संघ सरिता बह रही हैं - भाग २

संघ सरिता बह रही हैं... (२)

@रवींद्र मुळे

काल आपण संघाच्या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी विचार सुरू केला. जसा प्रत्येक व्यक्तीचा ,समूहाचा अस्तित्वाचे कारण असते तसे 
संघटना ,पक्ष आणि त्यांची तत्वे याचे पण अस्तित्वाचे कारण असते. जोपर्यंत समाजाचे प्रश्न आणि त्यांचे तत्व हे यथार्थ असते तोपर्यंत त्या संघटनेच्या अस्तित्वात पण यथार्थता असते. त्यातील चैतन्य टिकून असते. त्या संघटनेचा विस्तार होत असतो मुख्य म्हणजे नवीन नवीन लोकांची त्यात भरती होत राहते आणि संघटन जिवंत राहते. या उलट जेंव्हा संघटनेचा उद्देश संपतो तेंव्हा संघटन मृत होवू लागते. त्यात भरती होणाऱ्या नवीन लोकांची संख्या कमी होत जाते. एका अर्थाने ते प्रवाही राहत नाही. संघाचा प्रवाहीपणा हा संघाच्या अस्तित्वाचा यथार्थपण सिद्ध करतो.

आपण एक उदाहरण घेवू संघातील प्रचारक पद्धतीचे किंवा व्यवस्थेचे. अनेकांना ही पद्धत अजून कळलीच नाही. ( विरोधकांना तर नाहीच पण जे संघाबद्दल आस्था बाळगतात त्यांना पण नाही.) सर्वसाधारणपणे समाजात असा भ्रम आहे जो प्रचार करतो तो प्रचारक. अन्य काही पक्षात एक प्रचलित शब्द आहे फुलं टाईम वर्कर किंवा पूर्ण कालीन कार्यकर्ता. काय फरक आहे यात? संघाचा प्रचारक सर्व प्रथम संघ सांगेल त्या भौगोलिक कार्यक्षेत्रात किंवा संघ विचाराने चालणाऱ्या संघाच्या कुठल्याही क्षेत्रात कार्य करतो. त्याने एकदा ते बिरूद स्वीकारले की त्याच्या सर्व इच्छा , आकांक्षा , महत्वाकांक्षा या त्याच्याकडून संघाकडे सोपवल्या जातात. हा एक खूप अवघड मानसिक खेळ आहे. मी माझे काही वर्ष किंवा प्रसंगी आयुष्य पणाला लावतो आहे तर माझ्या म्हणण्याला तेवढेच महत्व दिले पाहिजे हा स्वाभाविक भाव मनातून काढून टाकावा लागतो. त्यासाठी रोज मनाशी लढाई खेळावी लागते आणि मग हळू हळू ते त्याच्या अंगळवणी पडते. तो उच्च विद्याविभूषित असतो . उच्च नोकरी, व्यवसाय सोडून किंवा प्रसंगी त्याकडे पूर्ण पाठ फिरवून तो कार्याला वाहून घेतो. पण म्हणून त्याला कुठल्याही भौतिक साधनांची आसक्ती नसते. 

मोबाईल हे आता प्रचारकांकडे दिसायला  लागले. पण अनेक वर्ष त्यांना परवानगी नव्हती.  आज ही तालुक्याचे दायित्व असणारे प्रचारक मोबाईल शिवाय असतात . जिल्हा प्रचारक अँड्रॉइड फोन वापरत नाहीत. प्रवास आणि आवश्यक त्या वस्तूसाठी प्रचारक खर्च करत असतो पण त्याचे जेवण हे कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरीच असते. हॉटेल मध्ये अगदी क्वचित प्रचारक जातो ही आज ही स्थिती आहे. त्याने वापरायचे कपडे हे ठरलेले म्हणजे पूर्वी धोतरच पण आता पायजमा आणि त्यावर झब्बा. आता वेगवेगळे रंग निघाले नाही तर पांढरा किंवा फार चैन म्हणजे बदामी असे असायचे.

त्याला तो खर्च करत असलेल्या पैशाचे एक तारखेला हिशोब देणे बंधन कारक असते. त्या हिशोबत त्रुटी आढळली तर विचारणा पण होते. आणि त्याची पण मनस्थिती ही त्याचे उत्तर देण्याची असते. त्याला घरी जाण्यास परवानगी घ्यावी लागते. आपल्या वरिष्ठ प्रचारक कार्यकर्त्याला सांगावे लागते आणि तो हो म्हणाला तर जाता येते. सण , वार हे सगळे घरी न जाता नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात व्यतीत करण्याचे संकेत असतात.

आता ही नियमावली कुठे लिहलेले आहे का ? तो कार्यकर्ता प्रचारक जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्याच्या कडून रीतसर फॉर्म भरून घेतला जातो का ? काही अग्रिमेंट असते का? नियम मोडला गेला तर कारणे दाखवा नोटीस असते का ? असे तरुण मिळण्यासाठी संघ पेपर किंवा इंटर नेट वर जाहिरात देतो का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 'नाही' अशी आहे. तरी पण ही व्यवस्था कमीतकमी ८५ वर्षांपासून चालू आहे आणि म्हणून  संघ प्रवाही आहे . त्यात चैतन्य आहे. 

संघाच्या अस्तित्वाच्या यथार्थतेचे दर वर्षी अशा कठोर व्रत अंगिकरणाऱ्या तरुणांची संख्या वाढणे हे एक व्ययछेदक लक्षण म्हणावे लागेल. प्रचारकीय  कठोर आणि व्रथस्त जीवनाचा स्वीकार करून ते यशस्वी पणे पार पाडणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या वर्षा काठी वाढतच आहे. अत्यंत उच्च विद्याभूषित आयआयटी, आयआयएम या संस्थात शिकलेले ते थेट ग्रामीण भागात काम करणारे कमी शिकलेले स्वयंसेवक प्रचारक म्हणून काम करताना अधिक संख्येने दिसत आहेत. आता एक प्रचारक या शब्दात वर वर्णन केलेले आणि न वर्णन केलेलं पण असंख्य संकेत पाळत ही परंपरा अव्याहत पणे चालू आहे.

काम करताना विशिष्ट कार्यक्षेत्रात झोकून द्यायचे . आपला व्यवहार वागणे हे असे ठेवायचे की लोक आपल्या संपर्कातून संघाच्या जवळ आले पाहिजे पण हे करताना कुठेही स्वतःला गुंतून घ्यायचे नाही. कुठेही, कुठल्या संस्थेत ,कुठल्या व्यक्तीत लिप्त व्हायचे नाही आणि म्हणून अशा प्रचारक कार्यकर्त्यांचे मग कार्यक्षेत्र हे ठराविक कालावधी नंतर बदलले जाते. या सगळ्या निर्णय प्रक्रियेत त्याच्याशी चर्चा जरूर केली जाते पण शेवटी जो निर्णय दिला जातो तो त्याला पाळावा लागतो. सर्व ठिकाणीं उपभोग वाद वाढीस लागलेला असताना संघाने ही व्यवस्था टिकवून ठेवली याचा अभ्यास संघाचे अभ्यासक ,विरोधक करतील का ? कुठलेही प्रलोभन न देता शुद्ध प्रेरणेने त्याच्या मनात अश्या प्रकारचे कार्य करण्याची प्रेरणा कशी उत्पन्न होत असेल? सध्याच्या सामाजिक जीवनात  मर्यादित कुटुंब व्यवस्था निर्माण झाली  आहे. मुलगा आई वडिलांना एकच असतो . कदाचित दुसरी बहीण असते. भविष्याची असुरक्षितता वार्धक्याकडे झुकल्यावर जाणवत असते प्रचंड खर्चिक शिक्षण प्रसंगी कर्ज घेवून केलेले असते , पुढे त्याने यशस्वी नोकरी, व्यवसाय करून जगावे आपल्याला प्रसंगी विचारावे अशी स्वाभाविक अपेक्षा असणे चूक नसते आणि तरी असे आई वडील आपल्या मुलांना ही परवानगी कशी देतात ? अनेक अशा प्रचारक कार्यकर्त्यांच्या घरात आई वडील आजारी पडतात त्यांची देखभाल थोडे दिवस हा प्रचारक करतो पण ! परंतु कर्तव्य कठोर होवून कार्यक्षेत्रात निघून जातो.

स्वातंत्र्य पूर्व काळात अनेक क्रांतिकारकांचे जीवन आपल्याला असे दिसते. पण त्यावेळेस स्वतंत्र देवता त्यांना ही प्रेरणा देत होती आणि देशभक्तीचे भारलेला तरुण त्या स्वतंत्र देवते ला भारत माते ला मुक्त करण्यासाठी समर्पित होत होते. संघाने स्वातंत्र्य पूर्व काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि नंतर स्वतंत्र भारतात हा समाज पुन्हा उभा करण्यासाठी देशभरात ही जी फळी उभी केली त्याची इतिहासाला नक्की दखल घ्यावी लागेल. संघाच्या ९५ वर्षाच्या वर्धिष्णु वाटचालीत या व्यवस्थेचे योगदान आहे असे नाही तर आपल्या संस्कृतीत असणारी सन्यासी आणि ऋषी यांची परंपरा आधुनिक काळात परिस्थिती नुसार  टिकवून ठेवण्याचे मोठे योगदान संघाचे आहे. राजकीय चाष्ण्यातून आणि तात्कालिक स्वार्थासाठी उथळ विचार मांडणारे सोडून देवू पणं खरोखर प्रामाणिक अभ्यासकांनी जरूर या व्यवस्थेचा अभ्यास करावा आणि किती मोठा मनोवैज्ञानिक अभ्यास करून संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी या संघटनेची रिती निती तयार केली असेल याचा अनुभव घ्यावा.

(क्रमशः) 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या