संघाविषयी ज्यांना फारशी माहिती नसते त्यांना जेव्हा हे समजते की संघात राष्ट्रभक्ती आणि संस्कारा शिवाय काहीही दिल्या जात नाही, उलट स्वयंसेवकच संघासाठी आपले जीवन, आपला बहुमोल वेळ, आपले श्रम , ईतकेच काय पण आपला पैसाही देत असतात तेव्हा त्यांना याचे नवल वाटते. संघामध्ये समर्पणाची भावना ईतकी खोलवर रुजलेली असते की प्रत्येक स्वयंसेवक हा संघाला समर्पित असतो.
समर्पणाची भावना स्वयंसेवकांच्या मनात कशी ओतप्रोत भरलेली असते त्यासंदर्भात घडलेला एक प्रसंग सांगतो. ही साधारणतः पस्तीस-चाळीस वर्षापूर्वींची घडलेली गोष्ट आहे. जळगावच्या ब्राह्मण सभेच्या सभाग्रुहात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार होती. त्यासाठी जवळजवळ शंभर ते दीडशे संघाचे पदाधिकारी येणे अपेक्षित होते. बैठक दिवसभर चालणार होती. त्यासाठी सहाजिकच साऱ्या स्वयंसेवकांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. आमटी, भात व पोळी असा साधासा बेत होता. आमटी आणि भात अनुभवी प्रौढ स्वयंसेवक तेथेच शिजवणार होते. पोळ्या मात्र विक्रमादित्य सायम् शाखा व गुरुगोविंद प्रभात शाखा यांनी त्यांच्या स्वयंसेवकांच्या घरून गोळा करून आणायच्या होत्या. संघाच्या कार्य पद्धतीचाच तो एक भाग होता.
या दोन्ही शाखांच्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन एकूण लागणाऱ्या पोळ्या व त्यासाठीच्या स्वयंसेवकांची घरे यांची यादी करण्यात आली. प्रति घर पाच पोळ्या जमा कराव्यात असे ठरले. बैठकीच्या दिवशी सकाळी 11 वाजता त्या त्या घरी जाऊन पोळ्या गोळा करायच्या होत्या. त्यासाठी आदल्या दिवशी रात्री घरोघरी निरोप पोहोचवण्याचे काम सुरू झाले. साऱ्या माता - भगिनींनी सहर्ष सहमती दर्शवली.
पण जेव्हा मनोहर भाऊ या किराणा दुकानावर काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या घरी आम्ही पोळ्यांचा निरोप दयायला गेलो तेव्हा ते कामावर गेले होते. घरी त्यांची बायको एकटी होती. तिला हा निरोप देताच ती संतापाने ओरडली, "काही पोळ्या वगैरे मिळणार नाहीत! आले फुकटचे मागायला! भिकारी कुठले!" आम्ही या भडिमाराने एकदम गांगरुन गेलो. त्या भगिनीने आम्हाला जवळजवळ हाकलूनच लावले. खजील होऊन आम्ही तेथून काढता पाय घेतला. हा अनुभव आमच्यासाठी अगदीच नवीन होता. पण आम्ही या विषयी कोणाजवळ काहीच बोललो नाही.
रविवारी सकाळी नियोजित बैठक सुरू झाली. अपेक्षित कार्यकर्त्यांची उपस्थिती बैठकीला होती. दुपारच्या भोजनासाठी आमटी भाताचा स्वयंपाक स्वयंपाकघरात सुरू होता आणि आमच्या शाखेचे स्वयंसेवक भागात फिरून पोळ्या संकलनाचे काम करीत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत जमा झालेल्या पोळ्या बैठक स्थळी आणण्यात आल्या. आता भोजन व्यवस्थेतले स्वयंसेवक वाढण्याची तयारी करत होते. तेवढ्यात एका स्वयंसेवकाची नजर दरवाज्याकडे गेली. दरवाज्यात मनोहर भाऊ उभे होते. तेच किराणा दुकानावर काम करणारे मनोहर भाऊ की ज्यांच्या बायकोने आदल्या दिवशी पोळ्यांची मागणी करायला गेलो असता आम्हाला हाकलून लावले होते.
मनोहर भाऊ आत आले आणि हात जोडून म्हणाले, "काल माझ्या बायकोने तुम्हाला अपमानित करून हाकलून लावले. तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. संघ म्हणजे काय हे मी तिला समजावून सांगण्यात कमी पडलो". मला रात्रभर झोप आली नाही. तळमळत अंथरूणावर पडलो होतो. शेवटी सकाळी सकाळी उठून मी स्वतः कणिक भिजवली आणि पोळ्या बनवल्या. आयुष्यात प्रथमच पोळ्या बनवल्या आहेत, त्यामुळे त्या गोल झालेल्या नाहीत व जाडसर झाल्या आहेत. पण कार्यक्रमासाठी पोळ्या मागितल्या आणि मी दिल्या नाहीत असे होता कामा नये. म्हणून माझ्या वाटेच्या पाच पोळ्या मी आणल्या आहेत. त्या घ्या आणि मनात काही ठेवू नका. मला काल रात्री पासून अपराध्यासारखे वाटते आहे. तुम्ही जर या पोळ्या घेतल्या नाहीत तर ही बोच आयुष्यभर मला सलत राहील. हे बोलताना त्यांचे डोळे पाणावलेले होते. आम्हा साऱ्यांच्या ही डोळ्यात पाणी आले.
आम्ही मनोहर भाऊंच्या हातातून पोळ्यांचे ते पुडके घेतले आणि भोजनाआधी दाखवायच्या नैवेद्याच्या पानात त्या पोळ्यांचा समावेश केला. मनोहर भाऊंनी स्वतःच्या हाताने केलेल्या पोळ्यांसाठी नैवेद्याच्या पाना इतकी योग्य जागा दुसरी कोणती असणार होती?
- हेमंत बेटावदकर, जळगांव
संपर्क- 9403570268
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
1 टिप्पण्या