दिनांक पाच जुनला रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय गुरुजींची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने अनेकांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला. गुरुजींची प्रखर बुद्धिमत्ता, जाज्वल्य राष्ट्रप्रेम, अध्यात्मिक बैठक, तपस्वी जीवन शैली, अफाट कार्यकर्तृत्व, संघ विस्तारासाठी त्यांनी अंगीकारलेले असिधाराव्रत, शेवटच्या श्वासापर्यंत संघकार्याचाच विचार अशा एक ना अनेक पैलूंविषयी बरेच लिहून आले आणि गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्थात हे सर्व बरोबरच होते आणि गुरुजींच्या एकूण प्रतिमेशी सुसंगत असेच होते. पण त्याचबरोबर गुरुजींची स्मरणशक्ती ही अतिशय तीव्र होती .त्यांच्या या असाधारण स्मरणशक्ती विषयी फारच कमी लिहील्या गेले. पण आमच्या बेटावदकर कुटुंबाला गुरुजींच्या या दैवी स्मरणशक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आला. तो साऱ्यांना कळावा असे मनापासून वाटते म्हणून हा लेखन-प्रपंच.
साधारण 1970 च्या आधीची गोष्ट असावी. पू. गुरुजी आपल्या नियोजित दौऱ्यात जळगावात आले होते. संघ कार्याच्या संदर्भात भेटीगाठी, बौद्धिक, कार्यकर्त्यांच्या बैठका असा भरगच्च कार्यक्रम होता. हे सारे झाल्यावर संघ कार्यालयात रात्री शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर गुरुजींचा वार्तालाभाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला शहरातील पंचवीस ते तीस कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात माझे वडील कै. मधुकर राव बेटावदकर हेही उपस्थित होते. कारण त्यांच्याकडे त्यावेळी शहराची काहीतरी जबाबदारी होती. वार्तालापाच्या कार्यक्रमाच्या सुरवातीला सार्यांनी आपले पूर्ण नाव आणि त्याच्याकडे असलेली संघ कार्याची जबाबदारी सांगावयाची होती. वडिलांनीही आपले पूर्ण नाव "मी मधुकर हरिदास बेटावदकर" व त्यांच्याकडे असलेली जबाबदारी सांगितली. वार्तालापाचा कार्यक्रम संपला आणि गुरुजी त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.
हे सारे पार पडल्यावर गुरुजी साधारणतः एक वर्षानंतर संघ कार्याच्या निमित्ताने राजस्थानच्या दौऱ्यावर होते. अजमेर शहरातही गुरुजींचा असाच कार्यक्रम होता. त्यावेळी माझे लहान काका कै. प्रभाकर हरिदास बेटावदकर हे अजमेरला रेल्वेत नोकरीला होते आणि सहाजिकच संघ कार्याशीही निगडित होते. मला वाटते त्यांच्याकडेही संघाची काहीतरी जबाबदारी होती. त्यामुळे सहाजिकच गुरुजींच्या उपस्थितीत होत असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच संघाच्या कार्यपद्धतीनुसार उपस्थितांनी आपले पूर्ण नाव आणि संघाची जबाबदारी क्रमाने सांगण्यास सुरुवात केली. काकांनी मै," प्रभाकर हरिदास बेटावदकर," असे नाव सांगून त्यांच्याकडील संघाची जबाबदारी सांगतली. पूजनीय गुरुजींनी क्षणार्धात काकांना विचारले की तू जळगावच्या मधू बेटावदकरचा भाऊ आहेस का? बैठकीतील सारे कार्यकर्ते दिग्मूढ झाले, अचंबित झाले. माझ्या काकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. कारण पु. गुरुजी जळगावला जवळजवळ एक वर्ष आधी गेले होते हे त्यांना माहित होते. बरे माझे वडीलही या वर्षभरात नागपूरला वगैरे गेले नव्हते अथवा गुरुजींना भेटले नव्हते. माझे वडील फार मोठे म्हणजे प्रांत पातळीवरचे एवढेच काय पण जिल्हा पातळीवरचे ही पदाधिकारी नव्हते. तरीही वर्षभरापूर्वी एका बैठकीत एका सामान्य कार्यकर्त्याने करून दिलेली आपली ओळख, परिचय गुरुजींच्या स्मरणात नावा निशी वार होता आणि त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर जळगाव पासुन हजारो मैल लांब अंतरावर असलेल्या परप्रांतात म्हणजे राजस्थानात त्यांनी माझ्या काकांचे नाव ऐकताच त्यांना तो सांगितला होता. गुरुजींची असामान्य, अलौकिक, दैवी स्मरणशक्ती साऱ्यांना थक्क करून गेली हे निश्चित.
सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्या विषयी वाटणारी ही आपुलकी आणि स्वतःच्या प्ररमोच्च स्थानाचा किंचितही गर्व नसणे यामुळे संघात परम पूजनीय सरसंघचालक आणि सामान्य स्वयंसेवक एकाच पंक्तीत भोजन करतात. पु. गुरुजींनी संघ कार्यासाठी आपल्या आयुष्यात जवळ जवळ चार वेळा संपूर्ण हिंदुस्थान पिंजून काढला होता. प्रत्येक ठिकाणी असे हजारो कार्यकर्ते त्यांना भेटले असतील. कामाच्या व्यापात कार्यकर्त्यांची नावे विसरणे हे सहज शक्य होते .त्यात काही वावगे ही नव्हते. एवढ्या प्रचंड कार्याच्या व्यापात सामान्य स्वयंसेवकांची नावे लक्षात राहिली नाहीत तर फारसे बिघडणारही नव्हते. पण मग संघकार्याचे तेच तर खरे वैशिष्ट्य आहे .त्यात पुन्हा पूजनीय गुरुजींना अध्यात्मिक शक्ती प्राप्त होती आणि तीव्र स्मरणशक्तीचे वरदानही प्राप्त होते. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक हा "देवदुर्लभ" आहे असा ठाम विश्वास मनात असल्यामुळेच गुरुजींनी अशा कार्यकर्त्यांच्या मदतीने संघाचे हे "परमेश्वरी कार्य" संपूर्ण भारतातच काय पण विदेशातही पोहोचवले आणि राष्ट्रभक्तीची ही जाज्वल्य पताका फडकावत ठेवली.
नेता ऐसा मिळे आम्हाला, काय असे मग ऊणे,
यशाने दुमदुमवू त्रिभुवने ।।
लेखक - हेमंत बेटावदकर
संपर्क - 9403570268
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या