संत निवृत्तीनाथ समाधी सोहळा दिवस

आज जेष्ठ कृष्ण द्वादशी अर्थात वारकरी संप्रदायातील आद्य संत श्री. निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई ह्या चार भावंडापैकी निवृत्तीनाथांनी सर्वात शेवटी समाधी घेतली. अवघ्या आठचा महिन्यांच्या कालावधीत ह्या चारही भावांनी समाधी घेऊन त्यांचे अवतारकार्य संपवले. ह्या सर्वांच्यां समाधी सोहाळ्याचे अत्यंत हृदयद्रावक असे वर्णन संत नामदेवांनी अभंगरुपाने केले आहे. हे वर्णन वाचताना अक्षरशः डोळ्यात अश्रू उभे राहतात.

मुक्ताईने निर्गमन केल्यानंतर चार भावंडांपैकी आता फक्त निवृत्तीनाथच उरले होते. आपल्या भावंडांशिवाय त्यांचे मन कुठेच लागत नव्हते. म्हणून आता आपणही समाधी घ्यावी असे त्यांच्या मनात वारंवार येऊ लागले. निवृत्तीनाथ पांडूरंगाला म्हणाले की, देवा ! आता तुम्ही मला त्वरेने त्र्यंबकेश्वरला घेऊन चला. निवृत्तीनाथ म्हणतात -
जे जे आम्ही सुख आठविले मना । त्याचा नारायणा आठव होतो ।।

नारायणा ! आधीच्या सुखाच्या आठवणी आठवल्या की मनाला फार टोचते.

जेष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणे । केले नारायणे उफराटे ।।

वडीलधाऱ्यांच्या अगोदर लहानांनी समाधिस्त होणे, म्हणजे देवा तू फार उफराटे केले. आज जमिनीवरील पाणी आड्याला गेल्यासारखे वाटत आहे.

यानंतर पांडूरंगाने गरूड विमान सज्ज केले. त्यात सगळे संत, वैष्णव, ऋषीमुनी यांच्यासहित विठोबा व रखूमई बसले आणि ते सप्तशृंगीच्या दिशेने निघाले. सोबत देवताही त्यांची विमाने घेऊन निघाले. तेथे गेल्यावर सर्वांनी आदिमाया शक्तीची पुजा केली आणि सप्तशृंग गडाला प्रदक्षिणा घातली. यानंतर सर्वजण पंचमीच्या दिवशी नाशिक येथे पंचवटीस आले.

पंचमीचे दिवशी गेले पंचवटी । उतरले तटी गौतमीचे ।।

तेथे पंचवटीत उतरून सर्वजण गौतमी गोदावरीत स्नान करण्यासाठी गेले. यानंतर निवृत्तीनाथांनी सूंदर नारायणांची तेथे पुजा केली. 

सूंदर नारायणा गौरविले फार । केला नमस्कार वैष्णवांनी ।।

अशा प्रकारे दशमी पर्यंत सर्वजण तेथेच थांबले. नंतर एकदशीच्या दिवशी सर्वजण त्र्यंबकेश्वरी आले. तिथे त्यांनी एकादशीचे व्रत केले.

एकदशी व्रत वद्य जेष्ठ मासी । उत्सव निवृत्तीसी देवे केला ।।

दुसऱ्या दिवशी द्वादशीला निवृत्तीनाथांसहित सर्वांणी एकादशीचे पारणे सोडले. नारायणाने सर्व ऋषीमुनींना पंगतीला बसवले आणि स्वतःच्या हाताने सर्वांना भोजनासाठी पात्रे वाढली. पुंडलिकाने त्या सर्वांना जेवण्यासाठी वाढले. स्वतः निवृत्तीनाथांना पुंडलिक, पांडूरंग व रखूमाईने घास भरवला.

भोजने उरकल्यावर नारा, महादा आणि गोंदा यांना देवाने समाधीस्थळाच्या गुहेत पाठवून तेथे झाडलोट करून यावयास सांगितले. पुंडलिकाने निवृत्तीनाथांच्या गळ्यात तुळशीपत्रांची माळ घातली. समाधीस्थळी बेल, मंजूळा, तुळशीपत्रे यांची पाने अंथरूली. यांनतरचे निवृत्तीनाथ सर्वांचा निरोप घेऊन समाधीच्या आसानावर बसले व त्यांनी सर्वांना अखेरचा नमस्कार केला. 

यानंतरचे वर्णन अत्यंत हृदयद्रावक आहे.
नामदेव महाराज वर्णन करतात -

निवृत्ती देवासाठी स्फुंदती ऋषीश्वर । लाविला पदर डोळीयांसी ।।
गरूडावर पुंडलिके घातियेला साज । जाती निवृत्तीराज समाधीसी ।।
चालती विमाने वाजतसे घंटा । उठा आता भेटा अवघेजण ।।
समाधी भोवती कुंकुमाचे सडे । पाहती निवाडे योगिराज ।।
कीर्तन गजरी गेलीसे मंडळी । बैसले ते पाळी समाधीच्या ।।
नामा म्हणे आता धरवेना धीर । येती गहिवर वोसंडोनी ।।

अशा रितीने निवृत्तीनाथ समाधीस्थळाच्या गुहेत प्रवेश करत असताना तेथील ऋषीमुनींसहित सर्वांना फार गहिवरून आले. सर्वजण पदराने आपापले डोळे पुसू लागले. पुंडलिकाने गरूडावर साज पांघरला आणि निवृत्तीनाथांना वैकुंठास नेण्यासाठी तो सज्ज झाला. निवृत्तीनाथ समाधिस्त होताच देव सूरवरांची विमाने चालू लागली, त्यांच्या घंटा वाजू लागल्या. समाधीभोवती कुंकवाचा सडा पडलेला होता. सर्वजण म्हणाले - आता निवृत्तीनाथ समाधिस्त झाले. चला आपण एकमेकांची भेट घ्या. अशा रितीने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. नामदेव नारायणाला म्हणाले - देवा आता आम्हाला धीर धरवत नाही. अशा रितीने तेथील सर्वांना ओसंडून रडू आले.

नामदेव महाराज म्हणतात, 
नामा म्हणे आता निवृत्तीसारिखा योगी । नाही आता जगी दाखावया ।।

अशा प्रकारे जेष्ठ कृष्ण द्वादशीच्या दिवशी आद्यसंत निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वरी समाधी घेतली.

✍️ गजानन जगदाळे

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या