शाखांमधून जशी स्वयंसेवकांची उपस्थिती वाढू लागली तसतसा स्वयंसेवकांच्या घरां मधूनही राष्ट्रप्रेमाची ही गंगा पोहोचायला हवी हा विचार वाढू लागला. त्यांनाही संघाच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी यासाठी घरांपर्यंत संघ विचार पोहोचून तो रुजावा यासाठी एखाद्या लोकप्रिय होईल अशा कार्यक्रमाच्या शोधात आम्ही होतो. वर्षप्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आठ ते दहा दिवसांवर आला होता. आमच्या डोक्यात असा विचार आला की यावर्षी साऱ्या हिंदूंना गुढी बरोबर भगवा ध्वज उभारा असे आवाहन केले तर? हा प्रयोग जर यशस्वी झाला तर प्रत्येक घर भगवामय होईल आणि सर्वत्र भगव्या ध्वजाच्या उभारण्याने साऱ्या समाजात एक वेगळाच संघाला अभिप्रेत असा संदेश जाईल .हा विचार डोक्यात येताच त्यादृष्टीने विचार विनिमय सुरू झाला.
होलसेल कपडा मार्केट मध्ये स्वर्गीय पेशुमल कुकरेजा या स्वयंसेवकाचे कपड्याचे दुकान होते. .त्याच्याशी संपर्क साधून त्याच्याकडील व त्याच्या ओळखीतून इतर दुकानदारांकडून जवळजवळ दहा तागे भगवे कपड्याचे ठाण उधारीवर घेण्यात आले .शाखेच्या भिंतीला लागूनच एक टेलर मशीन मांडून कपडे दुरुस्त करीत असे. त्याच्याशी प्रत्येक ध्वजाची एक रुपया शिलाई असा सौदा करण्यात आला. दोन बाय एक अशा साईज मध्ये त्याने सारे ध्वज गुढीपाडव्याच्या दोन दिवस अगोदर दिवस-रात्र खपुन करून द्यायचे होते. त्यासाठी त्याला मित्राच्या वाड्यात जागा उपलब्ध करून दिली. कपडा एक रुपये प्रति ध्वज जात होता, त्यामुळे "ना नफा ना तोटा" या धोरणानुसार त्याची किंमत दोन रुपये प्रति ध्वज ठरवण्यात आली.
शहरातल्या प्रत्येक भागात फलक लावून जाहिरात सुरू झाली. त्यासाठी आम्हाला ठिकठिकाणच्या गणेश मंडळे, तरुण मित्र मंडळे, सेवाभावी संस्था व मंदिर संस्थाने यांची फार मोलाची मदत झाली. आठ दिवस अगोदरच शहरात ठिक ठिकाणी बोर्ड झळकले. सर्व हिंदुत्ववादी नागरिकांनी येत्या वर्षा प्रतिपदेला आपल्या घरावर गुढी बरोबर भगवा ध्वज उभारावा असे आवाहन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी या या ठिकाणी आपणास ध्वज मिळतील .त्याची किंमत, विक्री कधी सुरू होणार आणि ध्वज मिळण्याची ठिकाणे यांचा उल्लेख फलकावर ठळकपणे करण्यात आल्यामुळे काहीही अडचण आली नाही. चौकाचौकात लावलेले फलक वाचण्यासाठी प्रचंड गर्दी होत होती.
इकडे दिवस-रात्र एक करून ध्वज बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. गुढीपाडव्याला दोन दिवस बाकी असताना टेलर ने आपले काम पूर्ण केले. त्याला आम्ही काहीजणांनी वर्गणी करून त्याची मजुरी दिली. रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि विक्रीचे नियोजन कसे करायचे ते ठरले. काही प्रमुख चौकात आमचे कार्यकर्ते टेबल मांडून विक्री करणार होते, तर फलकावर उल्लेख केलेल्या ठिकाणी ध्वजांचा पुरवठा करण्यात आला. जवळजवळ एक हजाराच्या वर ध्वज तयार झाले होते. हे ध्वजही कमी पडतील अशी चिन्हे दिसत होती. म्हणून आदल्या दिवशी पुन्हा एक तागा भगवा ठाण खरेदी करून त्या टेलरला दादा पुता करून ध्वज शिवुन देण्यासाठी तयार केले.
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच ठिक ठिकाणच्या ध्वज विक्री केंद्रांवर तुफान गर्दी उसळली आणि काही तासातच सारे ध्वज विकले गेले. तोपर्यंत टेलर नेही नवीन ताग्याचे ध्वज शिवायला घेतले होते. ते तयार झाले. ते ध्वज घेण्यासाठीही लोकांनी प्रतिक्षा रांग लावली आणि तेही ध्वज हातोहात विकले गेले. संध्याकाळी अशी स्थिती होती की नावालाही ध्वज कोणत्याच केंद्रावर शिल्लक नव्हता. लोक बिचारे घेण्यासाठी येत होते आणि रिकाम्या हाताने परत जात होते. नशीब की आम्ही अगोदरच आमच्या घरांसाठी ध्वज खरेदी करून ठेवले होते. अन्यथा आम्हालाही हात चोळत बसावे लागले असते.
गुढीपाडव्याच्या दिवशी संचलनासाठी सारे स्वयंसेवक जमले तेव्हा हाच विषय चर्चिला जात होता. संचलन मार्गावरही इतक्या सकाळी ही काही घरांवर भगवे ध्वज डौलाने फडकत होते. साधारण नऊ वाजता जेव्हा आम्ही सगळ्यांनी गावभर सायकलवर फेरफटका मारला तेव्हा गल्ल्याच्या गल्ल्या भगवामय झालेल्या दिसत होत्या. आम्ही मांडलेली कल्पना लोकांना मनापासून आवडली होती आणि त्यांनी ती स्वीकारली होती. ते दृश्य किती नयनरम्य दिसत होते हे शब्दात सांगता येणार नाही.
त्यादिवशी गुढीपाडवा म्हणजे वर्षप्रतिपदा म्हणजे नववर्षाची सुरुवात होती, ती इतकी आनंददायी असेल असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. पण निरपेक्ष भावनेने आम्ही हा ज़ो नवीन प्रयोग केला होता तो प्रचंड यशस्वी झाला होता. त्यादिवशी घराघरात सण म्हणून गोड-धोड करतात. पण सकाळपासूनच चोहीकडे असे उत्साहाचे भारलेले वातावरण तयार झाल्याने आमच्या साऱ्यांच्या चेहऱ्यावर जो संकल्प कृतीचा आनंद ओसंडून वाहत होता त्याने घरात केलेले गोड धोड आम्ही विसरून गेलो होतो आणि जणूकाही हवेत तरंगत होतो.
- हेमंत बेटावदकर, जळगांव
मो. 94 0 35 70 268
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या