केसरी, मराठा व डोंगरीचा तुरुंगवास
@ कल्पेश गजानन जोशी
----------
लोकमान्य टिळक व आगरकर यांचे शिक्षण विषयात एकमत होत होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्य पद्धती नसलेली व गोऱ्या शिक्षकांचा वावर नसलेली शाळा काढण्याचे ठरवले. ब्रिटिश शिक्षक त्यांच्या शाळांमधून सातत्याने स्वधर्म, स्वराज्य, भारतीय संस्कृती व परंपरा यांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात विष कालवत होते. टिळकांना विष्णुशास्त्री चिपळूणकर, ज्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाई त्यांनी 'न्यू इंग्लिश स्कूल' च्या स्थापण्यासाठी मदत केली.
या शाळेत सुरुवातीला १५० व तीन महिन्यानंतर पटावरील संख्या पाचशेच्या वर गेली होती. या शाळेने पहिल्याच वर्षी जगन्नाथ शंकर शेठ ही स्कॉलरशिप मिळवली. पुढे वर्षभरानंतर विद्यार्थी संख्या एक हजारहून अधिक झाल्यानंतर व मॅट्रिकचा निकाल ८९ टक्के लागल्यानंतर गव्हर्नरने खास पत्र लिहून शाळेचा गौरव केला.
टिळक व आगरकर यांनी पुढाकार घेऊन नंतर 'केसरी' व 'मराठा' वृत्तपत्र सुद्धा सुरू केली. 'केसरी' हे मराठी भाषिक होते, तर 'मराठा' हे इंग्रजी भाषेत निघत होते. या केसरी चे पहिले संपादक विष्णुशास्त्री चिपळूणकरच होते. त्यांच्या निबंधमालेमुळे त्यांची ख्याती झालीच जोती. टिळकांना मात्र लिखाणाचा भारी कंटाळा होता. त्यांचे लेख ते तोंडी सांगत व लेखक टंकलिखित करी. गीतारहस्य हा महान ग्रंथ मात्र टिळकांनी स्वतःच्या हाताने पेन्सिलने लिहिला आहे.
या वृत्तपत्रात विष्णुशास्त्री वाङ्मयावर लिहीत. इतिहास, अर्थशास्त्र, व सामाजिक विषयावर आगरकर लिहीत, तर हिंदू धर्मशास्त्र व कायदा विषयावर टिळक लिखाण करत असत. याच केसरीमधून कोल्हापूरच्या तत्कालीन छत्रपती शिवाजीराव यांची बाजू घेऊन खोट्या पत्रांचा संदर्भ घेऊन लिखाण केले, अश्या आरोपाखाली टिळक व आगरकरांना चार महिने तुरुंगवास भोगावा लागला आहे.
कोल्हापूरचे दत्तक महाराज शिवाजीराव यांचा कारभाऱ्यांमार्फत इतका छळ होत होता की त्यांना वेडे ठरविण्यात आलं होतं. तेव्हा छत्रपतींची बाजू घेऊन टिळक आगरकरांनी लिखाण केले. त्यात कारभारी रा. ब. बर्वे यांनी शिवाजीरावांवर विषप्रयोगाचा कट केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणाच्या असून इंग्रज प्रशासनावरही आसूड ओढण्यात आले होते. तथापि हा आरोप खोट्या पत्राच्या आधारे केला असल्याचे सांगून टिळक व आगरकरांवर बर्व्यांनी खटला भरला. टिळकांकडे या प्रकरणातील अस्सल पत्रेही होती. परंतु, कोल्हापुरच्या सरदार मंडळींनी आमची पत्र प्रसिद्ध करू नका अशी गळ घातल्यामुळे टिळकांचा निरुपाय झाला. शेवटी टिळक-आगरकरांनी बर्व्यांची माफी मगितल्यानंतरही त्यांना १०१ दिवसाचा तुरुंगवास ठोठावला गेला.
याच तुरुंगवासात आगरकरांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकाचं 'विकार विलसीत' हे भाषांतर केलं. तसेच डोंगराच्या कारावासाविषयी 'डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस' हे पुस्तक लिहिले. २६ ऑक्टोबर १८८२ रोजी टिळक व आगरकरांची तुरुंगातून मुक्तता झाली तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जवळजवळ दोन हजार लोक जमले होते. जागोजागी त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वतः महात्मा फुले यांनीही टिळक व आगरकरांच्या सत्कार केला.
टिळकांच्या आयुष्यातील हा पहिला तुरुंगवास होता. तेव्हा त्यांचं वय होत २५ वर्ष. इतक्या कमी वयात टिळकांचा न्यू इंग्लिश स्कुल, केसरी, मराठा व डोंगरीचा तुरुंगवास अश्या वेगवेगळ्या अनुभवातून प्रवास झाला. त्यामुळे त्यांच मन वज्रदेही झालं व नंतर इंग्रजांशी लढताना ते अभंग राहिलं.
Kavesh37@yahoo.com
संदर्भ- अरविंद ताटकेलिखित 'लोकमान्य टिळक' लघुग्रंथ
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या