कुटुंब व्यवस्था आणि गितोपदेश



@रोहिणी महाजन, पुणे 

     श्रीमद्भगवद्गीता भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा असा वाङ्मयीन ठेवा..जीवनविषयक तत्त्वज्ञानाचं परमोच्च ज्ञान देणारा नि जीवनाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोन अधिकाधिक सकारात्मक करणारा....असा हा ग्रंथ ! या ग्रंथातील १८ ही अध्याय मी समजवून घेतले. तरीही, त्यातला १६ वा अध्याय मला जरा वेगळा  वाटला.                           
     या अध्यायाचं नांव 'दैवासुरसम्प - द्विभाग योग' असं असून त्यात  प्रामुख्याने, भगवान् श्रीकृष्णाने चांगले गुण म्हणजे  'दैवी गुण' कोणते नि वाईट गुण म्हणजे 'असूरी गुण' कोणते... हे अर्जुनाला सांगितलं आहे.  त्याबरोबरच दैवी गुण आणि असूरी गुण असणाऱ्या लोकांचं वर्णनही केलं आहे. त्याचा उहापोह केला आहे. श्रीकृष्णाचं हे सांगणं कालनिरपेक्ष असून सर्व  मानवजातीसाठीही ते अत्यंत उपयोगी आहे, आवश्यक आहे.
                               
      भविष्यात  चांगलं आचरण व्हावं म्हणून व्यक्तीला लहानपणापासून, तिचे आई-वडील, घरातले इतर जेष्ठ लोक , गुरुजन हे अहिंसा, धैर्य, सत्य बोलणं, दया दाखवणं, निर्भयता असे काही दैवी गुण शिकवत असतात. वय लहान म्हणून  त्याचा  अर्थही त्या काळापुरता मर्यादितच असतो. तरीही व्यक्तीच्या पुढील  जडण-घडणीत या संस्कारांचा वाटा खूप मोठा असतो. 

     याशिवाय श्रीकृष्णाने सांगितलेले इतर जे दैवी गुण आहेत त्यापैकी काही असे  - 
१) 'अहिंसा' काया, वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख देऊ नये. 
२) सत्वसंशुद्धि म्हणजे अंतःकरण निर्मल असावं.
३) दान हे नेहेमी सात्विक असावं आणि श्रद्धेनं द्यावं 
४) 'त्याग करणे' म्हणजे कर्तेपणाचा  अभिमान बाळगू नये.
५) 'अपैशुनम म्हणजे कधी कुणाची निंदा  करू नये.
६) 'अक्रोध' म्हणजे आपल्यावर कुणीही कितीही अपकार केले तरी रागवू नये. 
७) 'र्ही' या गुणांचा अर्थ आहे की, व्यक्तीनं आपलं वागणं हे लोकसंमत नि शास्त्रसंमत असंच ठेवावं.
८) 'अचापलम्' याचा अर्थ... आपल्या हालचाली या निरर्थक नसाव्यात. कारणास्तवच असाव्यात. 
९) यापुढचा गुण आहे 'तेज' म्हणजेच श्रेष्ठ  व्यक्तींमधली शक्ती. या शक्तीमुळे नीच  प्रवृत्तीचे लोक अन्यायाचरण सोडून  श्रेष्ठींच्या सांगण्याप्रमाणे चांगली कामं  सुरू करून, सन्मार्गाला लागतात. 
१०) 'अद्रोह ' या दैवी गुणाचा अर्थ आहे व्यक्तीनं कुणाशीही शत्रुभाव न ठेवणे. 
११) 'नातिमानिता ' या शब्दाद्वारा सांगितलंय की, आत्मप्रौढी, अभिमान बाळगू नये आणि सत्कार, मानमरातब यापासून दूर रहावे. 

या दैवी गुणांबरोबरच श्रीकृष्णाने आसुरी गुणही सांगितले आहेत. उदा.दंभ, घमेंड, अज्ञान, अभिमान आणि राग वगैरे...

वाचकहो, सुरुवातीला मी एक उल्लेख केलेला आहे की, 'श्रीकृष्णाचं सांगणं हे कालनिरपेक्ष असून सर्व मानवजातीसाठी ते अत्यंत उपयोगी आहे, आवश्यक आहे. कारण आपण पाहत आहोत की, आजकाल माणसाचं जीवन अनेक बाबतीत तणावग्रस्त आहे. उदा. करोनामुळे निर्माण झालेली भिती, नोकरी-धंद्याची अनिश्चितता, त्यामुळे वाढत चाललेली गरिबी, समाजात होणाऱ्या आत्महत्या, कौटुंबिक-सामाजिक तसेच शिक्षणाचा प्रश्न,पैसा मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड. अशा विविध समस्यांना, संकटांना आपण सामोरं जातो आहे.       
                                            
अशा वेळी, वरील दैवी गुण असलेले लोक आज प्रत्येक  कुटुंबात असणं हे गरजेचं आहे. कारण हे लोकच प्रथम आपल्या कुटुंबात मग ते कुटुंब समाजात आणि पर्यायानं सर्व समाज एकत्र  येऊन राष्ट्रात प्रबोधन घडवून आणतील. कारण सद्गुणी विवेकी मार्ग हेच कल्याणकारी मार्ग आहेत, असूरी गुण विनाशाकडे नेणती आहेत. गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला हा मार्ग 'सुखी कुटुंब' घडवताना नक्की अंगिकारला पाहिजे. 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या