शहाद्यातील स्वातंत्र्यसंग्राम l प्रारंभिक लढे - भिल्लांचे उठाव


देवगिरी l 
          इ.स. १८१८ च्या सुमारास इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य जिंकून घेतले. खानदेशचा भाग इंग्रजांनी होळकरांकडून ताब्यात घेतला. ६ जानेवारी १८१८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि सरकार महाराज मल्हाराव होळकर (द्वितीय) यांच्यात तह झाला. ब्रिगेडियर सर जॉन माल्कन यावेळी उपस्थित होता. १४ कलमी कराराद्वारे 'खानदेशातील गाव जे आहेत ते इंग्रज सरकारात होळकर आज सोडून देतात' असे मान्य केले गेले. 

         पण एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते की खानदेश इंग्रजांना एका झटक्यात जिंकून घेता आला नाही. अनेक ठिकाणी लोकांनी इंग्रजी सत्तेचा प्रतिकार केला. याला कारण म्हणजे येथील दुर्गम भाग आणि प्रत्येक किल्ले इंग्रजांना लढून, वेढा देऊन, कठोर संघर्ष करून जिंकावे लागले. यासाठी इंग्रजांना मोठी किंमत मोजावी लागली. वेळप्रसंगी सैन्याची जादा कुमकही मागवावी लागली. म्हणजेच खानदेश इंग्रजांना अगदी सहजतेने जिंकता आला नाही. याला कारण म्हणजे येथील लोकांनी इंग्रजी राज्याशी केलेला प्रतिकार, दिलेला लढा व त्यांच्यातील लढाऊ बाणा होय. 

        मुख्यतः भिल्ल जमातींनी अधिक प्रखरपणे लढा दिलेला दिसतो. भिल्ल समाजातील याच लढवय्येपणाचा उपयोग मराठा सरदार त्रिंबकजी डेंगळे यांनी अतिशय समर्थपणे करून घेतला. 'तुम्हाला कायमचे गुलामगिरीत टाकणाऱ्या या फिरंग्यांचे मुडदे पाडा ' असा आदेश त्यांनी भिलांना दिला. त्यामुळे विविध ठिकाणच्या उठावात आठ हजार भिल्लांनी सहभाग घेतला होता. या उठावाच्या नोंदी इंग्रजी कागदपत्रात पाहायला मिळतात. 

         दाजी गोपाळ, देवचंद नाईक, सुभानिया नाईक, बामणिया नाईक अशी बोटावर मोजण्याइतकी नावे इतिहासाला ज्ञात आहेत. बाकी असंख्य भिल्ल योद्धांचा इतिहासाला थांगपत्ता नाही. १८४० पर्यंत व त्यानंतर १८५७ उठावा दरम्यानच्या काळातही भिल्लांशी इंग्रजांना लढावे लागले होते. भागोजी नाईक, काजिसिंग, भीमा नाईक यांच्या नोंदी कागदपत्रात मिळतात. स्वतः इंग्रजांनी म्हटले आहे , "Bhils gave much trouble."

          भिल्लांचा उठाव इंग्रजांसाठी इतका घातक ठरत होता की, केवळ स्थानिक इंग्रज अधिकारी यावर उपाय शोधण्यात असमर्थ ठरत होते. कालक्रमवार इतिहासाची नीटपणे मांडणी केल्यास या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्याचा उल्लेख इतिहासात नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे. हे लढे स्वातंत्र्य युद्धाचाच भाग असून हे बंड नव्हते.  क्रमशः

लेखक - पुष्कर शास्त्री, शहादा 

Published by - विश्व संवाद केंद्र, देवगिरी 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या