मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा हा तत्कालीन समाजाने देव, देश आणि धर्म रक्षणासाठी दिलेला लढा होता - मा. प्रमोदजी बापट


------------------------------------------------
लातूर| निजामाच्या भारतदेश विरोधाचे, धर्मांध रझाकारांच्या पाशवी अत्याचारांचे आणि त्या विरोधात हैदराबाद संस्थानातील विशेषतः मराठवाड्यातील जनतेने देव, देश, धर्मरक्षणासाठी दिलेल्या तीव्र प्रतिकाराचे निरंतर स्मरण होणे आवश्यक आहे, याचा विसर पडू देऊ नका असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रचार विभाग प्रमुख मा. प्रमोदजी बापट यांनी केले.

सांस्कृतिक वार्तापत्र, पुणेच्या 'लढा - मराठवाडा मुक्ती संग्रामाचा'- या विशेषांकाचे प्रकाशन लातूर येथे प्रमोदजी बापट यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
'आर्यसमाजाचे प्रवर्तक, संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीचे हे २०० वे वर्ष आहे. स्वामीजींनी धर्मरक्षणासाठी आर्य समाजासारख्या जाज्वल्य संघटनेची स्थापना केली. ग्लानीत असलेल्या तत्कालिन धर्माची- समाजाची स्थिती आणि गती स्वामीजींनी नेमकेपणाने ओळखून सिंहबळाने कार्य केले आणि आर्य समाजाच्या देशभरात शाखा सुरु करुन धर्मरक्षणाचे वेगवान कार्य आकाराला आणले. 

 १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतदेश स्वतंत्र झाला तरी निजामाच्या अधिपत्याखालील मराठवाडा हा पारतंत्र्यात होता. निजामाचा ओढा हा पाकिस्तानकडे अधिक असल्यामुळे त्याने आत्यंतिक भारतद्वेषातून आपल्याच राजवटीतील हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार करवले.

दिवसेंदिवस निजामाच्या हिंदूधर्मद्वेषी वृत्तीमुळे तत्कालिन समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु झाले. रझाकार ही सशस्त्र पाशवी संघटना स्थापन करुन समाजाचे दमन सुरु झाले. फाळणीच्या भयंकर वेदनांची आठवण होईल असे भीषण अत्याचार रझाकार सशस्त्र सेनेच्या माध्यमातून केले जाऊ लागले. हैदराबाद संस्थानात ठिकठिकाणी, लहान मोठ्या गावांत ही सेना स्त्रियांवर अत्याचार, आबालवृद्धांची छळवणूक करु लागल्यामुळे याविरोधात समाजमन पेटून उठले आणि प्रतिकार सुरु झाला. या सर्व ठिकठिकाणच्या प्रतिकारामागे आपला देव, देश आणि धर्म वाचवण्यासाठीची भावना होती.

स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई, लाहोरनंतर तिसरी शाखा तत्कालिन हैदराबाद - निजाम संस्थानाच्या अधिपत्याखाली धारुर, बीड येथे सुरु केली आणि निजामाच्या धार्मिक प्रचार, प्रसाराला आक्रमकपणे अटकाव सुरु झाला. धारुर पाठोपाठ चौथी शाखा हैदराबाद येथे उघडली आणि सत्यार्थप्रकाश या ग्रंथाचे तेलुगू भाषेत भाषांतर करुन ठिकठिकाणी या ग्रंथाचे जाहीर वाचन होऊ लागले. हा ग्रंथ सिंहबळ देणारा असल्यामुळे समाजजागृती वेगाने होऊ लागली आणि अस्मिता विसरत चाललेला समाज जागृत होऊ लागला. रझाकारांना काही ठिकाणी प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले.
अन्याय - अत्याचाराविरोधात आपले पूर्वज कसे लढले, याचे शोर्यस्मरण सातत्याने होणे आवश्यक आहे. अशा लढ्यांचा अभिमान, सन्मान आणि समाधान बाळगून याला पूर्णविराम न देता आपण आपल्या पुढच्या पिढीला या संघर्षलढ्याचे विविध साहित्याद्वारे सातत्याने स्मरण करवून दिले पाहिजे. लातूर येथीलचं डॉ कोलपुके यांनी लिहीलेले 'संघर्ष' हे नाटक अभ्यासले पाहिजे नव्हे शाळा-महाविद्यालयांंमध्ये हे नाटक वसवले गेले पाहिजे, असे मत बापट यांनी व्यक्त केले.

हैदराबाद संस्थानातील संघर्षलढा हा केवळ स्वातंत्र्यासाठी नसून तो सर्वार्थाने देव, देश, धर्माच्या मुक्तीसाठी होता. स्वातंत्र्यापेक्षाही मुक्तीचे मोल हे अधिक असते. हे मुक्तीचे मोल मराठवाड्यातील लोक गेली कित्येक दशके हरवून बसले आहेत. याच्या जागरणाची गरज आहे. हजारो हुतात्मे, तीव्र संघर्षाच्या हजारो घटना आणि जीवनमरणाचे प्रसंग मराठवाड्यातील मुक्तीलढ्यात जागोजागी घडले होते, त्याचे विस्मरण होणे हा समाज म्हणून कृतघ्नपणा असेल. सांस्कृतिक वार्तापत्राचा हा विशेषांक अशा सर्व हुतात्म्यांचे, संघर्षलढ्याचे स्मरण करतो म्हणून असे साहित्य मराठवाड्यातील घरांघरात पोहचले पाहिजे, असे मत बापट यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव समाजात देव, देश आणि धर्म रक्षणाची जागृती उत्पन्न व्हावी म्हणून सुरु केले होते त्याप्रमाणे मराठवाड्यातील मुक्तीलढ्यातील प्रेरणास्रोतांचे ठिकठिकाणी उत्सव साजरे झाले पाहिजेत, त्यांना अमर ठेवले पाहिजे.

अश्वं नैव गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च 
अजापुत्रो बलिं दध्यात्, देवो दुर्बल घातक:
या सुभाषिताप्रमाणे संख्येने बलवान समाज हा दुर्बल समाजावर केव्हाही भारी पडू शकतो हे लक्षात घेऊन समाजाने कायम प्रबळ, संघटित, एकजूट आणि देव, देश, धर्मरक्षणासाठी कटिबद्ध असले पाहिजे असे आवाहन बापट यांनी केले.

तत्पूर्वी 'मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम आणि हैद्राबाद संस्थान' या पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. चंद्रशेखर लोखंडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून मराठवाड्यातील ५०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मराठवाड्यातील मुक्तीलढ्याचा खरा इतिहास पोहचवल्याचे कार्य नमूद केले. आपण भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल १ वर्षांनी स्वतंत्र झालो, हे सध्याच्या विद्यार्थ्यांना माहित झाले पाहिजे, असे मत डॉ लोखंडे यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक वार्तापत्राच्या श्रीमती सुनीताताई पेंढारकर यांनी सदर विशेषांक समाज जागरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असून तो मराठवाड्यातील घराघरात पोहचला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मराठवाडा साहित्यमंचाचे संयोजक प्रवीण सरदेशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार डॉ प्रदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात संतोष बीडकर यांच्या पद्यगायनाने झाली तर समारोप महेश काकनाळे यांनी गायलेल्या वंदे मातरम् गीताने झाला. यावेळी व्यासपीठावर लातूर जिल्हा संघचालक संजय अग्रवाल, उमाकांत मद्रेवार, संजय गुरव, धनंजय तुंगीकर आणि शैलेश कुलकर्णी उपस्थित होते.

#मराठवाडा #मराठवाडा_मुक्तीसंग्राम #लातूर #LaturNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या