रामजन्मभूमी आंदोलन संपले म्हणजे प्रभू रामचंद्राचा विषयही संपला? काय म्हणाले सरसंघचालक, वाचा सविस्तर..


------------

#राममंदिर_ते_राष्ट्रमंदिर या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक #डॉ_मोहनजी_भागवत यांनी विवेक साप्ताहिक तर्फे मुलाखत घेण्यात आली. यावेळी सरसंघचालकांनी विविध प्रश्नांवर संघाची भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण हिंदू समाजासाठी ५ ऑगस्ट २०२० हा एक अभिमानाचा दिवस होता. अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या उभारणीचा संकल्प घेऊन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यामुळे आता रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन संपले आहे, अशी चर्चा ऐकू येत आहे. तेव्हा हा प्रभू रामचंद्रांचा विषय संपला आहे का? या प्रश्नावर पू. सरसंघचालकांनी आपले मत मांडले. 

सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, राममंदिराचा शिलान्यास १९८९ सालीच झाला होता. या ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिरनिर्मितीच्या कामाचा शुभारंभ झाला. मंदिर उभारण्यासाठी तेथील भूमी ताब्यात मिळावी यासाठी आंदोलन चालले होते. सर्वोच्च न्यायालयाने यावर आपला निकाल दिला आणि त्यांच्या आदेशानुसार एक न्यास स्थापन करण्यात आला. या न्यासाकडे मंदिरनिर्मितीसाठी तेथील जमिनीचा ताबा देण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन संपले. पण प्रभु रामाचा विषय तर त्यांच्या काळापासून सुरू आहे आणि तो यापुढेही तसाच सुरू राहणार आहे. 

भारतातील फार मोठी लोकसंख्या त्यांना आपले दैवत मानते. जे लोक त्यांना आपले दैवत मानत नाहीत त्यांच्या दृष्टीनेही आदर्श आचरणाचा मानदंड स्थापन करणारे ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू रामचंद्र म्हणजे भारताच्या भूतकाळाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचबरोबर भारताच्या वर्तमानकाळावर आणि भविष्यकाळावर त्यांचा दीर्घकाळ प्रभाव राहणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे प्रभू रामचंद्र होते, आहेत आणि यापुढेही राहतीलच! मात्र मी श्री रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा विषय ज्या दिवशी न्यास निर्माण झाला त्याच दिवशी संपला, असे त्यांनी सांगितले. 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या