‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या नावाने इंग्रजांनी भारतात प्रवेश कसा साध्य केला? कधीही ऐकली नसेल अशी माहिती...



२४ सप्टेंबर १५९९ ला शुक्रवार होता. या दिवशी लंडनच्या फाउंडर्स हॉल मध्ये इंग्लंडचे ८० व्यापारी एकत्र आले होते. १५९९ चे इंग्लंड हे शेक्सपिअरचे इंग्लंड होते. तीनच दिवसांपूर्वी, अर्थात २१ सप्टेंबर ला लंडन च्या ग्लोब थिएटर मधे शेक्सपियरच्या ‘ज्यूलिअस सीझर’ या नव्या कोऱ्या नाटकाचा प्रयोग झाला होता. ‘रोमिओ एंड ज्यूलिएट’ आणि ‘हेम्लेट’ मुळे इंग्लंडमध्ये शेक्सपिअरच्या नावाची चर्चा होती. नाट्य, नृत्य आणि संगीताचे ते दिवस होते. परंतू अशा वातावरणातही या व्यापाऱ्यांपैकी अनेकांना समुद्रापार जाऊन व्यापार करण्यात रस होता. तेवढे ते साहसी होते. या बैठकीचे अध्यक्ष होते, त्यावेळचे ‘लॉर्ड मेअर’ अर्थात महापौर ‘सर निकोलस मूसली’. या व्यापाऱ्यांनी भारताच्या समृध्दी चे अनेक किस्से ऐकले होते. भारताशी व्यापार करून यूरोपातील अनेक देशांची कशी प्रगती होतेय, हे पण ते बघत होते. त्यामुळे  भारताबरोबर व्यापार करण्याची त्यांची इच्छा असणे स्वाभाविक होते. 

या बैठकीत सामिल झालेल्या त्या ८० व्यापाऱ्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती कि त्यांच्या या बैठकी मुळे (मीटिंग मुळे) भविष्यात भारतीय उपमहाद्वीपाचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलणार आहेत. 

या व्यापाऱ्यांनी बैठकीत निर्णय घेतला कि, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ (प्रथम) कडे ते आपली कंपनी सुरु करण्यासाठी अर्ज करतील. आणि त्या कंपनीचे नाव असेल ‘ईस्ट इंडिया कंपनी’ !

राणी एलिझाबेथ (प्रथम) ने त्या अर्जावर निर्णय घ्यायला १५ महीने लावले, आणि इ. स. १६०० च्या शेवटच्या दिवशी, अर्थात ३१ डिसेंबरला, राणीने कंपनीला मान्यता दिली. शिवाय १५ वर्षांसाठी पूर्व दिशेला व्यापार करण्याचा एकाधिकार पण याच कंपनीला दिला. त्याकाळी राणीच्या दृष्टीने ‘पूर्व’ दिशेचा अर्थ होता, केप ऑफ गुड होप च्या नंतरचे, अर्थात आफ्रिकेच्या पूर्वेचे पूर्ण क्षेत्र. जेंव्हा या कंपनीला चार्टर मिळाले तेंव्हा यात २१८ शेअर होल्डर (भागीदार) होते. कंपनीचे पंजीकृत नाव होते, ‘Governer & Company of Merchants of London, Trading into the East Indies.’ हे भले मोठे नाव असले तरी प्रचलित नाव होते, ‘ईस्ट इंडिया कंपनी.’ 
पुढील काळात इ. स. १६९५ मध्ये ५ सप्टेंबरला अजून एक ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्याचे पंजीकृत नाव होते ‘The English Company, Trading to the East Indies.’ या कंपनीला इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र दहा वर्षात या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण झाले आणि २९ सप्टेंबर १७०५ रोजी या दोन्ही कंपन्यांची मिळून एक नवीन कंपनी तयार झाली – ‘The United Company of Merchants of England, Trading to the East Indies.’ हा सगळा कागदावरचा खेळ होता. पुढील १९० वर्षांच्या आपल्या राजवटीत, इंग्रजांनी कागदी घोडे नाचवण्याची जी वाईट पध्दत भारतात सुरू केली, त्याची ही चुणूक होती. ही कंपनी सुद्धा ‘ईस्ट इंडिया कंपनी’ म्हणूनच ओळखली जाऊ लागली. 

या कंपनीत एक गव्हर्नर आणि २४ जणांची कमिटी असायची. ही कमिटी कंपनीचा सर्व कारभार बघत असे. क्रिस होल्टे आपल्या ब्लॉगमध्ये लिहीतात, “ईस्ट इंडिया कंपनी आजच्या कॉर्पोरेट जगासाठी मॉडेल कंपनी होती, हे कटू सत्य आहे. याचे कारण म्हणजे या कंपनी जवळ स्वत:ची फौज होती. ती स्वत:च्या हिंमती वर विदेशी संपर्क / संबंध तयार करत असे. तिने स्वत:च्या शक्तीवर लढाया जिंकल्या. जमिनीचा एक चतुर्थांश कर (चौथाई कर) वसुलण्यासाठी लाच दिली. निती / नियम त्यांच्या चौकटीतच नव्हते. जवळपास १०० वर्षाच्या कंपनीच्या इतिहासात कंपनीच्या मुख्यालयात फक्त ३५ कायमस्वरूपी कर्मचारी होते.”
कपडा, मसाले इत्यादि वस्तूंच्या व्यापारासाठी बनवलेली ही कंपनी नंतर व्यापारासोबतच बरेच काही करू लागली. डिसेंबर १६०० ला कंपनीची अधिकृत स्थापना झाली होती. त्यानंतर ८ वर्षांनी, अर्थात गुरुवार २४ ऑगस्ट १६०८ रोजी ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले जहाज सुरतेच्या किनाऱ्यावर लागले. या जहाजाचा कप्तान होता विलियम हॉकिन्स. त्यावेळी सुरतेवर मुघलांचे राज्य होते आणि दिल्लीत जहांगीर हा मुघल बादशहा होता. विलियम हॉकिन्स ने बादशहा जहांगीर ची भेट घेतली आणि काही प्रमाणात व्यापार सुरू करण्याची परवानगी मागीतली. सन १६११ मध्ये कंपनीने आपला पहिला कारखाना सुरु केला तो भारताच्या पूर्व किनाऱ्यावर, आंध्र प्रदेशाच्या मछलीपट्टण येथे आणि पुढच्या वर्षी १६१२ मध्ये पश्चिम किनाऱ्यावर सुरत मध्ये कंपनीने दुसरा कारखाना सुरु केला. 

इ.स. १६१५ मध्ये थॉमस रो ने, ब्रिटिश राज्याच्या वकील या नात्याने दिल्लीत मुघल बादशाह जहांगीरची भेट घेतली. ही भेट अजमेर च्या किल्ल्यात झाली. या भेटीत त्याने बादशहाला, जिथे – जिथे मुघल सत्ता आहे, तिथे - तिथे कारखाने सुरु करण्याची परवानगी मागीतली आणि व्यापार करण्याचा एकाधिकार देण्याची मागणी केली. त्याबदल्यात ईस्ट इंडिया कंपनी बादशाहला युरोपच्या विशिष्ट वस्तू विकेल असाही प्रस्ताव ठेवला. जहांगीर बादशाहने जवळपास तीन वर्षांनी हा प्रस्ताव स्वीकारला. 

ब्रिटनच्या राणी एलिजाबेथने कंपनीला 15 वर्षांचा पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार दिला होता. 1609 मध्ये कंपनीचे प्रमुख जेम्स दवन नी राणीशी बोलून कंपनीला अनिश्चित काळापर्यंत व्यापार करण्याचा परवाना मिळवून दिला. 

भारतात इंग्रजांची मुख्य स्पर्धा पोर्तूगीज व्यापाऱ्यांशी होती. नंतर फ्रान्सीसी आणि डच व्यापारी पण या स्पर्धेत उतरले. पोर्तुगीज इंग्रजांच्या आधी 100 वर्षांपासून भारतात व्यापार करत होते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपली वसाहत केली होती. गोवा त्यांच्या ताब्यात होते. आणि कालीकत पासून वर दमण - दीव पर्यंत त्यांनी व्यापाराचे एक तंत्र तयार केले होते. इंग्रज त्या तुलनेत अगदीच नवीन होते. म्हणून त्यांनी पश्चिम किनाऱ्या बरोबरच पूर्व किनाऱ्यावरही आपले व्याापरी ठाणे निर्माण केले. कलकत्याला व्यापारी केंद्र सुरु केले. त्यामुळे बंगालमध्ये सत्तेसाठी मार्ग मोकळा झाला. 

पुढच्या काळात जेव्हा 1661 मध्ये पोर्तुगालच्या राज्याच्या मुलीचा, कॅथरीन ब्रिगेंजाचा, विवाह इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स (द्वीतीय) बरोबर झाला तेंव्हा भारतातील इंग्रजांना, म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीला, पोर्तुगीजांच्या सत्तेतील मुंबई (तत्कालीन बॉम्बे) बेट हुंड्याच्या रूपात मिळाले. कंपनीने मुंबईला एक मोठ्या व्यापारी केंद्राच्या रुपात विकसित केले. 

कंपनीचे अधिकारी मुघल बादशाह जहांगीरला हर एक प्रकारे खुश करण्याचा प्रयत्न करत होते. इंग्रजांचा जहांगीरच्या दरबारात तैनात असलेल्या राजदूत थॉमस रो ने याबद्दल बरेच काही लिहून ठेवले आहे. हे इंग्रज, बादशाह जहांगीर आणि त्याच्या काही सरदारांना विदेशी मुलींचा पुरवठा करत असत. 1617 मध्ये कंपनीच्या ‘एने’ या जहाजातून भारतात तीन स्त्रियाही पोहोचल्या. त्या तिघी कंपनीचे नियम मोडून भारतात आल्या होत्या. त्यांनी नावे होती मेरियम बेगम, फ्रांसेस स्टील आणि श्रीमती हडसन. त्यातील फ्रांसेस स्टील ही त्या ब्रिटीश जहाजावर प्रवास करत असतानाच गर्भवती होती. त्याच जहाजातून प्रवास करणाऱ्या रिचर्ड स्टीलशी तिने गुप्तपणे लग्न केले होते.

(प्रशांत पोळ यांच्या शनिवार, १७ जून ला प्रकाशित होणाऱ्या 'विनाशपर्व' या पुस्तकातील एक अंश)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या