स्वातंत्र्ययज्ञातील समिधा - वासुदेव बळवंत फडके



@ रवींद्र गणेश सासमकर

15 आॅगस्ट 1947 ! आपली मायभूमी स्वतंत्र झाली. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही.त्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याचा यज्ञ केला,प्रसंगी प्राणांचीही आहूती दिली,पण आज आपण त्यांना विसरलो आहोत. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले पं.रामप्रसाद बिस्मिल हे असेच एक क्रांतिकारक ,ते स्वत: उत्कृष्ट शायर होते त्यांनी लिहीले आहे,

शहीदों की चिताओ पर, लगेंगे हर बरस मेले
वतन पर मर मिटनेवालो का यही निशाँ होगा ll

पण आजची स्थिती काय आहे? स्वातंत्र्यानंतर प्रचंड उपेक्षा या लोकांच्या वाट्याला आली. इंग्रजांनी काहीही म्हणू देत,पण आपल्याही लोकांची क्रांतिकारकांना आतंकवादी म्हणण्यापर्यंत मजल गेली .गांधी-नेहरु परिवाराच्या रोशनाईत क्रांतिकारकांच्या स्मारकांची अवस्था "न फुल चढते है,न दीप जलते है" अशीच आहे. 

देशासाठी हौतात्म्य पत्करणार्या क्रांतीवीरांच्या केवळ स्मरणानेही राष्ट्रभक्तीची शुभंकर उर्जा निर्माण होत असते.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे म्हणजे "अनेक फुले फुलतात, फुलुन सुकूनही जातात,त्याची गणती कोण करतो? पण जे फुल गजेंद्रशूंडेने उपटले जाऊन श्रीहरी विष्णुंच्या चरणी अर्पण होते,त्या फुलाचे आयुष्य सार्थक होते ,त्याचप्रमाणे अनेक माणसे जन्माला येतात,जगतात आणि शेवटी मरतात,पण ज्यांचे जीवनपुष्प राष्ट्रासाठी,समाजासाठी समर्पित होते,अशी माणसे इतिहासात अमर होतात. अशाच समर्पित जीवनांपैकी एक म्हणजे वासुदेव बळवंत फडके

त्यावेळी देशावर इंग्रजांची जुलमी राजवट होती. साधनसंपत्तीची लूट,जबरदस्तीचे धर्मांतरण यामुळे त्रस्त झालेल्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सगळ्याच जाती- जमातीतील शूरवीरांनी संघर्ष केला. या सर्वांमध्ये ब्रिटीश काळात क्रांतीची मशाल पेटवणारे महान क्रांतिकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके होत.

*क्रांतीसूर्याचा जन्म*

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी कोकणातील शिरढोण येथे झाला. इथे फडके घराण्याचा मोठा वाडा आहे. त्यांचे आजोबा अनंतराव फडके जवळच्याच कर्नाळ्याचे  किल्लेदार होते. सन 1818 साली अगदी थोड्या सैन्यानिशी तीन दिवस त्यांनी तो किल्ला लढवला होता.पण कुठूनही सहाय्य न मिळाल्यामुळे अतिशय विदीर्ण मनाने  तो किल्ला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावा लागला.मरेपर्यंत त्याचे शल्य त्यांना बोचत होते. आजोबा वारल्यानंतर बळवंतरावांनी त्यांना कल्याण येथे शिक्षणासाठी ठेवले.तेथे वासुदेव उत्तम इंग्रजी शिकला.तो बारा वर्षाचा असतांना 1857 चा मोठा उठाव भारतात झाला.तात्या टोपे,झाशीची राणी,नानासाहेब पेशवे,कुंवरसिंह आदी लोक त्यावेळी ब्रिटीश सत्तेविरुध्द मोठा संघर्ष करत होते.त्या लढ्यातील बलिदान आणि पराक्रमाच्या कथा वासुदेवाच्या कानी पडू लागल्या. पुढे तो  पुण्याच्या "पुना हायस्कुल"मध्ये शिकू लागला. पाठ्यपुस्तकांपेक्षा तो धार्मिक आणि अध्यात्मिक पुस्तके अधिक वाचू लागला आणि भरपुर व्यायाम करु लागला. पण मॅट्रीक होण्यापूर्वीच त्याने शिक्षणाला रामराम केला आणि सरकारी नोकरी धरली.

*क्रांतीची ठिणगी*

वासुदेवाच्या आईचे नाव सरस्वती होते. वासुदेवाला चार भावंडे होती,पण आईला आपल्या या हूड मुलाची जास्त काळजी वाटत असे.वासुदेव बळवंत फडके यांना आपल्या व्यक्तीगत आयुष्यात अनेक आघात सहन करावे लागले.

आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा मृत्यू  झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व इंग्रज सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भूमिका घेतली 1870 च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे ब्रिटीश शासनाने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली आणि ब्रिटीशांविरुध्द जहाल भाषणे केली. क्रांतीगुरु लहूजी साळवे यांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. मायभूमीच्या स्वातंत्र्यलढ्यात मागास जातीनाही सहभागी करुन घेण्याचे महत्व लहूजीबुवांनी त्यांना पटवून सांगितले.अशाप्रकारे ब्रिटीश सरकारविरुध्द वासुदेव बळवंत फडक्यांच्या मनात क्रांतीची ठिणगी पडली.

वासुदेवरावांच्या पत्नी गोपिकाबाई या पडघवलीच्या कुंटे घराण्यातील होत्या. त्यांनी गोपिकाबाईंना लिहायला -  वाचायला शिकवलेच पण घोड्यावर बसणे,बंदुकबाजी वगैरेही शिकवले होते. वासुदेव बळवंत हे श्रीदत्ताचे निस्सिम भक्त होते. 1873 साली त्यांनी "दत्तमहात्म्य" नावाचा सात हजार ओव्यांचा ग्रंथही लिहिला होता. पुण्याला त्यांनी एक नवीन शाळाही सुरु केली होती.महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापक होते.

*सशस्त्र क्रांती*

इसवी सन 1979 नंतर फडके यांच्या क्रांतीकार्याला सुरुवात झाली. त्यासाठी अर्थिक मदतीची गरज होती,त्यासाठी त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर पहिला हल्ला चढवला. गावात शिरताच त्यांनी लोकांना अवाहन केले "बंधुनो, आम्ही चोर लुटारु नाहीत,आम्ही देशाच्या स्वातंत्र्याचे शिपाई आहोत. दुष्ट इंग्रज आपल्याला छळत आहे. त्याविरुध्द लढा देण्याची गरज आहे,त्यासाठी आम्हाला पैसा हवा आहे. या गावात जे श्रीमंत सावकार आहेत,त्यांनी फक्त दहा रुपये आम्हाला द्यावेत. ते मिळताच कोणालाही त्रास न देता आम्ही निघुन जाऊ. त्यानंतर  त्यांनी लोणी , खेड आणि जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व श्रीमंत भारतीयांकडे मदत मागितली परंतु दुर्देवाने त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रातील मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातील तरुणांचे संघटन केले  , त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा सैनिकांसह त्यांनी  इंग्रजांविरुध्द रणशिंग फुंकले शिरुर आणि खेड तालुक्यातील इंग्रजांच्या खजिन्यावर धाडी टाकल्या. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर हल्ला चढवला  आणि काही दिवसांकरता शहरावर वर्चस्वही  प्रस्थापित केले.

 इंग्रज सरकारने वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव मोडून काढण्याचा निश्चय केला. इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी डॅनियल नावाचा विशेष आधिकारी नेमला.

*स्वराज्याचा जाहीरनामा*

5 मे 1879 रोजी वासुदेव बळवंत फडके यांनी स्वराज्याचा जाहीरनामा प्रसिध्द केला.त्यात म्हटले होते " आपल्या प्राचीन,सुखी आणि समृध्द देशातील लोक आज हीन,दीन दरिद्री आणि दु:खी झाले आहेत.आमच्या देशातील उद्योगधंदे नाहिसे झाले आहेत.दुष्काळामुळे लोक मरत आहेत.
आणि तिकडे इंग्रज आधिकारी चैन करत आहेत. हे सगळे वेळीच थांबले नाही तर यापुढे इंग्रज आधिकार्यांची डोकी उडवली जातील.

वासुदेव बळवंत फडके यांचा हा जाहीरनामा सर्व इंग्रज आधिकार्यांकडे पोहचला.

इंग्रजांनी फडके यांना पकडून देण्यासाठी चार हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले. त्याला उत्तर म्हणून फडके यांनी लगेच पत्रक काढले "जो कोणी मुंबईचा गव्हर्नर ,पुण्याचा कलेक्टर या आधिकार्यांचे डोके आणून देईल त्याला पाच हजार रुपये रोख बक्षिस दिले जाईल" हे पत्रक अनेक शहरांच्या भिंतीवर झळकू लागले.

*दौलतरावांचे बलिदान*

वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यासाठी  डॅनियलने आपले सैन्य विभागून चारही दिशांना पाठवले.त्या तुकड्यांना एकाकी गाठून संपवायचे असे दौलतरावांनी ठरवले. दौलतराव म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचा उजवा हात. त्यांची आणि डॅनियलची चकमक झाली. यावेळी दौलतरावांनी निकराचा प्रयत्न केला, पण दौलतरावांच्या छातीतुन आरपार गोळी गेली. स्वराज्याच्या रामकार्यासाठी  या रामोशी वीराने आपल्या प्राणाचे बलिदान केले.

यानंतर वासुदेवरावांचे बरेच सहकारी मारले गेले. बरेच जण पकडले गेले ,काही जण घाबरले ,काही  देशांतर करुन पळून गेले.डॅनियलच्या गुप्तहेरांचे जाळे सगळीकडे  पसरले होते.त्याचवेळी वासुदेव बळवंत फडके आजारी पडले.
उपास आणि दगदगीमुळे त्यांना भयंकर ताप आला.अशा अवस्थेतच त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले त्यात त्यांनी लिहिले होते " माझ्या देशबांधवांनो, माझे ध्येय मी पूर्ण करु शकलो नाही,याबद्दल मला क्षमा करा. देशभक्तीवाचून कोणतीही भावना मनात नव्हती,हे परमेश्वरच जाणतो"

 वेशांतर करुन ते गाणगापुरला गेले,तेथे  त्यांनी "काशीकर बाबा" हे नाव धारण केले. येथे त्यांचे वास्तव्य एका मंदिरात होते.काशीकर बाबा बनलेल्या फडके यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. स्वातंत्र्यासाठी पुन्हा नव्याने  डाव मांडायचा प्रयत्न  त्यांनी केला.रोहिले आणि  दक्षिणी लोकांची फौज उभारायचे प्रयत्न केले. युध्दक्षेत्राचे नकाशे आणि शस्त्रास्त्रांची खरेदीही केली.

पैशाची व्यवस्था करण्यासाठी ते पंढरपुरला जायला निघाले पण डॅनियलच्या हेरखात्याला त्यांचा सुगावा लागला होता,तो गाणगापुरच्या दिशेने निघाल्याचे त्यांना कळाले. वासुदेव बळवंत फडके आणि डॅनियल यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला. सतत धावपळ,धड जेवण नाही, विश्रांती नाही त्यामुळे फडके पुन्हा आजारी पडले.

*अटक व खटला*

जुलै 1879  रोजी  विजापूरजवळ देवरनावडगी या गावात  गाढ झोपेत असताना वासुदेव बळवंत फडके यांना डॅनियलने  अटक केली.त्यांना  पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथेच त्याच्यावर खटला चालवण्यात आला. दुर्देवाने  पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काका यांनी  त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. साक्षी पुरावे झाले आणि शेवटी  वासुदेव बळवंत फडके यांना  जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. त्यांना  एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. एडनला जाण्यापूर्वी फडके यांनी भारतभूमीची ओंजळभर माती  कुडत्यात बांधुन सोबत घेतली. याच मातीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता. ही माती म्हणजे त्यांच्यासाठी साक्षात भारतमाता होती.

तुरुंगात असतांना त्यांच्या मनात एकच खंत होती,की आपण आयुष्यभर संघर्ष करुनही आपल्या मायभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करु शकलो नाही.त्यांची ही व्यथा जणू ते आपल्या श्वासांना सांगत होते.

श्वासांनो जा वायुसंगे
 ओलांडुन भींत
अन् आईला कळवा
 आमच्या ह्रदयातील खंत

एडन येथे शिक्षा भोगत असलेल्या फडके यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला पण  इंग्रजांनी त्यांना पुन्हा  पकडून तुरुंगात टाकले. 

एका लहानशा कोठडीत त्यांना ठेवण्यात आले. निकृष्ट दर्जाचे अन्न त्यांना दिले जात होते. तुरुंगात त्यांचा क्रूर छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांचे शरीर दुर्बळ झाले. जून 1881 मध्ये त्यांना क्षयाने पछाडले. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आमरण संघर्ष करणार्या या महान क्रांतिकारकांचा दि. 17 फेब्रुवारी 1883 रोजी मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूने एका समर्पित जीवनयज्ञाची पूर्णाहूती झाली.

भारतमातेसाठी जीवन समर्पित करणार्या वासुदेव बळवंत फडके यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करुया आणि सावरकरांच्याच शब्दात त्यांच्या अमर आत्म्याला अश्वासन देऊया

"कार्य सोडुनी अपूरे पडला,झुंजत खंती नको पुढे
कार्य चालवू गिरवत तुमच्या,पराक्रमाचे आम्ही धडे"

15 आॅगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वराज्य मिळाले,पण सुराज्याचे काय?  वासुदेव बळवंत फडके यांच्या स्वप्नातील भारत आपण उभा करु शकलो का? याचे आत्मचिंतन भारतीय म्हणून आपण केले पाहिजे आणि  भारतमातेला वैभवशाली करण्याचा निर्धार केला पाहिजे.

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या