ज्या गोष्टी मानव गरजपूर्तीसाठी करत होता, त्या आज चैनीच्या आणि दिखाऊपणाच्या झाल्यामुळे माणसाच्या जीवनाचं रासायनिकरण झालं असल्याचं वैद्य जयंत देवपूजारी यांनी सांगितले. सकाळी उठल्यापासून आपण विविध रसायनांचा वापर करू लागतो. दंतमंजन, साबण, सौंदर्य प्रसाधने, आहारातील कृत्रिम स्वाद वगैरे वगैरे अश्या अनेकानेक वस्तू व पदार्थांचा वापर सुरू झाल्यामुळे आपल्या जीवनात रसायनांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होऊ लागला, असे देवगिरी विश्व संवाद आयोजित वेब संवाद अंतर्गत "निरामय जीवनशैली - भारतीय चिंतन" या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
वैद्य जयंत देवपूजारी मार्गदर्शन करताना म्हणाले, "माणसाचा स्पर्धेच्या युगात प्रवेश झाला. इंटरनेटच्या महाजालामुळे माणसाचं जे जीवन शहानपणावर आधारित होतं ते आता माहितीवर आधारित होऊ लागले आहे. त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी माहिती संक्रमित व्हायची त्यावर परिणाम झाला. आपल्या जीवनात आलेल्या जीवनोपयोगी वस्तू चैनीच्या कधी झाल्या कळलंच नाही. आज बदललेल्या जीवनशैलीचा आपल्या आहारावर, झोपेवर, व्यायामावर व एकूणच आरोग्यावर परिणाम झालेला दिसून येतो.
आपल्या बदलत चाललेल्या जीवनशैलीचा परिणाम जैव विविधतेवर कसा होतो हे पटवून देताना श्री देवपूजारी यांनी मुंग्यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले पूर्वी घरात मुंग्या दिसणं म्हणजे समृद्धीचं लक्षण मानलं जायचं, परंतु आपण रासायनिक फवारणी करून त्यांचा नाश करतो. अनेक कीटक, किडे तसेच चिमणी - पक्षी यांचे मानवाच्या जीवणासोबत सहसंबंध आहेत. मग त्यांना आपण का नष्ट करतो? जैवविविधतेचा विचार करताना या जीवांचाही आपण विचार केला पाहिजे. त्यांनाही आपल्यासोबत जगू दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
आहाराचा विचार करू गेल्यास आपण आज भूक भागवण्यासाठी न जेवता जिभेचे चोचले पुरवताना दिसतो. आहार कसा घ्यावा याचे शास्त्र आहे. आयुर्वेदाने ते उत्तमरीत्या सांगितले आहे. परंतु आपण जेवण अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत करतो. मग पोटाचे विकार लागतात. असेही वैद्य देवपूजारी म्हणाले.
आयुर्वेदाने व्यायाम कसा करावा याविषयी सांगताना "अर्धशक्ती व्यायामा"चे महत्व सांगितले आहे. आपल्या क्षमतेच्या अर्ध्या क्षमतेचा व्यायाम आपण केला पाहिजे. परंतु, आज व्यायामसुद्धा शरीर सुदृढ राहण्यासाठी व आरोग्यासाठी न होता शरीर सौष्ठव कसे होईल, सिक्स पॅक कसे येतील यासाठी तरुण प्रयत्न करताना दिसतात. या सर्व बदलांमुळे मानवी जीवन दिखाऊपणाचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय संस्कृतीत येणारे सण उत्सव वर्षातील त्या त्या ऋतूमध्ये होणारे बदल यावर अवलंबून असलेले आपणास पाहायला मिळतात. याचे स्पष्टीकरण देताना वैद्य देवपूजारी म्हणाले, "वर्षात नवीन माठ कधी वापरावयास घ्यावा, असं महत्व सांगणारा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. याच सणाला आपण लिंबू व कैरीचे पन्ह घेण्याची रीत आहे. या दिवसात उष्णता वाढ होत असताना आरोग्यासाठी या गोष्टी हितकारक आहेत म्हणून त्या आजवर आपण पाळत आलो आहोत. तसेच, चातुर्मासात कांदा, लसूण वर्ज्य मानले जाते. या दिवसात कांद्यावर फंगस ची लागण होत असल्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी अपायकारक असते. म्हणून ते खाऊ नये असे सांगितले जाते, परंतु आपण ते पाळत नाही असे सांगून आपल्या जीवनाकडे आपण डोळसपणे पाहायला हवे असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या