उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका – स्वामी विवेकानंद


@मोनाली देशपांडे
आपल्या आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर त्याची जडघडण ही लहानपणापासूनच पाहिजे. आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानाचा भडिमार न करता ध्येयाकडे वाटचाल करणा-या प्रत्येक मुलाला ‘संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे का?’ असा प्रश्न विचारणारे स्वामी विवेकानंद आजच्या पिढीचे प्रेरणास्थान ठरतात.



तल्लख बुद्धिमत्ता असलेले आणि भारतीय संस्कृतीचे सखोल अभ्यासक स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी हा जन्मदिवस 'जागतिक युवा दिवस' म्हणून ओळखला जातो. तारुण्याच्या वाटेवर असताना अनेक आव्हानं स्पर्धेला सामोरे जाणारा तरुण हा जग बदलवण्याची ताकद स्वत:मध्ये ठेवतो. "give me hundred nachiketa and i will change the world" असे म्हणणा-या स्वामी विवेकानंदांना त्या काळातही तरुणांच्या शक्तीची कल्पना होती. एखाद्या ज्ञानाने समृद्ध होण्याआधी त्या विषयी सखोल माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. स्वामीजींची तारुण्याची व्याख्या टिळकांप्रमाणे होती. लो.टिळक म्हणत “माझा जन्म अशा पिढीत झालाय कि ज्यावर आभाळ कोसळलं, तरी त्यावर पाय रोवून उभारण्याची ताकद आमच्या पिढीत आहे.” तो खरा आत्मविश्वासी तरुणपणा टिळकांप्रमाणे स्वामीजींना अपेक्षित आहे.

स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला युवक कसा असावा ? ते म्हणतात ,मला असे युवक हवे आहेत,जे मनाने कणखर, शक्ती संपन्न, विचारप्रभावी, संस्कारक्षम, राष्ट्राप्रती, समाजाप्रती नितांत प्रेम करणारे, जे माझ्या राष्ट्राला , माझ्या समाजाला आणि माझ्या भारत मातेला शक्ती संपन्न , परिपुर्ण करुन पुन्हा एकदा त्या विश्वाच्या उत्तुंग शिखरावर बसवतील आणि ज्या दिवशी असे राष्ट्रभक्त युवक या भारतभूला मिळतील, त्यादिवशी निश्चितच भारतमाता त्या उत्तुंग शिखरावर असेल… म्हणुनच, प्रत्येक कामाला जेव्हा देशसेवेचे अधिष्ठान मिळते, तेव्हा आपल्या नकळतपणे व्यापक स्वरूप घेते.

भारत एक संधीचा देश आहे. या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघतंय कारण आज आपला देश सर्वात तरूण देश आहे. ज्या देशाची 65% लोकसंख्या तरूण असेल. 35 वर्षांच्या आतली असेल तो देश किती भाग्यवान आहे. आज आपल्या देशात किती तरी कोटी जनता युवा आहे. आणि जिथं तरूणाई असते ना, तिथं काही संकल्पना, सीमा नसतात. बंधने नसतात. युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपलं म्हणणं समाजापुढं मांडणारी नव्या जोशाची पिढी. आजचा तरूणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. पण आजच्या तरूणाईला गरज आहे. ती आदर्श विचारांची आणि कुशल नेतृत्त्वाची म्हणुनच तरुणांच्या बाबतीत ‘Change is the evidence of life , you need to change to make something strength ‘ हे व्हायलाच हवं. कारण राज्यघटनेने तरुणांना मतदानाचा हक्क दिला पण, किती तरूण तो हक्क बजावतात? लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचा अधिकार मतदान करण्याचा हक्क आहे तर तेवढ्याच अधिकाराने लोकप्रतिनिधींना विचारा सभागृहात तरुणांच्या हक्कासाठी किती ठराव केले जातात. किती प्रश्न निर्माण होतात. जर तुम्ही मतदान केले नाही तर तुम्ही तुमचा हक्कही गमावून बसतात. स्मरण करा स्वा.सावरकरांचे, भगतसिंग, सुखदेव राजगरू व संभाजी महाराजांचे विचार.

तरुणांच्या विचारशक्तीवर स्वामीजींचा विश्वास होता. स्वामीजी म्हणत यापुढची जगातील तिसरी क्रांती हि तरुणांकडून होईल. ती ही विद्याविश्वातून, त्या क्रांतीच माध्यम ज्ञान, विज्ञान, विचार असेल व त्याचे अग्रदूत, प्रणेते युवक असतील. ती क्रांती समाजाच्या नवनव्या आदर्शवाटा निर्माण करेल. स्वामीजींचे हे विचार कार्यान्वित करणे अवघड असले तरी यातून नव्या दृष्टीचा लाभ होईल हे मात्र निश्चित.

@ मोनाली देशपांडे लंगरे,
जळगांव

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या