हैदराबाद मुक्तीलढ्यात रा. स्व. संघाचे योगदान

रा. स्व. संघाचे कायमच 'राष्ट्राय स्वाहा इदं न मम्' या उक्तीप्रमाणे कार्य चालत आले आहे. भारत स्वतंत्र होत असताना संघ केवळ २३ वर्षाचा झाला होता. संघाचा प्रसार त्यावेळी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर होत होता. मध्य प्रदेशात संघाच्या शाखा वाढत होत्या. एवढेच काय तर जम्मू काश्मीर व सिंध प्रांतात देखील संघाचे चांगलेच कार्य वाढले होते. त्यामुळे भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान संघ स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात हिंदू माता भगिनींचे रक्षण करताना बलिदान दिले आहे. रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक पू. श्री गुरुजी यांची व  काश्मीरचे राजा हरिसिंग यांच्या भेटीनंतर हरिसिंग यांनी काश्मीरला भारतात विलीन होण्यास होकार दर्शविला होता. हे आपणास ठाऊक आहेच. परंतु असाच एक पेच प्रसंग भारत स्वतंत्र होत असताना हैदराबाद संस्थानात उभा राहिला होता.


हैदराबाद संस्थानवर त्यावेळी सातवा निजाम मीर उस्मान अली खान याचे राज्य होते. राजा मुस्लिम तर जनता बहुसंख्य हिंदू अशी तेथील परिस्थिती होती. हिंदू बहुसंख्य असूनही त्यांच्यावर निजाम अतोनात छळ करी. निजामाने त्याच्याविरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला दाबून टाकण्यासाठी रझाकार, इत्तेहादुल मुसलमीन, खाकसार, सिद्दीकी अश्या संघटना उभारल्या होत्या. त्यापैकी 'रझाकार' ही संघटना निमलष्करी दलासारखीच होती. प्रशासन व्यवस्थेतील पोलिसांपेक्षा रझाकारांची संख्या कैक पटीने जास्त होती. त्यामुळे हैदराबाद संस्थानात राष्ट्रीय काँग्रेसचे सुद्धा कार्य सुरू झालेले नव्हते. हैदराबाद संस्थानात उठावाचे लोण फुटले तेव्हा स्टेट काँग्रेस हैदराबादेत अस्तित्वात आली. त्यामुळे उर्वरित देशातील कोणत्याही संघटना किंवा नेत्यांना हैदराबाद संस्थानात खुलेपणाने कार्य करता आलेच नाही. 


हैदराबाद संस्थानात गैर मुस्लिम संघटनेला काम करण्यास परवानगी नव्हती. सर्व मानवी स्वातंत्र्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते. आंदोलन, सत्याग्रह, मिरवणूक, सभा, प्रदर्शने अश्या सर्व गतिविधि प्रतिबंधित होत्या. अश्या परिस्थितीत संघकार्य हैदराबाद संस्थानात प्रत्यक्ष पोहचू शकले नव्हते. संघाचे कार्य हैदराबादच्या सीमावर्ती भागात व वऱ्हाड प्रांतात सीमित राहिले होते. संघाचे काम अन्य नावाने चालत असे. व्यायामशाळा व गणेश मंडळे अश्या माध्यमातून स्वयंसेवक छुप्या पद्धतीने समाज जागरणाचे कार्य करत होते. जेव्हा निजामाने वऱ्हाड प्रांतावरही हक्क सांगितला, तेव्हा वऱ्हाड प्रांतातील संघ स्वयंसेवकांनी त्याला तीव्र विरोध केला . हैदराबाद मुक्ती लढ्यात स्वतः सहभागी झालेले स्वयंसेवक द. ग. देशपांडे यांनी आपल्या पुस्तकात बऱ्याच ठिकाणी संघाचा हैदराबाद मुक्ती लढ्यासंबंधी आठवणी नमूद केल्या आहेत, केसरी वृत्तपत्रातही अनेक वृत्तांतमधून संघाच्या तत्कालीन भूमिकेची कल्पना येते.


संघाची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका काय होती?

संघ आणि समाज यामध्ये कोणत्याही प्रकारचे द्वैत डॉ. हेडगेवार यांना मान्य नव्हते. अन्य हिंदू संघटना प्रमाणे संघ काही पृथक संघटना नाही. संघ ही हिंदू समाजाच्या अंतर्गत वेगळी हिंदू संघटना नसून हिंदू समाजाचेच ते संघटन आहे अशी धारणा आहे. म्हणूनच डॉक्टरांनी निःशस्त्र प्रतिकार करण्यासाठी जाणाऱ्यांना आदेशाची पत्रे धाडली नाहीत, तर ज्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली त्यांना डॉक्टरांनी व्यक्तिशः पत्र पाठवून अभिनंदन केले. रा. स्व. संघाचा स्वयंसेवक म्हणजे हिंदू समाजाचा एक घटकच आहे, संघ म्हणून त्याचे वेगळे अस्तित्व आहे असे नाही. त्यामुळे आजवर संघ स्वयंसेवकांनी केलेल्या महान कार्यांचे श्रेय संघाने कधीच घेतले नाही, ते श्रेय समाजाला दिले, स्वयंसेवकाला दिले आहे. स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा डॉक्टर हेडगेवार यांची अशीच भूमिका होती. स्वयंसेवक आपापल्या पातळीवर विविध माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होत होते. हैदराबाद संस्थानात सुद्धा स्वयंसेवकांनी तीच भूमिका घेतली.


संघ स्वयंसेवकांचा सत्याग्रह:

१९३८ मध्ये नागपूरहून संभाजीनगरला ( तत्कालीन औरंगाबाद) वंदे मातरम सत्याग्रहासाठी हिंदू महासभेची मंडळी मोठ्या प्रमाणात आली, तेव्हा तत्कालीन सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी अनेक कार्यकर्त्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले, शिवाय आर्वी पर्यंत त्यांच्या बरोबर ते स्वतः आले होते. स्वयंसेवक डॉ. ल. वा. परांजपे हे या तुकडीचे प्रमुख होते आणि या तुकडीत बावीस जण सहभागी होते. अशी आठवण या मोहिमेचे संघटक स्वतः द. ग. देशपांडे सांगतात.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी असताना त्यांनी हैदराबाद संस्थानातील हिंदूंची अवस्था व त्याविरुद्ध जनजागृती करणारे द. मा. देशमुख व द. ग. देशपांडे यांनी बौद्धिके शाखेवर घेण्यास सांगितले होते.  त्यामुळे वऱ्हाडात व निजाम संस्थानाच्या सीमावर्ती भागात समाज जागरण होण्यास मदत झाली. 


अकोल्याच्या महाशिबिरात श्री गुरुजी यांनी द. ग. देशपांडे व द. मा. देशमुख यांचा परिचय स्वतः करून दिला होता. त्यात “वंदे मातरम सत्याग्रह व भागानगर निःशस्त्र प्रतिकार यातील त्यांचा सहभाग व वऱ्हाडात निजामविरुद्ध प्रचार करणारे आणि निजाम वऱ्हाड प्रांतावर जो हक्क सांगत आहे, त्यास विरोध करणारे” असा परिचय करून दिला होता. श्री गुरुजी यांनी भागानगर सत्याग्रहात जास्तीतजास्त संख्येत स्वयंसेवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही केले होते. 


भैय्याजी दाणी यांचा निःशस्त्र प्रतिकार: 

हिंदू महासभेचे कार्यकर्ते व रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असा त्यावेळी भेद नव्हता. ‘अभेद्य हृदये’ असाच प्रकार त्यावेळी होता. भैय्यासाहेब दाणी हे त्यावेळी रा. स्व. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होते. 1962 - 65 या काळात ते संघाचे सर कार्यवाह राहिले आहेत. त्यांनी एप्रिल 1939 मध्ये उमरखेड मार्गे जाऊन संस्थानात निःशस्त्र प्रतिकार केला होता.  या तुकडीत 19 जण सहभागी होते आणि या तुकडीला निरोप देण्यासाठी नागपूरच्या टाऊन हॉल मध्ये डॉ. हेडगेवार स्वतः उपस्थित राहिले होते. निःशस्त्र प्रतिकार केल्यामुळे त्यांना निजामाने एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.  त्याचप्रमाणे डॉ. परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नागपुरात आठ नऊ हजारांचा समुदाय जमला होता. याच सभेत साताऱ्याच्या अनंत सदाशिव उपाख्य भिडे गुरुजी यांचा लढ्यातील स्तुत्य कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला होता. यासभेतही  डॉ हेडगेवार उपस्थित होते. या तुकडीने औरंगाबाद मधील सुपारी हनुमान जवळ जून 1939 मध्ये सत्याग्रह केला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. 


वाशीम येथे सत्याग्रहसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांची सोय ठेवण्यात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक बाबासाहेब धनाग्रे वकील, कृष्णराव देशपांडे वकील, बाळासाहेब देशपांडे वकील, बाळासाहेब जतकर वकील, वयोवृद्ध अण्णासाहेब डबीर आणि रुकमानंद हरिश्चंद्र उपाख्य आबासाहेब देशपांडे, रिसोडकर वकील आदी सहभागी होते. 


त्याचप्रमाणे लोणार, एलीचपूर, परतवाडा या ठिकाणी सुद्धा अश्याच प्रकारे रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना मदत केली व स्वतः निःशस्त्र प्रतिकार करण्यासाठी सहभागी झाले. यामध्ये दादासाहेब देशपांडे पार्डीकर, एलीचपूर कापड मिल चे मॅनेजिंग डायरेक्टर नानासाहेब देशमुख व लोकमान्य टिळकांचे समकालीन अनुयायी बळवंतराव बाबासाहेब देशमुख आदी स्वयंसेवक सहभागी होते. 


वाशीम, देऊळगाव, लोणार याठिकाणी रा. स्व. संघाच्या सत्याग्रहिंचा मुक्काम असे व तेथून मग त्यांची तुकडी तुकडीने पुढे रवानगी होई. असा उपक्रम सातत्याने चालू होता. या सत्याग्रहींना व प्रतिकारकांना तळणी - बामणी मार्गे जिंतूर व परभणी कडे घुसविले जाई. तर देऊळगावहुन वाघरुळ जालना मार्गे हैदराबाद किंवा औरंगाबाद मार्गे पाठविले जात असे. 


पू. डॉ. हेडगेवार व पू. श्री गुरुजी यांच्या आदेशानुसार अश्या शेकडो स्वयंसेवकांनी हैदराबाद येथील सत्याग्रहात भाग घेतला. निःशस्त्र प्रतिकार करून कित्येकांनी तुरुंगवासही भोगला. प्रचारकार्य व सत्याग्रहींना संस्थानात सोडून येण्याचे काही तुकड्यांचे कार्य अविरतपणे सुरू होते. वर्धा, चंद्रपूर व वऱ्हाडातील चार जिल्ह्यात हा प्रचार जोमाने सुरू होता.


दारव्हेकर यांचे बलिदान:

भागानगर सत्याग्रहात 19 सत्याग्रहींनी बलिदान दिले, त्यापैकी एक म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकर. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या या स्वयंसेवकाने निःशस्त्र प्रतिकार लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना निजाम पोलिसांनी अटक केली होती. आठ दहा दिवसांपासून त्याची प्रकृती चांगली नसतानाही तुरुंगात त्याच्यावर उपचार करण्यात आले नाही.  आदल्या दिवशी जेलर या तरुणाला मृत्यू शय्येवर सोडून हैदराबादला निघून गेला. या मयत तरुणाच्या भावाला तार केल्यावर तो भेटन्यासाठी आला तेव्हा त्यालाही त्रास देण्यात आला. केसरीत प्रसिद्ध झालेल्या बातमीत “17 जुलै रोजी असिफाबाद तुरुंगातील नाचणगाव येथील पुरुषोत्तम दारव्हेकर यांना संशयास्पद स्थितीत 17 जुलै रोजी पहाटे देवज्ञा झाली. ” असे नमूद करण्यात आले होते.


प्रल्हादजी अभ्यंकर यांचे योगदान:

प्रल्हाद जी अभ्यंकर हे तर संघाचे महाराष्ट्र प्रांताचे संघचालक राहिलेले कार्यकर्ते. त्यांनीही डॉ. हेडगेवार यांच्या सांगण्यावरून औरंगाबाद येथील गुलमंडी चौकात निजामविरुद्ध सत्याग्रह केला होता. त्यामुळे त्यांना अटक होऊन दोन वर्षाची कैद झाली होती. हर्सूल व परभणी येथील कारागृहात त्यांना डांबले होते. त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहिले आहे की मी जेव्हा तुरुंगात गेलो तेव्हा तिथे अनेक संघ स्वयंसेवक मला भेटले. यावरून अनेक संघ स्वयंसेवक वैयक्तिक पातळीवर व हिंदू महासभेच्या माध्यमातून निजामाच्या विरोधात लढा देत होते हे लक्षात येते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या