@ अनुप भालेराव
२०१५ साली 'शार्ली हेब्दो' साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीला सप्टेंबर महिन्यात प्रारंभ झाला. त्याच दरम्यान ऑक्टोबरच्या सुरवातीला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्राॅन यांनी इस्लामी दहशतवादाला विरोध करण्यासाठीचा कायदा आणणार असल्याची घोषणा केली. गेल्या काही वर्षांत फ्रान्सने ज्या प्रकारचे हल्ले सोसले आहेत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अशा कायद्याची त्यांना आवश्यकता होतीच. १६ ऑक्टोबरला शार्ली हेब्दो प्रकरणातील तेच जुने व्यंगचित्र वर्गात दाखवण्याच्या कारणासाठी सॅम्युअल पॅटी नावाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर अशाच काही घटनांमुळे फ्रान्समध्ये तणाव आहे.
प्रेषितांचे चित्र काढणे, दाखवणे इस्लाममध्ये निषिद्ध आहे म्हणून मग एखाद्याचा शिरच्छेद करणे हे कुठल्या कायद्यात आणि तत्वात बसते? आणि मग जर ते योग्य आहे असा एखादा धर्म किंवा कायदा सांगत असेल तर त्यास अतिरेक म्हणण्यात गैर काय? जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची तत्त्वे देणारा देश म्हणून फ्रान्सची ओळख आहे. स्वातंत्र्याचे तत्त्व तेथील नागरिक जीवापाड जपतात. आज याच तत्त्वाला तिथे आव्हान दिले जात आहे. मुस्लिम राष्ट्रे मॅक्राॅन यांचा निषेध करत आहेत. फ्रान्समधील उत्पादनांचा बहिष्कार करण्याचे आवाहन करत आहेत. याच देशांनी इस्लामिक स्टेटचा नंगानाच सुरू असताना निर्वासितांसाठी कवाडे बंद केली होती. त्यांना उदारपणे स्वतःच्या देशात प्रवेश युरोपीय देशांनी दिला. त्यामध्ये फ्रान्स आघाडीवर होता.
फ्रान्समधील घटनांना चिथावणी देण्याचे काम तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन सातत्याने करत आहेत. फ्रान्स आणि तुर्की यांच्या भूमिका गेल्या काही काळात एकमेकांच्या विरोधात राहिल्या आहेत. लिबियातील यादवी, भूमध्य समुद्रातील ग्रीस सोबतचा वाद, सध्या सुरू असलेला आर्मेनिया - अझरबैजान संघर्ष या सर्वच प्रकरणात तुर्की आणि फ्रान्स एकमेकांना विरोधी भूमिका घेत राहिले आहेत. एर्दोगन यांना तुर्कीला पुन्हा एकदा मुस्लिम जगताचा प्रमुख म्हणून पुढे आणायचे आहे. फ्रान्समध्ये झालेल्या ह्या घटना त्यांना योग्य संधी देऊन गेल्या. पाकिस्तान आणि मलेशिया यांनीही तुर्कीला समर्थक अशीच भूमिका घेतली.
बांगलादेशात ४५००० जणांनी फ्रान्स विरोधी निदर्शनात भाग घेतला. भारतातही काही ठिकाणी तीव्र विरोध करण्यात आला. दहशतवादी व कट्टरतावादी मानसिकतेतून झालेल्या हल्ल्यांचा निषेध करण्याऐवजी त्याचे समर्थन करणारी मानसिकता काय दर्शवते? असे होत असेल तर ही चिंता वाढवणारी बाब आहे. एर्दोगन यांना गेल्या शंभर वर्षातील आधुनिक, धर्मनिरपेक्ष तुर्कीची वाटचाल सोडून पुन्हा एकदा धार्मिक आधारावर देशाला पुढे न्यायचे आहे. मुस्लिम जगातील वर्चस्वाच्या संघर्षात ते अशा घटनांचे भांडवल करून जगभरातील मुस्लिमांना चिथावणी देत आहेत. दुर्दैवाने त्यात भारतातील मुस्लिमही ओढले जात आहेत. एका खिलाफतीचा अनुभव भारताला आहे. हे सर्व पुन्हा एकदा त्याच वळणावर जाऊ न देण्यासाठी भारताने सावध राहणे आवश्यक आहे.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या