संघसमर्पित ’पंडीतजी’



आम्ही कॉलेजला शिकत संघाचे काम करताना   संघाची विस्तारक योजना आली होती. त्यावेळी राजू बेटावदकर, अमृत पाटील, हेंमत म्हाळस आणि मी आम्ही वेगवेगळ्या गावांना विस्तारित म्हणून  गेलो होतो. १५ दिवस तेथे मुक्कामी राहावे लागत होते.  त्यावेळी नशिराबाद माझ्याकडे आले होते. त्यानुसार  मी १५ दिवस  पंडीतजी चौबे यांच्या परिवारात घरी मुक्कामी होतो. त्यावेळी मी १२ वीत होतो. 

  नशिराबादला त्यांना पंडीतजी म्हणूनच ओळखत. त्यावेळी संघ परिवारचे  सर्व कार्यकर्ते  पंडीतजींच्या घरी राहत. त्यांच्या घरी  या सर्वांचे आदरातिथ्य उत्तमरित्या होत असे. त्यावेळी पंडीतजी भुसावळला खासगी सिनेमा कंपनीत होते.  नशिराबादहून ते सायकलीने भादली पर्यत जायचे भादलीहून ते भुसावळपर्यंत रेल्वेने प्रवास करायचे. असा त्यांचा सकाळ संध्याकाळ सायकल प्रवास  व्हायचा. सायंकाळी ७ वाजेपर्यंत नशिराबादला आले म्हणजे ते प्रथम मला संघकार्यात मदत करायचे. नंतर ते घरी जात. 

काकूजी म्हणजे भाभीजी घर सांभाळत. त्या उत्तम  दर्जाची मिठाई बनवत.आल्या गेल्यांचं आदरातिथ्य त्या मिठाईनेच करायच्या. पंडीतजी पूर्ण संघाचे काम. त्यांनी संघ परिवाराला पोषक वातावरण निर्माण केले होते. प्रत्येक कार्यकर्त्याला ते मार्गदर्शन करत. 

त्याकाळी त्यांच्यावर अनेक आरोप झालेत, दंगली झाल्यात, अनेक प्रसंग आलेत. त्यांना विरोधही झाला. पण त्याने ते डगमगले नाही. आधी त्यांनी एकट्यानेच काम सुरू केले. नंतर लोक जमा झालेत.  दर शनिवारी वर्गावर त्यांच्यासोबत जायचो. त्यासाठी ते  कधीही कंटाळा करत नसत.मी आता थकुन आलोय, आज काही जात नाही ,असे त्यांनी कधीच केले नाही. 

मी त्यावेळी  वयाने लहान होतो. पंडीतजींच्या परिवाराने मला मुलासारखे आणि प्रेमाने वागवले होते. मला १५ दिवस कसे गेले ते जाणवलेच नाही. आपण बाहेर राहयला आलोय असे वाटलेच नाही. 

 काकूंनी व सर्व परिवाराने मला चांगले प्रेम दिले. त्यांनी आयुष्यभर निस्वार्थी पणे काम केले. प्रत्येकाला ते मदत करत.  त्यांच्यात स्वार्थ  असा कधी  जाणवला नाही. संघाच्या कामात ते नेहमी अग्रभागी असायचे. 

  नशिराबादला १९८९ ते ९४ दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात नेहेमीच तणाव निर्माण होत असे.या काळात चौबे काकांची खंबीर आणि स्वच्छ भुमिका प्रशासनासह सगळ्यांना अनुभवायला  मिळाली.पोलीस केस ची पर्वा न करता,अडचणींचा सामना करत नशिराबादमध्ये हिंदुत्वाचा झेंडा फडकवत ठेवण्यात काका अग्रेसर होते.

नशिराबाद परिसरात पंडीतजींच्या संपर्कातून शेकडो स्वयंसेवक तयार झाले.बहुतेक सगळ्यांशी त्यांचा नियमीत संपर्क असे .देशात आणिबाणिचा काळ स्वयंसेवकांसाठी कसोटीचा काळ होता.या काळात प्रांतस्तरावरच्या अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांसाठी पंडीतजींचे घर हक्काचे होते.अनेक भुमिगत कार्यकर्त्यांचा नशिराबाद परिसरात वावर होता.

पंडितजी आता आपल्यात नाहीत.या निष्ठावान स्वयंसेवकाला भावपुर्ण श्रध्दांजली. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

 - सतिश मदाने 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या