#आठवणी_रामजन्मभूमी_आंदोलनाच्या
धाराशिवहून एक कुटुंब जेव्हा कारसेवेसाठी निघालं...
----------
अयोध्येतील राम मंदिर आंदोलनासाठी १९८८ ते १९९२ या काळात मोठ्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त कारसेवा बजावण्यासाठी गेले होते. यामध्ये लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत माता-भगिनी सगळ्यांनी सहभाग घेतला होता. येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे अयोध्या नगरीत पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होणार असल्यामुळे 'जीवनाचे झाले सार्थक' अशी भावना या तमाम रामभक्तच्या मनात निर्माण झाली आहे. कधी एकदा प्रभू रामचंद्रांचे भव्य दिव्य मंदिर बघतो व रामचंद्राच्या चरणी मस्तक टेकवितो अशी अवस्था साऱ्याच हिंदु बांधवांची झाली आहे. देवगिरी विश्व संवादतर्फे अश्याच काही कारसेवामध्ये सहभागी झालेल्या रामभक्तांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितलेले अनुभव प्रचंड रोमांचकारी व प्रेरणादायी असल्याचे लक्षात आले.
अनुभव कथन- सौ. सुवर्णा मिलिंद कौलगी, पुणे
मूळच्या धाराशिव येथील राहणाऱ्या सुवर्णा मिलिंद कौलगी या सुद्धा कारसेवा बजावत राम मंदिर आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. बालपणापासून 'अयोध्या', 'कारसेवा', 'राम मंदिर' हे शब्द ऐकतच त्या मोठ्या झाल्या. घरामध्ये हिंदुत्वाचे वातावरण होते. धाराशिव येथील भारतराव मसलेकर यांच्या त्या कन्या होत.
सुवर्णताई सांगतात, मशिदीचे कुलूप उघडणे, आयोध्यातून आलेली ज्योत घरात लावणे हे सर्व शब्द लहानपणी कानावर पडत होते. अनेक कारसेवक आयोध्याला जाऊन परत येत होते. अशातच आम्हीही आयोध्याला कारसेवेमध्ये जाण्याचे ठरवले. तेव्हा मोठा प्रतिसाद मिळाला. खूप जणांनी सहभाग घेतला. आई, वडील, मावशी व बहीण असे आम्ही होतो. आम्ही सगळे जण अयोध्याकडे निघालो व दोन दिवसाचा प्रवास करुन रेल्वेने अयोध्या पर्यंत पोहोचलो.
अयोध्यामध्ये मोठी गर्दी जमली होती. आम्ही रामललाचे दर्शन घेतले. चार महिन्याचा बाळापासून ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्व रामभक्त तेथे जमले होते. सर्वत्र रामाचा जयघोष आणि चैतन्य पसरले होते. तेथील लोक खूप सहकार्य करत होते. ६ डिसेंबर चा दिवस उजाडला तेव्हा रॅली सुरू झाली होती. सर्व कारसेवक रामभक्त बाबरी मशिदीच्या समोर गोळा झाले होते. तेव्हा अचानक काही तरुणांनी घुमटावरवर चढून त्याला पाडण्यास सुरुवात केली. एकेक करत खूप जण वरती गेले आणि काही तासांच्या आत घुमट जमीनदोस्त झाले. तेव्हा सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सगळीकडे रामाचा जयघोष सुरू झाला होता". अयोध्येतील त्या जोशपूर्ण वातावरणाचा अंदाज यावरून येऊ शकतो.
सुवर्णताई सांगतात की "बाबराला मुक्ती देण्यासाठी मशिदीच्या विटा शरयू नदी मध्ये टाका" असे सगळे जण त्यावेळी सांगत होते. ताई सांगतात, आमचे काका रमेश पाटील यांनीही तसेच केले. परंतु नंतर त्यांना तंबूत यायला खूप उशीर झाला आणि सर्वजण खूप चिंतेत पडले. परंतु काही वेळानंतर ते परत आले. आम्हाला आनंद झाला.
बाबरी ढाचा पडला त्या दिवशी रात्री कोणीही झोपू नका असा सावधगिरीचा इशारा देऊन सूचना देण्यात आली होती. त्यामुळे सर्वजण जागे राहिले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. छोट्याशा चबुतऱ्यावर रामाची मूर्ती विराजित करण्यात आली होती. पुन्हा पुन्हा त्या मूर्तीचे रूप बघत रहावे असे वाटत होते. रामललाचे दर्शन घेऊन नंतर परतीचा प्रवास सुरू झाला.
वाटेत आमच्या रेल्वेतील एक जण टपावरून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई आणि दादा तिथेच राहिले. मी, मावशी आणि बहीण मात्र परत निघालो. खूप जण सोबत होते. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवस एकाच ठिकाणी आम्हाला राहावे लागले. आम्हाला तरीही खाण्यापिण्याची कसलीही चिंता पडलेली नव्हती. लोक खूप सहकार्य करत होते.
अशाप्रकारे काहीशा आनंदात व दुःखात आम्ही घरी पोहोचलो घरी आल्यानंतर आमचे मोठे स्वागत झाले. आता पाच ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे, त्याबद्दल खूप छान वाटत आहे. खूप आनंद होत आहे. सर्व वातावरण चांगले झाल्यानंतर पुन्हा रामललाच्या दर्शनाला जाण्याची आतुरता लागली आहे."
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या