माळ पहिली- श्री तुळजाभवानी देवी

अखंड भारताची पवित्र भूमी देवी देवता व साधू-संत, ऋषी- महात्मे यांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झाली आहे. इथे अनेक देवी देवतांनी स्वतः अवतार घेऊन मानवाला भिन्न भिन्न संकटातून तारले आहे. सर्व समाज अन्याय व अत्याचार मुक्त होण्यासाठी दिशा निर्देश त्यांनी केले आहेत. काळाच्या प्रवासासोबत ह्या गोष्टी निरंतर घडत आलेल्या आहेत. भारतीय समाज मनोभावे या देवतांची उपासना करत आलेला आहे. भारतीय समाजाची एकसंधता देशातील अश्याच विविध धार्मिक स्थळांमुळे अभंग राहिली आहे. आपल्या महाराष्ट्र याला अपवाद कसा असेल? मराठवाडा व खान्देश मिळून तयार होणाऱ्या देवगिरी प्रांतात अश्या अनेक देवींची मंदिरे असलेली आपणास माहित आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण यापैकी काही प्रसिद्ध मंदिरांची माहिती घेणार आहोत.

महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून धाराशिव जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे जागृत स्थान आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. 

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे. या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत.

श्रीक्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील धाराशिव-उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव आहे. समुद्रसपाटीपासून २७० फुट उंचावर असलेले हे तालुक्याचे ठिकाण उस्मानाबाद पासून १८ किलोमीटर तर सोलापूरपासून ४४ किलोमीटरवर आहे. पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता. या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे.

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास 'राजे शिवाजी महाद्वार' तर दुसर्‍या दरवाजाला 'राजमाता जिजाऊ' महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ दिसून येते. दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सागितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.

सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दिसते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह आहे. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती दिसून येते.

श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते. प्राचीन काळात आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंती असून त्यात कोरीव काम करण्यात आले आहे. 

श्री तुळजाभवानीबाबत पुराणामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळते. मार्कंडेय पुराणात तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो. दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आणि सात हजार श्लोकांद्वारे देवीचे महात्म्य वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशती हा ऋषी मार्केंडेय यांनी रचलेल्या मार्कंडेय पुरानाचाच एक भाग आहे. याशिवाय देवी भगवतीमध्येही तुळजाभवनीचे महत्व सांगण्यात आले आहे. स्कंध पुराणात तर देवीची अवतारकथाच वर्णन करण्यात आली आहे. 

श्री तुळजाभवानी वीरवदायिनी, इंद्रवरदायिनी, रामवरदायिनी आणि महिषासूरमर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे. श्री तुळजाभवानी शक्ती देवता आहे. तुळजापूरची भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. ज्या शिळा घाटावरून तुळजाभवानी देवीने प्रभू रामचंद्रास लंकेचा मार्ग दाखविला तो शिळाघाट अजूनही तुळजापूरला दिसून येतो. रावणाचा वध करून तू विजयी होशील, असा आशीर्वाद प्रभू रामचंद्रांस देवीने दिला असे सांगितले जाते. त्यामुळे तुळजाभवानी देवीस रामवरदायिनी असेही म्हणतात. दरवर्षी अश्विन महिन्यात तुळजापूरला नवरात्र उत्सव मोठा प्रमाणावर साजरा केला जातो. 

आई तुळजा भवानीस भारताला सर्व संकट व दोषातून बाहेर काढून परम वैभव प्राप्तीसाठी बळ दे, अशी कामना आपण करूया... 

माहिती संकलन- कल्पेश जोशी

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या