@मयूर चंद्रकांत लंबे
औरंगाबाद सोलापूर हायवेवर पाचोड परिसरातील डोणगाव दर्गा फाट्यावरून ८ किलोमीटर अंतरावर असलेलं रेणुका मातेचं हे मंदिर. डोणगाव हून तुम्ही 'डोणगाव - विहामांडवा' या मार्गाला लागलात की तुम्हाला मोठमोठ्या आकाराच्या शिळा दिसतील. या शिळा दिसू लागल्या की समजायचं चोंढाळा जवळ आलं आहे.
भगवान परशुराम जननी माहूर निवासिनी रेणुका देवीचे उपपीठ म्हणजे रेणुका मातेचे हे मंदिर. पठारावर असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हेमाडपंथी धाटणीचे हे मंदिर दगडावर दगड रचून बांधलेले आहे. कित्येक शतकांपूर्वी हे बांधकाम झालं असावं असा अंदाज आहे. मंदिराला तीन भव्य असे द्वार आहेत. दर्शनाला जाण्यासाठी आपण प्रमुख दरवाज्यातून आत जाऊ शकतो. मंदिराला किल्ल्याच्या भक्कम तटबंदी प्रमाणे भिंती असून मंदिराचे प्रांगण देखील भव्य आहे. प्रांगणातील उंच अशी आकर्षक दीपमाळ आणि मंदिरातील सुंदर कलाकुसर केलेले दगडी खांब लक्ष वेधून घेतात.या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला इतर मंदिराप्रमाणे कळस नाही.
हिवरा चोंढाळ्यातील रेणुका मातेची अख्यायिका अशी सांगितली जाते की, राक्षसाने देवीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. लग्नाला तयार होण्यासाठी देवीने राक्षसाला "गोदावरी नदीचे पाणी एका रात्रीतून चोंढाळ्याला आणण्याची अट" घातली. जर तो यात अयशस्वी झाला तर लग्नाला आलेलं सर्व वऱ्हाडींसह त्याचे दगडी शिळेत रूपांतर होईल. तो राक्षस काही गोदावरीचे पाणी सुर्योदयापर्यंत चोंढाळ्याला आणू शकला नाही आणि सर्व वऱ्हाडासह त्याचे शिळेत रूपांतर झाले.
आख्यायिकेनुसार, देवी कुमारिका असल्याने या गावातील लोक अजूनही गावात लग्न लावत नाहीत तर चोंढाळ्याच्या सीमेबाहेर लग्न लावतात. गावात दोन मजली घर कुणीही बांधत नाही. मंदिराच्या उंचीपेक्षा उंच घर असू नये अशी सर्वांची श्रद्धा यामागे आहे. गावात कुणीही पलंग किंवा बाज वापरत नाही. अशा आगळ्यावेगळ्या परंपरा येथील रहिवाशांनी जपल्या आहेत.
नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो त्यावेळी, दूरवरून देवीचे भक्त दर्शनाला इथे येत असतात.
पैठणचे संत श्री एकनाथ महाराज देखील चोंढाळ्याला देवीच्या दर्शनासाठी येत असत. प्रसिद्ध नायक सदाशिव अमरापूरकर यांची कुलस्वामिनी देखील हीच असून ते दर्शनासाठी नेहमी इथे येत असत.
हिवरा चोंढाळ्याच्या शेजारी विहामांडवा हे गाव आहे. या गावातच देवीचे गुरू बलखंडेश्वर महाराजांची समाधी आहे. हे मंदिर देखील भक्कम तटबंदी असणाऱ्या किल्ल्याप्रमाणे आहे. बलखंडेश्वर महाराजांच्या मंदिरातून देवीला टिपूर नेला जातो. टिपूर म्हणजे जळते निखारे. दरवर्षी नवरात्रीत अष्टमीला जो होम केला जातो त्यासाठी हा टिपूर विहामांडवा येथील भाविक श्रद्धेने नेतात.
विहामांडवा गावाच्या नावाची कहाणी देखील अतिशय छान आहे. देवीच्या लग्नाचा मांडव या गावात होता म्हणून या गावाचे नाव ''विवाह मांडवा' असे झाले. पुढे अपभ्रंश होऊन विहामांडवा अशी या गावाची ओळख झाली.
पैठण तालुक्यातील चोंढाळ्याला जाण्यासाठी तुम्हाला औरंगाबाद येथून दीड तास लागतो तर पैठणपासून एक तास लागतो. बस किंवा खाजगी वाहनाने आपण चोंढाळ्याला जाऊ शकतो.
औरंगाबाद बीड राष्ट्रीय मार्गावर पाचोड परिसरातील डोणगाव दर्गा फाट्यावरून चोंढाळ्याला जायला रस्ता आहे. तसेच पैठणहून बस किंवा खाजगी वाहनाने विहामांडवा मार्गे चोंढाळ्याला जाता येते.
परंपरा, श्रद्धा आणि बांधकाम शैलीचा अद्भूत संगम असलेले हे स्थान नक्कीच सुखावह आहे असून वारंवार भेट देण्यासारखे आहे.
(भ्रमणध्वनी- ७७७५८२७२६९
mayurlambe1111@gmail.com)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या