काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यातील दुर्गम सीमाभागात सैनिकी स्तरावर झटापट घडली, आणि लागलीच विविध माध्यमातून याबाबत वृत्तांकणाचे पडसाद उमटायला लागले, मात्र प्रत्यक्ष तेथील भौगोलिक परिस्थिती नेमकी कशी आहे - हे जाणून घेतले तर या प्रकरणाची सुरुवात कशी झाले हे कळेल..
खाली दिलेल्या उपग्रह छायाचित्रांवरून आपल्या लक्षात येते की - पेंगोंग लेक ते गलवान खोरे या अत्यंत महत्वाच्या आणि लष्करीदृष्ट्या तितक्याच संवेदनशील भागात रस्ते बांधणीची मुहूर्तमेढ माजी पंतप्रधान कै. अटलजी यांच्या काळात रोवली गेली, हा भाग एकाचवेळी तिबेट, अक्साई चीन आणि भारताची LAC यांच्यातला दुवा आहे, त्यामुळे तेथे पायाभूत सोयीसुविधा जलद हालचालींसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत, मात्र #चिन्यांना हा भाग आपल्या भूमीविस्ताराच्या (जमीन बळकावण्याच्या) धोरणात अडथळा ठरू शकेल - याची जाणीव झाली कारण या भागात गेल्या 7 वर्षात अत्यंत जलदगतीने होणारी कामे !
याच अनुषंगाने चीनने इंचाइंचाने बांध कोरून भारतीय ताब्यातली जमीन हडपण्याचा चंग बांधला आणि स्योको नदीच्या पात्रात आपली अवजड सामुग्री शांततेत उतरवून अगदी पद्धतशिरपणे या नदीचा प्रवाह अरुंद करायला सुरुवात केली., जेणेकरून थेट LAC पर्यंत यांना चौक्यांचे व रस्त्याचे बांधकाम करून - भारतीय हद्दीतील पेंगोंग लेक ते गलवाण खोऱ्यात रस्त्यावर आपली दडपशाही आरंभता येईल - आणि याच कारणाने भारत-चीन #संघर्षाची ठिणगी पडली.
हा भूभाग अत्यंत दुर्गम आणि वातावरणीय दृष्ट्या पहारा देण्यासाठीही खडतर मानला जातो - कारण ऑगस्ट ते मार्च या महिन्यांच्या काळात प्रचंड हिम-वादळांमुळे येथे सैनिकी गस्त नसते, आणि नेमका याचाचं फायदा घेत चीनने यावेळी घेतला आणि आपली सामुग्री या भागात घुसवली, मार्च महिन्यात कोरोनाच्या साथीमुळे आपल्या सैनिकी गतीविधीला जरासा उशीर होतोय - हे लक्षात घेऊनचं चीनने हे आगळीकीचे पाऊल उचललेले आहे - हे आपण लक्षात घेतलं पाहिजे -
या संघर्षला अनेक जागतिक कंगोरे आहेत -
१. कोरोनाच्या प्रसाराला आळा न घालता - माहिती लपवून आणि WHO ला भरीस घालून सर्व जगालाही या साथीबाबत अंधारात ठेवणे.
२. WHOमध्ये या सर्व प्रकरणानंतर भारताचे वाढणारे वर्चस्व
३. हँगकाँगचे आंदोलन दडपणे, तिबेटी बौद्ध धर्मियांवर अत्याचार
४. तैवानला वारंवार धमक्या देऊन - व्यापारी युद्धखोरीची भाषा करणे
५. ऑस्ट्रेलिया आणि कॅनेडाने चीनचा विस्तारवाद लक्षात घेऊन पुकारलेला असहकार आणि जागतिक स्तरावर केलेली निर्भत्सना, येथील निर्यातीत सातत्याने होत असणारी घट.
६. श्रीलंका, पाकिस्तानातील जनतेचा चीनला तेथील साधनसामुग्री वापरून याच देशांवर बंधने घालण्याविरुद्धचा वाढता आक्रोश.
७. तिबेटीयन दलाई लामांच्या निवडीत केलेला हस्तक्षेप - यामुळे आशियाई आणि जागतिक स्तरावरील बुद्ध धर्मियांच्या दुखावलेल्या भावना
आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे -
८. अमेरिकेने सातत्याने #चिनी_व्हायरसच्या नावाने शिमगा करीत - या देशाची केलेली नाचक्की, आणि चीनमधले शी जिनपिंग यांच्याविरोधात तेथील राजकरणात व जनमानसात असणारा क्षोभ.
या सर्व आघाड्यांवर आलेल्या अपयशाला झाकण्यासाठी या देशाने हे असले कृत्य केल्याचे निश्चितच जगजाहीर होत आहे, आणि कुठेतरी या चिनी अमर्याद सत्तापिपासू-विस्तारी वृत्तीला केवळ भारत आणि भारतचं आवर घालू शकतो- असा आशावाद या निमित्ताने जगाला वाटायला लागलाय - ही नक्कीच जगाचा ध्रुव आता संयत, लोकशाही देश असणाऱ्या भारताकडे सरकतोय याची नांदी आहे! आणि हीच खरी चिनी दुखण्याची कायम ठसठसती जखम ठरतेय..
लेखक - वरद मुठाळ
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या