भारतीय मुसलमान व ख्रिश्चनांबद्दल पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत काय म्हणतात? वाचा सविस्तर..


--------

#राममंदिर_ते_राष्ट्रमंदिर या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक #डॉ_मोहनजी_भागवत यांनी विवेक साप्ताहिक तर्फे मुलाखत घेण्यात आली. यावेळी सरसंघचालकांनी विविध प्रश्नांवर संघाची भूमिका स्पष्ट केली. आपल्या धर्मातील विविध उपासना पंथ अशा विचाराने एकत्र येऊ शकतील, पण आपल्या देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे अनुयायीसुद्धा आहेत. त्यांना सोबत घेण्यासाठी कोणते प्रयत्न आवश्यक आहेत आणि कोणते प्रयत्न चालले आहेत? या प्रश्नावर डॉ. मोहनजी भागवत यांनी स्पष्टीकरण दिले. 

पू. मोहनजी भागवत म्हणाले, अन्य धर्मानुयायांना आपल्यासोबत आणण्यापेक्षा ते आपली सोबत सोडून जाणार नाही याची काळजी करायला हवी. आपल्याला #रसखान माहीत आहे. ते मुस्लिम होते. त्यांनी इस्लामचा त्याग केला नव्हता. मात्र कृष्णभक्तीबद्दल त्यांचे काव्य अतिशय उत्तम मानले जाते. विट्ठलभक्त शेख महंमद आहेत. ही फार प्राचीन काळातील गोष्ट नव्हे! #रामकृष्ण_परमहंस यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा प्रत्यक्ष उपासनेद्वारे अनुभव घेऊन त्यांच्या अभ्यासाच्या अंती असे सांगितले की, सर्वांचे गंतव्यस्थान एकच आहे. रमणमहर्षी यांना जेव्हा पॉल ब्रँटन (Paul Brunton) यांनी ‘मी हिंदू होऊ का?’ असे विचारले असता ते म्हणाले होते, ‘‘तुमचा जन्म ख्रिश्चन म्हणून झाला आहे. तेव्हा तुम्ही एक चांगला ख्रिश्चन बनण्याचा प्रयत्न करा. तसे केले असता एका चांगल्या हिंदूला जे फळ मिळते ते तुम्हालाही अवश्य मिळेल.’’ हीच वृती आपल्याकडे नेहमी आढळते.

आपण पाहतो की वेळोवेळी कट्टरपंथी लोक या समाजघटकांना वेगळे पाडण्याचा आणि वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयास करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही असे प्रयत्न झाले होते आणि या प्रयत्नांना आळा घालण्याचे काम महाराजांनी केले. महाराजांच्या नौदलात #मुसलमान आणि सिद्दीदेखील होते. महाराणा प्रताप यांच्या सैन्यातही मुसलमान होते आणि ते अकबराच्या विरोधात हळदीघाटीत लढले होते. जेव्हा आपण सर्व लोक एकत्र होऊन उभे ठाकतो तेव्हा भारतभक्ती जागृत होते. तेव्हा भारताच्या संस्कृतीबाबत भक्ती जागृत होते. भारताच्या प्राचीन परंपरेबाबत मनात स्वाभिमान जागतो. तेव्हा सर्व भेदभाव मावळतात.

ज्या लोकांच्या हितसंबंधांना या एकतेमुळे धक्का पोहोचतो असे लोक वारंवार #फुटिरतावाद आणि कट्टरता यांना खतपाणी घालण्याचे उद्योग करत असतात. खरे पाहता आमचाच एकमेव देश असा आहे की जेथे सर्व धर्म, पंथ आणि संप्रदायांचे लोक दीर्घकाळ एकत्र नांदत आहेत. कोणत्या देशातील मुसलमान सर्वांत अधिक सुखी आहेत? तर भारतातील मुसलमानच सर्वांत सुखी आहेत. बहुसंख्याकांच्या तुलनेत अल्पसंख्य समाजाला अशी चांगली वागणूक देणारा देश जगाच्या पाठीवर अन्यत्र आढळणार नाही. मुस्लिम आक्रमकांच्या आधीही काही मुसलमान भारतात आले होते आणि या आक्रमणांच्या नंतर ते मोठ्या प्रमाणात आले. देशात रक्ताचे पाट वाहले होते. लढाई आणि वैर याचा इतिहास आहे. तरीसुद्धा आपल्या देशात आजही मुसलमान आणि ख्रिश्चन टिकून आहेत. त्यांना कोणीही वाईट वागणूक दिलेली नाही. त्यांना तर येथे सर्व अधिकार प्राप्त आहेत. मात्र पाकिस्तानात अन्य धर्माच्या अनुयायांना समान अधिकार मिळालेले नाहीत. पण आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. 

हिंदू-मुसलमान धर्माच्या आधारावर देशाची #फाळणी झाली आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण करण्यात आला. पण भारतीयांनी या देशातील मुसलमानांना असे कधीच सांगितले नाही की तुम्ही आता तुमच्यासाठी बनलेल्या देशात निघून जावे आणि याउपरही तुम्हाला याच देशात राहायचे असेल हिंदूंच्या नंतर दुय्यम नागरिक म्हणूनच तुम्हाला राहावे लागणार आहे. असे झाले नाही. आपल्या संविधानाने सर्वांना सारखेच अधिकार दिलेले आहेत. लोकसंख्येची अदलाबदल व्हावी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटत होते. पण जर येथे मुसलमान राहिले तर त्यांना पाकिस्तानात पाठविले जावे, अशी तरतूद सांगणारे संविधान डॉ. बाबासाहेबांनी बनविलेले नाही. हाच आमच्या देशाचा खरा स्वभाव आहे आणि या स्वभावालाच ‘हिंदू’ असे नाव आहे. 

     पाकिस्तानात हिंदू मंदिरांची झालेली अवस्था

आम्ही कोणत्या दैवताची पूजाअर्चा करतो यावर ‘हिंदू’चे काही घेणेदेणे नाही. धर्म हा माणसांना जोडतो, त्यांना उन्नत बनवितो. धर्म समाजाला एका सूत्रात गुंफतो. तो समाजाची धारणा करतो. भौतिक आणि आध्यात्मिक अशी दोन्ही प्रकारची सुखे धर्माचरणामुळे माणसाला प्राप्त होतात. अर्थ आणि काम या दोन्ही पुरुषार्थांचे उचित नियमन करून समाजाला चालविण्याचे काम धर्म करीत असतो. तुमची पूजापद्धती कोणतीही असू शकते. राष्ट्रीयत्व हे पूजापद्धतीशी जोडलेले नाही.

जेव्हा पाकिस्तानची संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली होती. तेव्हा जमाते इस्लामीचे नेते मदनी यांनी एक पुस्तक लिहिले होते की, ‘कौम आणि रिलिजन यांचा काहीही संबंध नाही. जे मुसलमान आहेत ते हिंदुस्थानचे नाहीत. असे सांगणारे लोक चूक आहेत.’ त्यामुळे अधूनमधून जेव्हा कट्टरतावाद डोके वर काढत असतो तेव्हा त्याला वेळीच आवर घालण्याची केवळ गरज आहे. म्हणून आपण पुरातन काळापासून एक राष्ट्र आहोत, हे हिंदू राष्ट्रच आहे. काही बदलण्याची गरज नाही. फक्त काही वाईट गोष्टींचा त्याग करायला हवा. संकुचितपणा सोडला पाहिजे. हे सहजशक्य आहे. ही गोष्ट मान्य असलेले अनेक सुशिक्षित आणि उच्चपदस्थ मुसलमान आणि ख्रिश्चन मला भेटले आहेत. 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या