@ कल्पेश गजानन जोशी
रामजन्मभूमी अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार म्हंटल्यावर काँग्रेससह अन्य रामजन्मभूमीच्या विरोधकांचे चांगलेच पोट दुखू लागले आहे. मागील गेल्या कित्येक वर्षात विशिष्ट पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामाजिक संघटनेचे कथित सामाजिक कार्यकर्ते रामजन्मभूमीचा निकाल कसा हिंदूंच्या विरोधात लागेल यासाठी उठाठेव करत होते. दिग्गज वकिलांची फौज यासाठी तयार करण्यात आली होती. परंतु, गेल्या पाचशे वर्षांपासून रामजन्मभूमी साठी लढा देणाऱ्या हिंदू समाजाला अखेर न्याय मिळाला. प्रभू रामचंद्राचे अस्तित्व नाकारांऱ्यांचा पराभव झाला. भारताच्या इतिहासात ९ नोव्हेंबर, २०१९ हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला.
आता ५ ऑगस्ट २०२० रोजी मंगल मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या नगरीत मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. देशातील सेक्युलॅरीजमच्या नावाखाली हिंदूंना दुय्यम महत्व देणाऱ्या विशिष्ट पक्ष व नेत्यांना मात्र अजूनही श्रीराम मंदिर निकाल पचनी पडलेला दिसत नाही. कधी कोणीतरी मंदिराच्या जागी बौद्ध संस्कृती असल्याचा दावा करतो, तर कोणी लॉकडाऊन चे कारण काढत भूमीपूजन कार्यात अडथळा आणू पाहतो. डाव्यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर विरोधी मत व्यक्त केले. मार्केडेय काटजू यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालावर बहुसंख्याकांच्या बाजूने दिलेला निकाल असून हा 'विचित्र निकाल' असल्याचे म्हंटले. जेएनयू मधील टुकडे गँग ने निकालाचा विरोध करत निदर्शने केली. पीएफआय या जिहादी इस्लामिक संघटनेने पुनर्विचार याचिका दाखल केली. तसेच एमआयएम या पूर्वापार विरोध करणाऱ्या कट्टर इस्लामिक पक्षाच्या वतीने औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीही भूमिपूजन प्रतिकात्मकरित्या करण्याचा फुकट सल्ला दिला. परंतु, कोणाचे एक चालले नाही, मा. न्यायालयाने राम मंदिराच्या विरोधात येणाऱ्या याचिका तथ्यहीन असल्यामुळे त्यांना केराची टोपली दाखवली.
पण सुधारतील ते सेक्युलर कसले? पुण्याचे साकेत गोखले नामक महाशयांनीही नुकताच भूमीपूजनात विघ्न आणण्याचा प्रयत्न करून पाहिला. मा. न्यायालयाने त्यांच्याही याचिकेला फटकारले. याचिकाकर्त्याने सोशल डिस्टन्सचे कारण दाखवले असले तरी त्याबद्दल त्यांनी कसलेही पुरावे दिलेले नाही, शिवाय आम्हाला राज्य सरकार व प्रशासनावर विश्वास असल्याचे सांगत ही याचिका फेटाळण्यात आली. रामजन्मभूमीच्या कार्यात खोडा घालणाऱ्या तमाम विरोधकांना ही चपराक आहे.
साकेत गोखले यांचे राहुल गांधींसोबतचे फोटो वायरल झाले आहेत. त्यामुळे साकेत गोखले हे कोणी सोडलेलं पिल्लू आहे हे वेगळे सांगणे नको. राम मंदिर भूमिपूजन सोबतच त्यांनी विधानसभा निवडणूक दरम्यान भाजपशी संबंधित व्यक्तीला मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सोशल मीडिया चालवण्याचे कंत्राट दिले होते, असा गौप्यस्फोट केला. अर्थात हा विषय राजकीय असला, तरी यानंतर भाजप व संघाच्या काही लोकांनी त्यांच्या घरासमोर येऊन 'जय श्री राम' च्या घोषणा दिल्या व त्यांच्या मातोश्रींना धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी ताबडतोब याची दखल घेतली. करिष्मा भोसले या तरुणीला जेव्हा जिहाद्यांकडून धमक्या येत होत्या, तिच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात होता तेव्हा गृहमंत्री मूग गिळून गप्प होते. या तरुणीला सुरक्षा देण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही. परंतु गोखलेंना लगेच संरक्षण मिळाले. जणू काही शस्त्रधारी गुंड किंवा नक्षलवादीच त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. ज्या नामाचा जयघोष ऐकून समाज स्वतःला सुरक्षित समजतो, त्या नामघोषाने गोखले महोदयांना भय वाटते, हेही आश्चर्यच आहे.
अयोध्येत राम मंदिराचे आता भूमिपूजन होत आहे, उद्या कलशारोहन होईल. प्रत्येकवेळी ही मंदिरविरोधी 'भुतं' काहीना काही कारण काढून मंदिराला गालबोट लावण्याचा प्रयत्न करील. देशातील बहूसंख्य समाज ज्या प्रभू रामचंद्रांना आपले आराध्य मानतो, त्या हिंदू समाजाशी या पक्ष व नेत्यांना देणेघेणे वाटत नाही. एक वर्ग अपल्या अश्या भूमिकांवर नाराज होईल, त्याचा परिणाम मतदानावर होईल याचीही धास्ती त्यांना राहिलेली नाही. देशातील कट्टरतावादी मुस्लिम, जिहादी संघटना, डावे कम्युनिस्ट, समाजवादी, काँग्रेसी असे सारेजण मिळून राम मंदिरविरोधी अघोषित आघाडी तयार करत आहेत. न्यायालयाने कितीही फटकारले तरी भविष्यात हिंदू समाजाला भारताची अस्मिता व स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या राम मंदिराचं रक्षण करावं लागणार आहे. ज्यांनी 'निर्लज्जम सदासुखी' हा मंत्र आपल्या माथ्यावर कोरला आहे, त्यांच्यापासून सतत सावध राहायला हवे.
Kavesh37@yahoo.com
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या