बौद्ध धम्म दिक्षा' - क्रांती स्वातंत्र समतेची



@ प्रा. डॉ. सोमनाथ खाडे

विजयादशमी या दिवसाचे भारतीय परंपरेत सीमोल्लंघन व विजय पर्व म्हणून जसे महत्व आहे तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून देखील महत्व आहे. भरात्रयन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संस्कृतीवाव परंपरेशी समांतर असलेला तथागत भगवान बुद्ध यांच्या बौद्ध धम्मात लाखो बंधु भगिनींच्या सह प्रवेश केला होता. हिंदू धर्मापासून एक मोठा समूह जरी या दिवशी फारकत घेऊन वेगळा झाला असला तरी देशभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारतीय विचार व संस्कृतीपासून दूर झाला नाही, तर अधिक जवळ गेला. 

बाबासाहेब देशभक्त होते व भारताचे सांस्कृतिक महत्व व मूल्य त्यांना ठाऊक होते. शूद्र हे क्षत्रिय आहेत (शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथात) हे डॉ. बाबासाहेबांनी सिद्ध केले तेव्हा अनेकांच्या झोपा उडाल्या. राष्ट्रहिताचे असेल व सत्य असेल तर कुणाचीही भीती न बाळगता स्पष्टपणे घोषित करण्याचा त्यांचा सहज स्वभाव होता. याशिवाय ज्यांना गुरुस्थानी मानले असे महात्मा फुले यांचे मत ब्राह्मण हे इराणमधून भारतात आले या विषयाचे त्यांनी खंडन केले आणि  आर्य व अनार्य एकच आहेत सर्व भारतीय एक आहेत हे सिद्ध करून सांगितले, हे त्याचे उत्तम उदाहरण.

शेकडो वर्षा पूर्वी सर्व भारतीय समाज एकत्र व समतेने नांदत होता. परंतु कालओघात व्यवसायनुरूप  समाज ओळखला जाऊ लागला व त्यातून जातीची रचना निर्माण झाली. जाती जातीतून भेदभाव निर्माण होऊ लागला. एकाच रक्ताचे नाते दुरावले गेले. एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाता येत नाही म्हणून समाज घुसमटत होता. याचा परकीय आक्रमकांनी फायदा उचलला व भारतीय समाजात आणखी दरी निर्माण करत भेदभाव वाढीस लावला व यातून आपली सत्ता टिकवणे हाच उद्योग चालवला. भारतीय समाज यामध्ये बळी पडत आपापसात भांडत राहिला यातून जातीने प्रखर रूप धारण केले. 

जो समाज दुय्यम व्यवसाय करत होता त्याला याच्या झळा मोठ्या प्रमाणत आज पर्यंत सहन कराव्या लागल्या आहेत. बाबासाहेब म्हणत मी देखील असंख्य वेदना सहन केल्या, परंतु माझ्या मनात कोणत्याही जाती व  समाजाविषयी द्वेष भावना नाही. परंतु, जातीयता संपवण्यासाठी व समानतेसाठी होणारा प्रयत्न फारच तोकडा आहे, याला गती मिळाली पाहिजे असे बाबासाहेब अतिशय तळमळीने सांगत. समाज बदलवण्यासाठी काळाराम मंदिर प्रवेश, महाड चवदार तळे सत्याग्रह (सहा वर्षे सतत संघर्ष)व विविध लेखातून समाज मन परिवर्तन करण्यासाठी असंख्य प्रयत्न केले परंतु अपेक्षित यश मिळत नव्हते. 

२५ नोव्हेंबर १९४७ रोजी दिल्ली येथे बोलताना बाबासाहेब म्हणतात, "आपण बंधुभावाचे तत्व आचरणात आणत नाहीत. आपण सर्व भारतीय लोक हे परस्परांचे सख्खे भाऊ आहोत. सर्व भारतीय जनता ही एक जिव्हाळ्याची जनता आहे, अशी मनात भावना असते ती 'बंधुभावना' या नावाने ओळखली जाते. सामाजिक जीवनात ऐक्याचे तत्व  बंधुभाव आहे. हे तत्व रोजच्या व्यवहारात यशस्वी रीतीने पाळणे महत्वाचे आहे. हे पाळले जात नसेल तर ते 'देशविघातक' आहे. कारण जातीजातीत मत्सर आणि तिरस्कार निर्माण होत असतील तर एक राष्ट्र म्हणून आपण या दूर केल्या पाहिजेत तरच बंधुभाव हा राष्ट्राला जोडणारा राहील. जर बंधुभाव अस्तित्वात नसेल तर समता, स्वातंत्र यांच्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार आहे. हाच विषय घेऊन बाबासाहेबांनी समाज्यातील जातीयता संपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. परंतु, अस्पृश्यता हा अस्पृश्यांचा प्रश्न नाही, तर तथाकथित स्पृश्यांच्या मनात घर करून बसलेला जो संकुचितपणाचा भाव आहे, त्यातून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. 

नवजागृत अस्पृश्यांच्या मनात चीड निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु जोपर्यंत स्पृश्यांच्या मनातील अस्पृश्यता नाहीशी होत नाही, तोपर्यंत या समस्येचे संपूर्ण निराकरण होणारे नाही. त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाला पाहिजे. धर्म अफूची गोळी आहे धर्माने आपली अवहेलना चालवलेली आहे, आपण धर्मविरहित जीवन स्विकारले पाहिजे, असे कम्युनिस्टांनी विचार मांडले, त्यावेळी बाबासाहेबांनी "धर्म हा मानवाचा आत्मा आहे. मानवी जीवनाला संरक्षण फक्त बंधुभावनेनेचे मिळते याचेच दुसरे नाव बंधुता किंवा मानवता आणि मानवता हेच धर्माचे दुसरे नाव आहे." असा योग्य दिशादर्शक विचार मांडला व कम्युनिस्टांच्या अभारतीय विचार तत्वाचे खंडन केले. 

येवला येथील १३ ऑक्टोबर १९३५ रोजी दहा हजारा पेक्षा जास्त श्रोत्यांसमोर बोलतांना बाबासाहेब म्हणाले, "असंख्य प्रयत्न करूनही स्पृश्य मानलेल्या हिंदूंचे किंचितही मनपरिवर्तन होत नाही. तेव्हा त्यांनी ठामपणे घोषणा केली 'मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो हा काही माझा दोष नाही, परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही''..! या घोषणे नंतर जगातील अनेक जणांचे लक्ष बाबसाहेबांकडे वळले. प्रत्येक धर्माचे ठेकेदार बाबासाहेबांनी आपला धर्म स्विकारावा यासाठी अनेक प्रलोभने देऊ लागला. परंतु  भारतीयांची नाळ जोडलेला याच भूमीत जन्म घेऊन विश्वाला शांतीचा व पंचशील मार्ग दाखवणारा  बौद्ध धम्म स्विकारण्याची बाबासाहेबांनी घोषणा केली.

बौद्ध धम्मच का ? असा प्रश्न अनेक जणांनी विचारला. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, "बौद्ध धम्म म्हणजे प्रत्यक्ष आचरणात आणावयाचे सामाजिक तत्व आहे. तसेच माणसाच्या सुखी जीवनासाठी प्रज्ञा, शील, करुणा आणि समता या तत्वांची शिकवण देणारा, प्रत्यक्ष आचरणात आणणारा कोणतेही भेदभाव नसणारा धम्म आहे. बौद्ध धम्म हा भारताचा मूळ संस्कृतीशी जोडणारा आहे." अल्लाउद्दीनच्या बिहारवरील आक्रमणाच्या वेळी त्याने ५ हजाराहून अधिक भिख्खूना ठार केले. राहिलेले भिख्खू नेपाळ, चीन, तिबेट आदी शेजारच्या देशात गेले. बुद्ध धर्माचे शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी नवी भिख्खू परंपरा निर्माण करण्याचा येथील बौद्धांनी प्रयत्न केला. पण तो पावेतो ९०% बौद्धांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा बौद्ध तत्वाला घेऊन  बाबसाहेबांच्या विवेचक व कुशाग्र बुद्धीने धम्मातील व्यवहारातील समानता शुचिता व परस्परांसंबंधीची कारुण्यपूर्ण स्नेहमयता या सर्व गुणांतून मिळणारी मानवसेवेची विशुध्द प्रेरणा हे बुद्ध मताच्या श्रद्धेतून उत्पन्न होणारे लाभ राष्ट्राच्या व मानवाच्या उन्नतीकरिता अगत्याचे आहेत हे ओळखले. अशा विविध कारणाने बौद्ध धम्म स्विकारणे हा सर्वोत्तम मार्ग निवडला. 

बौद्ध धर्म हा विश्वधर्म आहे. माझे क्षेत्र मला फक्त अस्पृश्यांकरता मर्यादित करायचे नाही. संपूर्ण भारतात धम्मचक्र घडवून आणावयाचे आहे. धम्म हा भारतीय संस्कृतीचेच अंग असल्यामुळे सर्व भारतीयांचे हित साधणारे आहे.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी, माईसाहेब व स्वीय सहायक नानकचंद रत्तू यांनी बौद्ध भिख्खू चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते 'जयभीम' च्या गजरात पाच लाख बांधवांच्या  उपस्थितीत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली... 'नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस' असे पाली भाषेतून त्रिशरण पंचशील म्हंटले. भगवान बुद्धांना तीनवेळा मनोमन वंदन केले. हा दिवस भारताचा स्वर्ण दिवस ठरला. शेकडो वर्षांपासून अनंत वेदना सहन करणाऱ्या आपल्या बांधवांना न्याय देणारा व समस्त भारतीयांना जोडणारा दुवा हा दिवस आहे. आज युद्ध नको शांतता हवी आहे. असा  विश्वव्यापी विचार भारताने विश्वाला दिला तोच विचार घेऊन आज पुन्हा शंखनाद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. ज्यादिवशी बाबासाहेबांना हा देश समजून घेईल तो दिवस भारताला पुढे घेऊन जाणारा विश्वाला मागदर्शन करणारा दिवस असेल. कारण बाबासाहेबांना समजून घेतले की आम्हाला भारत समजेल. डॉ.बाबासाहेब अर्थात भारत.. 
धन्यवाद.

@ प्रा.डॉ.सोमीनाथ सारंगधर खाडे
  जालना, मो. ८२७५५१५९३८

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या