्म आणि समाज यांचीही त्यामध्ये अवश्य भूमिका असली पाहिजे. असे वातावरण तयार करून आपल्यालाच वाटचाल केली पाहिजे.


प्रश्नः भारताची अर्धी लोकसंख्या म्हणजे स्त्रीशक्ती आहे. विश्वगुरू भारत संकल्पनेत त्यांचे योगदान काय असणार आहे?

- यामध्ये स्त्रीशक्तीचे बरोबरीचे योगदान असणार. त्यांचे प्रबोधन करून त्यांनाही सक्षम करावे लागणार. त्यांच्यात कर्तृत्वाची मुळीच उणीव नाही. आपण जे दरवाजे बंद करून ठेवले होते; ते उघडण्याची गरज आहे. सध्या भारतीय महिलांची अशी प्रतिमा आहे की, आपल्या कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करून स्त्रीशक्ती कोणतीही गोष्ट करणार नाही. कारण त्या भारतीय महिला आहेत. पण त्यांना कौटुंबिक जबाबदार्‍यांतून आवश्यक मोकळीक आणि आवश्यक स्वातंत्र्य हे मिळालेच पाहिजे. आपल्या कुटुंबात माता म्हणून स्त्रीचे स्थान आहे. ती सर्जनशक्ती आहे. तीच प्रतिभा आणि आणि सामर्थ्य देत असते. मात्र तिला देवी बनवून तिची पूजा बांधू नका अथवा तिला दासी समजून वागवू नका. तिला आपल्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे. तिला आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर त्या दृष्टीने सल्ला आणि संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तरच तिला आपले योगदान देता येईल. त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पुरुषांचा भारसुद्धा हलका होणार आहे. त्यामुळे पुरुषांत नवीन शक्तीचा संचार होईल व ते आपली अन्य कामे अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. यामुळे ‘बरोबरीने सहभाग’ आणि ‘बरोबरीची तयारी’ हाच महिलांच्या बाबतीत कायम विचार केला पाहिजे.


प्रश्नः युवा भारत असे भारताचे वर्णन केले जाते. सध्याच्या कोरोनाच्या संकटात आणि भावी काळातही युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. युवाशक्तीबाबत आपण काय विचार करता?

- युवा या शब्दाने जे सांगितले जाते त्याच अपेक्षा त्यांच्याकडून सर्वांच्या असणार! जो एखाद्या बेडीत अथवा पुस्तकात स्वतःला बंदिस्त करून घेत नाही आणि जो नवीन विचार करण्यासाठी जो सक्षम असतो, जो स्वप्ने पाहू शकतो, ज्याच्या अंगात उत्साह आणि उदात्तता आहे, ज्याच्या अंगात धाडस आहे आणि जो धोका पत्करू शकतो तो युवा होय. लहान मुले आणि युवक खूप संवेदनशील असतात. लहान मुले अधिक संवेदनशील असली तरी त्यांच्यात सामर्थ्य नसल्यामुळे ती परावलंबी असतात. युवकात सामर्थ्य असल्यामुळे संवेदनशीलतेने तो सत्य आणि न्यायाची भूमिका घेऊन उभा ठाकू शकतो. त्याने जर मनात आणले तो इकडचा हिमालय तिकडे हलवू शकतो. युवकांच्या शक्तीला केवळ दिशा देण्याची आवश्यकता आहे. पण युवकांनी जर केवळ आपले करिअर आणि स्वार्थ यांचाच विचार केला आणि धोका पत्करायचे नाकारलेे तर तो उद्योगाकडे पाठ फिरवून केवळ नोकरीचाच विचार करू शकतो. त्यातल्या त्यात सरकारी नोकरी मिळाली की आपले काम झाले! असा विचार युवक करीत असेल तर त्याचे केवळ केसच काळे आहेत आणि तो वृद्ध झाला आहे असे मानावे लागेल. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे पांढर्‍या केसांचे लोक युवक आहेत असेच म्हणावे लागेल. ‘पांढरे केस हिरवी मने’ या नावाचे वि.द. घाटे यांचे पुस्तक आहे. हिरवी मने या शब्दाला महत्त्व आहे. तरुणांचे मन नेहमी हिरवेगार असले पाहिजे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन, दिशा आणि साहाय्य देण्याची गरज आहे. त्यांच्यासमोर नवी नवी भव्य क्षितिजे निर्माण केली पाहिजेत.

ऐंशीच्या दशकातील गोष्ट आहे. डॉ. जोशी एकदा चीनच्या प्रवासाला गेले होते. त्यांनी आपला एक अनुभव सांगितला आहे. ते परतीच्या प्रवासाला निघणार इतक्यात चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना दूरध्वनी केला व एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी थांबण्याचा आग्रह केला. त्यांच्या विद्यापीठात एक युवा संमेलन होते आणि सुमारे दोन लाख युवक त्या संमेलनात उपस्थित राहणार होते. त्या संमेलनाच्या उद् घाटनाला येण्याचे निमंत्रण डॉ. जोशी यांना देण्यात आले. त्या संमेलनाच्या उद्घाटनाला अत्यंत चांगल्या प्रकारे प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला अंधार होता. मग समोरचा पडदा एकाएकी प्रकाशमान झाला. त्यात जगाच्या नकाशावर चीनला लालपिवळ्या रंगात ठळकपणे दर्शविण्यात आले होते. त्या चीनच्या नकाशातून त्यांचा ड्रॅगन बाहेर पडून संपूर्ण जग पादाक्रांत करीत आहे असे दर्शविण्यात आले होते. तेवढ्यात निवेदक सांगू लागला, ‘एके काळी हा चीनी ड्रॅगन आपल्या पंखाने संपूर्ण जगात वादळ निर्माण करीत होता. संपूर्ण विश्वाला आपल्या छायेने त्याने झाकून टाकले होते. आपल्याला पुन्हा असा चीन उभा करायचा आहे.’ अशा प्रकारचे मोठे लक्ष्य चीनने आपल्या युवापिढीसमोर ठेवले आहे.


जयप्रकाश नारायण यांनी इस्त्रायलमध्ये समोरच्या व्यक्तीला असा प्रश्न विचारला होता, ‘‘आपण युवाशक्तीला कशी प्रेरणा देता?’’

तेव्हा त्यांनी जयप्रकाशजींनाच विचारले होते, ‘‘तुमच्या देशातील युवकांच्या ओठावर कोणते गीत आहे ते आम्हाला सांगा. मग मी तुम्हाला याचे उत्तर सांगतो!’’

युवकांच्या समोर नवी स्वप्ने, नवे आदर्श ठेवता आले पाहिजेत. युवक कोणत्याही प्रकारच्या दंभाला सहन करू शकत नाही. तो सर्व जाणतो.

प्रश्नः कोरोना महामारीच्या काळानंतर भावी वाटचालीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. भविष्यकाळातील भारत असा तो विषय आहे. संघाचे सरसंघचालक या नात्याने आपण भविष्यकाळातील भारत या विषयी काय सांगाल?

- मनाची अयोध्या निर्माण करण्याबद्दल मी आधी बोललो आहेच. भारतीय व्यवस्थेच्या संदर्भात जगाचा दृष्टीकोन यावरही मी बोललो आहे. या गोष्टी उचित प्रकारे झाल्या तर भविष्यातील भारत आपोआपच साकार होणार आहे. आपला देश महान व्हावा अशी आपल्या देशातील युवा पिढीच्या मनात इच्छा आहे. आपला विश्वास दृढ करणार्‍या अनुकूल घटना आपल्याला घडताना दिसत आहेत. कोरोनाचे संकट आले पण यावेळी स्वातंत्त्योत्तर काळात प्रथमच असे दृश्य आपल्याला पाहायला मिळाले की, संपूर्ण समाज एक होऊन उभा ठाकला. सरकारचे आवाहन म्हणून नव्हे तर समाजाने आपणहून हे केले. पण प्रसारमाध्यमांत नकारात्मक गोष्टीच ठळकपणे दाखविल्या जातात. किती लोक ‘कोरोना पॉझिटिव्ह’ झाले आहेत यावर भर दिला जातो, कोरोनावर मात केल्याचे फार कमी सांगितले जाते. कोरोनाच्या काळात कामधंदा नसतानाही कित्येक मालकांनी आपल्या मजुरांना वार्‍यावर सोडले नाही. त्यांना पगार दिला. आता मालकांना आपला उद्योग पुन्हा सुरू करायचा आहे तर अनेक ठिकाणी अशी उदाहरणे दिसून येतात की मजूरवर्ग स्वतःच सांगतो आहे की, संकटाच्या काळात आम्हाला पगार दिला असल्यामुळे आता आपल्याला शक्य होत नसेल तर आम्हाला विलंबाने पगार दिला तरीसुद्धा चालेल.

दुसरी गोष्ट म्हणजे शासन आणि प्रशासनाच्या वतीने ज्या सूचना देण्यात आल्या त्यांवर विश्वास ठेवून जनतेने त्या सूचनांचे पालन केले असल्याचेही दृश्य आपल्याला दिसले. पंतप्रधानांनी दिवा लावण्याचे आणि थाळी वाजविण्याचे आवाहन केले तेव्हा जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी केल्या आहेत. असे दृश्य स्व. लालबहादूर शास्त्री आणि 1971 साली स्व. इंदिरा गांधी यांच्या वेळेस पाहायला मिळाले होते. मी व्यक्तीची प्रशंसा करण्यासाठी हे सांगत नाही. मला एवढेच सांगायचे आहे की, समाजात जी अंगभूत उर्जा असते तिच्या बळावरच तो असा एक होऊन उभा ठाकत असतो. आज देशातील छोटी मुलेसुद्धा खेळणे विकत घेण्याचा हट्ट करताना जेव्हा ‘मेड इन चायना’ असा छाप वस्तूवर पाहतात तेव्हा ती वस्तू घेण्यास आपणहून नकार देतात. अशी भावना मनात जागविणारी गुणसंपदा देणारी गोष्ट म्हणजेच मनात अयोध्या साकार करणे होय. त्यामुळे आपला भविष्यकाळातील वाटचालीचा मार्ग (Roadmap) हा भारतीय मानसाच्या आधारावर आणि वसाहतवादी दृष्टिकोनातून पूर्णपणे मुक्त असेल त्यामुळे मार्गदर्शक आराखडा तयार करताना देशकालपरिस्थितीशी सुसंगत अशा बाहेरील गोष्टींचा स्वीकारही आपल्याला केला पाहिजे. याशिवाय अन्य काही करण्याची गरज वाटत नाही.


प्रश्नः भविष्यातील भारताप्रमाणे ‘विश्वगुरू भारत’ ही संकल्पनासुद्धा मांडली जाते. स्वामी विवेकानंदांपासून श्रीगुरुजीपर्यंत अनेक महापुरुषांनी यावर भाष्य केले आहे. काही देश आपल्या सामर्थ्याच्या बळावर अन्य देशांना नमविण्याचा प्रयत्न करताना आज आपल्याला दिसत आहेत. तेव्हा महासत्ता म्हणून विश्वगुरू भारत कसा साकार होईल?

- हे पाहा, सत्तेवर आमचा विश्वास नाही. आपण महान होताना ‘भूभाग नहीं शत शत मानवों के हृदय जीतने का निश्चय’ आपण करीत असतो.

एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मन:।

स्वं स्वं चरित्रं शिक्षरेन्पृथिव्यां सर्वमानवा:।

एकेकाच्या चारित्र्याच्या माध्यमातून याची शिकवण जगाला देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आम्हाला कोणाचा भूभाग हडप करायचा नाही, कोणाचे वैशिष्ट्य नष्ट करायचे नाही. कोणत्याही देशाला गुलाम बनवायचे नाही. दुसर्‍याच्या संपत्तीवर कब्जा करायचा नाही. आपल्याला अशा अर्थाने महाशक्ती बनायचे नाही. आमच्याकडे ज्ञानशक्ती आणि धनशक्ती अव्वल दर्जाची असेल. मात्र याचा उपयोग ‘ज्ञानाय, दानाय च रक्षणाय’ यासाठीच करायचा आहे.

एक सुभाषित सांगते की,
विद्या विवादाय धनं मदाय, शक्ति: परेषां पीरपीडनाय।

खलस्य साधोर्विपरितमेतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय॥

दुष्ट लोकांची शक्ती दुसर्‍याला त्रास देण्यासाठी वापरली जाते. आपण मात्र जगाच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करणार आहोत. जगातील दुर्बळांच्या रक्षणासाठी आपल्या शक्तीचा उपयोग करणार आहोत. ज्यांच्यापाशी काही गोष्टींचा अभाव आहे त्यांना आम्ही त्या गोष्टी देणार आहोत. अन्य लोकांना केवळ आपल्याच अस्तित्वाची काळजी असते कारण त्यांचा मूलभूत विचारच तसा आहे. चांगले-वाईट राहू द्या; पण त्यांनी आपल्या अनुभवांती निष्कर्ष काढला आहे की, जीवन ही एक शर्यत आहे आणि जो पुढे पळेल तोच जिंकेल, असे ते मानतात. ते आधी ‘वैश्विक बाजारपेठ’ (ग्लोबल मार्केट) या बद्दल सांगत असतील आणि आता ‘स्वदेशी, स्वदेशी’ असाही आग्रह धरत असतील, तरी त्यामागे त्यांना आपल्याच स्वार्थाची काळजी असते. पण भारत असा विचार करीत नाही. ‘सर्व जगतील तर आम्ही जगू आणि आम्ही जगू तर सर्व जगले पाहिजे’ असा भारताचा विचार आहे. त्यामुळेच जग भारताला विश्वगुरू मानणार आहे. जेव्हा कारगील युद्ध झाले तेव्हा त्याचा अभ्यास करण्यासाठी चार-पाच प्रगत देशांतील मंडळी भारतात आली होती. आपल्या जवानांचा पराक्रम होताच, पण दुसर्‍या देशाने लादलेले युद्ध सीमारेषा न ओलांडताही भारताने कसे जिंकले याचे सर्व जगाला आश्चर्य वाटले. भारताने सीमारेषा न ओलांडण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता की चुकीचा होता यावर चर्चा राहू द्या! पण असा विचार केवळ भारतच करू शकतो. त्यामुळे जेव्हा भारत विश्वगुरू होईल तेव्हा एकेक भारतीयाच्या आचरणाचा आधारे आणि एक राष्ट्र म्हणून भारताच्या आचरणाकडे पाहतच जगाला आपल्या जीवनाचा विचार करावा लागणार आहे. अमेरिकेतील 65% लोक शाकाहाराचा अंगीकार करीत आहेत, हा विचार त्यांनी भारताकडून स्वीकारला आहे. संपूर्ण जगाने ‘योग’ स्वीकारला आहे. जगाच्या गरजा भागविण्याची शक्ती भारत संपादन करणार आहे.


प्रश्नः भारतीय जनमानसात ‘रामराज्य’ ही संकल्पना घर करून आहे. सध्याचा काळ पाहता आपल्याला ही संकल्पना कशी साकार करता येईल? तो सर्व जाणतो.

- प्रजा नीतिमान आणि राजाही नीतिमान तसाच शक्तिमान अशी व्यवस्था म्हणजेच रामराज्य होय. राजा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करीत होता आणि जनता ही राजाच्या आज्ञेत होती. राजा आणि प्रजा यांपैकी कोणाचे म्हणणे चालणार? असा प्रश्नच नव्हता. प्रजेला जे हवे तेच होईल असे राजा मानत होता आणि राजा सर्व जाणत असल्यामुळ तो योग्य तेच करील असे प्रजा मानत होती. राज्यात चोरलुटारू नव्हते. नितिमत्ता आणि उद्योग व परिश्रमाला किंमत होती. श्रमाला प्रतिष्ठा होती. स्वतःच्या पायावर उभे राहून पोट भरण्याची वृत्ती होती. त्यामुळे राज्यात समृद्धी होती. श्रीसूक्तात लक्ष्मीच्या अभावाची लक्षणे सांगितली आहेत.

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहमं ।

रोग, भूक, तहान ही अलक्ष्मीची लक्षणे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे,

न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभा मतिः ।

राग, एकमेकांशी भांडणे, एकमेकांचा मत्सर, दुसर्‍याचे भले झालेले न पचणे, अस्वच्छता आणि अशुभ मती ही अलक्ष्मीची लक्षणे आहेत.

मात्र रामराज्यात यांचा पूर्ण अभाव होता. त्यामुळे लक्ष्मी नांदत होती. भोगांऐवजी धनाचा व्यय धर्मासाठीचा केला जात होता. सर्व जीवनावश्यक गोष्टींची उपलब्धता विपुल होती. पण भोगविलासाकडे प्रवृत्ती नव्हती. अनुशासित, संयमी, जागृत, संघटित व स्वहिताचे भान असलेले जनजीवन तेव्हा होते. राजा धर्मानुसार वागत होता आणि प्रजासुद्धा धर्माने वागत होती. सत्तेचा केवळ विश्वस्ताप्रमाणे जनकल्याणार्थ उपयोग करत होता. भरताने रामाला सांगितले, ‘‘हे राज्य आपलेच आहे. माझ्या आईने वडिलांकडे हट्ट करून आपल्याला वनवास धाडले आहे. पण आता ते ही आम्हाला सोडून गेले आहेत. तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला परत चला आणि राजा व्हा!’’

तेव्हा रामचंद्र म्हणाले, ‘‘मी वचन दिलेले असल्यामुळे मला असे वागता येणार नाही.’’

अशा रितीने सत्ता दोघांच्याही हातात आहे पण तिचा लोभ दोघांनाही नव्हता. नाईलाजाने भरताला अयोध्येला तसेच परतावे लागले तेव्हा त्याने रामचंद्राच्या पादुका राजसिंहासनावर मांडून स्वतःला त्यांचा प्रतिनिधी मानून राज्यकारभार चालविला.

जेथे अशी प्रजा आणि असा राजा असतो तेच रामराज्य होय. ती व्यवस्था आता बदलली आहे. प्रजेची नीयत, नीती आणि भौतिक अवस्था; राजाची नीयत, नीती आणि भौतिक अवस्था तसेच प्रशासनाची नीयत, नीती आणि भौतिक अवस्था या तिघांचीही गुणवत्ता राखली तर त्यालाच रामराज्य म्हणता येईल. याचाच परिणाम म्हणून राज्यात रोगराई नव्हती, अपमृत्यू नव्हते, कोणी उपाशीतापाशी नव्हते, कोणी भिकारी आणि चोरलुटारू नव्हते. दंडित करण्यासाठी दंडनीय असे कोणीच समोर नव्हते. ही सर्व लक्षणे परिणामस्वरूप मानली पाहिजेत आणि राज्यव्यवस्था हीच यांच्या मुळाशी आहे. राज्यव्यवस्था, प्रशासन आणि सामाजिक संघटन यांच्यात परिवर्तन अपेक्षित आहे. त्यासाठी रामाने अवतार घेण्याची गरज नाही. रामाने केवळ अडथळा दूर करण्यासाठी अवतार घेतला होता. अडथळा दूर सारल्यावर सर्व गोष्टी आपोआप घडून आल्या. आज आपल्याला रामराज्याप्रमाणे प्रजेची स्थिती निर्माण करावी लागणार आहे; कारण आज राजा आणि प्रशासन हे समाजामधूनच येत असते. सध्याच्या काळातही तसा प्रयत्न झाला तर आपोआपच ‘रामराज्य’ साकार होईल, हे निश्चित!


मुलाखतकार - श्री. अमोल पेडणेकर व  श्री. रवींद्र गोळे 
***
साभार- साप्ताहिक विवेक

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या