छ.शिवाजीमहाराजांचा दक्षिणदिग्विजय



@ रवींद्र गणेश सासमकर

6 जून 1674 ! छत्रपती शिवरायांचा रायगडावर  राज्याभिषेक झाला. शतकानुशतकांचा अंधकार फिटला. दास्यत्व आणि आत्मविस्मृतीचा लोप होऊन भगवी पहाट झाली "दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा" ही मानसिकता धुळीला मिळवून हिंदुसुध्दा राजा होऊ शकतो,हे शिवाजीमहाराजांनी जगाला दाखवून दिले.

*भाग्यनगरची कुत्बशाही*

पूर्वी दक्षिणेला कर्नाटक असेच म्हणत असत. शिवाजीमहाराजांना सुरुवातीपासून कर्नाटकाविषयी ममत्व होतेच. त्यावेळी गोवळकोंड्याला अबुल हसन कुत्बशाह राज्य करत होता. त्याचा सर्व कारभार मादण्णापंत पाहत होता ,हा अबुल हसन कुत्बशाह काफीर ब्राह्मणांच्या सल्ल्याने राज्य करतो,याचा मुघल बादशाह औरंगजेबाला भयंकर राग होता. स्वत: कुत्बशाह फार कर्तबगार वगैरे नव्हता.त्यामुळे मादण्णावर त्याने सर्व कारभार सोपवला होता.त्याने मादण्णाला "सूर्यप्रकाशराव" असा किताब दिलेला होता.  या मादण्णाशी सख्य करुन दक्षिणेचे राजकारण साधायचा शिवाजीमहाराजांचा मनोदय होता.

दसरा जवळ आला होता.विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाची प्राचीन हिंदु परंपरा आहे. याच दिवशी दक्षिणदिग्विजयासाठी प्रस्थान  करावे असे महाराजांनी ठरवले. तत्पूर्वी  पाटगाव येथील हिंदु संत मौनीबाबांचे महाराजांनी  दर्शन घेतले.

*दक्षिणेकडे*

विजयादशमीच्या शुभसमयाला
वंदुनी श्रीशंभु भवानीला
तो रणी निघाला शिवराया
दक्षिणपथ विजयाला ll

दि. 6 आॅक्टोंबर 1676 !! महाराज रायगडाहून निघाले. सोबत सुमारे पंचविस हजार फौज होती. रायगड ही मराठ्यांची अयोध्या आणि या अयोध्येचा श्रीराम दक्षिणदिग्विजयाला निघाला होता.मजल दर मजल करत महाराजांची स्वारी दक्षिणेकडे चालली होती.वाटेने दक्षिणेतील सामान्य रयतेला कुठलाही त्रास होत नव्हता,हे सांगण्याची गरजच  नाही.कारण ही मुघलांची नव्हे तर मराठ्यांची स्वारी होती.

महाराज भाग्यनगरला (आताचे हैद्राबाद)  पोहचणार होते. बादशाहाने महाराजांच्या स्वागताची तयारी सुरु केली होती. महाराजांच्या स्वागतात उणीव राहू नये,यासाठी मादण्णाही दक्षता घेत होता.

दक्षिणदिग्विजयाच्या मागे महाराजांचे मोठे राजकारण होते."दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणियांचे हाती राहिली पाहिजे"  हे त्या स्वारीचे सुत्र होते. स्वराज्याच्या शत्रुचा पाडाव आणि दक्षिणेपर्यंत हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवणे हा महाराजांचा हेतू होता.

 भाग्यनगरच्या वाटेवर असतांना  कर्नाटकातील रयतेचा आक्रोश महाराजांच्या कानी पडला. कोप्पळचा  प्रदेश आदीलशाही अमलाखाली होता. कोप्पळच्या किल्ल्यात दोन सख्खे भाऊ  आदीलशाहीचे बलाढ्य सरदार होते. हूसेनखान मियाना आणि  दुसरा होता अब्दुर्रहीमखान मियाना. हे पठाण होते. या पठाणांच्या अत्याचाराखाली जनता भरडून निघत होती. शेतकरी हवालदिल झाला होता, गाई कापल्या जात होत्या,हिंदुच्या स्त्रीया सुरक्षित नव्हत्या. रयत अगदी त्रस्त  झाली होती.पण ही दु:खे सांगणार कोणाला ? पण महाराजांची कीर्त या लोकांनी ऐकली होती.  ही पीडलेली  रयत महाराजांकडे गेली. कोप्पळकरांनी आपली व्यथा महाराजांपुढे मांडली.प्रजेला पुत्रासमान मानणारा हा राजा होता,कोप्पळ स्वराज्यात नसले म्हणून काय झाले? रयत तर हिंदुच होती ना! महाराजांनी पठाणांचे पारिपत्य करण्याचा निश्चय केला.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पठाणांवर धाडले (जानेवारी 1677)  यावेळी धनाजी जाधव आणि नागोजी जेधे ही तरणी मुले हंबीररावांसोबत होती.

प्रचंड रणकंदन झाले. दोन्ही खान भाऊ मैदानात उतरले. खानाची फौज मराठ्यांपेक्षा जास्त होती.तरीही मराठ्यांनी  पठाणांची कत्तल उडवली.खान घाबरला, हत्तीवर बसलेला खान युध्दाच्या मैदानातून पळून जाऊ लागला.नागोजी जेध्याने त्याच्या हत्तीवर भाल्याने प्रहार केला,पण खानाने नागोजीवर आपल्या धनुष्यातून बाण सोडला,तो नागोजीच्या मस्तकात गेला. शेवटी खान कैद झालाच!

नागोजी जेधे हा कान्होजी जेधे यांचा नातू! या कोवळ्या पोराने स्वराज्यासाठी बलिदान केले.त्याची बायको गोदुबाई सती गेली. कर्नाटकातील जनतेचा संसार सुखी व्हावा म्हणून मावळातल्या  या लेकराने आपला संसार मोडला. स्वराज्यासाठी प्राण वैरायलाही तयार असणारी ही  देवदुर्लभ  माणसे महाराजांनी कशी घडवली असतील?

देश से है प्यार तो 
हर पल यह कहना चाहिए,
मै रहूँ या ना रहूँ
भारत यह रहना चाहिए ।

नागोजींच्या मनातील भाव यापेक्षा वेगळे काय असतील?

नागोजीचा पिता सर्जेराव याच युध्दात सहभागी होता. डोळ्यासमोर  पोटचा गोळा गेला  आणि तिकडे तरुण सून सती गेली,तरी सर्जेराव घरी गेला नाही,तो स्वराज्याच्या पुढील मोहीमेसाठी रवाना झाला.

*एक अपूर्व सोहळा*

महाराज भाग्यनगरला पोहचले. लोकांच्या डोळ्यात उत्सुकता दाटली होती. अफजलखानासारख्या रथी-महारथी सरदाराला फाडणारा ,सव्वा लाख फौजेत घुसून शायिस्ताखानाची बोटे छाटणारा आणि  रयतेला सुखी करणारा हिंदुचा राजा आज भाग्यनगरात आला होता. भाग्यनगरचे भाग्य उजळले होते. महाराजांची अतिभव्य शोभायात्रा निघाली. लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. रांगोळ्या,गुढ्या- पताकांनी शहर सजले होते. राजा शिवछत्रपतींच्या  जयघोषाने आसंमत दणाणून गेले. लोक महाराजांवर फुले उधळत होते ,माता-भगिनी  त्यांना औक्षण करत होत्या. महाराजही मुक्तहस्ते  चांदी सोने उधळत  होते. काय वर्णावा तो सोहळा!!

बादशाह अबुल हसन कुत्बशहाने महाराजांचा सन्मान केला.दादमहालात  त्यांची भेट झाली.कुत्बशहाने महाराजांसाठी एक स्वतंत्र उच्च सिंहासन तयार केले होते.ही भेट मोठ्या आनंद आणि उत्साहात पार पडली. 

यावेळी मादण्णा,आक्कण्णा दत्ताजीपंत,प्रल्हाद निराजी,रघुनाथ हनुमंते,येसाजी कंक,सोनाजी नाईक,बाबाजी ढमढेरे  वगैरे मंडळी  होती. महाराजांचा भाग्यनगरात महिनाभर मुक्काम होता.

शिवछत्रपती आणि कुत्बशाह यांच्यात तह ठरला. भाग्यनगरच्या मुक्कामातील खर्चासाठी कुत्बशहाने साडेचार लाख रुपये द्यावे, पुढे होणार्या स्वारीत कुत्बशहाचे पाच हजार सैन्य महाराजांबरोबर द्यावे, तोफखाना आणि दारुगोळा पुरवावा.बादशाहांनी पूर्वीप्रमाणे एक लाख होन खंडणी महाराजांना द्यावी,स्वराज्याचा वकील कुत्बशहाच्या दरबारात असावा,स्वारीत शाहजीराजांच्या आधिपत्याखाली नसणारा प्रदेश कुत्बशहाला मिळावा अशा गोष्टी तहात  ठरल्या.

*जिंजीवर विजय*

महाराज दक्षिणेकडे निघाले. निवृत्ती संगम आणि श्रीशैल मल्लिकार्जून येथील देवस्थानांची महाराजांनी मनोभावे पुजा केली. श्रीकृष्णामाईस घाट आणि धर्मशाळा बांधण्याची आज्ञा दिली. 

श्रीशैलम येथे रा.स्व.संघाचे कार्यकर्ते श्री.मोरोपंत पिंगळे यांच्या प्रयत्नातून "श्रीशिवाजी स्फूर्ती केंद्रम" नावाचा प्रकल्प साकारला आहे. महाराजांच्या श्रीशैलम वास्तव्याच्या आठवणी येथे जागृत होतात. आंध्रप्रदेशात गेल्यावर या प्रकल्पाला आवर्जून भेट दिली पाहिजे.

पुढे महाराजांनी जिंजीचा बलाढ्य किल्ला ताब्यात घेतला.जिंजीवर भगवा झेंडा फडकला. येथील व्यवस्था लावुन महाराज तिरुवन्नमलाईला पोहचले.

*मशिदी पाडुन मंदिरांची प्रतिष्ठापना*

तिरुवन्नामलाई येथील शिव मंदिर म्हणजेच सोनाचलपती मंदिर आणि समोरत्तीपेरूमल येथील विष्णू मंदिर मुस्लिम आक्रमकांनी पाडले होते आणि त्या ठिकाणी मशिदी उभ्या केल्या होत्या. शिवाजी महाराजांनी ह्या दोन्ही मशिदी पाडून त्यांचे पुन्हा मंदिरामध्ये रुपांतरण केले.ही सारी हकीकत "शिवचरित्र साहित्य खंड -8 ,लेखांक 15 आणि पृष्ठ क्र 55-56 वर आली आहे. या गोष्टीला आधार म्हणून आणखी एक प्रत्यक्ष शिवकालीन पुरावा मिळतो. तो म्हणजे रघुनाथ नारायण हणमंते यांनी लिहीलेल्या "राजव्यवहारकोश" या ग्रंथात. त्यात ही मंदिरे पुन्हा उभारावी, अशी आज्ञा शिवरायांनी  रघुनाथपंताला दिल्याचे  लिहिले आहे.

"उत्सादितां चिरतरं यवनै प्रतिष्ठाम् 
शोणाचलेशितुरयं विधिवदविधाय l
श्रीमृष्णवृध्दगिरिरुक्मसभाधिपानाम् 
पूजोत्सवान्प्रथयति स्म सहात्मकीर्त्या ll80

तुम्ही जर आमची मंदिरे पाडुन आमच्या स्वाभिमानाचा अपमान कराल,तर आम्हीही हट्टाने त्यांचे पुनर्निर्माण करु असा संदेशच शिवाजीमहाराजांनी मुस्लिम आक्रमकांना आपल्या कृतीतुन दिला.

कोणत्याही देशापासून त्याचा धर्म आणि संस्कृती हिरावून घेता येत नाही.स्वाभिमान हिरावून घेता येत नाही. परकीय आक्रमकांनी जर आमच्या स्वाभिमानाची छेडछाड केली तर त्याला जशास तसे उत्तर द्यावे आणि  गुलामीची चिन्हे मिटवून पुन्हा आपल्या मानबिंदुंची पुनर्प्रतिष्ठापना करणे हाच शिवचरित्राचा बोध आहे.

*वेल्लोर किल्ल्यावर भगवा*

 वेल्लोर येथे एक भक्कम किल्ला होता त्याच्या जवळच्या डोंगरावर महाराजांनी दोन किल्ले बांधले ,त्यांना नावे दिली "साजरा आणि गोजरा" !!

महाराजांनी शेरखान नावाच्या सरदाराचा दारुण पराभव केला.त्याचे अनेक किल्ले जिंकले आणि त्याचा मुलुख ताब्यात घेतला. वेल्लोर किल्ल्याला मराठ्यांचा वेढा पडला.

महाराजांनी आपले सावत्रबंधु एकोजीराजांची भेट घेतली.महाराजांनी त्यांना स्वराज्यकार्यात मदत मागितली,पण व्यर्थ!

छत्रपती शिवाजी महाराज हे इ.स १६७८ मध्ये दक्षिण दिग्विजय करुन महाराष्ट्रात परत येत असताना कर्नाटकातील बेलवडी गावच्या  छोट्या गढीस वेढा घातला. कारण येथील सावित्रीबाई देसाई हिने महाराजांच्या सैन्यातील बैल पळवून नेले होते. आपल्या सैन्यासह सावित्रीबाईने मोठी झुंज दिली. पतीच्या निधनानंतर मोठ्या धीराने मराठी सैन्याशी दोन हात करणाऱ्या  सावित्रीबाईला तिचे राज्य मुलांच्या दुधभातासाठी म्हणून महाराजांनी परत दिलं. महाराजांनी तिचा साडीचोळी देऊन गौरव केला. शिवरायांची ही आठवण कायमस्वरुपी लक्षात राहावी म्हणून सावित्रीबाईने शिवरायांच्या हयातीत जगातील त्यांचे पहिलं शिल्प बनविलं.

शिवाजीमहाराजांनी  नागोजी जेधेच्या घरी स्वत:  जाऊन त्याच्या वीरमातेचे सांत्वन केले. आणि त्याच्या शौर्याची आठवण म्हणून दरवर्षी एक शेर सोने त्याच्या घरी पाठवून देण्याची व्यवस्था केली.

महाराजांचा हा दक्षिणदिग्विजय हिंदु समाजाला पराक्रम ,शौर्य आणि बलिदानाची प्रेरणा देत राहिल. परकीय आक्रमकांनी भग्न केलेली आपली श्रध्दास्थाने पुन्हा स्वाभिमानाने कशी उभी करावी,याचे उदाहरण दक्षिण दिग्विजयाने घालुन दिले. छ.शिवाजीमहाराजांचा हा पराक्रम हिंदु समाजाने सदैव मस्तकी मिरवावा एवढा उदात्त , प्रेरणादायी आणि तितकाच रोमहर्षक आहे.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या