कृतार्थ जीवन जगणारे पंडित गंगाधर चौबे

🪔 नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती....

हा लेख लिहित असतांना, एका क्षणासाठी मनात विचार आला की या लेखाचे शिर्षक 'कृतार्थ जीवनाची सांगता' असे द्यावे, पण दुस-या क्षणी मनात  विचार आला की, जीवन प्रवाह हा सतत वाहणारा गंगाजला सारखा असतो. पंडितजींच्या वडिलांचे नांव देखील गंगाधर असल्याने हा प्रवाह अक्षय वाहत राहणारा आहे. अशी मनोमन खात्री असल्यामुळे 'सांगता' हा शब्द येथे योग्य नाही. पंडितजी आज शरिराने आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी हयात असतांना जी स्वप्ने अंतःकरणी  बाळगली होती, ती स्वप्ने पूर्ण होतांना बघितल्यावर जीवन सार्थकी झाल्याचा अनुभव घेत घेत मरण येणे, हे भाग्य  केवळ पुण्यवानालाच मिळते. पंडितजींचे जीवन ख-या अर्थाने "कृतार्थ जीवन"होते, कारण ते कृतकृत्य, तृप्त, संतुष्ट, समाधानी, धन्य, भाग्यशाली, यशस्वी, विजयी असे पंडितजींचे व्यक्तिमत्व होते. 

पंडितजींचा जीवनपट समोर आल्यावर मी वर्णन केलेल्या प्रत्येक विशेषणाचा अनुभव येतो.या लेखात ज्येष्ठ प्रचारक श्री.भाऊराव पाटील व श्री.शिरीषराव कुळकर्णी यांचे मनोगतात याचा उल्लेख येईल.शिवाय पंडितजींचे ज्येष्ठ चिरंजीव श्री.कपिल  यांचे आप्तेष्ट व मित्र यांचेही मनोगत देत आहे.या सर्व लिखाणातून पंडितजींची महानता लक्षात येईल.

पंडितजींच्या आत्म्याला सद् गती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

दीपक गजानन घाणेकर 
(9423187480)
-------------

हेमंत चंदनकर यांचे मनोगत

 स्व. पंडित गंगाधर चौबे (पंडितजी) रा. नशिराबाद

 जन्म दि. 30.10.1937  (धनत्रयोदशी) स्व. 08.10.2020

पंडितजी एकुण 6 भाऊ व 2 बहिणी, सर्वांना दीर्घायुष्याचे वरदान लाभले आहे.  त्यांचे 2 भाऊ जयपूर येथे, 2 भाऊ अकोला येथे व 1 भाऊ भुसावळ येथील रहिवासी. आता हयात असलेले जयपुर येथील भाऊ त्यांचे वय 97, भुसावळ येथील भाऊ वय वर्षे 90, एक बहिण तीचे वय 94. गेल्याच महिन्यात त्यांचे एक भाऊ जयपुर येथे वयाच्या 86व्या वर्षी स्वर्गवासी झाले, पंडितजी त्यांचेकडे जयपूरला जाऊन आले होते. पंडीतजींचे वय सुद्धा 83 वर्षे होते.

 पंडितजींचा विवाह कोटा येथील उर्मिला काकुंशी 29 मे 1966 रोजी झाला. काकुंचा संघ संबंध नव्हता, परंतू काकांसोबत काकुंनी तुटपुंज्या आर्थिकस्थितीत  सर्व संसार साभाळला आणि वाढवलाही व हे करत असतांना त्याही संघमय झाल्या आहेत. पंडितजींचे घर म्हणजे संघाचे घर हे काकुंमुळेच शक्य होते, नाही म्हणायला काकुंकडे त्यांचे मामा संघसंपर्कातील होते. 

 पंडितजींना 2 मुले व एक मुलगी. मुलगी चित्तोडगढ राजस्थान येथे, जावई तेथेच बिर्ला सिमेंट मधुन निवृत्त झाले आहेत.

 मोठा मुलगा कपिल - जळगाव जनता सहकारी बँकेत अधिकारी तर लहान किर्तीकांत हा नशिराबादला उपसरपंच आहे.

 पंडितजी भुसावळ येथील ए.व्ही.एम. या सिनेमा वितरण करणाऱ्या खाजगी कंपनीत नौकरीला होते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. ते नेहमी म्हणत की माझा जन्म जरी धनत्रयोदशीचा असला तरी धनाचा व माझा फार संबंध नाही.

पंडितजींनी तालुका कार्यवाह म्हणुन अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. पंडितजींच्या उपस्थितीत नशिराबाद येथे 2 शिबीरे संपन्न झाली. मा. प्रल्हादजी अभ्यंकर या शिबीरात उपस्थित होते. पूर्व सरसंघचालक मा. रज्जूभैय्या हे सरकार्यवाह असतांना त्यांनी नशिराबाद येथील शाखेस विशेष भेट दिली होती. आणीबाणीच्या काळात त्यावेळी प्रचारक असलेले विनीतराव कुबेर हे भूमिगत झाले होते. त्यांच्या सोबत पंडितजींनी जळगाव व भुसावळ येथील मिसा बंधुंच्या कुटुंबियांसाठी मोठी मदत केली होती व अशा कुटुंबियांच्या ते सतत संपर्कात होते. संघ स्वयंसेवक असल्याने पंडितजींनी आपल्या पंडित या नावातील अनुस्वार कायम जपला.
---------------

ज्येष्ठ प्रचारक श्री.भाऊराव पाटील यांचे मनोगत

कै.पंडित जी चौबे व माझा संबंध मी 1984  जळगाव ला आलो असतांना झाला त्यावेळी ते भुसावळला एका फिल्म डिस्ट्रीब्यूटर कडे नोकरी करत असत. त्यामुळे ऑफिस संपल्यानंतर ते नशिराबादला येत व येतांना शाखेवर येऊन शाखेनंतर संपर्क करीत असत, त्यांना मी शाखा घेताना कधी पाहिले नाही पण जे शाखा घेणार यांच्या पाठीशी उभे राहात होते. शाखेतील अडचणी, बैठकी, शाखेत स्वयंसेवक यावेत म्हणून संपर्क करणे या गोष्टीचे सातत्याने करीत असत त्यांचा स्वभाव शांत असल्यामुळे समस्या समजून देण्याची त्यांची पद्धत फार चांगली होती.त्या त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती म्हणून भाभीजी घरी मिठाई बनवत व त्यातून त्याही संसाराला मदत करीत असत. संघ कार्यकर्त्याचे घर असल्यामुळे येणार्‍या जाणाऱ्यांचा राबता खूप होता, परंतु या संदर्भात नाराजी नव्हतीच उलट येणारा कार्यकर्ता म्हणजे पंडितजींसाठी आनंदाचे चांदणे असायचे. 

मनापासून नेहमी स्वागत असायचे ते कधी पैशाच्या पाठीमागे लागले नाहीत, परंतु मुलांच्या  संस्कारात कुठेही कमी पडले नाहीत. नशिराबादला असे पर्यंत सातत्याने त्यांनी काम केले परंतु काम करताना स्वतःला फोकस कधी केले नाही.माजी खासदार  कै.वाय.जी महाजन यांच्याकडे  त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला होता. येणाऱ्या कार्यकर्त्यांना पंडितजी  त्यांच्याकडे नेवून हळूहळू त्यांना पुढे आणले. स्थानिक तरुणांना ही त्यांनी पुढे आणले, ते मात्र शांतपणे संघ काम करीत राहिले संघर्षाशिवाय त्यांच्या आयुष्यात दुसरे काहीच नव्हते, संघाचे काम वाढावे हे प्रत्येक स्वयंसेवकांच्या मनात असते तसे त्यांच्याही मनात होते, परंतु पंडितजींसारखे देशभरात अनेक तरुण उभे राहिल्यामुळे हिंदुत्वाची शक्ती देशभरात वाढत आहे. याचा परिणाम श्री नरेंद्र मोदीजी संघाचे स्वयंसेवक देशाचे पंतप्रधान म्हणून दिसू शकले. देशातील सकारात्मक वातावरणामुळे आपली स्वप्ने हळुहळु पूर्ण होतांना दिसत होती.

त्याकाळात नशिराबाद हिंदू-मुस्लिम दंग्यामुळे गाजत होते, अशा काळात हिंदू तरुणांच्या सोबत उभे राहणे तसे अवघड होते आज त्याची कल्पना येणार नाही परंतु अशाही परिस्थितीत पंडितजी शांतपणे संघटनेचे काम करत  होते. या काळात  शाखेतील कार्यकर्त्यांना धीर देणे आवश्यक गोष्ट होती त्यांना संघटित ठेवणे आवश्यक होते हे काम पंडितजी करीत असत. त्यामुळे हिंदू तरुणांना व शाखा कार्यकर्त्यांना त्यांचा आधार होता. देशभरात हिंदुत्वाचे वातावरण व भारतीय जनता पक्षाचे बहुमताचे सरकार त्यामुळे काश्मीरचे 370 कलम गेले पाहिजे व अयोध्येतील भव्य राम मंदिर झाले पाहिजे हे दोन्ही  विषय व्हावेत असे त्यांच्या बोलण्यात  येत असे. चांगला योग असा की, दोन्ही विषय त्यांच्या हयातीत झाले. राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम ही त्यांना पाहता आला एका अर्थाने ते कृतार्थ झाले होते. पंडितजींचे पाठीवर हात ठेवून शांतपणे गप्पा मारणे मृदू  संभाषणातून त्याला आपलेसे करणे त्यामुळे त्यांना भेटल्यानंतर मनस्वी आनंद होत असे त्यांच्या मनात असलेली कामाविषयी, कार्यकर्त्यां विषयी आत्मीयता नेहमी जाणवत असे. 

माझ्या वाढदिवशी ते फोन करून आवर्जून बोलले होते.त्यांच्या शांतपणे समर्पण वृत्तीने काम करण्यातून, आपल्या सहवासातून अनेक जणांना प्रेरणा दिली. त्यांनी कधी कोठेही भाषण केलेले मला माहित नाही परंतु अशा छोट्या-छोट्या कृतीतून जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीला मृत्यू चुकत नाही परंतु अशा अनेक व्यक्ती, पंडितजीं  सारख्या जीवनाला अर्थ प्राप्त करून जातात त्यांचा सहवासही आपल्याला प्रेरणा देणारा असतो. पंडितजी  आपल्यातून गेल्यामुळे   ज्याच्यावर डोके टेकवावे ते पाय आता दिसणार नाहीत. पाठीवर हळुवार पणे फिरणारा, अनेक गोष्टींची उभारी देणारा तो हात आता फिरणार नाही ही खंत मात्र मनात  कायम राहणार. कुटुंबीयांवर झालेल्या आघातातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो व कै. पंडितजींच्या  आत्म्याला शांती लाभो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.

रत्नाकर (भाऊ) पाटील
------------------

संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शिरीष कुळकर्णी --

 शनिवार दिनांक 10 ऑक्टोबरला जळगांवहून फोन आला. फोन वर पंडितजी  चौबे यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. मन भूतकाळात प्रचारकी जीवनात गेले. मी 1981मधे जळगांव शहर व तालुका प्रचारक म्हणून कार्यरत होतो. तालुक्याच्या प्रवासात नशिराबाद येथे पंडितजी चौबे यांचा परिचय झाला. माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्याला एक वडिलबंधू जणू काही मिळाले. जळगांव तालुक्यात काम करतांना एक प्रेरणास्थान म्हणून पाहावे असे पंडितजी होते. मर्यादित आर्थिक स्थिती असतांनासुध्दा वेळ काढून संघ कार्य निष्ठेने व जिद्दीने करत याची आठवण आज प्रकर्षाने जाणवत आहे. उपहास, अवहेलना व सर्व प्रकारचा विरोध सहन करत, नशिराबाद सारख्या प्रतिकूल गावात  संघाचा आधार म्हणून त्यांचे स्थान होते. समाजातील सर्व लहान थोर व्यक्तींना आपलेसे करून त्यांचा संघ कार्यात सहभाग करुन घेण्याकडे त्यांचे लक्ष असे. संघ कार्य करतांना आपल्या कुटुंबातील सगळ्यांना संघकामात सहभागी करून घेत. 

संघानुकूल कुटुंब बनवणे, संघ कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवून  त्यांच्या अडचणी दूर करत असत. याचा अनुभव मला येत असे. त्यांचे काम जळगांव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहिल. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहोत.

-शिरीष कुळकर्णी सोलापूर

------------
 माझे बाबा.                                     

वडील काय असतात वडिलांची माया काय ही माझ्या आयुष्यात यापूर्वी भोगली नव्हती मी लहान असतानाच वडिलांची छाया आम्हाला सोडून गेली होती पण 2007 मध्ये बाबा नशिराबाद येथून जळगाव येथे स्थायिक झाले. वडील काय असतात वडिलांचे प्रेम काय असते हे बाबां मुळे मला कळले. बाबा अतिशय शिस्तीचे, बाबांची रोजची दिनचर्या सकाळी साडेपाच वाजता सुरू होणार, उन्हाळा असो पावसाळा असो अथवा हिवाळा बाबांचे पायी फिरणे अखंडपणे सुरु असायचे, त्यांचे फिरायला जाणे कधी चुकले नाही. वयाच्या 83 व्या वर्षी सुद्धा बाबा स्वतःचे काम स्वतः करत. अतिशय मोजका आहार, परंतू सर्व गोष्टी वेळेवर करावयाच्या सवयीमुळे त्यांना कधीच आजारी बघितले नाही बाबा नेहमी आनंदी असत हीच त्यांची तंदुरुस्ती होती.

त्यांच्या नशिराबाद मधील आठवणी व संघ स्वयंसेवक म्हणून त्यांनी केलेले काम या बद्दल ऐकुन होते.  बाबा कुशल संघटक होते व त्याचा अनुभव आम्हाला नेहमी यायचा. बाबांचा रोज संध्याकाळचा वेळ काव्यरत्नावली चौकात त्यांचे सर्व पेन्शन मित्रांसोबत मजेत जात असत तिथे कधी कोणाचा वाढदिवस साजरा करायचे किंवा सर्व मित्र मिळून एखाद्या तिर्थस्थळी जाऊन येत. बाबांना मैत्री करण्यासाठी वयाचे बंधन नसायचे त्यांच्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्यांशी सुद्धा त्यांची सहज गट्टी जमायची. संघाचे अनेक मोठे नेते कायम बाबांना भेटायला यायचे. मला फार माहिती नसले तरी ती व्यक्ती येऊन गेल्यावर त्यांच्या बद्दल बाबा भरभरुन सांगायचे. बाबांच्या तरुणपणी त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्ती आज संघातील मोठ्या जबादारी सांभाळत आहेत. या सर्व मोठ्या व्यक्ती आजही बाबांशी संपर्क ठेवून होत्या या वरुन बाबांच्या स्वभावाची कल्पना येते.

बाबा घराच्या बाहेर पडले की, हातात कायम काठी आणि पिशवी असायची, रोज घरी येताना बाबा काहीतरी खाऊ घेऊन येत असत तिला आम्ही जादूची पोटली म्हणत. आल्याबरोबर सर्वात पहिले कीर्ती  भैय्या कडे आपल्या पोटलीतून खाऊ देत नंतर माझा नंबर लागायचा सगळ्यात शेवटी कपिल भैय्या ला खाऊ मिळत असत. बाबांच्या दृष्टीने तिनही घरे त्यांचीच होती. त्यांनी आम्हाला कधीही कपिल भैय्या किंवा किर्ती भैय्या पेक्षा वेगळं मानल नाही.

क्रिकेट असो किंवा राजकारण बाबा प्रत्येक विषयावर भरभरून बोलत असत. सभा व्याख्यानं यांना बाबा आवर्जून जात असत. बाबांबद्दल मला व माझ्या फॅमिलीच्या मनात आदरयुक्त भीती होती. उत्तम आरोग्य स्वच्छ विचारसरणी असलेले आमचे बाबा 83 वर्षी सुद्धा तेज:पुंज होते. बाबा असे अचानक निघुन जातील असे स्वप्नातही वाटले नव्हते. परंतू आमच्या सर्वांचे बाबा देवाला सुद्धा हवे असतील म्हणून त्याने आम्हा सर्वांना पोरके केले....

- सौ.अर्चना हेमंत चंदनकर
--------------

 *आमच्या अंगणातील बोधीवृक्ष*

पंडितजी गंगाधरजी चौबे यांचे नुकतेच देहावसान झाले. पिकलं पान गळून पडलं. आमच्या घराण्यातील एक महत्वाचा अध्याय काळाच्या पडद्याआड गेला. जीवन-मृत्यूचे चक्र हा अविभाज्य घटक असला तरी कुणीही जेव्हा इहलोक सोडून परलोकात प्रयाण करतो तेव्हा लोकांच्या मुखातून उमटलेल्या प्रतिक्रिया या संबंधीत व्यक्तीचे खरेखुरे मूल्यमापन करत असतात. याचा विचार केला असत पंडितजींचे जाणे हे चौबे घराण्यासाठी अपरिमीत हानी तर आहेेच, पण याचा वैयक्तीकरित्या मला फार मोठा धक्का बसला आहे.

पंडितजी हे आमचे काका. खरं तर वडिलच...१९८१ साली माझ्या वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर आम्ही अक्षरश: सैरभैर झालो होतो. याच मनस्थितीत आमचे कुटुंब नशिराबाद येथे आले. या ठिकाणी मला नवीन उभारी देत माझी पूर्ण जडणघडण करण्याचे काम काकांनी केले. यात व्यवहाराच्या दोन गोष्टी तर असतच. लोकांसोबत मृदूपणे वागणे, नैतिकता, चारित्र्य आदींचे धडे त्यांनी आम्हा भावंडांना दिले. उमलत्या वयातील हे संस्कार आम्हाला आयुष्यात पुढे खूप उपयुक्त ठरले. मात्र या पेक्षाही सर्वात महत्वाची बाब म्हणजे काकाजी हे चालते-बोलते ज्ञानकोष होते. अगदी गावातील स्थानिक बाबींपासून ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घटकांबाबत त्यांना इत्यंभूत ज्ञान होते. इंटरनेटपूर्व कालखंडातील ते आमचे अक्षय्य ज्ञानस्त्रोत होते. आम्ही त्यांना त्या काळी बोधिवृक्ष म्हणत असू. बोधिवृक्षाच्या झाडाखाली संपूर्ण ज्ञान मिळत असल्याचे मानले जाते. यामुळे काकाजी हे आमच्या अंगणातील बोधिवृक्षच होते. आज हा वृक्ष काळाच्या पडद्याआड गेला असला तरी त्यांनी आमची वैचारिक जडण-घडण इतक्या परिपूर्ण पध्दतीत केलीय, की जेव्हाही कधी आयुष्यात डगमगून जाण्याचे क्षण आले, सत्वपरीक्षेचा कालखंड आला तरी आम्ही भावंडे घाबरलो नाहीत. आम्ही परिस्थितीचा मोठ्या धाडसाने मुकाबला केला. याचेच फळ म्हणून चौबे कुटुंबांच्या कर्तबगारीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिसत आहे.

काकाजींचा अजून सर्वात महत्वाचा गुण म्हणजे ते कट्टर धर्मनिष्ठ होते. आम्ही नशिराबाद येथे वास्तव्यास असणारा कालखंड हा धगधगता होता. तेथील हिंदू जन हे थोडे दबकतच वागत होते. या स्थितीत काकाजींनी राष्ट्रीय स्वंसेवक संघाच्या माध्यमातून तेथे राष्ट्रधर्माची ज्योत प्रज्वलीत केली. तेथे संघ शाखा सुरू केली. यात आमच्यासोबत अन्य मुले तेथे येत असत. यातून नशिराबादच्या अनेक पिढ्यांवर देशभक्तीचे संस्कार झाले. नशिराबादमध्ये संघाची अनेक मातब्बर मंडळी त्यांच्याकडे मुक्कामाला असे. आम्ही त्यांच्यातील चर्चा ऐकत असत. यातून आमचा पिंड घडत गेला. काकाजींसोबतच्या अनेक आठवणी असल्या तरी त्या आमच्या कुटुंबाच्या वैयक्तीक बाबींशी संबंधीत आहेत. मात्र चौबे कुटुंबातील या महान पुरूषाने सर्व समाजालाच आपले कुटुंब समजून जी माया केली, जे संस्कार पेरले, जी जीवनमूल्य शिकवली ते पाहता ते अजरामर झालेले आहेत. अतिशय कृतार्थपणे काकाजींना वंदन करून माझ्या मनोगताला विराम देतो. धन्यवाद

-नितीन चौबे.जळगांव 

---------------

 रिश्ता एक, मायने अनेक।

जहां से मुझे याद है, पूरा साल हमारे घर चित्तौड़गढ़ में बिताने के बाद जब गर्मी की छुट्टियां  जैसे-जैसे नजदीक आने लगती थी वैसे वैसे एक-एक दिन हमारी गिनती में कम होता चला जाता था और खुशियां बढ़ती जाती थी। खुशी इस बात की, कि हम अब अपने ननिहाल नशिराबाद जलगांव महाराष्ट्र जाएंगे। जैसा की विधित है हर बच्चे को अपना ननिहाल प्यारा होता है, किंतु हमारे विषय में यह उससे भी अधिक है। क्योंकि हमारे जन्म लेने से पूर्व ही हमारे दादा जी इस दुनिया को छोड़ कर चले गए थे और हमें अपने नाना जी में ही नाना जी और दादा जी दोनों का स्नेह मिलता था इसलिए यह हमारे विषय में और अधिक लगाव वाली बात थी। 

ननिहाल पहुंचकर नानाजी के साथ उनके ऑफिस भुसावल घूमने जाना, टॉकीज में मूवी देखना, फलों का आनंद लेना विशेषकर आमों का छुट्टियों में, एक भी दिन ऐसा ना होता जब आम का रस और चूसने वाले आम न खाते, वहीं दूसरी ओर पेड़ा और मिठाई भी हर रोज हमारे लिए बनाते और खिलाते। उन एक-दो महीनों की छुट्टियों में हम जो फरमाइश करते वह यथास्थिति अधिक से अधिक पूर्ण करने की कोशिश करते थे। हर रिश्ते के महत्व को निस्वार्थ भाव से निभाना उनकी प्राथमिकता थी।     
हमें जब से समझ आई तब से उनसे इमानदारी और मेहनत की शिक्षा ली। साथ ही मुख्य रूप से यह भी सीखा कि इंसान को हर परिस्थिति में मेहनती, ईमानदार और स्वाभिमानी रहना चाहिए। 
       
उनका सबसे बड़ा गुण हर उम्र के व्यक्ति के साथ घुलने मिलने का था। साधारण जीवन जीने की शैली, सरलता, पारदर्शिता और परोपकार की भावना भी उनके मूल जीवन के स्वभाव है।परिस्थितियां कैसी भी हो पर कभी स्वाभिमान से समझौता नहीं किया। अभिमान रहित स्वाभिमानी व्यक्तित्व, कर्तव्य परायणता, परोपकार और नैतिकता उनके जीवन को सार्थक बनाते हैं। 
       
आज जब वह हमारे बीच नहीं रहे तब हमें एक साथ कई रिश्तों को खोने का अनुभव हो रहा है। यह हानि एक अपूरणीय क्षति है।। आपके साथ बिताया हुआ हर एक पल हमारी यादों में आज भी जिंदा है और सारी उम्र ऐसे ही जिंदा रहेगा, हम आपके स्नेह और प्यार को कभी नहीं भुला सकते।
आप द्वारा दिए गए संस्कारों व गुणों से हम आपको अपने भीतर सदैव जीवित रखेंगे यह प्रण है।।।
     
नाना जी आपकी याद में दो शब्द समर्पित।।।।

जन्म और मृत्यु यदि सत्य है विधी (जीवन) का,
तो यादों और भावनाओं पर भी बंधन नहीं किसी का।--१
कौन कहता है कि लोग अमर नहीं होते,
अच्छे व्यक्तित्व तो कभी खत्म नहीं होते।।--२

--
मयंक चतुर्वेदी
एवं
हितेंद्र चतुर्वेदी
(दोहिते)
चित्तौड़गढ़
(श्री.पंडितजी यांची मुलगी सौ.कल्पना चे मुले )
------------

 आनंदयात्री

श्री.पंडितजी चौबे हे आमच्या चौबे समाजाचं आदरणीय व्यक्तिमत्व.उंच आणि सडपातळ असं त्यांचं स्वरुप परंतु त्यांची मेहनत,संयम, चिकाटी वाखाणण्या सारखी होती.नोकरीसाठी त्यांना भुसावळ ला जावे लागे.पैशांची प्रचंड चणचण म्हणून सायकलने जायचे. रात्री जेवण आटोपली की , त्यांच्या ओट्यावर गप्पांचा फड सुरू होत असे. रात्री उशिरा झोपले तरी सकाळी लवकर उठणे हा त्यांचा क्रम शेवटपर्यंत कायम राहिला. त्यांना मी काका म्हणत असे. काकांची आई त्यांना सोडून लवकर देवाघरी गेली. आईचं अकाली निधन झाल्यामुळे काका खूप हळवे झाले होते. लहान - लहान गोष्टीमुळे त्यांचे अश्रू घळाघळा वाहायचे.
श्री पंडित काका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्मठ स्वयंसेवक होते. संघाच्या लोकांची त्यांच्या घरी कायम वर्दळ असे. येणाऱ्यांचे स्वागत ते मनापासून करायचे.

उत्तर आयुष्यात ते जळगावला स्थायीक झाले. सकाळ संध्याकाळ नियमित फिरणे, लहान-लहान गोष्टीत आनंद कसा शोधावा हे काकांनी आम्हाला शिकवलं.

सांगा कसं जगायचं कण्हत-कण्हत 
कि गाणं म्हणत म्हणत ?
पायात काटे रुतून बसतात
हे ही अगदी खरं असतं
आणि फुलं फुलून येतात
हे ही काय खरं नसतं ?
काट्या सारखे सलायचं
कि फुलासारखं फुलायचं ?
हे तुम्ही ठरवा !

काकांनी फुलांचा मार्ग निवडला.
काकांचं बोलणं मोहक होतं. हास्यविनोद, कोपरखळी त्यांच्या बोलण्यात असे. त्यांचा एक विशेष नियम होता, तो म्हणजे रोज फिरून येताना ते मुलांसाठी, नातवांसाठी फळ ,मिठाई , फरसाण काहीतरी घेऊन येत रिक्त हस्ताने ते कधीच येत नसत.

त्यांनी आपल्या घराचे नाव "अपना निवास " ठेवलं होतं आणि ते नाव खऱ्या अर्थाने सार्थक होतं. घराचा आनंद हा गृहिणीच्या आनंदावर अवलंबून असतो. आमच्या काकू यांनी काकांना पावलोपावली साथ दिली. कोंड्याचा मांडा करणे त्यांना माहित होते.

काकांचं उत्तर आयुष्य खूप सुखात गेलं. त्यांची दोन्ही मुले श्रावण बाळ आहेत. सुना सुध्दा खूप सोज्वळ आहेत.

हासत दुःखाचा केला मी स्वीकार
वार्षेले चांदणे , पिऊन अंधार |
प्रकाशाचे गाणे , अवसेच्या रात्री 
आनंद यात्री मी आनंदयात्री ||

असे हे आमचे सर्वांचे आवडते काका अनंताच्या प्रवासाकडे निघून गेले. त्यांच्या जाण्याने एक न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांचे आदर्श जीवन हीच आमची प्रेरणा आहे.

 प्रा.श्रीमती सुनिता धीरज चतुर्वेदी 
 (पंडितजी चौबे यांची पुतणी)

 पिता केवल शब्द नहीं, रिश्तों की परिभाषा है।।
बचपन में पिता जी से मिला स्नेह व प्यार मां से अधिक नहीं तो कम भी नहीं था। उनके इसी स्नेह और प्यार से हम उनके और नजदीक होते चले गए। हमारी शिक्षा और जरूरतों के लिए आर्थिक संकटों से गुजरते हुए भी कभी उनके चेहरे पर शिकन ना होती थी। हमें वह परिवार को किसी भी तरह की कमी ना हो इसलिए पिताजी नौकरी के साथ-साथ बचे हुए समय में घर पर ही मिठाई की दुकान का सामान बनाया करते थे ताकि हमारी परवरिश में कोई कमी ना रह सके और मेहमानों की आवभगत में भी किसी प्रकार की कोई कमी ना हो। 
           
बचपन से ही पिता जी को संघर्ष करते हुए देखकर हालातों को बदलने के लिए हमारी कुछ कर गुजरने की अच्छा प्रबल होती चली गई, किंतु पिताजी द्वारा दिए गए संस्कारों में अति महत्वपूर्ण ईमानदारी के साथ जीवन व्यापन करना तथा सदैव निष्ठावान रहना शामिल था। इसलिए परिस्थितियां बदलने में भी समय लगा। परंतु पिताजी ने अपना संघर्ष जारी रखा। वे इतने मेहनत प्रिय व्यक्ति थे की अंतिम समय तक भी यथाशक्ति कुछ ना कुछ कार्य करते रहते थे।
     
बचपन से ही दोनो भाईयों को अपने साथ संघ की शाखाओं में जाने के लिए प्रेरित करते थे। जहां पर संस्कारों को आचरण में लाया जाता था, वहीं पर हमने उनसे सेवा, संगठन और परोपकार की सीख लेकर उनसे हमने शिक्षक और विद्यार्थी का रिश्ता भी अपनाया।
      
हम बहन भाइयों में कभी भेद ना करते हुए सभी को समान माना। बेटा बेटी को समान मानने की सोच उस जमाने से ही उनमे थी। बेटी की शिक्षा को भी महत्वपूर्ण समझ कर हमारी बड़ी बहन को स्कूली शिक्षा के पश्चात कॉलेज की शिक्षा के लिए जलगांव कॉलेज में दाखिला दिलवाया और शिक्षा का महत्व समझाया, इतना ही नहीं शिक्षा के साथ-साथ संगठन के काम करने के लिए भी प्रेरित किया। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के नारे को भी उन्होंने उस जमाने में सार्थक बनाने का प्रयास किया था।
           
उनका सरल स्वभाव और किसी की भी मदद के लिए सदैव तत्पर रहने का गुण उनकी व्यवहारिकता और व्यवहार कुशलता को उनके व्यक्तित्व से ही दर्शाता था। इस बात का अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि अपना पूर्ण जीवन नसीराबाद गांव में बिताने के बाद जब वे हमारे साथ अपने आगामी जीवन के लिए नशिराबाद से जलगांव आ गए थे तब भी उनके व्यवहार से और व्यक्तित्व से उनका पुन: नए लोगों से और मित्रों से जुड़ाव व व्यवहार बन गया था, जिसे वह अपने अंतिम दिनों तक निभाते रहे और साथ ही साथ अपने पुराने परिचितों से भी समय-समय पर मिलते जुलते रहते थे। 
        
रिटायरमेंट के बाद उनका अधिक से अधिक समय घर पर ही व्यतीत होता था, जिससे की उनके स्नेह और प्यार से घर के बच्चे भी उनके नजदीक ही रहते थे। दूसरों पर प्रतिबंध ना लगाते हुए स्वयं को दूसरों के अनुरूप ढालने का प्रयास करते थे। सादा जीवन उच्च विचार वाली सोच के साथ जीवन व्यापन किया। हमेशा जमीन से जुड़े हुए रहना उन्हें पसंद था। उनके जीवन को सफल बनाने में उनके आदर्शों, उसूलों और स्वाभिमान का महत्वपूर्ण योगदान भी है।
         
हमने अपने पिताजी से मां की तरह स्नेह, शिक्षक की तरह शिक्षा, गुरु की तरह संस्कार, और कैसी भी परिस्थिति में परिवार को संगठित रखते हुए चलाने का ज्ञान प्राप्त किया है। इसलिए हमारे लिए पिता केवल एक शब्द नहीं, रिश्तों की पूरी परिभाषा है।

--
सौ.कल्पना चतुर्वेदी  (चितोंडगढ)
(श्री.पंडितजी चौबे यांची मुलगी)

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या