स्वातंत्र्य लढ्यात संघाचा सहभाग आणि पार्श्वभूमी

@दीपक राठोड

सध्या देशभरात आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अनेक चर्चा सुरू असतात, आणि ही चर्चा होणे स्वाभाविक आहे. कारण संघाची समाज जीवनात असली व्यापकता, संघ स्वयंसेवकांनी देशभरात उभारलेले विविध सेवा प्रकल्प, समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातील सक्रिय सहभाग, राष्ट्रीय आपत्ती व संकटात मदत कार्यासाठी सदैव तत्पर असलेले शिस्तबध्द स्वयंसेवक वैगरे वैशिष्ट्यांनी संघाची सतत चर्चा सुरू असते. संघ आता शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अश्या स्तिथीत संघाचे स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय? असा प्रश्न विचारला जातो, त्यासोबतच गैरसमज पसरवले जातात. 

मुळात या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. सर्वप्रथम डॉ हेडगेवार यांचे संघटन स्थापनेमागील चिंतन समजून घ्यावे लागेल व त्यांनी मांडलेली संघाची कार्यपद्धती समजून घ्यावी लागते. जंगल सत्याग्रहमध्ये डॉ हेडगेवार स्वतः सहभागी होते, म्हणून जंगल सत्याग्रह व घटना व विचार समजून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
 स्वयंसेवकांनी कोणत्याही समाज हिताच्या कार्यात समाजाचा घटक म्हणून त्यात सहभागी व्हावे, स्वत:ची स्वतंत्र ओळख घेऊन जाण्याची गरज नाही हा संघाचा विचार आहे. देव, देश आणि धर्मासाठी, मानव कल्याणासाठी, भारताला परम वैभव संपन्न करण्यासाठी स्वतंत्र संघटना काम करते असे नसून हा इथल्या भारतीय समाजाचा हजारो वर्षापासूनचा स्वभाव आणि संस्कार आहे असे संघ मानतो. म्हणून राष्ट्र जीवनात कितीही मोठे सेवाकार्य केले तर संघ त्याचे श्रेय घेण्यासाठी कुठेही दिसत नाही. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वयंसेवक याच विचारातून अनेक गतिविधिमध्ये सक्रिय सहभागी झाले होते. परंतु राष्ट्र विघातक शक्तींचा अपप्रचार खोडून काढण्यासाठी तसेच संघ कार्याची प्रेरणा पुढे येण्यासाठी संघाच्या इतिहासात डोकावणे गरजेचे ठरते.

जंगल सत्याग्रह समजून घेण्याआधी डॉ हेडगेवार यांचे मूलभूत चिंतन समजून घेणे आवश्यक आहे. कारण त्यातूनच पुढे संघाची वाटचाल झालेली आहे. डॉ हेडगेवार यांचा संघ स्थापनेमागे हाही विचार होता की, भारत तर स्वतंत्र होईलच पण त्यानंतर त्याला पुन्हा कोणी गुलाम बनवू शकणार नाही असे संघटन हवे. भारताला त्याचे पुनर्वैभव प्राप्त करून देईल, आपले ‘स्व’त्व जाणून घेईल आणि पुन्हा कधी गुलामीत जाणार नाही अश्या विचाराचे संघटन साध्य करायचे होते. यामागे संपूर्ण समाजाचेच संघटन व्हावे हा उद्देश होता. संघाच्या सुरुवातीच्या प्रतिज्ञेतही 'हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी संघाचा घटक झालो आहे.’ अश्या अर्थाची ओळ होती. 

स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान काय आहे?  याचे थेट उत्तर द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, स्वातंत्र्य लढ्यात संघाच्या नावाने योगदान दिसून येत नसले तरीही संघ स्वयंसेवकांचे योगदान उल्लेखनीय आहे. इंग्रजांच्या गुलामीतून भारताला मुक्त करण्यासाठी विविध मार्गाने स्वयंसेवक प्रयत्न करत होते. 

आपल्याला स्वातंत्र्य केव्हा आणि कसे मिळणार, हा प्रश्न सर्वत्र विचारला जात असताना, 'आपण पारतंत्र्यात का झालो आणि आपले स्वातंत्र्य अबाधित कसे राहिले' या प्रश्नाच्या मूळ विचारासाठी डॉ. हेडगेवारजींनी प्रयत्न तर सुरू केलेच, शिवाय त्याच्या उत्तरासाठी  डॉ. हेडगेवार यांनी नेहमीच ‘अधूनमधून’ आंदोलनात्मक आणि राष्ट्र उभारणीच्या ‘दैनंदिन’ कार्याला महत्त्व दिले. खरे तर अशा आंदोलनांची गरजच पडू नये, अशी परिस्थिती निर्माण करणे हा डॉक्टरजींचा दीर्घकालीन उद्देश होता. आग लागली तेव्हाच आग विझवण्यासाठी अग्निशमन दल पाठवावा या पक्षात संघ नव्हता. त्यांचा सर्व भर आणि लक्ष हिंदू समाजाची अंतर्गत ताकद वाढवण्यावर होता.

निजामाच्या राजवटीत हैदराबाद संस्थानातील 85.5% हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ 1938 मध्ये नि:शस्त्र प्रतिकार चळवळ सुरू झाली.  डॉ.हेडगेवार यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी संघाच्या शाखांना परवानगी पत्र पाठवले नाही. पण इच्छा ज्यांची होती त्यांचे अभिनंदन करताना सांगितले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हिंदू समाजाचाच एक भाग आहे, समाजाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन संघात येत नाहीत. अशा चळवळीसाठी जे करणे आवश्यक आहे त्यासाठी स्वयंसेवक स्वतंत्र आहे.

संघ काहीही करणार नाही, पण देशभक्तीने सुसंस्कारित संघ स्वयंसेवक त्यांच्या स्वतंत्र संस्थात्मक अस्तित्वाची व्यवस्था न करता एक सामाजिक घटक म्हणून देशाच्या हिताचे काम करतील,' असा विश्वास डॉ. हेडगेवारांना होता. म्हणूनच  “संघ कुछ नही करेगा, स्वयंसेवक कुछ नही छोड़ेगा” हे पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचं वक्तव्य स्वयंसेवकांकडून बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळते. 

क्रमशः १

- दीपक राठोड, छत्रपती संभाजीनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या