सहलीचा नवा प्रयोग
शाखांमधून स्वयंसेवकांच्या येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताच कार्यकर्त्यांकडून दैनंदिन उपस्थितीत वाढ कशी होईल यासाठी निराळे निराळे प्रयोग करण्यात येऊ लागले. मी कार्यवाह असलेल्या विक्रमादित्य सायं शाखेत तर उपस्थितीची कधीच वानवा नव्हती. पण आता तर संघ शाखांसाठी असे काही अनुकूल वातावरण तयार झाले होते की शाखेचे एवढे विस्तीर्ण मैदान ही कमी पडू लागले होते. तरुण बाल आणि शिशु यांच्यासाठी वेगवेगळे गण असत. आमच्या शाखेत किमान गणसंख्या सारे मिळून किमान पाच तर कमाल दहा ते बारा पर्यंत जात असे. अशी एकूण सर्व परिस्थिती असताना स्वयंसेवकांची ही संख्या वाढावी म्हणून सारेच प्रयत्नशील होते.
शाखेतील उपस्थिती वाढावी म्हणून निरनिराळ्या नवीन मैदानी व बैठ्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. पण, त्या शिवाय दर रविवारी शहरातील शाखांचे एकत्रीकरण मुद्दाम आमच्या शाखेतल्या मैदानावर करण्याचे ठरले व तसे होऊ लागले. महिन्यातल्या एखाद्या विशिष्ट सोमवार ते रविवार या सप्ताहात "भरती सप्ताह "साजरा करण्यात येऊ लागला. त्याकाळात जास्तीत जास्त स्वयंसेवक शाखेत आणावेत यासाठी गटनायकांना प्रोत्साहन देण्यात येऊ लागले व गटनायकही त्यासाठी जिवाचे रान करू लागले. स्वयंसेवकांना आकर्षित करण्यासाठी चंदनाचा कार्यक्रम, कोजागिरी उत्सव, दिवाळी वर्गासाठी जास्तीत जास्ती स्वयंसेवक तयार करणे, हिवाळी शिबिरासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवक पाठवणे, गुरुदक्षिणा समर्पणात प्रत्येक स्वयंसेवक फुल ना फुलाची पाकळी समर्पित करेल हे पाहणे, शहर स्तरावरच्या प्रत्येक कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग अशा एक ना दोन युक्त्या व प्रयोग यांचा वापर होऊ लागला.
एकदा शाखा संपल्यावर आम्ही काही कार्यकर्ते या स्वयंसेवकां साठी एखाद्या लोकप्रिय कार्यक्रमाच्या शोधाची चर्चा करत होतो. त्यावेळी आमच्या शाखेची दैनंदिन संख्या शंभर ते दीडशे होती तर गटनायकांची संख्या 20 होती.एका गटात किमान पंधरा तरी स्वयंसेवक होते. शाखेची एकूण पटसंख्याच तीनशेच्या वर होती. आम्ही असे ठरवले की येणाऱ्या रविवारी दोन दोन गटनायकांनी आपल्या आपल्या गटातील स्वयंसेवकांची सहल जळगावच्या आसपासच्या प्रेक्षणीय स्थळी न्यायची. स्थळाची निवड दोन्ही गटनायकांनी
मिळून ठरवायची. गावात असलेली तीन मोठी उद्याने, तरसोदचा गणपती, अवचित हनुमान, ममुराबाद फार्म, गिरणा पंपिंग, गोळीबार टेकडी, ओंकारेश्वर मंदिर, एमआयडीसीतील कैटा देवी एवढेच काय पण चिमुकले राम मंदिर, पिंम्पराळा येथील पान मळा अशा स्थळांची निवड करण्याचे स्वातंत्र्य गटनायकांना असल्याने त्यांनी सोयीची आणि आवडीची स्थळे निवडली.
बरोबर संघाचा एक अधिकारी जाणार होता जो त्यांच्याबरोबर राहून डबे खाल्ल्यानंतर दहा मिनिटे संघ कार्याचा एखादा विषय मांडणार होता. जिल्हा, शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी होकार दर्शविला होता. गटनायक कामाला लागले आणि स्वयंसेवकांना सहलीला येण्यासाठी तयार करू लागले. त्यासाठी काही गटनायकांना स्वयंसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागली. पण गटनायकांनी
हे सारे आनंदाने केले व आपल्या गटातील जास्तीत जास्त स्वयंसेवक सहलीला कसे येऊ शकतील याचा विचार केला. तरसोद आणि ममुराबाद फार्म आणि अवचित हनुमान या ठिकाणांसाठी तरुणांची व मोठ्या बालांची संख्या असलेल्या गटांची निवड करण्यात आली होती कारण ही ठिकाणे गावापासून लांब असल्याने तेथे सायकलने जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला. प्रत्येक सहलीसाठी किमान वीस ते तीस स्वयंसेवक डबे घेऊन सामील झाले होते. त्यादिवशी सहलीत सहभागी स्वयंसेवकांची एकूण संख्या दोनशे ते अडीचशे पर्यंत पोहोचली होती. त्यादिवशी या सर्वच ठिकाणी शिस्तबद्ध स्वयंसेवकांची असलेली हजेरी चर्चेचा विषय झाली होती आणि जो तो आम्हाला हे तुम्हाला कसे सुचले असे विचारत होता.
विक्रमादित्य सायं शाखेने अजून एक विक्रम केला होता आणि नंतरच्या काळातही तो अबाधित राहिला. अर्थात या साऱ्यांचे श्रेय गटनायकांना, त्यांच्या कष्टाला आणि स्वयंसेवकांच्या उत्साहालाच द्यायला हवे.
- हेमंत बेटावदकर
संपर्क - 9403570268
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या