स्वयंसेवकाने शाखे व्यतिरिक्त स्वयंसेवकांच्या सुखदुःखाशी निगडीत राहायला हवे, त्याला संकटसमयी एकटे पडू देता कामा नये ,अशी संघाची शिकवण असते. त्याच बरोबर स्वयंसेवकांच्या घरातली मंडळी सु द्धा त्यांच्या घरापर्यंत स्वयंसेवकांचे संबंध असल्यामुळे शाखेतील स्वयंसेवकांना आपल्या मुलाप्रमाणेच मानतात. स्वयंसेवक घरच्यांच्या पेक्षा कार्यवाह, मुख्य शिक्षकाचे अधिक ऐकतो, सांगितले तसे वागतो याचीही भर त्यात पडते. त्यामुळे कार्यवाह, मुख्य शिक्षकाला केवळ शाखेचा विचार करून चालत नाही तर शाखेच्या स्वयंसेवकांच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांकडे ही बारकाईने लक्ष द्यावे लागते.
आमच्या शाखेत रोज येणारा तरुण स्वयंसेवक होता अरुण .शाखेच्या दैनंदिन कामात त्याने स्वतःला झोकून दिले होते. स्वभावाने मितभाषी, सर्वांना हवाहवासा वाटणारा अरुण सर्व स्वयंसेवकांचा ही आवडता होता. अरुणला एखादे काम सांगितले की ते झालेच म्हणून समजा. तर हा अरुण गेले चार-पाच दिवस अस्वस्थ वाटत होता. मितभाषी असल्याने तो इतरांशी यासंदर्भात काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. पण काहीतरी त्याचे बिनसले होते हे नक्की. कार्यवाह म्हणून मला त्याच्या वागणुकीतला हा बदल जाणवत होता. इतरांनाही तसेच वाटत होते. पण त्याला विचारायचे कसे हा प्रश्न होता.
दोन तीन दिवसानंतर सकाळी मी घरात बसलो असताना अरुण चे वडील पत्ता शोधत घरी आले. पाणी वगैरे घेतल्यावर मी त्यांना येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा ते म्हणाले की गेल्या चार-पाच दिवसांपासून अरुणने घरच्यांशी अबोला धरला आहे. आम्ही त्याचे लग्न ठरवले आहे .मुलगी नात्यातलीच आणि नेहमीच्या पाहण्यातली आहे. शिक्षण, वय, रूप, वर्तन हे सारे अरुणला अनुरूप असेच आहे. मुलीच्या घरच्यांचा एवढेच नाही, तर मुलीचाही या संबंधाला होकार आहे. अरुणलाही ती आवडते. पण अरुण मात्र काहीतरी मनात धरून टाळाटाळ करतो आहे. बरे, कारणही सांगायला तयार नाही. मी आज तुमच्याकडे अशासाठी आलो आहे की अरुण तुम्हाला मानतो. तुम्ही सांगितलेले सर्व काही तो ऐकतो. त्याला तुमच्याविषयी आदर वाटतो आणि तो वेळोवेळी घरात तसे बोलूनही दाखवतो. त्यामुळेच माझी तुम्हाला विनंती आहे की त्याच्याशी बोलून त्याच्या मनातले काढून घ्या आणि त्याला या लग्नासाठी तयार करा. हे काम तुमच्याशिवाय दुसरे कोणी करू शकेल असे मला वाटत नाही. आमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी एवढे तुम्ही कराच असे म्हणून ते निघून गेले .
ते निघून गेले आणि मी मात्र विचार मग्न झालो. अरुण चे वडील आपला अति खाजगी प्रॉब्लेम सांगायला आणि तो तुम्हीच सोडवा अशी विनंती करायला माझ्याकडे आलेत याचा अर्थ त्यांना संघाचा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडून काही अपेक्षा असाव्यात. किंवा मग संघ कार्याविषयी त्यांना अशी खात्री असावी की हा प्रॉब्लेम संघाचे लोकच सोडवू शकतील. याचाच दुसरा अर्थ असा कि संघाकडे लोक फक्त शाखा, संघटन यादृष्टीने पाहतात असे नाही तर आपल्या वैयक्तिक संकटातही संघाने आपल्याला मदत करावी असे त्यांना वाटते. त्यासाठी आपल्या खाजगी तल्या खाजगी गोष्टीही ते बिनधास्तपणे स्वयंसेवकां समोर मांडतात. यालाच संघावरील लोकांचा अतोनात विश्वास असेही म्हणता येईल. "सब समाज के लिये साथ मे आगे है बढते जाना" हे फक्त पद्यापुरते मर्यादित नाही तर संघाच्या समाजाप्रती च्या भावनाच अशा प्रसंगातून व्यक्त होतात. नाही पेक्षा कोण कुठला मी? ना नात्याचा, ना गोत्याचा! पण अरुणच्या वडिलांना माझ्याविषयी एवढा विश्वास का वाटावा? निश्चितच मी एक निमित्तमात्र होतो. खरेतर त्यांचा संघ कार्यावर, संघावर ठाम विश्वास होता.
मी माझ्या इतर स्वयंसेवकांशी, सहकार्यांशी या विषयावर बोललो आणि मग आम्ही सगळ्यांनी अरुणला विश्वासात घेऊन त्याच्याशी चर्चा केली. त्याला बोलते करून त्याच्या मनातली जळमटे साफ केली. क्षुल्लक पूर्वग्रहामुळे अरुण लग्नाला तयार नव्हता. त्याची समजूत काढून त्याला लग्नासाठी तयार केले. अरुणच्या विवाह प्रसंगी त्याच्या वडिलांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप खूप समाधान वाटले. आणि संघ म्हणजे फक्त शाखा नाही तर स्वयंसेवकांच्या सुखदुःखाशी समरस होणे म्हणजे संघ याची खात्री पटली.
-हेमंत बेटावदकर
संपर्क- 9403570268
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या