पू. सुदर्शनजी: व्यक्तित्व आणि परिचय

----------------
- नितीन अर्जुन भोई

२०१२ मध्ये तृतीय वर्षात नागपूरला शिक्षार्थी  म्हणुन मी उपस्थित होतो. आज रोजच्यापेक्षा सर्व शिक्षार्थी सभागृहात लवकरच जमलेली होती. कारण आजपासून कोणीतरी विशेष अधिकारी  आपल्या सोबत काही दिवस असणार आहे अशी माहिती आधीच मिळाली होती आणि त्या अधिकारीचं  बौद्धिक कदाचित आज आपल्याला ऐकायला मिळणार, म्हणून सर्व उत्सुकतेने एका रांगेत उभे होते. उपविश: आज्ञा येताच सर्वजण खाली बसले. मी बसलेल्या शेजारच्याच रांगेत ती अधिकारी व्यक्ती बसलेली होती. ते अधिकारी  म्हणजेच 'रा. स्व. संघाचे  पाचवे पु. सरसंघचालक के.  एस. सुदर्शनजी होते. सुदर्शनजी तेव्हा नुकतेच सरसंघचालक या जबाबदारीतुन निवृत्त झाले होते. शिक्षकांच्या आग्रहास्तव नंतर त्यांना केवळ एका आसनावर बसण्यास विनंती केली गेली. 

संघात व्यक्तीविशेषता नाही, संघात केवळ तत्व आणि भगव्या ध्वजाला महत्व आहे असे ऐकून होतो. त्या दिवशी त्याचे जिवंत उदाहरण बघत होतो. जगातील सर्वात मोठ्या संघटनेच्या सर्वोच्च पदावर ९ ते १० वर्ष कार्यरत राहिल्यानंतरही एखादी व्यक्ती एक सामान्य व्यक्ती कशी राहू शकते याचे ते उदाहरण होते. संघात पद नाही, जबाबदारी असते आणि संघात कोणी लहान मोठं नाही, सारेच फक्त स्वयंसेवक असतात याचा पाठ वर्गाच्या पहिल्याच दिवशी आम्हाला अनुभवायला मिळाला होता. सुदर्शनजी यांच्या कार्याची व व्यक्ती म्हणून तेव्हापासून आतापर्यंत कधी ऐकण्यातून तर कधी वाचण्यातून ओळख होत आली आहे.

सुदर्शनजी यांचा जन्म १८ जून  १९३१  रोजी मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला. तीन भाऊ व एक बहीण अशा परिवारात ते सर्वात मोठे होते. श्रीकुप्पहल्ली सीतारामय्या सुदर्शन असे त्यांचे पूर्ण नाव. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा दमोह येथील संघ शाखेशी संबंध आला. पदवी शिक्षण घेतल्या नंतर १९५४  साली वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी संघासाठी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम सुरु केले. त्यांनी विभाग प्रचारक, क्षेत्र प्रचारक अश्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. 

वास्तविक त्या काळात इंजिनिअर अर्थात अभियंता  पदवी घेतलेल्या तरुणांना चांगले करीअर  करण्याची संधी होती. इंजिनिअर होणं म्हणजे दुरापास्त बाब होती. मात्र त्याचा त्याग करून आपल्या शिक्षणाचा व जीवनाचा उपयोग संघकार्यासाठी करण्याचे त्यांनी ठरवले. दि. १० मार्च २००० ला अ. भा. प्रतिनिधी सभेत रज्जू भैय्या यांनी उत्तराधिकारी म्हणून सुदर्शनजी यांची रा. स्व. संघाचे पाचवे सरसंघचालक म्हणून निवड केली.

सुदर्शनजी यांनी लिहिलेला लेख मी काही वर्षांपूर्वी वाचला होता. त्यात त्यांनी भारतीय विचार दर्शन या संदर्भात विचार प्रकट केले होते. दीनदयाल यांच्या विचारसरणीचा सार अगदी थोडक्यात त्यांनी सांगितला की “स्वतःचे पोट भरण्यासाठी कमावणे ही प्रकृती झाली, स्वतःचे पोट भरण्यासाठी दुसऱ्याकडून हिसकावून घेणे ही विकृती झाली, मात्र दुसऱ्यांचे पोट भरण्यासाठी कमावणे ही संस्कृती होय. आपणास ठाऊक आहे की Homo-Centricism म्हणजेच केवळ स्वतःचा विचार करणे हा पाश्चात्य विचारधारेचा सहज भाव आहे. या उलट भारतीय मात्र जीवनाकडे समग्र दृष्टीकोनातून पाहतात.”

एवढ्यावरच ते विचार थांबत नाहीत तर सध्या आपण कोरोना विषाणूच्या प्रभावाखाली जीवन जगत आहोत. अश्या नैसर्गिक महासंकटाला कारणीभूत पाश्चात्यांची उपभोगवादी स्वार्थी विचारसरणी आहे, हे त्यांनी या लेखात सांगितले होते. ते लिहितात “या विश्वामध्ये सगळेच सगळ्यांशी घट्टपणे जोडले गेले आहेत आणि कुठे काही घडल्यास त्याचा परिणाम संपुर्ण विश्वावर होतो. या विश्वाच्या आंतरिक नात्याच्या मुल तत्वाला ओळखु न शकल्यामुळे आपण चुका करतो, नैसर्गिक संपत्तीची निर्दयतेने लुट करतो, नासधूस करतो आणि पर्यायाने त्यांच्या कोपाला आमंत्रण देतो.” आणि तीच निर्माण झालेली परिस्थिती आपण आज प्रत्येक्षात अनुभवत आहोत.

सुदर्शनजी कोण होते? सुदर्शनजी एक महान चिंतक होते, तपस्वी होते. सुदर्शनजी अभ्यासक होते, विद्यार्थी होते आणि सुदर्शनजी प्रयोगशील व्यक्ती होते. सतत अभ्यास, मग चिंतन आणि त्यावर स्वतः प्रयोग करून पाहणं अशी त्यांची ओळख सांगता येईल. 

सुदर्शनजी यांची ओळख त्यावेळी संघाचा 'माहितीकोश' (Encyclopedia) अशी होती. प्रचंड बुद्धिमान व अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कोणतीही समस्या असो, तिच्या मुळाशी जाऊन चिंतन करून त्यावर उपाय शोधणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आसाम मधील घुसखोरांच्या आंदोलनाबाबत त्यांनी गहन चिंतन जरून असेच महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. बांग्लादेशमधून आसाम मध्ये येणारे मुस्लिम हे सुनियोजित षडयंत्र असून हिंदू मात्र प्रचंड यातना सहन करून शरणार्थी म्हणून येत आहेत, केवळ त्यांनाच आश्रय दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले होते. सामाजिक सद्भाव आणि समरसता प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन व मुस्लिम समाजाशी निरंतर संवाद साधला आहे.

चीनच्या हेकेखोर व साम्राज्यवादी विचारांना आपण आज अनुभवत आहोत, त्यामुळे स्वदेशीचं महत्व आपल्याला कळत आहे. परंतु, के सुदर्शनजी यांनी देशांतर्गत निर्माण होणाऱ्या वस्तू व उत्पादनांना प्राधान्य दिले पाहिजे व विदेशातील वस्तू - उत्पादनांना दुय्यम महत्व दिले जावे असे ते सांगत असत. तत्कालीन वाजपेयी सरकारच्या निर्णयांवर त्यांनी आक्षेप घेतलेला दिसून येतो. एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला होता, की तुम्ही भाजपचे सरकार असूनही त्यांच्या निर्णयांना विरोध का करता? तेव्हा त्यांनी सांगितले, की संघ कोणाकडे आपले व परके म्हणून पाहत नाही तर, केवळ देशासाठी हिताचं काय आहे, याचाच विचार केला जातो. त्यामुळेच आम्ही सरकारचे समाजहित व राष्ट्रहिताच्या दृष्टीने जे जे चांगले निर्णय असतात त्यांचे स्वागत करतो व जे निर्णय देशहिताच्या दृष्टीने घातक असतात त्याबद्दल आक्षेपही घेतो. के सुदर्शनजी यांची ही प्रतिक्रिया एका बौध्दिकापेक्षा कमी नाही. स्वयंसेवकाला कायम मार्गदर्शन देणारी ही वाक्ये आहेत. 

सुदर्शनजी सेंद्रिय शेती, स्वदेशी व पर्यावरण पूरक जीवनपद्धतीचे उपासक व अभ्यासक होते. बायोडिझेल चा वापर करून शेती करावी यासाठी ते आग्रही होते. प्लास्टिक कचऱ्यापासून पेट्रोल निर्मिती त्यांनी करून दाखवली होती. त्याचे प्रयोगही केले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण अभियंता असल्याचं त्यांनी दाखवून दिलं होतं. के. सुदर्शनजी म्हणजे एक तपस्वी, भारतीय राजकारण, समाजकारण, विदेश नीती, सामाजिक समरसता, सामाजिक सद्भाव, स्वदेशी, सेंद्रिय शेती व आयुर्वेद अश्या विविधांगी विषयावर शेवटपर्यंत गहन चिंतन व अध्ययन करणारे विद्यार्थी होते. 

अश्या महान व्यक्तित्वास त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन.. 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या