प्रेरक प्रसंग। केवळ नैसर्गिक उपचार पद्धतीने भडगाव येथील रुग्णांना कोरोनामुक्त करणाऱ्या डॉ. निलेश पाटील यांची 'यशोगाथा'

जळगांव- जळगांव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या मोठी चिंतेची बाब असताना भडगाव येथून दिलासादायक वृत्त आले. भडगाव कोविड सेन्टरमधील आरोग्य अधिकारी डॉ. निलेश पाटील व त्यांच्या पत्नी सौ. डॉ. पल्लवी पाटील यांनी नैसर्गिक उपचार व योग व्यायामाच्या माध्यमातून तब्बल 54 रुग्ण बरे केले. या डॉक्टर दाम्पत्याचे कार्य विस्मयकारक असून सर्वांना सुखद धक्का देणारे ठरले आहे. डॉ. निलेश व डॉ. पल्लवी यांची एका वृत्त वाहिनीने मुलाखत घेतली, त्याचा सारांश येथे देत आहोत. 


डॉ. निलेश पाटील यांचे भडगाव येथे क्लिनिक असून त्यांच्या पत्नी सौ. डॉ. पल्लवी पाटील या रेडिओलॉजिस्ट आहेत. डॉ. निलेश पाटील रा. स्व. संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यही करत असतात. संघाचे मा. जिल्हा सहसंघचालक असे त्यांच्याकडे दायित्व आहे. कोविड सेंटरला सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने सेवाकार्य करण्यास त्यांनी पत्नीसह सुरुवात केली. ते दोघे स्वेच्छेने येथे सेवाकार्य देत आहेत.

कोविड रुग्णांच्या मनातील भीती काढण्यासाठी पीपीई किट जाळला

डॉ. निलेश पाटील यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की जेव्हा भडगाव कोविड सेंटरमध्ये माझी आरोग्य अधिकारी म्हणून जबाबदारी आली तेव्हा कोविड सेंटर मध्ये गेल्यानंतर तेथील सर्व 52 रुग्णांशी मी त्यांच्या जवळ जाऊन संपर्क साधला. त्यामुळे रुग्णांमध्ये आपुलकी निर्माण झाली. आजपर्यंत सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार होत असलेल्या उपचाराची अंमलबजावणी करत त्यांच्या जवळ कोणीही गेलेले नव्हते. त्यामुळे सर्वात प्रथम रुग्णांशी आपुलकीचे नाते निर्माण केले. आपल्याशी प्रथमच कोणी डॉक्टर जवळ येऊन संवाद साधत असल्याचा त्यांना इतका आनंद झाला की त्यांना गहिवरून आले व त्यांचे डोळे पाणावले. 

दैनिक जनशक्तीशी ऑनलाइन मुलाखत साधताना डॉ. निलेश पाटील व सौ. डॉ. पल्लवी पाटील

आपण सहज सोपी नैसर्गिक उपचार पद्धतीचा अवलंब करून कोरोनाला हरवू असे आवाहन रुग्णांनी आनंदाने स्वीकारले. डॉ. निलेश पाटील यांना त्यांच्या पहिल्याच कृतीने मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला व जे रुग्ण आपल्या घरादारापासून दूर झाले, नातेवाईक - मित्रांपासून तुटले, समाजाशी त्यांचा काही एक संबंध नाही आणि दवाखान्यातही त्यांना (नाईलाजाने) अस्पृश्यासारखी वागणूक मिळते त्यांच्यासमोर त्यांनी पीपीई किट जाळून टाकला. या एका कृतीमुळे रुग्णांचा मोठा आत्मविश्वास वाढला.

नैसर्गिक उपचारपद्धतीचं वेळापत्रक तयार

डॉ. निलेश व डॉ. पल्लवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नैसर्गिक उपचार करण्यासाठी एक वेळापत्रक तयार केले. ज्या रुग्णांचे केवळ कोविड 19 चे रिपोर्ट सकारात्मक आले होते परंतु त्यांना कोणताही आजार नव्हता असे मोठ्या संख्येने रुग्ण तिथे होते. त्यामुळे ज्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षणं अजून दिसत नाहीत, त्यांना कसला आजार नाही, सर्दी खोकला किंवा घसादुखी नाही त्यांना ती अनावश्यक अँटिबायोटिक औषध का द्यायची, म्हणून सरकारी गाईडलाईननुसार सुरू असलेली औषधं देणे थांबवून केवळ नैसर्गिक उपचार पद्धतीचा अवलंब करायचा त्यांनी ठरवले. 
सार सकाळी 6 ते 8 वाजे दरम्यान दोन तास व्यायामयोग, नंतर सकारात्मक चर्चा खेळ व सायंकाळी पुन्हा विविध शारीरिक खेळ, योग व चर्चा असे वेळापत्रक तयार केले. स्वतः स्वयंसेवक असल्याने संघाच्या शाखेत होणाऱ्या खेळांचे महत्व माहीत होतेच, त्यामुळे त्याचा मोठा उपयोग झाला असे डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले. शिवाय घरातसुद्धा आम्ही नैसर्गिक उपचार पद्धती वापरत असून मागील दोन महिन्यांपासून आम्ही शिजवलेले अन्न खाल्लेले नाही, केवळ नैसर्गिक आहार घेतला असल्याचं डॉ. पल्लवी पाटील यांनी सांगितले.

कोविड रुग्ण योग व प्राणायाम करत असतानाचा एक क्षण

52 कोविड रुग्ण झाले बरे!

डॉ. निलेश व डॉ. पल्लवी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या नैसर्गिक उपचार पद्धतीमुळे पुढील तीन दिवसांनंतर हळू हळू कोविड रुग्ण सर्वसामान्य झाले होते. सुरुवातीला त्यांची जी भीती व चिंतायुक्त चर्या झाली होती ती प्रसन्न व आत्मविश्वासाने भारलेली दिसत होती. दोन आठवडे त्यांना क्वारांटाईन करण्यात येऊन नंतर डिस्चार्ज देण्यात येत होता, तेव्हा जातानाही त्यांचे डोळे पाणावले होते. डॉक्टर दाम्पत्य व त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे कश्या पद्धतीचे नाते निर्माण झाले होते हे यावरून लक्षात येते. केवळ नैसर्गिक उपचार घेत कोणत्याही औषधी विना 52 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले होते. 

चार नवीन रुग्णांवर पुन्हा प्रयोग!

भडगाव येथे जिल्हाधिकारी महोदयांचा दौरा असता त्यांना डॉ. निलेश यांनी हा अहवाल दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या नाविन्यपूर्ण प्रयोगाची पुन्हा निश्चिती करून पाहण्यासाठी चार नवीन रुग्णांची डॉ. निलेश व डॉ. पल्लवी यांना शुश्रूषा करायची होती. 7 व 8 जूनला त्यांच्याकडे आलेल्या चार रुग्णापैकी एक 70 वर्ष वयाचे व दुसरे 80 वर्ष वयाचे रुग्ण होते. विशेष म्हणजे दोघांनाही न्युमोनियाची लागण झाली होती व अन्य दोन रुग्ण सामान्य होते. पूर्वीच्या नैसर्गिक उपचार पद्धतीनुसार या रुग्णांवर उपचार सुरू झाले. खेळ सुरू झाले. सकारात्मक संवाद व व्यायाम करण्यास सुरुवात झाली. 

कोविड रुग्णाची 14 दिवस पूर्ण होण्याअगोदर पुन्हा टेस्ट करता येऊ शकत नाही. परंतु, हा एक प्रयोग असल्यामुळे चारही रुग्णांची केवळ तीन दिवसात कोविड टेस्ट करण्यात आली व 14 जून रोजी आलेल्या रिपोर्टमध्ये टेस्ट निगेटीव्ह आली होती. त्यामुळे एक मोठे यश या डॉक्टर दाम्पत्याच्या हाताला आले होते. त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतूक वर्षाव झाला. या रुग्णांचा उपचार करताना शिजवलेले अन्नपदार्थ टाळत केवळ नैसर्गिक वनस्पती व फळ अश्या अन्नपदार्थांचा त्यांनी वापर केला होता. यामध्ये 'क जीवनसत्व' असलेले आंबा, संत्री, लिंबू अश्या फळांचा समावेश करण्यात आला होता. 

कोविडमुळे होणारे बहुतेक मृत्यू कोरोनाच्या भीतीमुळे!

कोरोनाचे बहुतेक मृत्यू हे त्याची भीती बाळगल्याने होत असून भीती न बाळगता नियमित व्यायाम व नैसर्गिक उपचार पद्धती केल्यास कोविडवर यशस्वी मात करता येऊ शकते असे डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले. ते ज्यावेळेस भडगाव कोविड सेंटर येथे उपचार करत होते तेव्हा त्यांनी कोविड रुग्णांच्या मनातील कोरोनाविषयी भीती सर्वप्रथम काढून टाकली. त्यांना अस्पृश्यसारखी वागणूक मिळत होती ती थांबवली व त्यांच्यात मिळून मिसळून भीतीच्या जागी उत्साह व आत्मविश्वास निर्माण केला. हा विश्वास प्राप्त करण्यासाठी त्यांनी एका रुग्णाचा वाढदिवस साजरा करताना त्याच्या हातून पेढाही खाल्ला. तो रुग्ण बरा जाऊन घरी जात असताना त्याने सांगितले की तुम्ही जेव्हा माझ्या हातून पेढा खाल्ला तेव्हाच आम्ही कोरोनामुक्त झालो होतो. 
------------------------------------------------------
कोविड रुग्णांना नैसर्गिक उपचार करतानाचा व्हिडीओ पाहण्यासाठी  येथे  Click करा.
-------------------------------------------------------
कोरोनाविषयी भीती बाळगू नका पण निष्काळजी होऊ नका असे डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले. भारतात दरवर्षी लाखो लोक टीबीने मारतात, मलेरिया मुळे लाखो लोक मारतात, त्यांची आपण कधी अशी आकडेवारी दाखवीत नाही. त्यामुळे त्या आजाराविषयी आपण भीती बाळगत नाही, तर गंभीर असतो. कोरोना बाबतीत तसाच विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

(डॉ. निलेश पाटील यांची मुलाखत पाहण्यासाठी येथे Click करा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या