विद्यापीठं उद्ध्वस्त झाली असली तरी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरांवरील शाळांचे जाळे साऱ्या देशात पसरले होते. जिथे हिंदु राजे मांडलिक झाले होते तिथे त्यांनी शाळा सुरू केल्या. आणि चांगल्या पद्धतीने चालवल्या देखील.
इंग्रज जेंव्हा भारतावर राज्य करण्याच्या परिस्थितीत आले तेंव्हा त्यांनी सर्वात आधी भारताच्या शिक्षण पद्धतीचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा रिपोर्ट इंग्लंड, स्कॉटलंड आणि काही प्रमाणात भारतात देखील उपलब्ध आहे. हा सगळाच रिपोर्ट खळबळजनक आहे. आपल्या सगळ्या मान्यतांना, आपल्याला आजपर्यंत शिकवलेल्या इतिहासाला खोटं ठरवणारा आहे.
1757 मध्ये प्लासीची लढाई जिंकल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आपल्या आधिपत्याखाली घेतले. जेंव्हा त्यांनी आपल्या प्रशासन तंत्राचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की पूर्ण बंगालमध्ये कर वसुली लायक जमिनीच्या 34% जमिनीवर कुठल्याही प्रकारची कर वसुली करता येऊ शकत नाही. कारण ही सगळी जमीन शाळांसाठी राखीव आहे. हे सर्व बघून इंग्रजांनी (अर्थात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी) जिथे - जिथे ते शासन करत होते तिथे - तिथे शिक्षण पद्धतीचे सर्वेक्षण करण्याचे ठरवले.
इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करून अखंड भारताच्या मोठ्या भूभागावर आपले राज्य स्थापन केले. आता त्यांचे प्राधान्य शासन चालवण्याकडे होते. शिक्षण पद्धती ही शासन व्यवस्थेचाच एक भाग होती. त्यावेळी मद्रास प्रेसिडेन्सीत गव्हर्नर जनरलच्या पदावर मेजर जनरल सर थॉमस मुनरो होते. त्यांनी 25 जून 1822 ला एक आदेश काढला. त्या आदेशानुसार मद्रास प्रेसिडेन्सीच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, त्यांच्या अखत्यारीतील सर्व गावांच्या सर्व शाळांची माहिती काढायला सांगितली होती.
थॉमस मुनरो (Sir Thomas Munro : 27 मे 1761 - 6 जुलै 1827) हे स्कॉटिश योद्धा होते. ईस्ट इंडिया कंपनीत बढती मिळून मेजर जनरल या पदावर पोहोचले. 10 जून 1820 ते 6 जुलै 1827 पर्यंत ते मद्रास प्रेसिडेन्सीत गव्हर्नर जनरल होते. ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजी सत्ता यांच्याशी प्रचंड एकनिष्ठ असलेल्या थॉमस मुनरोंचे भारतीयांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष होते. त्यामुळेच, त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या आपापल्या जिल्ह्यांच्या रिपोर्टच्या अभ्यासासाठी मुनरो यांना चार वर्षे लागली.
18 मार्च 1826 ला त्यांनी सर्वेक्षण रिपोर्ट सार्वजनिक केला त्याचे शीर्षक होते, ‘The early measures for education in the Madras Presidency - Sir Thomas Munro’s minutes on education in 1822 and 1826.’ या रिपोर्ट मध्ये जनरल मुनरो यांचे शब्द आहेत,
"प्रेसिडेन्सीच्या सगळ्या गावांमध्ये शाळा आहेत" (every village has a school). रिपोर्टच्या सातव्या अध्यायात (chapter मध्ये) जनरल मुनरो लिहितात, 'State of native education here exhibited, low as it is compared with that of our own country, it is higher than it was in most European countries at no very distant period’. _(मद्रास प्रेसिडेंसी मध्ये शिक्षणाचा स्तर हा आपल्या देशाच्या, अर्थात इंग्लंड च्या, शैक्षणिक स्तरापेक्षा कमी आहे, मात्र इतर सर्व युरोपियन देशांपेक्षा चांगला आहे.)_
इंग्रजी राज्याप्रति अत्यधिक एकनिष्ठ असलेले जनरल मुनरो, इंग्लंडच्या शैक्षणिक स्तराला कमी कसे म्हणू शकतील? हे स्वाभाविकच आहे. पण तरीही ते, भारतातील या शिक्षणाला, इतर युरोपियन देशांपेक्षा चांगले म्हणतात. पण बाकी लोकांनी या बाबत काय म्हटले? *अनेक समकालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि ख्रिश्चन मिशनरीजनी लिहून ठेवले आहे की भारतीय शिक्षण व्यवस्था इंग्लंडच्या शैक्षणिक पध्दती पेक्षा चांगली आहे.*
याच मद्रासच्या रिपोर्ट मध्ये लिहिले आहे, 'मद्रास प्रेसिडेन्सीत 12,498 शाळा आहेत ज्यात 1,88,650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सन 1823 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सी ची लोकसंख्या होती 1,28,50,941 आणि सन 1811 च्या जनगणनेनुसार संपूर्ण इंग्लंडची जनसंख्या होती 95,43,610. त्यात शाळा / विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती 75,000 फक्त.
अर्थात कोणत्याही दृष्टिकोनातून बघितले, शाळा / विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किंवा त्यांच्या टक्केवारीनुसार, दोन्ही बाबतीत भारत इंग्लंडच्या कितीतरी पुढे होता. आणि तरीही आम्ही हेच म्हणत राहणार की इंग्रजांनी भारतात शिक्षण पद्धतीची निर्मिती केली? इंग्रजांनी भारतात शिक्षण पद्धती विकसित केली?*
त्याच दरम्यान बंगालमध्ये हेच सर्वेक्षणाचे काम विलियम एडमने केले. 1796 मध्ये स्कॉटलंडमध्ये जन्म झालेले विलियम, बाप्टीस्ट मिशनरी म्हणून सन 1818 मध्ये भारतात आले, त्यावेळी मराठ्यांना हरवून इंग्रजांनी जवळपास पूर्ण देशावर राज्य करणे सुरू केले होते. विलियम 27 वर्ष भारतात राहिले. त्या दरम्यान त्यांचा राजा राम मोहन रॉय यांच्याशी चांगला संपर्क होता.
त्यावेळी लॉर्ड विलियम बेंटिक भारताचे गव्हर्नर जनरल होते. इंग्रजांची राजधानी कलकत्ता होती. बेंटिक ने विल्यम ॲडम्स ला शिक्षण खात्यात अधिकारी पदावर नियुक्त केले. आणि त्याला बंगाल आणि बिहारच्या शाळांचे अहवाल तयार करण्यास सांगितले.
विल्यम ॲडम्सने 1835 ते 1838 या काळात तीन अहवाल दाखल केले. हे अहवाल ‘एडम्स रिपोर्टस’ या नावाने प्रसिद्ध आहेत. आपल्या पहिल्या रिपोर्ट मध्ये ऍडम्स लिहितो, *‘बंगाल (त्या वेळचा पूर्ण बंगाल, अर्थात आजच्या बांग्ला देशा सहित) आणि बिहारमध्ये एक लाखाच्या आसपास शाळा आहेत.*
या दोन्ही प्रांतांची लोकसंख्या चार कोटींच्या पेक्षा थोडी जास्त आहे. म्हणजेच प्रत्येक 400 व्यक्तींवर एक शाळा आहे.
विल्यम ॲडम्सने दिलेल्या संख्येपैकी सगळ्याच शाळा काही मोठ्या शाळा नाहीत. त्यातल्या अधिकतम शाळा या मंदिरात, मोकळ्या जागेत, अंगणात, वडाच्या झाडाच्या पारावर किंवा शिकवणाऱ्या शिक्षकांच्या घरी अथवा त्यांच्या अंगणात लागतात. असं असलं तरी सगळ्या प्रकारचे मूलभूत प्राथमिक शिक्षण या शाळांमधून दिले जाते.
त्यावेळी पूर्ण पंजाब इंग्रजांच्या ताब्यात नव्हता. महाराजा रणजीत सिंह ने लाहोरला आपली राजधानी केली होती आणि पेशावर पर्यंत आपले शासन ठेवले होते. या पट्ट्यात जेवढा पंजाब इंग्रजांच्या हातात होता, त्याचा गव्हर्नर जनरल चार्ल्स स्टुअर्ट हार्डिंग होता. त्याने सुद्धा मद्रास आणि बॉम्बे प्रमाणे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु उत्तर पश्चिम सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती असल्याने ते शक्य झाले नाही.
पंजाब मध्ये हे सर्वेक्षण जवळपास 50 वर्षांनी झाले. कारण तोपर्यंत इंग्रजांनी पूर्ण पंजाब वर आपले वर्चस्व स्थापित केले होते. जी.डब्ल्यू. लेटनर या ब्रिटिश आय सी एस अधिकाऱ्याने हे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातील काही रिपोर्टसच्या आधारे त्याने एक पुस्तक पण लिहिले होते. *या पुस्तकात लेटरन ने अतिशय महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. तो लिहितो, 'भारतात खूप चांगली विकेंद्रीत शिक्षण व्यवस्था आहे. जवळपास प्रत्येक गावात, गावाची म्हणून एक शाळा आहे. ती गावकरी चालवतात. त्या शाळेसाठी जमीन राखून ठेवण्यात आली आहे. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून शाळेचा खर्च चालवला जातो'.
*लेटनर पुढे लिहितो, 'यातील अनेक शाळांचा दर्जा तर आमच्या ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या बरोबरीचा आहे. शिक्षकांना चांगले वेतन मिळते.'*
(प्रशांत पोळ यांच्या शनिवार १७ जून ला प्रकाशित होणाऱ्या *विनाशपर्व* या पुस्तकातील अंश)_
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
1 टिप्पण्या