असे झाले कारगिल युद्ध - संक्षिप्त मागोवा

@विशाल पाटील

स्वातंत्र्य पूर्वोत्तरापासूनच काश्मीर हा भारताचा अभिन्न सांस्कृतिक घटक राहिला आहे. ब्रिटीश सत्ताक अविभाजित भारताचे दोन भाग फिरंगीवृत्तीने केले ते १९४७ च्या वर्षी. इंग्रजांनी भारताचे आर्थिक व मानसिक शोषण पार खोलापर्यंत केले होते. १५० वर्षांपर्यंत चाललेल्या या शोषणात भारतीय मानसिकता गुलामी स्वभावाची बनवण्याचा अतोनात प्रयत्न त्यांनी केला. याचीच प्रचिती म्हणून आपणास आजही इंग्रजांची तोंडसुख प्रशंसा करतांना अनेक मंडळी सहज डोळ्यासमोर दिसते. स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या पाकिस्तानाने काश्मीरचे स्वप्न बाळगत भारतावर अनावश्यक युद्धे लादली. तरीही तीन युद्धात पाकिस्तानला भारताकडून सपाटून मार खावा लागला.

वर्ष होते १९९९ चे, जम्मू-काश्मीरचा उत्तरी भाग. या उत्तरी भागात असलेली भारत व पाकिस्तानास भेदणारी नियंत्रण रेषा जाते. या नियंत्रण रेषेस इंग्रजीत लाईन ऑफ कंट्रोल(LOC) म्हटले जाते. नियंत्रण रेषेलगतचा भाग अत्यंत काठिण्य परिस्थितीने नि वातावरणाच्या शीत प्रतिकुलतेने वेढलेला असा आहे. उंच उंच नभभेदी शिखरे, विस्तीर्ण कणखर पाषाण, अरुंद चढाई आणि साधनांच्या अभावांनी युक्त बर्फाच्छादित प्रदेश. यांच्या लगतचाच भारतीय हद्दीतील जिल्हा म्हणजे कारगिल. लेह व कारगिल मिळूनच लडाख पूर्ण होतो. या उंच डोंगरांवर आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपले सैनिक चौकी लावून रक्षण करीत असतात. परंतु नोव्हेंबर-डिसेंबर चा महिना येताच हा भाग बर्फाच्या शीतल चादरिने पांघरूण ओढतो. या काळात पलीकडील पाकिस्तानी तर अलीकडील हिंदुस्थानी सैन्य खाली येते. पुन्हा मे महिन्यात बर्फ ओसरण्यास सुरुवात झाल्यावर सैन्य आपल्या चौकी हातात घेते. हा सालाबादचा क्रम. परंतु आपल्या पूर्वयोजना आखलेला पाकिस्तान याने १९९९ साली फेब्रुवारी ते में या महिन्यातच भारतीय चौकी हस्तगत करण्याचे अभियान हाती घेत संपूर्ण चौक्या काबीज केल्या. 

भारतीय मेंढपाळ 'ताशीनाम ग्याल' यांनी तत्काळ सैन्याच्या हे लक्षात आणून दिले की आपल्या हद्दीत शत्रू जाळे टाकीत शिरलाय. तत्काळ एक भारतीय सैन्याचा चमू तेथे गेला असता पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर दारू गोळ्याचा चा वर्षाव सूरु केला आणि अनाकलनीय हानी तेथे घडली. आपल्या गेलेल्या चौक्या पुन्हा मिळवायच्या, हा वीरभाव धरून भारत तथा पाकिस्तान या दोन देशांमध्ये ३ में १९९९ ला युद्ध पेटले. पाकिस्तानाने हस्तगत केलेल्या भारतीय चौक्या उंचावर असल्या कारणाने त्यांद्वारे मार करणे अत्यंत सहज व सोपे होते. भारतीय वीरांना मात्र चढाई करत लढा देणे संघर्षपूर्ण जिकिरीचे होते. 

श्रीनगर पासून थेट लेहला जोडणारा एकमात्र राष्ट्रीय महामार्ग १ डी भूतलीय दुवा म्हणून आपली भूमिका बजावतो. याच मार्गाने सैन्याला संपूर्ण लष्करी रसद पुरवली जाते. लेह मार्गे तीच रसद पुढे सियाचीनलाही मिळते. हा मार्ग नियंत्रणात घेत लेह व सियाचीनचा संपर्क तोडायचा आणि भारताला काश्मीरमुद्यावर चर्चेसाठी नमते करण्याचा निश्चय पाकिस्तानी योजनेचा मुख्य उद्देश होता. याच चौकीवरून अत्याधुनिक आयुधांचा उपयोग केल्यास कारगिल येथील सैन्यभवनावरही हल्ला करणे शक्य होते. यांविरुद्ध भारतीय थळसेनेने अभियान 'विजय' तर वायुदलाने अभियान 'सफेद सागर' आरंभीले. 

मे सारखा उष्ण महिना असताही या प्रदेशात -२८℃ पर्यंत तापमान असते. म्हणजे हाडे गोठवून टाकणारी शुभ्रच्छादित थंडीच. या प्रतिकूल वातावरणामध्ये उंचावर शत्रूविराजीत असल्यामुळे त्यास पराजित करण्यासाठी रात्री लढा देण्याचे भारतीय सैन्याचे ठरले. प्रत्येक साधन शत्रूसाठी जमेची बाजू असतांना केवळ धैर्याच्या बळावर आपल्या वीर जवानांनी शत्रूस नरसिंह धडक देण्यास सुरुवात केली. "वर चढाई करायची असल्या कारणाने ४०-५० किलोचा सामानाचा झोला खांद्यावर घेत जेवण आणि पाण्याची कुठलीही शिदोरी सोबत न बांधून दारू गोळा हीच आमची भूख वाटायची, कारण अन्न पाण्याविना जगणे शक्य होईल परंतु शत्रूची गोळी आपणास संपवता कामा नये" असे युद्धातील प्रत्यक्षभागी कॅप्टन अखिलेश सक्सेना आनंदाने सांगतात. परमवीरचक्र कॅप्टन विक्रम बत्रा नेहमी म्हणत असत "मला छेदू शकेल अशी कुठलीही शत्रूची गोळी बनलेली नाही." 
"ये दिल मांगे मोर" हे तर त्यांचे विधान अजरामरच झाले. एक एक करत अनन्य साधारण विरतेचे उदाहरण प्रस्तुत करत भारतीय सेनेने विक्राळ शक्तीनिशी शिखरावर कब्जा करून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना आपल्या अदम्य धैर्याचा परिचय करविला. 

१३ जून १९९९ ला 'तोलोलिंग शिखर' वीर जवानांनी शत्रूच्या जबड्यातून मुक्त केले. ज्यामुळे पुढील कारवाईत त्यांना मदद झाली. लवकरच २० जूनला पॉईंट ५१४० वर देखील जयाचा नाद दुमदुमून गेला. आणि पूर्णपणे तोलोलिंग शिखर पुन्हा भारताच्या रक्षणात आले. ४ जुलैला पुन्हा एक विजय नोंदल्या गेला. तो म्हणजे टायगर हिलवर पुन्हा राष्ट्रनिशान फडकू लागताच संपूर्ण युद्ध आपल्या विजयाच्या बाजूने झुकलेले असतांना पाकिस्तानी सैन्य सळो की पळो झाले. याच प्रकारे क्रमाक्रमाने पाकसैन्यास ढकलत ढकलत संपूर्ण शिखरांवर भारताने पुनःताबा घेतला. भारताची रेजिमेंट १४ ने बलशाली बोफोर्सद्वारा पाक सैन्यास निशाणा बनवत दारूगोळ्यांच्या अनियंत्रित जंत्रीच्या माऱ्याने हैराण करून सोडले. भारतीय वायुदलानेही आकाशातून इंद्रवज्राप्रमाणे आघात सुरूच ठेवले. 

समोर मृत्यू उभा असलेला बघून पाकसैन्य कावरे बावरे होऊन बसले. पाकिस्तानचे असंख्य सैनिक यात मारल्या गेले. संपूर्ण जग भारताच्या बाजूने ठामपणे उभे होते. पाकिस्तानच्या साथीला कुणीही धजावले नाही. "जगभर आम्हाला या युद्धाचा दोषी मानले गेले" असे पाकिस्तानचे तत्कालीन विदेश सचिव शमशाद अहमद खान सांगतात.पाकसैन्याचे निवृत्त लेफ्टनेंट जनरल अली कुली खान मानतात की पाकिस्तानी इतिहासातील सर्वात मोठा पराभव म्हणजे कारगिल युद्ध आणि या युद्धात अनेक निरपराध प्राणास मुकले. या लज्जास्पद पराभवानंतर जगभर पाकिस्तानाची एक जबाबदार देश म्हणून सिद्ध करण्यात कुटनीतिक स्तरावर प्रचंड कसरत झाली. पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत सैन्याने परवेझ मुशर्रफच्या नेतृत्वात पाकिस्तानची सत्ता बळकावली. आजच्याच २६ जुलै १९९९ च्या दिनी केसरिया बाण्याने हा विजय संपादिला. 

युद्धात शहिद झालेल्या त्या अमर स्मृतींना सभाव विनम्र आदरांजली.
जय हिंद !

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या