--------------------
- गजानन जगदाळे
जेष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिनी छत्रपती शिवराय सिंहासनारूढ झाले व त्यांनी छत्रपती हे बिरुद धारण केले. शिवरायांचा राज्याभिषेक होणे ही तमाम हिंदू जनमाणसासाठी कोणत्याही पर्वकाळापेक्षा कमी गोष्ट नव्हती. शिवरायांचा राज्याभिषेक होण्यापुर्वी त्यांच्यावर ते सर्व धर्म संस्कार करण्यात आले जे लहानपणापासून करणे बाकी राहिले होते.
जगातील विविध देशात त्या देशात राष्ट्रांतर घडवून आणण्यासाठी एक अजेंडा कायमच शत्रू कडून राबविला गेला आहे. तो म्हणजे या देशातील लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या व त्यापासून प्रेरणा पावणाऱ्या महापुरुषांच्या चारित्र्याला बदनाम करा. ज्यामुळे तेथील लोकांमधील प्रेरणा स्रोत नाहीसा होतोच शिवाय आपापसात भेदभाव जन्म घेतो व ते आपापसात लढायला लागतात. हीच संधी साधून शत्रू टपून बसलेला असतो.
भारतात इंग्रज अधिकारी लॉर्ड मेकॉले याने येथील लोकांचे छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी हे दोन प्रेरणा मंत्र आहे हे ओळ्खले होते. त्यानंतरच्या काळात लोकांना त्यांच्या संस्कृती व सभ्यता विषयी संभ्रम निर्माण करून इंग्रजीचे व पाश्चात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करण्यास सुरुवात केली. हाच कुटील डाव आजही अनेक दृश्य अदृश्य शक्तींनी सुरू ठेवला आहे. ज्या शिवरायांच्या एका जयघोषाने येथील लहान थोरात चैतन्य सळसळते, त्या शिवरायांच्या चरित्राविषयीच संभ्रम निर्माण करायचा, म्हणजे लोक त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याऐवजी सत्य - असत्य याचाच विचार करतील व आपापसात भेदभाव जन्माला घालतील. ही परिस्थिती आज आपणाला पहावयास मिळते. शिवरायांच्या राज्याभिषेकावर म्हणूनच काही आक्षेप तयार करून शिवराय हे कशारितीने ब्राह्मणविरोधी व सनातन धर्म विरोधी होते हे दाखवण्यात येते (जे धादांत खोटे आहे).
शिवरायांच्या राज्याभिषेकाला तत्कालीन ब्राह्मणांनी विरोध केला, असा आरोप केला जातो. आता ह्याची चिकित्सा करू गेल्यास असे लक्षात येते की, शिवरायांचा राज्याभिषेक करविणारे गागाभट्ट काशीहून शिवरायांची थोरवी ऐकून अश्या महात्म्याला भेटण्यासाठी पायी चालत आले होते. रायगडावर जवळपास तीन महिने त्यांचा निवास राहिला आहे. भारतातील हिंदूंना त्यांचा प्रतिपालक मिळाला आहे, युगायुगापासून ही भूमी वाट पाहत होती ती वेळ जवळ आली आहे असे सांगून आता राज्याभिषेक करण्याची वेळ अली आहे असा प्रस्ताव खुद्द गागाभट्ट यांनी सर्व मंत्री, सरदार व मासाहेब जिजाऊ यांच्या समक्ष ठेवला आहे. शिवरायांची कितीतरी कौतुके त्यांनी गायली. राज्यभिषेक करण्याचा विधीग्रंथ त्यांनी स्वतः निर्माण केला. स्वराज्यातील व आसपासच्या सर्व ब्राम्हण, साधू, संत यांना आमंत्रणं पाठवली गेली होती. या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती आणि या सोहळ्यात ब्राह्मणांनी वाद घातला की विरोध केला असा कुठे उल्लेख नाही. स्वयंघोषित इतिहासकारांनी काल्पनिक दावे मांडून समाज फोडण्याचा आपला अजेंडा राबवल्याचे यावरून लक्षात येते.
शिवरायांना महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून त्यांनी काशीहून गागाभट्टांना बोलावले, अशी खोटी थाप काहीजण मारतात. परंतु, वस्तूस्थिती ही आहे की, गागाभट्टांचे घराणे हे मूळचे पैठणचे असून ते काशी येथे वेदाध्ययनासाठी गेले होते. गागाभट्ट हे त्या काळी सर्व पंडितांमध्ये अधिक विद्वान व मान्यता पावलेले होते. शिवरायांच्या राज्याभिषेक व्हावा हा प्रस्ताव खुद्द गागाभट्ट यांनी शिवरायांच्या दरबारी ठेवला होता. त्यामुळे राज्याभिषेकसाठी त्यांना बोलावण्याचा प्रश्नच येत नाही. गागाभट्ट यांच्यासारखी विद्वान व्यक्ती इथे असताना आपण त्यांच्याकडूनच राज्याभिषेक का करून घेऊ नये असा सल्ला शिवरायांना येथील ब्राह्मण मंडळींनीच दिला होता. म्हणून शिवरायांनी गागाभट्टांकडून राज्याभिषेक करवून घेतला आहे.
आपला ब्राम्हणविरोधी मुद्दा पुढे रेटताना शिवरायांनी केलेल्या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दाखला दिला जातो. परंतु, यामुळे आपण एक सत्शील राजाचे चरित्र गढूळ करत आहोत याचेही त्यांना भान राहत नाही. शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने केला असे काही ग्रंथात उल्लेख आहेत. त्याच बरोबर एक दावा असाही करण्यात येतो की दुसरा राज्याभिषेक यजुर्वेदातील ऋचानुसार झालेला आहे. परंतु हा दुसरा राज्यभिषेक खरच झाला होता का, आणि झाला असेल तर कोणत्या पद्धतीने झाला? हा संशोधनाचा विषय आहे.
शंभू राजांनी बुधभूषण ग्रंथामध्ये बळी देण्याच्या प्रथेचा विरोध केलेला दिसून येतो. हे विचार जर भोसले घराण्याचे असतील तर शिवरायांनी तांत्रिक पद्धतीने राज्यभिषेक केला असे कसे आपण मानू शकतो? तसेच शिवरायांनी आपल्या हयातीत अंधश्रद्धा व अपशकुन यांना कधी मानले नाही. अमावस्येच्या दिवशी राजांनी मोहिमा काढल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या तांत्रिक म्हणवल्या जाणाऱ्या राज्याभिषेकावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.
तरीही तुर्तास शिवरायांनी जर दुसरा राज्यभिषेक केला असे मानल्यास हा राज्याभिषेक केवळ जनभावना लक्षात घेऊन केला असावा हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाजी महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधी अंधश्रद्धा व तंत्र-मंत्र याचे उदात्तीकरण केले नाही. शिवरायांनी महादेवाची व आई भवानीची उपासना केली. मातृसेवा केली. त्यांना अध्यात्माची ओढ होती. परंतु, अंधश्रद्धेला त्यांनी कधीही जागा दिलेली नाही.
एका उल्लेखानुसार, निश्चलपुरी गोसाव्याने पहिल्या राज्याभिषेकावेळी सर्वांसमक्ष काही अपशकुन समोर ठेवले. राज्याभिषेक झाल्यानंतर काही विपरीत घटना घडतील असे त्याने सांगितले. दुर्दैवाने राज्यभिषेक झाल्यानंतर मासाहेब जिजाऊ यांचे निर्वाण झाले. त्यामुळे निश्चलपुरी गोसाव्याने सांगितलेले भाकीत खरे ठरतेय की काय अशी एकच भीती जनमानसात पसरली होती. त्यामुळे लोकांच्या मनाची समजूत निघावी म्हणून शिवरायांनी एक छोटेखानी राज्याभिषेक करून घेतला असण्याची शक्यता आहे.
वास्तविक निश्चलपुरी गोसाव्याने व्यक्त केलेले भाकीत किती खोटे होते हे शिवरायांनी राज्यभिषेक झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच मोहिमेतील यशावरून लक्षात येते. या मोहिमेत खुद्द शिवरायांनी बहादूर खानाची दाणादाण उडवून मुघलांना जोरदार धक्का दिलेला आहे. अनाजींपंतांनी फोंडा काबीज केला आहे. शंभू राजांनी भागानगर म्हणजेच हैद्राबाद प्रदेशात लुट करून आपली दहशत बसवली आहे. एकंदरीत राज्यभिषेक झाल्यानंतर उघडलेल्या सर्व मोहिमा फत्ते झाल्याचे लक्षात येते. कुठेही अपशकुन आडवा आलेला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक म्हणजे तमाम हिंदुस्थानातील हिंदू जनतेला दिलासा होता. कुणीतरी आपला वाली आहे आणि हिंदूंनाही विजय संपादन करता येऊ शकतो, आपल्या मातृभूमीवर आपण पुनः आपले राज्य निर्माण करू शकतो असा आत्मविश्वास शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकातून निर्माण झाला आहे. तत्कालीन आत्मविस्मृत हिंदू समाजाचे डोळे उघडणारा हा राज्याभिषेक होता. राज्याभिषेकाचे वृत्त ऐकून औरंगजेबाला किती यातना झाल्या हे श्रीमान योगी या कादंबरीत छान रेखाटले आहे. देवगिरीच्या राजा रामदेवरायचं राज्य गेल्यानंतर हिंदुस्तानात एकही हिंदू राज्य शिल्लक राहिलं नव्हतं. शिवरायांनी साडे तीनशे वर्षानंतर पुन्हा हिंदू राज्य निर्माण केले, ही समस्त हिंदूंसाठी आजही अभिमानाची गोष्ट आहे. त्या अभिमाला कोण नख लावत आहे, हे समाजाने ओळखले पाहिजे.
( लेखक शिवचरित्र, संत वाङ्मय व हिंदू धर्म ग्रंथ अभ्यासक आहेत)
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या