मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘अभाविप’ने केला स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांचा सन्मान



अंबड| अंबड शहरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे संपूर्ण मराठवाड्यामध्ये काढण्यात येत असलेल्या कृतज्ञता रथयात्रे चे आगमन झाले होते. यानिमित्त अभाविप शाखा अंबड तर्फे पाचोड रोड वरील 'पवन करिअर अकॅडमी' मध्ये नागरी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यास नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या नागरी सोहळ्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये ज्यांनी निजामाविरुद्ध लढा देऊन निजामाची जुलमी राजवट उध्वस्त करण्याचे कार्य केले. अशा शासनमान्य स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान सोहळा आयोजित केला होता. 

आता यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक स्वर्गवासी झाल्यामुळे त्यांच्या वारसांचा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री देवदत्त जोशी, अंबडच्या अप्पर तहसीलदार ऋतुजा पाटील मॅडम, अभाविप देवगिरी प्रदेश उपाध्यक्ष प्रा नाना गोडबोले, शहर मंत्री माधव उद्देवाल व यात्रा प्रमुख सुरेश माटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राध्यापक श्री सुरेश जगताप होते. माननीय देवदत्त जोशी व आंबडच्या अप्पर तहसीलदार ऋतुजा पाटील मॅडम यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 
याप्रसंगी बोलताना प्रमुख मार्गदर्शक अभाविप चे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री देवदत्त जोशी म्हणाले," इंग्रजांपेक्षाही रझाकरांचे अत्याचार हे मोठे वेदनादायी होते. रझाकार ही काही निजामाची अधिकृत लष्करी संघटना नव्हती तर निजाम पुरस्कृत दहशतवाद निर्माण करणारी संघटना होती. मराठवाड्यातील जनतेने त्यांचा अन्याय सहन करताना त्यांना प्रतिकार केला व निजामास शरण येण्यास भाग पाडले. संघर्षानंतर निजाम शरण येऊन तत्कालीन हैदराबाद संस्थान हे 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात समाविष्ट झाले. निजाम व त्याच्या रजाकार संघटने विरुद्धच्या संग्रामात जे नागरिक शहीद झाले किंवा ज्यांनी कारावास भोगला त्यांच्या आठवणी जागृत करून त्यांचा या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. निमित्ताने तरुणांमध्ये देशभक्ती जागृत ठेवणे गरजेचे आहे." 

अप्पर तहसीलदार ऋतुजा पाटील मॅडम यांनी या सोहळ्याचे विशेष असे कौतुक करत आयोजकास धन्यवाद दिले व स्वातंत्र्य सैनिका विषयी आदर व्यक्त केला. त्यांच्या हस्ते रथ यात्रेतील मराठवाडा मुक्ती संग्राम स्तंभास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अंबड शहर व परिसरातील पुढील स्वातंत्र्य सैनिकांच्या  वारसांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माजी आमदार भालचंद्र कुलकर्णी अंबड यांचे चिरंजीव डॉ यशवंत कुलकर्णी,  स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव देशमुख, साडेगाव तालुका अंबड यांचे नातू सुभाष देशमुख, स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय पंढरीनाथ गोविंद तत्सत यांचे नातू किरण देशपांडे, स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय भवानीदास देशपांडे साडेगाव तालुका अंबड यांच्या कन्या सौ छाया देहेडकर व नातू डॉक्टर परीक्षित देशपांडे, स्वातंत्र सैनिक स्वर्गीय निवृत्ती काकडे यांचे पणतू श्री अनिकेत काकडे, स्वातंत्र्या सैनिक स्वर्गीय बापूसाहेब देशमुख साडेगाव यांच्या नात सून सौ उषा देशमुख, स्वातंत्र सैनिक स्वर्गीय दगडूजी जारे तीर्थपुरी यांचे नातू एड. कैलास जारे, स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय बाळासाहेब देशमुख अंबड यांचे चिरंजीव श्री अशोक देशमुख, स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय प्रल्हाद सिंह ठाकुर अंबड यांचे चिरंजीव श्री दीपक भैय्या ठाकूर, स्वतंत्र्या सैनिक स्वर्गीय वसंतराव देशमुख अंबड यांचे चिरंजीव श्रीकांतराव देशमुख, स्वर्गीय मोतीलाल शर्मा यांचे चिरंजीव एडवोकेट शर्मा,  स्वर्गीय देविदत्त ओझा (अंबडचे माजी नगराध्यक्ष) यांचे चिरंजीव श्री राजेश ओझा इत्यादी स्वातंत्र्यसैनिक वारसांचा सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर नागरी सोहळा संपल्या नंतर अंबड शहरातील नगरपालिकेसमोरील स्वातंत्र्य सैनिक स्मृतीस्तंभाला भेट देऊन पुष्यमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. अंबड शहरातून मुख्य रस्त्याने अमृत महोत्सवी रथयात्रा गेली. मतस्योदरी देवी परिसर, देवगिरी पतसंस्था परिसर, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवन करिअर अकॅडमी, नगरपालिका चौक व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये रथयात्रेचे विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

नागरी सोहळा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रथयात्रा प्रमुख श्री सुरेश माटे यांनी केले. त्यांनी यात्रेचा प्रवास व यात्रेस  मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद याविषयी माहिती देत असतानी यात्रेचा समारोप 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांच्या विशेष उपस्थितीमध्ये जाहीर कार्यक्रमांने संभाजीनगर येथील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या परिसरात होईल, अशी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मानसी मोहोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंबड शहर मंत्री महादेव उद्देवाल यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या