@ देविदास देशपांडे
मोबाईल : ८७९६७५२१०७
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी श्री अरविंद यांचा उल्लेख केला. ही अत्यंत उल्लेखनीय आणि गौरवास्पद गोष्ट म्हणायला हवी. याचं कारण म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपण नेहमी क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकीय नेते यांचाच उल्लेख करतो. परंतु भारत हा मुळातच अध्यात्मिक देश आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी येतो आणि हाच दिवस योगी श्री अरविंद यांचा जन्मदिवस तर रामकृष्ण परमहंस यांचा समाधी दिन असतो, हे आपल्या गावीही नसते. आधुनिक भारताच्या मनामध्ये अस्मितेची पेरणी करणाऱ्या या दोन क्रांतदर्शी साधू पुरुषांच्या जीवनाशी निगडित तारखेलाच भारताचा स्वातंत्र्यदिन जोडला जावा, हा नियतीचा केवढा मोठा योगायोग आहे! तरीही या गोष्टीकडे आजवर नाही म्हटलं तरी दुर्लक्ष झाले आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी श्री अरविंद यांचा उल्लेख करणे अतिशय संयुक्तिक ठरते. इतकेच नाही तर श्री अरविंद यांचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
श्री अरविंद यांचे स्वप्न काय होते?
या उत्तराचे दोन पैलू आपल्याला सांगता येतात. एक पैलू आहे तो क्रांतिकारक अरविंद घोष यांचा आणि दुसरा पैलू आहे योगी श्री अरविंद यांचा. आयुष्याची आरंभीची वर्षे इंग्लंडमध्ये काढल्यानंतरसुद्धा अरविंद घोष हे मनाने पूर्णपणे भारतीय होते. त्यांच्या काळातील बहुतांश पुढारी ब्रिटिशांकडे विनंती व याचना करून स्वातंत्र्याची मागणी करत होते. ब्रिटिशांचा राज्यकारभार वाईट आहे आणि आम्ही आमचा कारभार उत्तम करू, हा त्यांचा युक्तिवाद होता. परंतु, संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे अरविंद घोष हे पहिले नेते होते. “ब्रिटिशांचा कारभार उत्तम असो अथवा वाईट, आमच्या देशात राज्य करण्याचा नैसर्गिक अधिकार आम्हाला आहे. आमच्या मातृभूमीवर आमचाच हक्क आहे. ब्रिटीश हे परके आहेत. त्यामुळे त्यांनी निघून जावे,” हा त्यांचा आग्रह होता.
“भारतात असहिष्णू वातावरण आहे म्हणून इतर देशांनी हस्तक्षेप करावा” किंवा “आम्ही देश सोडून जातो” अशी भाषा करणाऱ्यांना पुरेपुर उत्तर देणारी ही विचारसरणी आहे. दुसरा भाग आहे तो, योगी श्री अरविंद यांच्या स्वप्नाचा. दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यानिमित्त योगी अरविंद यांनी आकाशवाणीला एक संदेश दिला होता. या संदेशात योगी अरविंद म्हणतात, “ज्या स्वातंत्र्यासाठी कधीकाळी मी प्रयत्न केले होते तो दिवस माझ्या जन्मदिनी यावा ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. परंतु भारताची फाळणी झाली आहे. भारतभूमीची अखंडता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे स्वातंत्र्य अपूर्ण मानले जाईल. भारत हे अखंड राष्ट्र आहे आणि ते कधीही खंडित करता येणार नाही.” ते पुढे म्हणतात, “मनुष्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्राची सुद्धा एक नियती असते. भारताची नियती ही अध्यात्मिक नियती आहे आणि जगाला अध्यात्माचा प्रकाश दाखवणे हेच भारताचे कर्तव्य आहे.”
हा संदेश लक्षात घेतला तर आपण दोन अर्थ काढू शकतो. एक म्हणजे ‘पाकव्याप्त काश्मीर’ असे ज्याला म्हटले जाते तो भाग परत घेऊन भारताच्या अखंडतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणे. दुसरा भाग म्हणजे अध्यात्माच्या रूपाने भारताने विश्वगुरू बनणे.
इथे काही बाबी नोंद घेण्यासारख्या आहेत. एक म्हणजे, पाकिस्तान टिकणार नाही ही भविष्यवाणी श्री अरविंद यांनी १९४७ मध्ये केली होती. त्याची प्रचिती अवघ्या पंचवीस वर्षांच्या आत आली आणि पाकिस्तानचे तुकडे झाले आणि बांगला देश अस्तित्वात आला. दुसरे म्हणजे ६ वर्षांपूर्वी मोदी यांनी लाल किल्ल्यावरूनच बलुचिस्तानमधल्या संघर्षाचा उल्लेख केला होता. आज आपण पहात आहोत की, बलुचिस्तान आज फुटतो की उद्या, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा वर्षानंतर पंतप्रधान मोदी परत असाच काहीसा संदेश तर देत नाहीत ना?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंतप्रधानांच्या या भाषणाला पार्श्वभूमी होती ती कोरोना महामारीची. या चिनी विषाणूने जगभरात हाहाकार माजविला असताना बहुतांश जगाने मानसिक आधारासाठी भारतीय संस्कृती जवळ केली आहे. ‘नमस्ते’सारख्या भारतीय परंपरा जग स्वीकारत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जेव्हा श्री अरविंद यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प जाहीर करतात त्यावेळी त्याला मोठे मोल येते.
प्रकट उच्चार न करता हवा तो संदेश देण्यात पंतप्रधान मोदी वाकबगार आहेत. याही वेळेस एका वाक्यात श्री अरविंद यांचा उल्लेख करून त्यांनी केवढा मोठा आशय दिला आहे!
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या