"कर्मयोगी बाबा जोगदेव"। काही आठवणी..

नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती..

"कर्मयोगी बाबा जोगदेव"

आज कोरोनाच्या महामारीमध्ये संघाचे स्वयंसेवक जीवावर उदार होऊन सेवाकार्य करत आहेत, त्यामुळे संघाची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. केवळ सेवाकार्य केल्याने ही विश्वासार्हता वाढलेली नसून "सेवा कार्य करणारा जो स्वयंसेवक आहे त्याचे चारित्र्य कसे आहे, तो योग्य संस्कारित आहे कां? यावर समाजात ही विश्वासार्हता अवलंबून असते. 

संघामधे माणूस संस्कारित करण्याचे काम संघाच्या स्थापनेपासून सुरू आहे. संघाने "माणूस घडविण्याच्या (संस्कारित करण्याच्या) या महायज्ञात सामील झाले त्या भाग्यवानात आपले आदरणीय कै. त्र्यंबक श्रीधर जोगदेव उर्फ बाबा जोगदेव होते.

बाबा जोगदेव यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जांभळी या गावी सर्वसाधारण कुटुंबात झाला. बाबांना चार भाऊ व तीन बहिणी होते. ऋषींचे जात व कुळ पाहू नये तसा बाबांचा लौकिक इतिहास फारच कमी जणांना माहित असेल. 

बाबा बालपणापासून संघ शाखेत जात होते. शिक्षण झाल्यावर टपाल व तार खात्यात नोकरीला लागले. बाबांचा विवाह पुणे येथे निर्मलाबाईं बरोबर  झाला. विशेष म्हणजे त्यांच्या विवाह समारंभाला प. पू. डॉ. हेडगेवार उपस्थित होते. नोकरीच्या  निमित्ताने त्यांंच्या नाशिक, धुळे, जळगांव जिल्ह्यात विविध तालुक्यात बदल्या झाल्या. कोणत्याही गावात बदली झाली तरी शाखेत जायचा क्रम कधी चुकला नाही. मी पहिल्यांदा पाहिलेले बाबा जोगदेव मला बळीराम पेठेतील त्यांच्या भाडेकरु म्हणून राहात असलेल्या घरातील आठवतात. बाबांना दोन मुले व एक मुलगी होते. सर्व घर संघ संस्कारात वाढलेले असल्यामुळे घर संघमय होते.

जळगांवात दोन स्वयंसेवक असे होते की, त्यांचा स्वभाव अबोल परंतु क्रियाशील होता. पोषाख सारखा (धोतर व नेहरू शर्ट) नियमित वेळेवर सदंड व शाखा वेशात शाखेत जाणारे. आपल्या नोकरीच्या ठिकाणी नेमून दिलेले काम चोख करणारे, तेथे असलेल्या सहकार्यांबरोबर चांगली वर्तणूक ठेवणारे असे बाबा जोगदेव व दुसरे दादा अभ्यंकर हे होते.

आणीबाणी लागण्यापूर्वी बाबांकडे जिल्हा कार्यवाह असे दायित्व होते. त्यामुळे त्यांचा पूर्ण जिल्ह्यात प्रवास असायचा. प्रवासामुळे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे सहचारिणीचे योगदान असते. निर्मलाताई राष्ट्र सेविका समितीच्या सेविका होत्या. भारतीय जनसंघाच्या त्या शहर महिला आघाडीच्या प्रमुख होत्या. हसतमुख व सर्वांशी गोड बोलणे याने त्यांनी महिलांची मने जिंकली होती. जनसंघाच्या सर्व आंदोलनात त्या कमलाबाई प्रभुदेसाई यांचे बरोबर सहभागी असत. बाबांनी पोस्टल कॉलनीत घर बांधले व घराचे नाव "वात्सल्य" ठेवले.

आणीबाणी पर्व संघ कार्यकर्त्यांना अडचणीचे गेले. बाबांना 'मीसा'खाली अटक होऊन नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. आणीबाणी व संघबंदीच्या विरोधात अनेक स्वयंसेवक सत्याग्रहात भाग घेऊन स्वतःला अटक करुन घेत होते. या सत्याग्रहात माझा मित्र मुकुंद जोगदेव (बाबा जोगदेव यांचे चिरंजीव) यानेही भाग घेतला होता. त्याला तीन महिन्याची शिक्षा झाली होती. १९७७ मधे आणीबाणी उठल्यावर सर्व संघ कार्यकर्त्यांची जेल मधून मुक्तता करण्यात आली.

या काळातच ते नोकरीतून निवृत्त झाले.निवृत्तीनंतर सहचारिणीची जास्त आवश्यकता असते, परंतु दुर्दैवाने  बाबांना या सुखापासून वंचित व्हावे लागले. १९८० मधे निर्मलाताईंचे कँसरने निधन झाले. बाबांचे पुढील आयुष्य कसे गेले असेल ? कुटुंबातील सर्वांनी त्यांना  कायम  आदरानेच वागविले.

बाबांचा स्वभाव एखाद्या घटनेवर खूप आनंद वा शोक प्रकट न करणारा होता. त्यांची वाटचाल स्थितप्रज्ञतेकडे जाणारी होती. आयुष्यात सर्व प्रथम स्थान संघानुकूल जीवन जगण्यात घालवले. "की घेतले व्रत न आम्ही अंधतेने" असे हे व्रत स्विकारल्यावर संघात केवळ समर्पणाचाच विचार येतो. बाबांनी हे व्रत जीवनभर आंगिकारले. अशा जीवनव्रतीच्या शब्दाला नैतिक आधिष्ठान प्राप्त होते.

काही प्रसंग जीवनात असे येतात की ते कायम स्मरणात राहतात. मी सायं विभाग प्रमुख असतांना घडलेला प्रसंग. जिल्हा संघचालक माननीय कै. डॉक्टर दादा आचार्य होते. माझेकडे सायं शाखांचे दायित्व होते. रविवारचा दिवस होता सायं शाखांचे सांघिक रामदास सायं शाखेवर (गोलाणी मार्केट नसतांना कॉटन मार्केटचे ग्राऊंड) होते. जिल्हा संघचालक मा. दादा आचार्य त्या सांघिकला येणार होते.

निरनिराळ्या शाखांमधून बाल स्वयंसेवक रामदास शाखेवर येत असल्यामुळे शाखा दहा मिनिटे उशिरा लागली. मा. दादा वेळेवर शाखेत उपस्थित होते. उशिरा शाखा लागल्याने, मी सायं विभाग प्रमुख असल्यामुळे मला सर्व स्वयंसेवकासमोर अपमानास्पद बोलले. त्या घटनेचा राग माझ्या मनात होता. परंतु शाखा चालु असतांना संघचालक पदाचा योग्य तो मान देऊन शाखा झाल्यावर, मी माझ्या मनातील डॉक्टरांबद्दलचा राग शहर कार्यवाहांकडे  व्यक्त केला. डॉ. आचार्य यांचे व्यक्तीमत्व असे होते की बरेचजण त्याच्या समोर अनौपचारिक गोष्टी करायलाही संकोच करत. मी हट्ट धरला होता की, डॉक्टरांनी सर्व स्वयंसेवकासमोर माझा अपमान केला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी. बाबा जोगदेवांना या घटनेची माहिती समजली ते लगेच डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी "असे घडायला नको होते" अशी सुचक जाणीव डॉक्टरांकडे केली.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर माझ्या दुकानात आले, कालच्या शाखेत घडलेल्या घटनेचा उल्लेख न करता आपल्याला सायं शाखेचा विचार करण्यासाठी एकत्र बसायचं आहे. "पुढील रविवारी बसू." येवढ्या साध्या संवादातून माझा डॉक्टरांवर असलेला राग दूर झाला. मळभ दूर झाले. ही किमया बाबा जोगदेवांची होती.

१९७८ मधे जळगांव जनता सह. बँकेची स्थापना झाली. त्या वेळी अनेक संघ कार्यकर्त्यांना बँकेत नोकरी मिळाली. बाबांनी ठरवले असते तर त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्या मुलास बँकेत नोकरीस लावले असते. परंतु बाबांनी मुलास बँकेत नोकरीसाठी बोलणे टाळले.

बाबांचा फार पूर्वी संघ शिक्षा वर्ग झाला होता. ते तृतीय वर्ष शिक्षित होते. शाखेतील प्रत्येक शारिरिक कार्यक्रमात ते सहभागी असत. शाखेत जातांना सदंड शाखावेष असावा असा त्यांचा आग्रह असे. ते उत्तम शिशु शिक्षक होते. शिशुंचा गण घेणे फारच अवघड असते. उदा. शिशुंचे रंजक खेळ घेणे व त्यांना कार्यक्रमात गुंतवुन ठेवणे इ. बाबा शिबीरामधे भोजनगृहात भोजन तयार करणाऱ्याला मदत करत असत. अशी विविध कामे करतांना मी बाबांना पाहिले आहे.

बाबांचे बौद्धिक ऐकण्याचा योग कधी आला नाही. बाबांचे सहजपणे वागणे संघ विचारांशी अनुकूल असे होते त्याला कृत्रिमतेची झालर कधी लावावी लागली नाही. बाबा जुन्या पठडीतले स्वयंसेवक होते, त्यामुळे त्यांच्यात अनावश्यक कर्मठपणाचा दोष येऊ शकतो परंतु बाबांमधे तसा कर्मठपणा नव्हता. बाबांची नात सौ. प्रतिमा अमेरिकेला असतांना तिने आग्रहाने बाबांना अमेरिकेत येण्याचे निमंत्रण पाठवले. नातीच्या प्रेमाखातर त्यांची विदेशवारी झाली. 

जळगांव शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रांत संघचालक मा. प्रल्हादजी अभ्यंकर यांना स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी जळगांव येथे बोलवावे असे ठरले. मा. प्रांत संघचालक येणार असतील तर कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे  व कार्यक्रमाचे निमित्त असे असावे की सर्व स्वयंसेवक उपस्थित राहतील. बाबांना वयाची ८० वर्ष पूर्ण होऊन ८१ वर्षात पदार्पण केले होते. कार्यकर्त्यांनी जोगदेव कुटुंबीयांना भेटुन, बाबांच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केल्या निमित्ताने सहस्त्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम घ्यावा अशी कल्पना सुचविले.

बाबा स्वतःचा सत्कार या माध्यमातून करुन घेतील अशी शक्यता नव्हती. त्यामुळे कांही ज्येष्ठ स्वयंसेवकांनी बाबांना भेटून असे सांगितले की या निमित्ताने मा. प्रल्हादजी अभ्यंकर जळगावला येऊ शकतात व त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य स्वयंसेवकांना मिळेल, असे सांगितल्यावर त्यांनी सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम घेण्यास अनुमति दिली. परंतु कोणताही सत्कार स्विकारणार नाही, अशी अट सांगण्यास विसरले नाही. या जाहीर कार्यक्रमात मा. प्रल्हादजींचे समयसुचक उदबोधन झाले. मोठ्या संखेने स्वयंसेवक उपस्थित होते. मला वाटते बाबांचा जाहीर सत्काराचा हा पहिलाच कार्यक्रम असावा. या काळातही बाबा नियमित सायकलवर विवेकानंद प्रभात शाखेत जात असत. कर्म फलाचा त्याग करत गीतेत सांगितल्या प्रमाणे कर्म योगी जीवन बाबा जगले.

अखेर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला अंतिम सत्याला सामोरे जावेच लागते. बाबांच्या वयाच्या ९० व्या वर्षी त्यांना कँसरचे दुखणे सुरू झाले, कोणताही मेडीकल इलाज न करता ११ एप्रिल २००८ मधे त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

- दीपक गजानन घाणेकर

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या