भारत होऊ शकतो जगाच्या नवरचनेचा शिल्पकार

- मनमोहनजी वैद्य 

कोरोना विषाणुच्या साथीमुळे सर्व ठप्प झालेय. डोक्यावरुन घोंघाविणारा विमानाचा ध्वनी नाहिये, संयानेही (रेल्वेही) थांबलीयेत नि माणसांनीही घराबाहेर जाणे थांबवलेय. पृथ्वी स्वच्छ नि निरोगी वायुत (हवेत) श्वास घेतेय. प्रदूषण प्रचंड घटलेय नि चिवट धूर-धुक्याच्या मागे दडपलेला प्रसन्न वायू मुक्त झालाय. नदीतून स्वच्छ पाणी वाहतय, प्राणी त्यांची निसर्गदत्त स्थाने पुन्हा मिळवताहेत नि निसर्ग त्याच्या पूर्ण वैभवासह अभिव्यक्त होतोय— इतका की, पंजाबमधील जालंधरच्या भूमीवरुन हिमालयाची हिमशिखरे दिसताहेत.


हे सर्व जरी तात्पुरते असले, तरीही ही मानवी इतिहासातील महत्त्वपूर्ण वेळ असून जग यास सदैव स्मरण करेल. मानवी उद्यमाने निर्मित ही यंत्रे थंडावल्यावर काय घडेल, हे पाहण्याची संधी आपल्याला पहिल्यांदाच मिळाली. विकासरथ थांबल्याचे दूष्परिणाम कळण्यासाठी विकासाचे दूष्परिणाम कळणे अनिवार्य आहे.

श्री.स. क. चक्रवर्तींनी "उगवते तंत्रज्ञान नि ढासळती नीतिमत्ता" नामक लेखात, "मानवाचे निसर्गाशी असलेले भावनिक नाते तुटण्याची वेळ, आधुनिक विज्ञान आणि त्याद्वारे साध्य तंत्रज्ञानाची वाटचाल एकाच वेळी घडली. अवजारापासून यंत्र, त्याचे स्वयंचलन व तेथून पुढे मायक्रोचिप्सपर्यंतच्या स्थित्यंतराने माणसातील माणुसकी सातत्याने घटविलेली दिसते", असे लिहिले आहे. विकासाच्या गतीतील विचारशून्य वाढ आणि ग्राहकवादामुळे हे घडले आहे.

आता विकासाची चाल मंदावली आहे, निसर्ग शुद्ध होतोय आणि माणूस त्याच्या प्रियजनांसह, परिवारासह वेळ घालवतोय. लोकांना, आयुष्य हे उपभोगप्रधान मार्गाविनाही जगता येते, हे दिसत आहे. आपल्या प्रियजनांच्या नात्यातील प्रेमाची उब व मूलभूत गरजांसह जगणे भाग पाडले आहे. समाजमाध्यमांवर पसरलेल्या एका संदेशात लिहिले आहे की, "तुम्ही जेव्हा बाहेर जाऊ शकत नाही, तेव्हा आत जा. केवळ बाहेरच नाही, तर आतही डोकावून पहा. अंतर्मन बघा." ह्या भारतीय चिंतनाच्या साराचे स्मरण करवितो. 

जग अशाप्रकारे ठप्प होण्याचे दूष्परिणाम नाहीत असे म्हणण्याचे कारण नाही. अर्थचक्र थंडावलेय, अनेकांनी चाकर्‍या (नोकर्‍या) गमावल्या आहेत, वेतने थकली आहेत आणि ऋण वाढतय. लोकांना उपजिविका असलेली नगरे सोडून गावी परतावे लागलेय. ह्या परिस्थितीने भारतासम विशाल नि विविधांगी देशासमोर सामना करण्यास अनेक प्रश्न व समस्या उभ्या केल्या आहेत.

'डेअर टू फेल्' ह्या पुस्तकात लेखक बिली लिम लिहितात, "तुम्ही जेव्हा समस्येशी सामना न करता तिपासून दूर पळता, तेव्हा ती परिस्थिती होते. तुम्ही जेव्हा तिचे आकलन करता, तेव्हा ती आव्हान होते. आणि तुम्ही जेव्हा आव्हानाशी सामना करण्यासाठी संसाधनांचा विचार करता, तेव्हा ती संधी होते."

भारतीय पारंपरिक शिक्षण पद्धतिने संशोधन व शोधक वृत्तीस सदैव प्रोत्साहन दिलेले आहे. शिक्षकांनी आचरणातून विद्यार्थ्यांना जीवन कला शिकणे शिकविले. सध्या केवळ पैसे कमविणे आणि ग्राहकवाद वाढविण्याच्या एकमेव उद्देशाने, व्यवसाय म्हणुन शिकविले जात आहे. परिणामस्वरुपी, आपण आत्मकेंद्री व भौतिकवादी पिढ्या घडवित आहोत.

विकासाची दिशा नि मापी (मापनपट्टी) ह्या नगरकेंद्री राहिल्याने मार्ग, आरोग्य, शिक्षण, श्रमसंधी इ. मूलभुत सोयीही नगरकेंद्रीच राहिल्या आहेत. परिणामस्वरुपी, भारताच्या प्रज्ञावंतांचे गाव ते नगर, नगर ते महानगर, आणि महानगर ते विदेश स्थलांतर झाले. म्हणुन, गावे ओस पडताहेत आणि नगरांतील दाटी वाढतेय. नागरी जीवन सुकर असले, तरी ते रटाळ, वास्तवाचा गंध नसलेले आणि अंतिमतः पोकळ आहे व आपल्या विकासाच्या मार्गाने आपल्यासमोर दुसरा पर्यायही ठेवला नाहिये. 

अविकसित नि विकसनशील देशांवर थोपविलेले जागतिकीकरण आता त्याचे दुष्परिणाम दाखवतेय. आताचे जागतिकीकरण हे अविकसित व विकसनशील देशांचे शोषण करणारे साम्राज्यवादाचे नवरुप असल्याचे शेवटी जगाला कळत आहे. प्रत्येकजण ह्या दुष्टचक्रातुन बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतोय. आता जगात सर्व ठप्प असताना नि जग त्याच्या नवरचनेविषयी चिंतीत असताना भारत पुढाकार घेत जगाला आश्वस्त आणि निश्चिंत करेल का?

उत्तर हो आहे. केवळ भारतच हे करु शकतो. कारण केवळ भारताकडेच ह्यासाठी आवश्यक गुण आहेत. प्रथम, केवळ भारताकडेच १०,००० वर्षांहुन अधिक सामाजिक नि राष्ट्रिय जीवनाचा अनुभव आहे. दुसरे, भारताकडे अनन्य अशी अध्यात्माधारित, कल्याणकारी व एकात्म जीवनदृष्टी आणि ह्यानुसार जगण्याचा अनुभवही आहे. आधुनिक शास्त्रिय व तांत्रिक शोधांनी जग जवळ आणलेय. म्हणुन मानवजातीला वांशिक, धार्मिक आणि भाषिक वैविध्याच्या जपणुकीसाठी, एकमेकांना पूरक होण्यासाठी भारताकडे वळावे लागेल.

आपण विविधतेत एकतेला अंतर्निहितपणे मानतो व नियंत्रित उपभोगासह जीवनाचे सर्व पैलू साजरे करतो. हेच भारताविषयी जगाचे युगानुयुगांचे निरीक्षण अनुभव आहे. भारताने भौतिक संपन्नतेचे शिखर गाठले होते ह्याचा अनेक शतके जागतिक व्यापारात सर्वाधिक वाटाही होता. भारतीय सहस्रो वर्षे विदेशात व्यवसायासाठी जात, तरीही त्यांनी तेथील लोकांना गुलाम करण्याचा, धर्मांतर करण्याचा अथवा वस्त्या (वसाहती) स्थापून त्या देशांना शोषण्याचा प्रयत्न केला नाही; ह्यास इतिहास साक्ष आहे. याऊलट, त्यांनी त्यांच्या आचरणातून सभ्य नि उन्नत सांस्कृतिक जीवनाचा प्रसार केला. आपल्या 'वसुधैव कुटूंबकम्'— जग हे एक कुटूंब आहे, ह्या अध्यात्माधिष्ठित जीवनदृष्टिमुळे हे शक्य झाले होते. आपण जेथेही गेलो, तेथे संपत्ती निर्माण केली नि संपन्नता पसरविली. हे भारताकडे जगताच्या नवरचनेसाठी दृष्टी, तज्ज्ञता आणि अनुभव असल्याचे दर्शविते.

(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. सह सरकार्यवाह आहेत.)

मराठी अनुवाद - शुभम गरुड 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या