लेखाचा मथळा हा हिंदुसंघटक स्वा. सावरकर यांचे वाक्य आहे. तात्याराव एका ठिकाणी असे म्हणले आहे की हिंदुत्वाचे व हिंदुराष्ट्रवादाचे आधारस्तंभ म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार होत. डॉक्टरांबद्ल काय लिहावे, हिंदु समाजाचे सामाजिक औदासीन्य पाहुन तसेच म.गांधीजींच्या खिलाफत चळवळीत मुस्लिम समाजाने दंगली केल्या. विशेषतः मलबार, कोहाट यांसारख्या भागांत हिंदूंच्या कत्तली झाल्या. याची प्रतिक्रिया म्हणून सशस्त्र क्रांतीतील काही नेते जे प्रारंभी काँग्रेसबरोबर होते, ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांत डॉ. हेडगेवार बाहेर पाडले. धार्मिक तणावांच्या वेळी बहुसंख्य ठिकाणी आक्रमक पवित्रे घेणाऱ्या मुस्लिम शक्तींपुढे सदैव भीतीग्रस्त राहणाऱ्या असंघटित हिंदूंमध्ये स्वसंरक्षणाचे सामर्थ्य निर्माण करण्याची त्यांना आवश्यकतावाटू लागली. प्रांताप्रांतांतून संरक्षक दले उभारण्याचे प्रयत्न झाले. त्यांत सर्वाधिक यश डॉ. हेडगेवारांना मिळाले. सत्शील देशभक्त, तरुणांसाठी त्यांना स्वेच्छेने अनुशासित जीवन जगण्यास व कर्तृत्व दाखविण्यास वाव देणारी संघटना उभारावी तसेच, त्यांना लष्करी शिक्षण आणि शिस्तीची आवड निर्माण व्हावी व या सोबतच हिंदुराष्ट्राला व सर्व स्तरांतील हिंदुसमाजाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून देऊन शक्तिसंपन्न व संघटित करण्यासाठी त्याला हिंदुराष्ट्रवादाची तात्त्विक बैठक देऊन संघटना उभी करण्याचा मानस डॉक्टरांच्या मनात आला आणि त्याला मुर्तस्वरुप १९२५ च्या दसऱ्याला नागपूरमध्ये एका छोट्या बैठकीत केला आणि पुढे १७ एप्रिल १९२६ रोजी ‘सभासदां ‘च्या बैठकीत बहुमताने ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ असे नामाभिधान करण्यात आले. त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या आणि राष्ट्रसेवेच्या विशुद्ध कल्पना कलकत्ता येथील विद्यार्थिदशेत उदित झाल्या होत्या. त्या कल्पनांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अत्यंत विकसित असे मूर्त स्वरूप होय. त्यामुळे अर्थातच त्यांची पहिले सरसंघचालक म्हणून निवड झाली.
संघकार्याची रचना कौटुंबिक मूल्यांवर केलेली आहे म्हणजे. संघ हे आपले कुटुंब आहे आणि कुटुंबात जसा आपण व्यवहार करतो, तसाच संघात केला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. माणसाला संस्कारित केल्याशिवाय व स्वबांधवांविषयी त्याच्या मनात आपुलकीची आणि कर्तव्याची भावना निर्माण केल्याशिवाय कोणतीही व्यवस्था कल्याणकारी ठरणार नाही, असे त्यांचे मत होते. डॉक्टरांचा जन्म हा नागपूर येथला बळीराम व रेवतीबाई (पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई पैठणकर) या दांपत्यापोटी. डॉक्टरांचे मुळ घराणे आंध्रप्रदेशातील कंदकुर्ती या गावचे. त्यांचे पणजोबा नरहरशास्त्री हे नागपुरात येऊन स्थाईक झाले.
अध्ययन व अध्यापन ही या घराण्याची परंपरा मात्र डॉक्टरांनी व्यवहारापुरते वेदविद्येचे शिक्षण घेतले होते. त्यांना दोन वडीलबंधू आणि तीन बहिणी होत्या. त्यांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबात एखादा तरी मुलगा आंग्लविद्याविभूषित असावा म्हणून त्यांना नील सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षणासाठी दाखल केले. आई-वडिलांचे प्लेगने निधन झाले. घरात पैलवानी परंपरा असल्याने केशवरावांनी त्या विद्येत प्रावीण्य मिळविले होते. इतर अनेक मर्दानी खेळांतही ते प्रवीण होते. त्यांचे क्रांतिकारक आचार-विचार व वंदेमातरम् उद्घोष केल्याप्रकरणी त्यांना शाळेतून काढण्यात आले. वंगभंग चळवळ, स्वदेशी व बहिष्कार आणि केसरी तील स्फूर्तिदायक अग्रलेख यांमुळे ते भारावून जात असतं.
यवतमाळच्या ‘विद्यागृह’ या राष्ट्रीय शाळेत ते दाखल झाले, पण ती शाळा सरकारने बंद केली. त्यानंतर द नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन (बंगाल) मधून ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर डॉ. मुंजे यांनी त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी कलकत्ता येथे पाठविले. नॅशनल मेडिकल कॉलेजमधून शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी एल्. एम्. अँड एस्. ही वैद्यकीय पदवी मिळविली आणि तत्संबंधीचा अनिवार्य प्रायोगिक अभ्यासक्रमही पूर्ण करून वैद्यकीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. विद्यार्थिदशेत असतानाच स्थानिक क्रांतिकारक गटांशी, विशेषतः पुलिन बिहारी दास यांच्या समितीशी त्यांची जवळीक वाढली होती. १९१० च्या जातीय दंगलीत रुग्णशुश्रूषा पथकात व १९१३ च्या बंगालच्या महापुराच्या वेळी त्यांनी झटून काम केले. कलकत्त्याच्या वास्तव्यात अरविंद घोष, श्यामसुंदर चक्रवर्ती आदी प्रभृती क्रांतिवादी नेत्यांच्या संपर्कात ते आले. डॉक्टर झाल्यावर जन्मभर अविवाहित राहून देशसेवेचे व्रत पार पाडण्याचा निश्चय केला व मध्ये नागपूरला परतले.
नागपूरला प्रांतिक काँग्रेस कमिटी, नागपूर नॅशनल युनियन, राष्ट्रीय मल्लशाळा, अनाथ विद्यार्थी गृह, रायफल असोसिएशन, राष्ट्रीय उत्सव मंडळ आदी संस्थांच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले.
राष्ट्रीय आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी प्रांतभर संचार करून त्यांनी जहाल भाषणे दिली. परिणामी त्यांच्यावर भाषणबंदीचा हुकूम बजावण्यात आला व पुढे आधीची दोन भाषणे राजद्रोही आहेत, असा आरोप ठेवून त्यांना एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली गेली. पुण्यातील सोन्यामारुती सत्याग्रहात भाग घेतला. भोसला मिलिटरी स्कूलच्या उद्घाटनप्रसंगी ते नाशिकला उपस्थित होते. त्यांनी हिंदू युवक परिषदेचे पुणे येथे अध्यक्षस्थान भूषविले.
डॉ.मुंजे यांना ते गुरुस्थानी मानीत. तसे सावरकर बंधू, बापूजी अणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नृसिंह पाचलेगावकर महाराज आदी निकटवर्तीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. हेडगेवार हे नव्या हिंदुराष्ट्रवादाचे जनक आणि सुप्त हिंदुराष्ट्राचे प्रबोधक मानले जातात. अशा या महान देशभक्ताच्या जयंती निमित्त ( चैत्र.शु.प्रतिपदा ) कोटी कोटी नमन.
वंदे मातरम्
- योगेश काटे, नांदेड
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या