पोलिसांनी गिट्टीचा मारा केला, जखमी झाले, तरीही 'त्यांनी' अयोध्या गाठलीच!

#आठवणी_रामजन्मभूमी_आंदोलनाच्या

पोलिसांनी गिट्टीचा मारा केला, जखमी झाले, तरीही 'त्यांनी' अयोध्या गाठलीच!

अयोध्येतील राम मंदिर आंदोलनासाठी १९८८ ते १९९२ या काळात मोठ्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त कारसेवा बजावण्यासाठी गेले होते. त्याचवेळी जालना जिल्ह्यातील शेकडो रामभक्त आयोध्येत जात होते. कारसेवा करत होते. जालना शहरातील मुरलीधर त्र्यंबकराव काकड यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या कारसेवेचा अनुभव सांगितला. त्यावेळी श्री काकड हे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक होते आणि तब्बल सहाशे रामभक्त कार्यकर्त्यांसह ते अयोध्येकडे रवाना झाले होते. 

श्री. काकड यांनी सांगितले, की जेव्हा उत्तरप्रदेश कानपुरकडे रेल्वेने आमचा प्रवास सुरु होता तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जागोजागी उत्तरप्रदेश सरकारतर्फे ठेवण्यात आला होता. रामभक्तांना अडविण्याचा प्रयत्न सुरू होता. कानपूरच्या जवळ आले असताना आमच्या असे लक्षात आले की रेल्वेच्या बोग्या मागच्या मागे काढण्यात येत आहे व रामभक्तांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. तेव्हा सगळ्यांनी ठिय्या मांडला व जोपर्यंत आमचे अन्य सहकारी कारसेवक आमच्यासोबत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. तेव्हा कानपुरपासून २५ किलोमीटर दूर सिआरपीएफ च्या कॅम्प मध्ये या सर्व रामभक्तांना बंदिस्त करण्यात आले. यामध्ये कर्नाटक व तामिळनाडूचेही रामभक्त आलेले होते. त्या ठिकाणी एक दोन दिवस गेल्यानंतर कारसेवकांनी युक्ती केली व त्या कॅम्पमधून ते पसार झाले व सर्वजण पायी अयोध्येच्या दिशेला लागले.

परंतु, या रामभक्तांचा संघर्ष संपलेला नव्हता. ज्या भागातून कारसेवक जात होते तिथे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंग यांचे भाऊ पालकमंत्री होते. गोळीबार न करण्याच्या सूचना पोलिसांना होत्या. त्यामुळे सरकारी आदेशावरून पोलिसांनी रामभक्तांवर गिट्टीचा (खडी) मारा सुरू केला व त्यांना पांगवण्याचा  प्रयत्न झाला. अनेक रामभक्त त्यात जखमी झाले. तरीही कोणी ऐकेना, अयोध्येच्या मार्गावरून कोणीही मागे फिरत नव्हते. तेव्हा रामभक्तांच्या मदतीला तत्कालीन महापौर सरला बेन व माजी खासदार आले पण त्यांनाही पोलिसांनी मारायला सुरुवात केली. तेव्हा सरला बेन यांच्यासाठी रामभक्तांनी सुरक्षा तयार केलं व त्यांना तिथून बाहेर काढलं. अनेक जण जखमी झाले. त्यावेळी श्री काकड यांच्यासोबत जालन्याचे दुर्गेश अग्रवाल, भोकरदनचे गणेश आवटे होते. संभाजीनगरचे राजीव जहागीरदार होते. नांदेडचे राटेकर, दत्ता शिंदे असे बरेच कार्यकर्ते होते. 

मारहाण झाल्यामुळे श्री काकड हे बेशुद्ध झाले होते. त्यांना लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले. पोलिसांवर मारहाण केल्याचे कारणे सांगून या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. तेव्हा या सगळ्या कार्यकर्त्यांना जामीन मिळावा म्हणून विश्व हिंदू परिषदच्या केंद्रीय मंत्र्यांनी मदत केली तसेच लालजी टंडन, विनय जी कट्यार, विहिम्प केंद्रीय मंत्री विनायकराव देशपांडे यांनी मदत केली व जामीन मिळाला. 

हे सर्व रामभक्त १३ दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर जेव्हा कानपुरला गेले तेव्हा तेथील हिंदू समाजाने त्या सर्व रामभक्तांचे भव्य स्वागत केले. तेथील लोक या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा तुमच्या गावी जायचे असेल तर आम्ही मदत करतो असे म्हणत होते. परंतु "आम्ही अयोध्येला जाण्याचा संकल्प करूनच आलो आहोत, रामाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही असे त्यांनी सांगितले". त्यावेळी अशोकजी (सिंघल) यांनी दूरध्वनीवरून या रामभक्तांशी संवाद साधला व त्यांना अयोध्येत कारसेवकपूरम येथे आणण्यात आले. 

अयोध्येत पोहचल्यानंतरचा अनुभव सांगताना श्री काकडे भावुक झाले. अशोकजी सिंघल यांनी श्री काकडे यांच्या पाठीवर हात फिरवून मोठ्या आपुलकीने विचारले, "बेटा, बहोत मारा है क्या?" तेव्हा श्री काकड़े यानी त्यांना "नही. कुछ ज्यादा नही" ऐसे उत्तर दिले. हा प्रसंग म्हणजे माझे भाग्य थोर की अशोकजी सारख्या व्यक्तीशी माझी प्रत्यक्ष भेट झाली व त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर या सर्व रामभक्तांची तिथे राहण्याची सोय करण्यात आली. श्रीरामाचे दर्शनही झाले. सर्व राभक्तांचा संकल्प पूर्ण झाला. श्री काकडे म्हणतात की आमचे भाग्य आहे की आमच्या जीवनात आम्ही मंदिर उभं राहताना बघत आहोत. 

अश्या पद्धतीने राम मंदिर आंदोलनात लक्षावधी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यामध्ये लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत माता-भगिनी सगळ्यांनी सामील झाले होते. येत्या ५ ऑगस्ट बुधवार रोजी राम मंदिराचे अयोध्या नगरीत पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होणार असल्यामुळे 'जीवनाचे झाले सार्थक' अशी भावना या तमाम रामभक्तच्या मनात निर्माण झाली आहे. कधी एकदा प्रभू रामचंद्रांचे भव्य दिव्य मंदिर बघतो व रामचंद्राच्या चरणी मस्तक टेकवितो अशी अवस्था तर साऱ्याच हिंदु बांधवांची झाली आहे. देवगिरी विश्व संवादतर्फे अश्या काही कारसेवामध्ये सहभागी झालेल्या देवगिरी प्रांतातील रामभक्तांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितलेले अनुभव प्रचंड रोमांचकारी व प्रेरणादायी असल्याचे लक्षात आले. 

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या