श्री गजानन महाराज संजीवन समाधी

@ कृनाल महाजन 

आषाढ महिन्यात हरी पाटलाला घेऊन स्वामी पंढरपूरात श्री विठ्ठलाच्या भेटीला गेले. पंढरपुरात अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्व संताचे अंतिम ध्येय साक्षात विठू माऊली विराजमान आहे. स्वामी आणि हरी पाटील चंद्रभागा नदीत स्नान करून पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाकरिता गेले. यावेळी स्वामी भावविवश दिसत होते, त्याच भावनेच्या आवेशात स्वामी पांडुरंगाशी बोलू लागले. ‘हे देवा पंढरीनाथा, समर्था, हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता आज माझी विनवणी ऐक, तुझ्या आज्ञेने या भूमीवर मी भ्रमण केले, जे जे भाविक होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता हे अवतार कार्य संपले आहे हे तू जाणतोच. हे प्रभू आता मला जाण्याची आज्ञा असावी. देवा! मी भाद्रपद महिन्यात वैकुंठवासी होऊ इच्छितो'. अशी विनंती करून स्वामींनी हात जोडले. श्रीहरींचा हा विरह सहन होणार नाही या उत्कट भावनेने स्वामींच्या डोळ्यात पाणी तरळले.

समोर हरी पाटील होता तो स्वामींना हात जोडत विचारू लागला हे स्वामी आपल्या डोळ्यात आज पाणी का आले? किंवा मी काही सेवेला चुकलो का? त्यावर हरी पाटलाचे हात धरत ‘तुला सांगितले तरी त्यातील  रहस्य नाही कळणार, तो विषय खूप खोल आहे. एकच सांगतो ते ऐक आता माझी संगत फार थोडी शिल्लक आहे. चल आता शेगावला 'तुमच्या पाटील वंशाला काही कमी पडणार नाही'. मात्र हरी पाटलाला फार चिंता लागली.

शेगावी आल्यावर हरी पाटील सर्व मंडळींना स्वामींचे शब्द सांगू लागला. पुढे श्रावण महिना गेला आणि स्वामींच्या शरीराला क्षीणता आली. पुढील भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘गणपती विसर्जनासाठी तुम्ही या’ म्हणून महाराजांनी सर्वांना बोलाविले. गणेश पुराणातील कथेप्रमाणे चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशाची स्थापना करावी, पूजा अर्चना करून नैवेद्य द्यावा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करावे, आज तो दिवस आला आहे तो साजरा केला पाहिजे. या पार्थिव देहाला तुम्ही आनंदाने विसर्जित करा, कोणीही दु:ख करू नये. आम्ही येथेच आहो तुम्हाला सांभाळण्यासाठी याचा तुम्हाला विसर पडू देऊ नका. हे शरीर वस्त्राप्रमाणे बदलणे भाग आहे असे श्री कृष्णांनी गीतेत सांगून ठेवले आहे.

स्वामींनी चतुर्थीचा दिवस अतिशय आनंदाने काढला. बाळाभाऊच्या हाताला धरत स्वामी आपल्या आसनावर बसले. मी गेलो आहे असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, मला कधीही विसरू नका. मी इथेच आहे असे म्हणून त्या महात्म्याने योगाच्या माध्यमातून आपला प्राण ब्रम्हरंध्रात प्रवाहित केला. शके अठराशे बत्तीस साधारण नामसंवत्सर, भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी दिवसाच्या प्रहराला ‘जय गजानन’ असे बोलून सच्चिदानंद परम चैतन्यात लीन झाले. देहाचे चलन वलन थांबले, स्वामी समाधिस्थ झाले.

भक्तांची रक्षणकर्ती, पालन पोषणकर्ती माय आज गहन निद्रेत गेली. लोक हळहळ करू लागले, शेगावात पुकार झाली सर्वांची माय माउली स्वामी गजानन समाधिस्थ झाले. असे ऐकता समस्त शेगाववासी, स्वामींचे भक्त हृदय पिटाळून रडू लागले. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलतो श्रीहरी. गेला तो कैवारी दीनजनांचा, कालरूपी वाऱ्याने विझला हा ज्ञानदिवा. गेला आमचा विसावा, गेला आमचा सौख्यठेवा. अहो! गजानन स्वामी आता आम्हास कोण त्राता? का रे इतक्यात गेलास आम्हा सोडून तू पुण्यवंता?

मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूसा, बंकटलाल, ताराचंद आणि श्रीपतराव कुळकर्णी स्वामींचे भक्त मंडळी मठात जमली. आज पंचमीचा दिवस आहे स्वामींना आज समाधी न देता आसपासच्या लोकांना अंतिम दर्शन घेण्यासाठी येऊ द्या. आता ही मूर्ती निश्चित लोपणार आहे त्यामुळे ज्यांच्या नशिबी असेल त्यांना दर्शन घडेल. सर्वत्र निरोप देण्यासाठी माणसे धाडावी.

भक्तांमधील गोविंदशास्त्री डोणगावकर हे विद्वान त्याठिकाणी होते. ते बोलले त्यांच्या आवडत्या भक्तांना ते निश्चितच दर्शन देतील. तोपर्यंत आपल्या मस्तीकी हा प्राण धरून ठेवतील. त्याची प्रचीती बघण्यासाठी दूर जाण्याची आवशकता नाही. स्वामींच्या मस्तकी लोणी आणून ठेवा, डोक्यावर लोणी ठेवता तो विरघळू लागला. जो तो हा चमत्कार बघून कौतुक करीत होते मात्र हे बळ योगशास्त्राचे आहे. त्यावर गोविंदशास्त्री बोलू लागले, केवळ एक दिवसच नाही तर हे नि:संशय असेच वर्षभर राहतील मात्र हे करणे उचित नाही. स्वामींचे आवडते भक्त आल्यानंतर त्यांना समाधी द्या, ही सूचना सर्वांना आवडली.

स्वामिंपुढे भक्तांनी हजारो टाळ घेऊन भजन मांडले. दुरदुरच्या भक्तांना स्वामींनी स्वप्नात जाऊन आपल्या समाधीची गोष्ट सांगितली. स्वामी समाधिस्थ झाल्यावर सुद्धा आपल्या समाधीची वार्ता दूरवरच्या भक्तांना कळविली या एका लीलेवरून स्वामींचे दिव्य शक्ती, अथांग ज्ञान आणि प्रवळ योगसिद्धींची प्रचीती येते.  

ऋषीपंचमीला शेगावी स्वामींचे अनेक भक्त शेवटचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित झाले. स्वामींच्या अंतिम यात्रेसाठी रथ तयार करण्यात आला. संपूर्ण रस्ता भर रांगोळ्या आणि सडा समार्जन केल्या गेले. भक्तांच्या अनेक दिंड्या येऊन विठ्ठल नामाचा गजर करू लागले. तुळशी, बुक्का, गुलाल आणि फुले समस्त भक्तगण उधळू लागली. श्री गजानन स्वामींचे पार्थिव फुलांनी झाकून गेले. बर्फी पेढ्यांचा प्रसाद भक्त वाटत होते. अशी मिरवणूक शेगावमध्ये रात्रभर सुरु होती, सकाळ होताच पुन्हा मठात येऊन समाधीच्या ठरलेल्या जागेवर नेऊन ठेवले.

स्वामींच्या देहाला अखेरचा रुद्राभिषेक केल्या गेला. पंचोपचार आरती केली, आणि भक्तांनी नामगजर केला जय जय अवलिया गजानन, हे नरदेहधारी नारायण, अविनाशरूपा आनंदघना!, परात्परा जगत्पते. अशा भजनात उत्तराभिमुख मूर्ती ठेवत अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले. ‘जय स्वामी गजानन’ असे बोलून मीठ, अर्गजा, अबीर यांनी ती गार भरून शिळा लावून द्वार बंद करण्यात आले. भक्तांनी शेवटी दहा दिवसपर्यंत समाराधना चालविली. तेथे असंख्य लोक येऊन स्वामींचा प्रसाद घेऊन गेले.  

।।सदगुरु श्री गजानन महाराज की जय।।

(प्रस्तुत लेख, कृणाल महाजन लिखित आगामी पुस्तक 'श्री गजानन लीला' यामधील आहे.)

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या