------------
आणीबाणी उठल्यावर जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि समाजाच्या दृष्टीने उपेक्षित असलेल्या रा. स्व .संघा विषयीचे लोकांमधले आकर्षण एकाएकी वाढले. संघा विषयीचे कुतूहल, जिज्ञासा यामुळे संघात येणाऱ्या हवशे, नवशे, आणि गवशे यांची संख्या अतोनात वाढली. शहरातली शाखांची संख्याही त्यामुळे वाढणे सहाजिकच होते. "जसा असेल तसा घ्यायचा आणि पाहिजे तसा घडवायचा" या संघाच्या कार्यपद्धतीनुसार या मेगा भरतीचे ही स्वागत करण्यात आले.
जशी शाखानिहाय स्वयंसेवकांची संख्या वाढू लागली तसे तसे शाखेत नवे नवे प्रयोग सुरू झाले. उदाहरणच द्यायचे तर शाखेच्या एक तासात कोणता खेळ खेळायचे हे ठरलेले असे. इतक्या वर्षात त्यात काडीचाही बदल झाला नव्हता. पण समाजात संघा नुकूल वातावरण तयार झाले. शाखेत येणाऱ्या बाल, तरुण स्वयंसेवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि काही आधुनिक नवे खेळ शाखेत खेळले जावेत असा विचार जोर धरू लागला. तरुणांना आकर्षित करू शकतील असे व्हॉलीबॉल, फुटबॉल या मैदानी खेळांचा समावेश शाखेतल्या खेळात करण्यात आला .त्यासाठी लागणारे हॉलीबॉल, फुटबॉल, हवा भरण्याचे पंप, हॉलीबॉलची मधली जाळी यांची खरेदी करण्यात आली. त्यासाठीचा पैसा स्वयंसेवकांकडून वर्गणी घेऊन जमा करण्यात आला. संघस्थाना्वर स्वयंसेवक हे खेळ खेळू लागले आणि संघ आधुनिकतेकडे वाटचाल करतो आहे याची समाजाला खात्री पटू लागली. अर्थात चाकोरीबद्ध चालणाऱ्या संघातल्या जुन्या कार्यकर्त्यांना हा नवा बदल तितकासा पचनी पडला नाही. पण काळाची गरज ओळखून तसे करणे आवश्यक होते.
घराघरात संघाचे स्वयंसेवक तयार होऊ लागले. त्यांच्यामुळे घरातल्या इतरांनाही संघाची ओळख होऊ लागली व ही मंडळी संघाच्या कार्यक्रमात मग ते बौद्धिक असो, संघाचा विजयादशमी ,पाडव्याचा उत्सव असो किंवा जिल्हा बैठकीसाठी घराघरातून पोळ्या जमवायच्या असोत सक्रिय सहभाग घेऊ लागली. संघाच्या जाहीर कार्यक्रमांना राजकीय पक्षाच्या सभांना व्हावी तशी गर्दी होऊ लागली. संघाच्या सहा प्रमुख उत्सवांना स्वयंसेवक नसलेल्या पण हितचिंतक असलेल्या तरुण ,प्रौढांची उपस्थिती वाढू लागली. पूर्वी उत्सवाचे निमंत्रण दिले की ते थट्टेवारी नेले जायचे. संघाच्या कार्यक्रमाला जायचे म्हणजे अब्रह्मण्यम् मानले जाई.
या मानसिकतेत फार मोठा बदल घडून आला. घराघरातून पालक आपल्या मुलांना दैनंदिन शाखेत जाण्याचा आग्रह करू लागले. काहीजण तर बळजबरीने आपल्या मुलांना संध्याकाळी शाखेत पिटाळत, तर काही पालक शाखेत येऊन कार्यवाह, मुख्य शिक्षकांना विनंती करत की आमचा मुलगा आम्ही सांगूनही शाखेत यायला तयार नाही, तुम्ही तरी त्याला समजावून सांगा आणि शाखेत घेऊन या. इथे शाखेत आला तर त्याला वाईट सवयी लागणार नाहीत आणि चांगले संस्कार होतील.
मला वाटते समाजाच्या मानसिकतेत संघाच्या संदर्भात झालेला हा बदल संघासाठी ,शाखेसाठी मोठा क्रांतिकारी ठरला आणि ब्राह्मणांचे वर्चस्व असा शिक्का बसलेल्या संघातून त्यानंतर बहुजन समाजातील कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झाली आणि त्याचा फार मोठा फायदा जनसंघाला व नंतर भाजपला झाला. तो इतका मोठा होता की त्यानंतरच्या काळात संघाचा एक प्रचारक, स्वयंसेवक श्रध्देय अटलजींच्या रूपाने या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाला. संघाच्या स्वयंसेवकांनी फार पूर्वीपासून पाहिलेले एक स्वप्न साकार झाले.
- हेमंत बेटावदकर, जळगांव
मो. 94 0 35 70 268
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या