@ रवींद्र मुळे
काल आपण प्रचारक व्यवस्थेबद्दल बोलत होतो. या व्यवस्थेने संघाला आणि समाजाला प्रचंड मोठी व्यक्तिमत्वे दिली. काही माहिती झाली. काहीचे कार्य हे पडद्याआड राहिले. संघ कार्याचे मूल्यमापन करताना कितीही वैचारिक विरोध असला तरी अशा व्यक्ती निर्माण करण्यात संघ यशस्वी झाला हे लोकांनी आडवळणाने मान्य केले आहे, पण ज्यांना चिकित्सा करायची आहे त्यांनी ही व्यक्तीमत्त्व अभ्यासलीच पाहिजेत अशी आहेत. संघाने निर्माण केलेली ही व्यक्तिमत्वे ही संघाच्या कार्यपद्धतीला आलेली सकारात्मक जीवन पुष्प म्हणजे भारतमातेच्या उत्कर्षासाठी वाहिलेली एक पुष्पांजली आहे. या पुष्पांजली मध्ये न दिसणारा एक समान धागा आहे तो संघ संस्काराचा. एक एक व्यक्तिमत्व समाजात मिशन घेवून उभे राहिले आणि ते मिशन घेवून काम करताना त्या त्या क्षेत्रात त्यांनी मापदंड उभे केले.
आपण कन्या कुमारी येथे जातो. विवेकानंद केंद्र बघतो. स्वामीजींनी केलेल्या तपश्चर्येचे खडकावर दुसऱ्या एका तपस्वीने न भूतो न भविष्याती काम उभे केले. स्वामी विवेकानंद यांचे विचार कुणाला नको आहेत? पण मग महापुरुषाचे विचार हे जेंव्हा उचित स्मारक उभे राहते तेंव्हा ते चिरंतन राहण्यासाठी मदत होते. हे स्मारक उभे करणारे एकनाथजी रानडे. एके काळी संघाचे प्रचारक होते म्हणजे शेवटपर्यंत प्रचारक होते. पण संघाने आज्ञा दिल्यावर आपला देह झिझवून त्यांनी प्रसंगी ख्रिश्चन समाजाशी दोन हात करत, सर्व समाजा चा सहभाग घेत आणि सर्व पक्षांची संमती घेत अविस्मरणीय काम उभे केले. डॉ. हेडगेवार यांनी गोळा केलेल्या पहिल्या स्वयंसेवकांच्या टीममधले ते होते. उच्च विद्या विभूषित होते.
रामजन्मभूमीचा प्रदीर्घ लढा यशस्वी होवून त्याच्या पुनर्निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या लढ्यात सातत्याने एक नाव आपण ऐकत आलो. श्री अशोक जी सिंघल ! स्वतः धातुशास्त्रातील पदवीधर इंजिनिअर होते. वडील शासकीय सेवेतील अधिकारी. व्यापार आणि व्यवसायाच्या बाबतीत सिंघल परिवाराचे नाव आघाडीचे नाव. पण अशोकजी प्रचारक निघाले. आणि आजन्म प्रचारक राहिले. विश्व हिंदू परिषदेचे काम त्यांच्याकडे सोपवल्यावर राम जन्मभूमी लढ्याला त्यांनी निर्णायक वळण दिले.स्वतः आघाडीवर राहून पोलिसांचा लाठी हल्ला झेलला. आज ते नाहीत. पण रामजन्मभूमी पुनर्निर्माण कार्य सुरू झाले आहे. ह्या संपूर्ण हिंदू समाजाच्या लढ्याचे निर्णायक नेतृत्व त्यांनीं केले. हिंदू समाजाला राजकीय दृष्ट्या जागृत करण्यासाठी, हिंदू समाजात एकात्म भाव निर्माण करण्यासाठी रामजन्मभूमी लढा हा त्यांनी माध्यम म्हणून वापर करत एकाच वेळेस दोन्ही उद्दिष्ट सफल केले.
यादवराव जोशी!
शास्त्रीय गायनाचे धडे त्यांनी आणि भीमसेन जोशी यांनी एकाच वेळेस एकाच गुरु कडे घेतले यादवराव किंचित पुढेच भीमसेन जोशी यांच्या ! पण डॉक्टरांच्या संपर्कात आले. प्रचारक बनले आणि संपूर्ण दक्षिण भारतात संघाचे काम उभे केले.
उत्तर प्रदेशात भाऊराव देवरस गेले शिक्षण घेता घेता संघ काम करण्यासाठी पण संघ काम करताना त्यांना विद्यापीठात सुवर्ण पदक मिळाले. सर्व बाजूने वैभव आणि प्रतिष्ठा साद घालत होती. पण त्यांनी डॉक्टरांना कळवले मी आयुष्यभर प्रचारक राहणार आहे. त्यांनी मग दीनदयाळ जी, राजेंद्र सिंह जी, अटलजी, नानाजी असे कित्येक प्रचारक घडवले. विद्या भारती चे जाळे आज उत्तर भारतात उभे राहिले ते भाऊराव यांच्या प्रेरणेतून !
नानाजी बीटस् पिलानी चे विद्यार्थी. वडील लवकर गेले. बहिणीकडे शिक्षण झाले. राजस्थानला गेल्यावर प्रचारक जाण्याची प्रेरणा मिळाली. उत्तर प्रदेशात गेले. बलरामपुर येथे त्यांना पाठवले गेले. पुढे तीच त्यांची कर्मभूमी झाली. घरात पाहुणे आल्यावर जेवण देवू शकले नाही ही खंत मनात ठेवून त्यांच्या आईने आपले जीवन एका विहरी त उडी मारून संपवले. नानाजी आपल्या जन्म गावी थेट ८० च्या दशकात आले तेंव्हा त्यांनी त्या विहिरीची पूजा करून आई चे श्राद्ध केले. नानाजी यांनी १९८० नंतर राजकारण सोडून समाजसेवेचा वसा पुढे नेत चित्रकूट येथील खेड्यांना स्वयंपूर्ण करत आत्मनिर्भर भारताचा खरा पाया घातला. एक प्रचारक ते भारत रत्न हा प्रवास.
दीन दयाळ उपाध्याय !
राजकारणात राहून राजकारण चिकटवून न घेणारे चिंतक. समाज शास्त्रज्ञ . अर्थ शास्त्री. वेद आणि उपनिषदात असलेल्या चिंतनातून संपूर्ण मनुष्य समाजा समोर एक आदर्श कल्याणकारी साक्षात्कार घडवणारा भाष्यकार. येथून पुढील काळात त्यांनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शन या तत्वज्ञानावर आधारित च जगाची उभारणी अपरिहार्य आहे. संघाच्या प्रचारक व्यवस्थेतून असा चिंतक निर्माण झाला. संघाचे सगळे सरसंघचालक हे प्रचारकच. भारतीय मजदुर संघ, भारतीय किसान संघ अशा संघटनांना शुद्ध भारतीय विचाराच्या आधारावर पाथेय देणारे माननीय दत्तोपंत ठेंगडी हे प्रचारकच.
जे निरपेक्ष पणे संघ कामाचे सिंहावलोकन करू इच्छितात त्यांनी अवश्य ही जीवन चरित्रे अभ्यासावी अशीच आहेत. अविरत कष्ट , हाल अपेष्टा, उपहास, कुचेष्टा यातून प्रवास करत आज या कार्यकर्त्यांनी प्रचारकांनी संघाच्या विचाराला एका निर्णायक भूमिके मध्ये आणले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान मुलं बरोबर संवाद, तरुणांना मित्रत्वाने संबोधन वयोवृध्द लोकांशी वागताना चा एक नम्र पण मग देश परदेश कुठे ही असो इतरांना त्याचे आश्चर्य वाटते किंवा नाटक वाटते पण ज्यांनी प्रचारक बघितले आहेत, प्रचारक जीवन अनुभवले आहे त्यांना मोदींचे वागणे हे सहज सुलभ आणि एका प्रचारक म्हणून जसे हवे तसे वाटते.
अशी ही प्रचारक व्यवस्था आहे.यात ही वर उल्लेखलेली व्यक्ती चित्र ही तर १/८ हिमनगाचे तुकड्या पेक्षा कमी आहेत पण अशी असंख्य प्रचारकंची परंपरा हे संघ कामाचे ९५ वर्षाचे फार मोठे यश म्हणावे लागेल.
( क्रमशः)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या