हिंदू राजपुतांच्या आत्मसन्मानासाठी झालेल्या हल्दीघाटीच्या लढाईची गोष्ट
चेतक पर चढकर जिसने, भाले से दुश्मन संघारे थे |
मातृ भूमी कि रक्षा करने, जंगल मे साल गुजारे थे ||
या ओळी फक्त कवितेच्या नाहीत, तर खुद्द महाराणा प्रतापांच्या पराक्रमाची साक्ष देतात. या ओळी अश्या एका लढाईची आठवण करून देतात, जेव्हा राजपुतांच्या आत्मसन्मानासाठी महाराणा प्रताप यांनी खुद्द मुघल सम्राट अकबराशी लढा दिला होता.
गोष्ट हल्दीघाटीच्या लढाईची
वर्ष होतं १५७२. महाराणा प्रताप नुकतेच मेवाडच्या राजगादीवर विराजमान झाले होते. त्या दरम्यान उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी मुघलांचं वर्चस्व होतं. हे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. जास्तीत जास्त भूभागावर वर्चस्व मिळवण्यासाठी अकबर कोणत्याही थराला जायला तयार होता. खरं तर मेवाड प्रांत म्हणजे पूर्ण भारताच्या दृष्टीने खूप छोटं राज्य होतं. तरीही मुघल सम्राट अकबराला ते जिंकून घेणं महत्वाचं वाटलं. याला कारण काय ? तर अकबराचं साम्राजवादी धोरण, आणि विविध प्रांतात व्यापार करताना मेवाड या हिंदू प्रांतातून जावं लागत असल्याने तिथे निर्माण होणारा अडथळा.
म्हणूनच आता अकबराला काहीही करून मेवाड काबीज करायचं होतं. सुरुवातीच्या काळात अकबराने सामंजस्याची भूमिका घेऊन महाराणा प्रताप यांना मुघल साम्राज्यात सामील होण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर अर्धा हिंदुस्तान देऊ करण्याचे आमिष दाखवले. यासाठी अकबराने एक दोन नाही, तर तब्बल चार वर्ष मेहनत घेतली. त्यासाठी विशेष शिष्टमंडळ नेमलं. मात्र तरीही महाराणा प्रतापांनी मुघल साम्राज्यात सामील होण्यास नकार दिला.
हळूहळू मेवाड प्रांतातील बरेच मातब्बर लोक मुघलांना सामील झाले. यात खुद्द महाराणा प्रतापांचे भाऊ ‘’जगमल सिंग’’ हे सुद्धा होते. या सगळ्या प्रकारामुळे आता मेवाड साम्राज्य दिवसेंदिवस कमकुवत होत चाललं होतं. आता महाराणा प्रतापांचा पुढे फक्त दोनच पर्याय होते. एक म्हणजे मुघलांना समील होणे, आणि दुसरा राजपुतांच्या अस्तित्वासाठी मुघलांशी लढाई करणे.
अश्या परिस्थितीत महाराणा प्रताप यांनी दुसरा म्हणजेच युद्धाचा पर्याय निवडला. आणि तिथूनच हल्दीघाटीच्या लढाईला सुरुवात झाली.
मेवाड साम्राज्यात ‘खमनौर‘ आणि ‘बलीचा’ या गावांमध्ये साधारण सहा किलोमीटरचा परिसर आहे. या भूभागाला ‘हल्दीघाटी’ या नावाने ओळखतात. आता हल्दीघाटी हे नाव कशामुळे, तर राजस्थानच्या या परिसरात पिवळ्या रंगाची वाळू आहे. जी वाळू हळदी सारखी दिसते. म्हणूनच याला हल्दीघाटी हे नाव पडलं.
राजपूत आणि मुघल यांच्यातल्या या लढाईत मेवाडचा भिल्ल समाज सामील झाला होता. एवढंच नाही, ग्वालियर प्रांताचा राजा आणि त्या सोबतच इतर अनेक प्रांतातील मातब्बर सैनिक सामील झाले होते. अश्या प्रकारे १८ जून १५७६ रोजी या लढाईला सुरुवात झाली. महाराणा प्रतापांच्या सैन्याने हजारो मुघल सैनिकांना धूळ चारली. हे घनघोर युद्ध सुरुच होतं. मात्र मुघलांच्या सैन्यापुढे राजपुतांची ताकद कमी पडू लागली. अश्यातच अकबराचा सेनापती मानसिंगवर हल्ला करताना महाराणा प्रतापांचा लाडका घोडा चेतक जखमी झाला.
त्यानंतर अकबराच्या सैन्यापुढे राजपुतांची ताकद कमी पडू लागली. अश्या वेळी राजपुतांना महाराणा प्रतापांचा जीव वाचवण महत्वाचं वाटू लागलं. तेव्हा झाला बिदा नावाच्या एका सैनिकाने महाराणा प्रतापांचा मुकुट धरण केला, आणि मुघलांना हुलकावणी देऊन तो स्वत: धारातीर्थी पडला. या सगळ्यात राजपूत सैनिकांनी महाराणा प्रतापांचा जीव वाचवला, आणि त्यांना जंगलात पाठवून दिलं.
अश्या सगळ्या घडामोडींमुळे या युद्धात कोणाचाच विजय घोषित झाला नाही. असं असून सुद्धा हळू हळू अकबराने मेवाडमधले छोटे छोटे प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. आता आपण मेवाड काबीज केलं असा अकबराचा समज होऊ लागला, पण तेव्हाच महाराणा प्रतापांनी जंगलात राहून आपली रणनीती आखली आणि मेवाडमध्ये पुन्हा नव्याने साम्राज्य स्थापन केलं. अश्या प्रकारे राजपुतांच्या आत्मसन्मानासाठी महाराणा प्रतापांनी मुघलांच्या तावडीत गेलेलं राज्य पुन्हा सोडवलं. अश्या या महान योद्ध्याला जयंती निमित्त कोटी कोटी नमन !
0 टिप्पण्या