आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक
15 आॅगस्ट 1947 ! आपली मायभूमी स्वतंत्र झाली. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही.त्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याचा यज्ञ केला,प्रसंगी प्राणांचीही आहूती दिली,पण आज आपण त्यांना विसरत चाललो आहोत. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले पं.रामप्रसाद बिस्मिल हे असेच क्रांतिकारक ,ते स्वत: उत्कृष्ट शायर होते त्यांनी लिहीले आहे
शहीदों की चिताओ पर, लगेंगे हर बरस मेले
वतन पर मर मिटनेवालो का यही निशाॅं होगा ll
पण आजची स्थिती काय आहे? स्वातंत्र्यानंतर प्रचंड उपेक्षा या लोकांच्या वाट्याला आली. इंग्रजांनी काहीही म्हणू देत,पण आपल्याही लोकांची क्रांतिकारकांना आतंकवादी म्हणण्यापर्यंत मजल गेली .गांधी-नेहरु परिवाराच्या रोशनाईत क्रांतिकारकांच्या स्मारकांची अवस्था "न फुल चढते है,न दीप जलते है" अशीच आहे.
देशासाठी हौतात्म्य पत्करणार्या क्रांतीवीरांच्या केवळ स्मरणानेही राष्ट्रभक्तीची शुभंकर उर्जा निर्माण होत असते.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे म्हणजे "अनेक फुले फुलतात फुलुन सुकूनही जातात,त्याची गणती कोण करतो? पण जे फुल गजेंद्रशूंडेने उपटले जाऊन श्रीहरी विष्णुंच्या चरणी अर्पण होते,त्या फुलाचे आयुष्य सार्थक होते ,त्याचप्रमाणे अनेक माणसे जन्माला येतात,जगतात आणि शेवटी मरतात,पण ज्यांचे जीवनपुष्प राष्ट्रासाठी,समाजासाठी समर्पित होते,अशी माणसे इतिहासात अमर होतात. अशाच समर्पित जीवनांपैकी एक म्हणजे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक होत.
त्यावेळी देशावर इंग्रजांची जुलमी राजवट होती. साधनसंपत्तीची लूट,जबरदस्तीचे धर्मांतरण यामुळे त्रस्त झालेल्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सगळ्याच जातीजमातीतील शूरवीरांनी संघर्ष केला. या सर्वांमध्ये ब्रिटीश काळात क्रांतीची मशाल पेटवणारे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक होते.
*क्रांतीसूर्याचा जन्म*
उमाजींचा जन्म दि.7 सप्टेंबर 1791 रोजी भिवडी (ता.पुरंदर ,जिल्हा पुणे) या गावी झाला. दादोजी खोमणे आणि लक्ष्मीबाई हे त्यांचे आई-वडील होय. ज्या रामोशी- बेरड जमातीत उमाजी नाईकांचा जन्म झाला,ती जमात छत्रपती शिवरायांच्या काळापासुनची लढाऊ जमात होती. किल्ल्यांचे रक्षण करणे हे त्यांचे काम होते. रामायणकाळापासून या जमातीचे अस्तित्व लक्षात येते.श्रीरामांसोबत रावणाचा संहार करण्यासाठी ज्या सेना होत्या,त्यात रामोशीही होते. श्रीरामांसोबतचे वास्तव्य यामुळे त्यांना "रामवासी" म्हणत म्हणून पुढे रामोशी हेच नाव रुढ झाले.
जेजुरीचे मल्हारी मार्तंड खंडोबा हे उमाजी नाईकांचे दैवत! खंडोबाचा भंडारा उधळत या शूर माणसाने इंग्रजाविरुध्द क्रांतीचा वणवा पेटवला. 1818 साली उमाजी नाईकांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली होती,त्यावेळी ते लिहायला वाचायला शिकले आणि सुटकेनंतर इंग्रजाविरुध्द संघर्ष तीव्र केला. उमाजींना रयतेची साथ मिळाल्याने इंग्रज हैराण झाले. इंग्रज आधिकारी मॅकीन्टाॅश याने सासवड पुरंदरच्या मामलेदारास उमाजी नाईकांना पकडण्याचे फर्मान सोडले. उमाजी आणि इंग्रजांच्या सैन्यात घनघोर युध्द झाले आणि त्यात इंग्रज पराभूत झाले. पाच इंग्रजांचे मुंडके कापून उमाजींनी मामलेदाराला पाठवले.इंग्रजांना धास्ती निर्माण झाली. उमाजी नाईकांच्या सैन्यात वाढ झाली.त्यावेळी त्यांचे सैन्य पाच हजार असल्याचे दिसते.
*स्वराज्याची घोषणा*
उमाजींनी इंग्रजांची संपत्ती लुटून ती गोरगरिब जनतेला वाटून टाकली. स्त्रीयांच्या अब्रुचे रक्षण केले. 21 डिसे 1830 ला बोईड नावाच्या इंग्रज आधिकार्यासह त्याच्या सैनिकांना मांढरदेवीच्या गडावरुन घायाळ केले व यमसदनी पाठवले. यानंतर दोनच महिन्यात उमाजींनी स्वातंत्र्याचा एक जाहीरनामाच प्रसिध्द केला (दि.16 फेब्रुवारी 1831) या जाहीरनाम्यात त्यांनी जनतेला अवाहन केले की" इंग्रजांना शेतसारा देऊ नये,इंग्रजांची नोकरी करु नये,इंग्रजांचे खजिने लुटावेत ,इंग्रज राजवट लवकरच संपेल त्यांना कोणीही मदत करु नका" अशा नव्या स्वराज्याची घोषणा करत उमाजी स्वत: स्वराज्याचे राजे झाले. ते स्वत: दरबार भरवून न्यायनिवाडा करु लागले.
*फितूरीमुळे सिंह जाळ्यात*
इंग्रज उमाजींच्या बंडामुळे भयंकर धास्तावले,त्यांनी उमाजी नाईकांना पकडून देणार्यास 10,000 रुपये रोख चारशे बिघे जमीन बक्षिस देण्याची घोषणा केली. या घोषणेच्या लोभाने काळोजी चव्हाण आणि नाना चव्हाण फितूर झाले. आपल्या देशाला फितूरीचा शाप नवीन नव्हता. छत्रपती शिवाजीमहाराज हिंदुच्या स्वातंत्र्यासाठी लढत असतांना अापल्याच लोकांनी त्यांना विरोध केला. तिकडे बाजीप्रभू घोडखिंडीत शिवरायांसाठी प्राण द्यायला सज्ज झाले असतांना दळवी आणि सूर्वे महाराजांना रोखण्यासाठी विशाळगडाच्या पायथ्याशी मोर्चे बांधून बसले होते. तानाजी मालुसरेंना उदेभान राठोड या आपल्याच माणसाशी लढावे लागले,काय सांगाव्या या कर्मकथा? इंग्रजांनी बेसावध अवस्थेत उमाजी नाईकांना भोर तालुक्यातील उतरोली गावात पकडले .फितूरांनी उमाजींची बित्तंबातमी इंग्रजांना सांगितली. फितूर गडगंज श्रीमंत झाले पण देशाचे स्वातंत्र्य लांबणीवर पडले. सिंह जाळ्यात सापडला.
*बलिदान*
उमाजी नाईक हे नाव ऐकताच इंग्रज सरकारला धडकी भरत असे. इंग्रजांच्या अनुभवी,मुत्सद्दी आधिकार्यांना कधीही उमाजींना पकडणे जमले नाही,ते फितूरांनी करुन दाखवले. इंग्रज सरकारने उमाजींना पुणे येथे मामलेदार कचेरीत कैद केले. यावेळी तुरुंगात मॅकीन्टोश या इंग्रज आधिकार्याने उमाजी नाईकांचे चरित्र लिहून ठेवले आहे.त्याच्यावरच उमाजींना पकडण्याची जबाबदारी सोपवलेली होती.
उमाजी नाईकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दि.3 फेब्रुवारी 1832 रोजी वयाच्या केवळ एकेचाळीसाव्या वर्षी भारतमातेसाठी उमाजी हसत-हसत फासावर गेले. इतरांना दहशत बसावी या हेतूने तीन दिवस त्यांचे प्रेत पिंपळाच्या झाडाला टांगून ठेवले होते. खुशाबा नाईक आणी बापुजी सोळकर या उमाजींच्या सहकारींना पण फाशी दिली गेली.
*जर फितूरी झाली नसती तर*
इतिहासात "जर-तर" ला काही अर्थ नसतो,पण राहून राहून खंत वाटते की फितूरी झाली नसती तर काय झाले असते?
इंग्रज आधिकारी राॅबर्टने ईस्ट इंडिया कंपनीला लिहीले होते " उमाजी नाईकांचा रामोशी समाज इंग्रजाविरुध्द पेटला असून तो परिवर्तनाची वाट पाहतोय. सर्व जनता उमाजीला मदत करत आहे. कोणी सांगावे हा उमाजी "राजा" होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य तर स्थापन करणार नाही?" तर इंग्रज आधिकारी मॅकीन्टोश लिहीतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवाजीचा आदर्श होता ,त्याला वेळीच फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजीच झाला असता!"
भारतमातेसाठी बलिदान करणार्या उमाजी नाईकांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन आणि सावरकरांच्याच शब्दात त्यांच्या अमर आत्म्याला अश्वासन देऊया.
"कार्य सोडुनी अपूरे पडला,झुंजत खंती नको पुढे
कार्य चालवू गिरवत तुमच्या,पराक्रमाचे आम्ही धडे"
- रवींद्र गणेश सासमकर
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी
संदर्भ:
1) उमाजी नाईक - कर्नाळा प्रकाशन
2) इयत्ता आठवीचे पाठ्यपुस्तक
3) गाथा क्रांतिची- विवेकानंद दर्शन प्रतिष्ठान
4) आंतरजाल
#स्वराज75
#उमाजीराजे_नाईक
#क्रांतिवीर_उमाजी_नाईक
#swaraj75
1 टिप्पण्या