जलज्वलनतेज हिंदुस्थानी वीरांगना - राणी लक्ष्मीबाई


- स्नेहल दिनेश विसपुते

इतिहासाच्या भव्य आकाशात आपल्या दिव्य तेजाने तळपनाऱ्या दैदिप्यमान  नक्षत्रांपैकी एक प्रमुख तारका म्हणजे मनिकर्निका. वाराणसी येथे मोरोपंत तांबे यांच्या पोटी माणिकर्णिकाचा जन्म झाला. मोरोपंत तांबे मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे. परंतु, नंतर ते पुणे येथे पेशव्यांच्या सेवेत रुजू झाले. मनू तिथेच मोठी झाली. पेशवे दरबारी मनूला सैनिकी शिक्षण मिळालं. घोडेस्वारी, तलवारबाजी, नियुद्ध अश्या युद्धकलांमध्ये ती निपुण झाली. पेशव्यांच्या वाड्यात बागडणाऱ्या मनुचा 1842 मध्ये झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव यांच्याशी विवाह झाला आणि इथूनच माणिकर्णिका 'झाशीची राणी लक्ष्मीबाई' म्हणून नावारूपास आली.

याचकाळात लक्ष्मीबाई देशातील एकूण परिस्थिती बघत होत्या. ब्रिटिश शासन भारतातील एक एक संस्थान कधी युद्ध करून तर कधी कधी जाचक कायदे लादून आपल्या काबूत करत होते. अनेक संस्थाने त्यांनी आपले मांडलिक बनवले होते. ब्रिटिश संपूर्ण भारतावर आपले अधिराज्य मिळवण्याच्या प्रयत्नात आहे हे लक्ष्मीबाईंनी ओळखले होते.

1851 मध्ये लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु, दुर्दैवाने त्या बालकाचा बाल्यावस्थेतच मृत्यू झाला आणि याच काळात ब्रिटिशांनी दत्तक विधान नामंजूर करणारा कायदा अस्तित्वात आणला. ज्या राजांना आपली स्वतःची अपत्ये नाहीत त्यांचे उत्तराधिकारी नेमण्यावार ब्रिटिशांनी पायबंद घातला. परंतु गंगाधररावांनी ते अमान्य केले. ब्रिटिश शासन त्यामुळे फारच चिडले.

पुढे एके दिवशी गंगाधररावांचा मृत्यू झाला आणि झाशी संस्थानची जबाबदारी लक्ष्मीबाईच्या हाती आली. प्रजेवर जाचक कर लादून, शेतकऱ्यांची व सामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्यामुळे ब्रिटीशांविरुद्ध जनतेतही असंतोष पसरतच होता. याकाळात राणी पूर्णपणे तुटून गेल्या होत्या. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्या विधवा झाल्या होत्या. इंग्रज राज्य बळकावण्याच्या मागावर होते. चारही बाजूंनी परिस्थिती बिकट होती. राणी लक्ष्मीबाई अश्या कठीण अवस्थेत सापडल्या होत्या जिथे त्याचा दुखःला आणि संकटांना तोड नव्हती.

गंगाधररावांच्या मृत्यू पश्चात ब्रिटीशांनी झाशीवर ताबा मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. दत्तक पुत्रावर खटला देखील भरला. राज्याची  सगळी संपत्ती देखील जप्त केली. गंगाधर रावांनी घेतलेल्या कर्जाला लक्ष्मीबाईंच्या मिळकतीतून कापण्यास सुरुवात केली, त्यामुळे लक्ष्मीबाईंना झाशीचा किल्ला सोडून राणी महालात जावे लागले. या संकटांमुळे राणी लक्ष्मीबाई घाबरल्या नाहीत, विचलित झाल्या नाहीत. राज्य ब्रिटीशांच्या ताब्यात जाऊ द्यायचे नाही या आपल्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या. कसही करून आपलं राज्य वाचवायचचं या निर्धाराने त्यांनी सैन्य संघटन करण्यास सुरुवात केली.

७ मार्च १८५४ रोजी इंग्रजांनी एक राजघोषणा प्रसिद्ध करून झाशीचे संस्थान खालसा केले. राणी लक्ष्मीबाई या अन्यायामुळे जळफळत असतांनाच इंग्रज अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाई यांना भेटण्यासाठी आला. त्याने झाशी संस्थान संपुष्टात आणले गेल्याची राजघोषणा वाचून दाखवली. संतापलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे एलिसने परत जाण्याची अनुज्ञा मागताच चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे त्या म्हणाल्या,''मै मेरी झाशी नही दूँगी!'', हे ऐकून अपमानित व हतबल होऊन एलिस निघून गेला. परंतु, ब्रिटिश शांत बसणार नाहीत हे राणी जाणून होती. 

लक्ष्मीबाईंनी इतर राज्यांच्या मदतीने सेना तयार केली, या सेनेत लोकांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. या सैन्यात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता, त्यांना युद्धाचे विशेष प्रशिक्षण दिल्या गेले. लक्ष्मीबाईंच्या या सैन्यात युद्ध कुशल आणि विद्वान असे गुलाम खान, दोस्त खान, खुदाबक्श, सुंदर-मुंदर, काशीबाई, मोतीबाई, लालाभाऊ बक्षी, दिवाण रघुनाथ सिंह, दिवाण जवाहर सिंह यांच्या समवेत 1400 सैनिक सहभागी होते.

तिकडे ब्रिटिशांविरुद्ध धगधगत असलेला जनतेचा ज्वालामुखी मंगल पांडेंच्या रुपात अखेर फुटला आणि याचे लोण लवकरच झाशीपर्यंत येऊन पोहोचले. राणी याच दिवसाची वाट पाहत होती. झाशीचे सैन्य व ब्रिटिश यांच्यात युद्धाला प्रारंभ झाला. 

'मेरी झांशी नहीं दुंगी..! छाती असेल त्यांनी घेऊन पहावी!' झाशीची कडक बिजली अशी गडगडली मात्र, तोच बुंदेलखंड भर घनघोर वादळाचा हुंकार झाला! जिकडे तिकडे रक्ताचा शिळांधार पाऊस झोड देत उठला. सागर नौगाल, बांदा , बाणापुर, शहागड, कर्की- तेथील आकाशाच्या बिंदू बिंदुतून उल्कापाताचे  - अग्निगोलकांचे आंधळे पणाने सोसाटत चालले!

झाशीच्या सैन्याने ब्रिटिशांवर चांगलाच हल्लाबोल केला. तात्या टोपे यांच्या नेतृत्वात झाशीची सैन्य ब्रिटिशांचा सामना करत होते. गोरे सैनिक पडत होते. परंतु तोफेच्या माऱ्यामुळे किल्ल्याचा एक तट कोसळला आणि ब्रिटिश सैन्याने आत प्रवेश केला. ब्रिटिशांच्या अत्याचाराला सीमा राहिली नाही. त्यामुळे राणीला तिथून निघावे लागले. युवराज दामोदरसह राणी काल्पी येथे सुखरूप येऊन पोहचली. तेथे तात्या टोपे यांनी लक्ष्मीबाईंना मदत केली. त्याचबरोबर तेथील पेशव्यांनी देखील राणीला काल्पी इथं आश्रय दिला आणि त्यांचे सैन्य राणींच्या मदतीसाठी दिले.

काल्पी येथेही ह्यू रोज चालून आला. तिथे राणीने ह्यू रोजला मात दिली, परंतु पुन्हा झालेल्या लढाईत राणीला माघार घ्यावी लागली व राणीने तेथून निघून ग्वाल्हेर जवळ केले. ग्वाल्हेर संस्थान राणीने आपल्या ताब्यात घेतले. ग्वाल्हेरवरही ब्रिटिशांनी हल्ला चढवला. ही निर्णायक लढाई असल्याचे लक्ष्मीबाईच्या लक्षात आले. राणीचा प्रचंड उत्साह पाहून सैन्याला बळ आले. तिच्या दोन दासीही पुरुषी वेशात शस्त्रसज्ज झाल्या होत्या. 

18 जूनच्या सकाळीच युद्धाला प्रारंभ झाला. आभाळातून वीज कोसळावी तशी राणी लक्ष्मीबाई आपला पुत्र पाठीशी बांधून घोड्यावर स्वार होत ब्रिटिशांवर तुटून पडली. राणीने कित्येक गोऱ्यांच्या धडाचे आपल्या तलवारीने तुकडे केले. राणीच्या सैन्याने ब्रिटिशांच्या रक्ताचे सडे पाडले. परंतु, ब्रिटिशांच्या दूरवरून येणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या एक एक वेध घेत होत्या. राणी घायाळ झाली होती. अश्या परिस्थितीत राणीला रघुनाथसिंग यांनी जवळच असलेल्या बाबा गंगादास यांच्या मठात जाण्यास सुचवले. रामचंद्र राव यांनी ब्रिटिशांची नजर चुकवून राणीला त्या मठात आणले. राणीच्या हृदयाची धडधड येथे हळुवार शांत होत होती. 

रक्ताने लालभडक पडलेली ती रणलक्ष्मी रणशय्येवर  पहुडली आणि तिच्या मृण्मय पिंजऱ्यातून उडून तिचा आत्मा चिन्मय रुपी सारूप्य पावता झाला... याच ठिकाणी राणी लक्ष्मीबाईच्या इच्छेनुसार रामचंद्ररावांनी गवताच्या गंजीची चिता तयार केली आणि त्या तेजस्वी काली प्रमाणे भासणाऱ्या पवित्र देहाला कुठल्याही राक्षसाच्या स्पर्शाने अपवित्र होण्या अगोदर अग्निदेवतेच्या स्वाधीन केले. 

भारत मातेला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी तळमळणारी राणी कायमची निघून गेली परंतु तिच्या अद्भुत शौर्याने पुढे असंख्य देशभक्त जन्मास आले. राणी लक्ष्मीबाई आजही आपल्या मनामनात जिवंत आहे.

(लेखिका वकील आहेत व दुर्गावाहिनीच्या कार्यकर्त्या आहेत) 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या