दोन वर्षांची मुलगी घरी ठेवुन 'हे' दाम्पत्य गेले होते कारसेवेसाठी..

#आठवणी_रामजन्मभूमी_आंदोलनाच्या 

दोन वर्षांची मुलगी घरी ठेवुन 'हे' दाम्पत्य गेले होते कारसेवेसाठी..

अयोध्येतील राम मंदिर आंदोलनासाठी १९८८ ते १९९२ या काळात मोठ्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त कारसेवा बजावण्यासाठी गेले होते. यामध्ये लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत माता-भगिनी सगळ्यांनी सहभाग घेतला होता. येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे अयोध्या नगरीत पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होणार असल्यामुळे 'जीवनाचे झाले सार्थक' अशी भावना या तमाम रामभक्तच्या मनात निर्माण झाली आहे. कधी एकदा प्रभू रामचंद्रांचे भव्य दिव्य मंदिर बघतो व रामचंद्राच्या चरणी मस्तक टेकवितो अशी अवस्था साऱ्याच हिंदु बांधवांची झाली आहे. देवगिरी विश्व संवादतर्फे अश्याच काही कारसेवामध्ये सहभागी झालेल्या देवगिरी प्रांतातील रामभक्तांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितलेले अनुभव प्रचंड रोमांचकारी व प्रेरणादायी असल्याचे लक्षात आले. 

------------------

अनुभव कथन- सौ. डॉ. यशस्विनी अश्विनीकुमार तुपकरी
(कन्सलटिंग फिजिशियन, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, संभाजीनगर)

दिनांक पाच मंदिराच्या निर्माणाची प्रक्रिया सुरू होणार आहे ही बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि माझं मन भूतकाळात रमलं. आमच्या घरी सशस्त्र दरोडा पडलेला होता. वर्तमानपत्रात या दरोड्याची बातमी झळकली होती. घरात भीतीचे वातावरण होते. अनेक जण भेटायला येत होते, परंतु अशा परिस्थितीत माझे सासरे माझे पती अश्विनीकुमार तुपकरी यांना म्हणाले की गेल्या वेळी संजय सावजी यांनी कार सेवा बजावली होती यावेळी तुझा नंबर आहे. माझ्या माहेरची वातावरण संघ संबंधी नव्हते. त्यामुळे माझ्या सासाऱ्यांचा हा निर्णय मला जरा विचित्रच वाटला. 

माझी मोठी मुलगी जेमतेम दोन वर्षाची होती. त्यामुळे भीतीने माझ्या पोटात गोळाच आला. परंतु दोन वर्षाच्या माझ्या लेकीला घरी ठेवून मी नवऱ्यासोबत अयोध्याला जाण्यासाठी निघाले. आमचा प्रवास चांगला झाला. अयोध्याला गेल्यानंतर मात्र संघ कार्याचे व्यापक स्वरूप माझ्या निदर्शनास आले. संघाचे अखिल भारतीय रूप मला तेथे पाहायला मिळाले. इतके मोठे विशाल संघटित रूप मी प्रथमच पाहत होते. 

तिथे दररोज साध्वी ऋतंभरा देवी, आचार्य धर्मेंद्रजी विचारप्रवर्तक प्रवचने देत असत. आम्ही बंदिस्त रामलला चे दर्शन घेतले. प्रतीकात्मक शीला न्यासासाठी न्यायालय परवानगी देईल या आशेवर तेथे जमले रामभक्त दररोज वाट बघत होते. शेवटच्या दिवशी नदीतील वाळू घेऊन तिचे अर्पण करायचे अशाप्रकारे प्रतिकात्मक शिलान्यास करण्याचे आम्हाला सांगण्यात आले. परंतु जमलेल्या हिंदू समाजाचा राग अनावर झाला. संयम तुटला आणि कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना विवादित ढाचा पडला. 

सर्वत्र जोश व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी लष्कराची विमाने आकाशात घिरट्या घालत होती. जाळपोळ सुरू झाली होती. दुसर्‍या दिवशी कसेबसे आम्ही आयोध्याच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. खूप गर्दी उसळली होती. रेल्वेचे दरवाजे आणि काचा बंद करून बसावे अशा सूचना आम्हाला दिल्या गेल्या होत्या. जेव्हा औरंगाबादेत आलो तेव्हा येथे कर्फ्यू लागलेला होता. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या वाहनातून आम्हाला घरी पोहोचवलं. घरी आल्यानंतर माझ्या आई-वडिलांना कळले की आम्ही आयोध्याला गेलो होतो, तिथून पुढे मी अभ्यास करून संघ विचार समजून घेतला.

पाच ऑगस्ट रोजी याच रामजन्मभूमी मध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन होत आहे. हा मोठा भाग्याचा दिवस आहे. हे आंदोलन केवळ एक मंदिर निर्माण व्हावे इतक्या संकुचीत उद्दिष्टासाठी नव्हते, तर त्यामागे समस्त हिंदूंची आस्था होती. संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन व्हावे हेही त्याचे लक्ष आहे. श्री राम मंदिर आंदोलन म्हणजे सर्व हिंदू समाज आपापसातील भेद विसरून समरस होऊन एकजूट झालेला अनुभवण्यास मिळाला. या आंदोलनामागे राजकीय हेतू नव्हता. आंदोलन कोणत्याही उपासना पद्धतीच्या किंवा श्रद्धेच्या विरोधात नव्हते परंतु दुर्दैवाने त्याचे तसे चित्रिकरण केले गेले. आता लवकरात लवकर मंदिर पूर्ण झाल्यानंतर रामललाचे दर्शन घेण्याची आतुरता लागली आहे."

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या